हनुमान जयंतीनिमित्त गाडगीळ पटांगणात रंगला पालखी सोहळा

नगर – श्री हनुमान जयंतीनिमित्त नालेगाव येथील गाडगीळ पटांगणामध्ये भव्यपालखी सोहळ्याचे आयोजन  करण्यात आले होते. उत्सव- मूर्तीच्या पालखीची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या साथीत आणि जयघोषात भक्तिमय
वातावरणात पार पडली. या पालखी सोहळ्यात गावातील महिला, पुरुष, युवक आणि लहानग्यांनी मोठ्या उत्साहाने
सहभाग घेतला. भक्तगणांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून भगवंताच्या नामस्मरणात सहभागी होत सोहळ्याची
शोभा वाढवली आणि टाळ मृदूंगाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी परिसरात सर्वत्र उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी ग्रामस्तांनी सडा रांगोळी टाकत पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी भक्तांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.नालेगाव गाडगीळ पटांगण येथे हनुमान जयंती- निमित्त पालखी सोहळा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल, सुनीता मुदगल उपस्थित होते.

दत्तात्रय मुदगल म्हणाले की, आज आपण प्रभू श्रीरामाचे प्रिय भक्त, श्री हनुमानजींच्या जयंतीनिमित्त येथे एकत्र आलो आहोत. हनुमानजी हे पराक्रम, भक्ती, नम्रता आणि निष्ठेचं मूर्तिमंत प्रतीक आहेत. हनुमानजींचं चरित्र हे अत्यंत प्रेरणादायी आहे. रामायणात त्यांच्या पराक्रमाने आणि बुद्धीने संपूर्ण विश्व थक्क झाले. त्यांचा नम्र स्वभाव आणि प्रभू  रामावर असलेली अखंड भक्ती. त्यांनी कधीही आपला अभिमान केला नाही, उलट मी प्रभू रामाचा सेवक आहे असे म्हणत, नम्रतेने जीवन जगले. आपल्याला हनुमान जयंती निमित्त हाच संदेश घेऊन जायचा आहे, की आपण ही त्यांच्या गुणांचा आदर्श घेऊन, सत्य, निष्ठा, मेहनत आणि भक्ती या मूल्यांनी आपले जीवन घडवूया, असे ते म्हणाले

नगर पुणे महामार्गावरील घाटात मकाच्या गोण्यांचा ट्रक पलटी

चालक गंभीर जखमी, मृत्युंजय दूताच्या तत्परतेने मिळाले उपचार

नगर – नगर पुणे महामार्गावर कामरगाव (ता.नगर) घाटातील धोकादायक वळणावर मकाच्या गोण्या घेवून चाललेल्या मालट्रकला ११ एप्रिल रोजी दुपारी भीषण अपघात झाला. हा मालट्रक रस्त्यावर पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झाला आहे. हरी मारुती खेडकर (वय २३, रा. दहीगाव शे, ता.शेवगाव) असे जखमी चालकाचे नाव आहे. त्यास कामरगाव येथील मृत्युंजय दूत म्हणून काम पाहणाऱ्या सिद्धांत आंधळे या तरुणाने तत्परता दाखवत उपचारासाठी तातडीने नगरच्या रुग्णालयात पाठविले. त्यामुळे त्यास वेळेत उपचार मिळाले आहेत.

चालक हरी खेडकर हा सौरभ संतोष सूर्यवंशी (रा.दौंड, जि. पुणे) यांच्या मालकीचा मालट्रक (क्र. एमएच १२ एच डी ७५१५) या मध्ये सिन्नर (नाशिक) येथून सुमारे ६०० ते ७०० मकाच्या गोण्या भरून त्या खाली करण्यासाठी नगर मार्गे शिरूर कडे जात होता. ११ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास कामरगाव घाटात असलेल्या धोकादायक वळणावर त्याचा ट्रक वरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात चालक खेडकर हा गंभीर जखमी होवून ट्रक मध्ये अडकला होता.

या अपघाताची माहिती मिळताच कामरगाव येथील मृत्युंजय दूत सिद्धांत आंधळे या तरुणाने अपघातस्थळी धाव घेत चालक खेडकर यास बाहेर काढले, तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यास उपचारासाठी नगरमधील पॅसिफिक हॉस्पिटल मध्ये पाठविले. आंधळे याच्या तत्परतेने चालक खेडकर याला वेळेत उपचार मिळाले. त्यानंतर आंधळे याने नगर तालुका पोलिस तसेच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले यांना फोन करून घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच नगर तालुका पोलिस तातडीने घटनास्थळी गेले व त्यांनी महामार्गावर पडलेला मालट्रक व त्यातून खाली पडलेल्या मकाच्या गोण्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. मृत्युंजय दूत सिद्धांत आंधळे याच्या तत्परतेचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले यांनी कौतुक केले.

महामानव डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जयंतीपूर्वी नागरिकांसाठी खुला करा : आंबेडकरी समाजाची मागणी

नगर – नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात असलेल्या महामानव, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासारखाच पूर्णाकृती पुतळा अहिल्यानगर शहरात उभारण्याची प्रक्रिया पूर्ण
झाली आहे. दोन-तीन दिवसांवर, १४ एप्रिल रोजी सालाबादप्रमाणे डॉ.आंबेडकर यांची जयंती आहे. हा दिवस तमाम भीमप्रेमी तसेच संविधानप्रेमी सर्वच नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मोठ्या संख्येने नागरिक डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी एकत्र येत असतात. मात्र पुतळ्याचे काम पूर्ण होऊन देखील
त्याचे अनावरण झालेले नसल्यामुळे सदर पूर्णाकृती पुतळा हा अद्यापही नागरिकांसाठी खुला झालेला नाही. जयंतीदिनी भीमप्रेमी, संविधानप्रेमी नागरिकांना अभिवादन करता यावे, यासाठी पुतळा खुला करण्यात यावा, अशी मागणी आंबेडकरी समाजाच्या वतीने योगेश साठे, सुशील कदम, आकाश आल्हाट, अतुल साळवे, मुकेश झोडगे, निखिल शेलार, हनीफ शेख आदींनी मनपा आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेव्दारे ७५
लाख रूपये खर्चून स्टेशन रस्त्यावरील मार्केट यार्ड चौकात सुमारे २८ फुटी (पुतळा दहा फूट व चौथरा अठरा फूट) पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळा, चौथरा, नवीन संसद भवनाच्या प्रतिकृतीसह परिसर सुशोभिकरण, संरक्षण भिंत, बगीचा व अन्य आवश्यक सुविधा आदी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. सदर काम हे महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य
संस्थेच्यावतीने पूर्ण झाले आहे. महानगरपालिका ही एक सरकारी यंत्रणा आहे. पुतळ्याचे काम पूर्ण झाले असल्याने मनपाने सदर पुतळा नागरिकांना जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी उपलब्ध करून देणे ही मनपाची जबाबदारी आहे. तशी तमाम
भीमसैनिक आणि नागरिकांची भावना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागील ३० ते ३२ वर्षापासून आंबेडकरप्रेमी जनतेची मागणी होती. ती स्वप्नपूर्ती झाली आहे. सबब जनभावना लक्षात घेता डॉ. आंबेडकरांचा
पुतळा जयंतीदिनी अभिवादन करण्याकरिता तातडीने नागरिकांसाठी खुला करावा.

‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे मृत्य

नगर – भिंगार, गवळीवाडा येथे महावितरणच्या गंभीर हलगर्जीपणामुळे २ एप्रिल रोजी सचिन भोजेल्लू (वय अंदाजे ४०) यांचा विजेचा शॉक बसून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेतील दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, व मृताच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महावितरणकडे केली आहे. या प्रकरणी मयताच्या पत्नी रेखा भोजेल्लू, कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर
केले. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांच्यासह
अनेक नागरिक उपस्थित होते.

सचिन भोजेल्लू हे आपल्या घरातील पाण्याच्या टाकीतून पाणी घेण्यासाठी लोखंडी जिन्यावरून जात असताना त्यांना अचानक २३० व्हॉल्टचा विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, महावितरणच्या कर्मचार्‍यांनी घरातील संपूर्ण वीज बंद केली होती, तरीही जिन्यावर विद्युत प्रवाह सुरूच होता. हे पाहून कर्मचारी सुद्धा हादरले व संपूर्ण भिंगारचा वीजपुरवठा बंद करण्यात आला, तरीही त्यांना प्रवाहाचा स्त्रोत समजू शकला नाही.

दुर्दैवाने, दुसर्‍याच दिवशी मयताची मुलगी त्याच जागेवरून जात असताना तिलाही विजेचा धक्का बसला. सुदैवाने ती बचावली. यानंतर नागरिकांनी पुन्हा महावितरण अधिकार्‍यांना बोलावले. चौकशीनंतर समोर आले की, पाठीमागील गल्लीतील एका घरामध्ये केबल ऑपरेटरने अ‍ॅम्प्लिफायर लावून बेकायदेशीर वीज वापर सुरू ठेवला होता, ज्यामुळे विजेचा प्रवाह लोखंडी जिन्यावर पोहोचत होता. याप्रकरणी केबल ऑपरेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र विद्युत महावितरणने स्वत:वरील जबाबदारी झटकली असून, ते देखील या प्रकरणाला जबाबदार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. मृताच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी संबंधित दोषी असलेल्या महावितरण कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. घराच्या गच्चीवर
महावितरणच्या वायरी उघड्यावर असून, कोणत्याही क्षणी पुन्हा दुर्घटना घडू शकते, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

एक कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबाला आता कोणत्याही प्रकारे आधार मिळालाच पाहिजे. महावितरणच्या दुर्लक्षित व्यवस्थेमुळे एखाद्याचा जीव गेला, ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कारवाई आवश्यक आहे, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कर्मचारीवर कठोर कारवाई करण्यात यावी, व मृत कुटुंबीयांना आर्थिक व कायदेशीर न्याय मिळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

चौक सजावट व रांगोळी स्पर्धेत चितळे रोडवरील गुगळे परिवाराला दुसर्‍या वर्षीही प्रथम क्रमांक

नगर – भगवान महावीर जयंतीनिमित्त नगरमध्ये सकल जैन समाजाच्यावतीने . शोभायात्रा काढण्यात आली. भगवान महावीर यांचा अहिंसा, शांतीचा संदेश यानिमित्त देण्यात आला. यावेळी आयोजित चौक सजावट व रांगोळी स्पर्धेत सलग दुसर्‍या वर्षी चितळे रोड येथील गुगळे परिवाराने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. गुगळे परिवाराने भगवान महावीर
समवशरण विषयावरील सजावट केली तसेच रांगोळीव्दारे अहिंसा परमो धर्म, एक पेड माँ के नाम हा संदेश दिला. आई ही  प्रत्येकासाठी देवासमान असते. जशी ती आयुष्यभर मुलांना मायेची सावली देते तसेच वृक्ष हे आपल्याला सावली देतात. जगण्यासाठी ऑसिजन देतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे पूर्ण संगोपन केले पाहिजे असे आवाहन यानिमित्त करण्यात आले.

चौक सजावट करताना गुगळे परिवाराने आकर्षक व्यासपीठ उभारून जैन ध्वज फडकावला होता. सजावट व रांगोळीसाठी दरवर्षी संपूर्ण गुगळे परिवार एकत्रित राबत असतो. रांगोळीसाठी स्नेहल गुगळे, काजल गुगळे, प्रतिक्षा गुंदेचा, मीना गुगळे, कोमल गांधी, कु.सिया गुगळे, निखिल गुगळे, शामली रातडीया यांनी परिश्रम घेतले. तसेच चौक सजावटीसाठी नितेश, रोहित, संपतलाल, निखील गुगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. चितळे रोडवरील मिरावली बाबा दर्गाह येथील ट्रस्टींनी तसेच जय श्री महाकाल ग्रुप, चितळे रोड यांनी या सजावटीसाठी विशेष सहकार्य करून एकतेचे दर्शन घडविले.

संपतलाल  गुगळे यांनी सांगितले की, मागील ३६ वर्षांपासून गुगळे परिवार महावीर जयंतीनिमित्त रांगोळी व चौक सजावट करीत आहे. यात परिवारातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे उत्साहात सहभागी होतात. दरवर्षी महावीर जयंती आधी पंधरा दिवसांपासून परिवारात तयारीला सुरुवात होते. यंदा चौक सजावट व रांगोळी अशा दोन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याने आमचा आनंद व्दिगुणित झाला आहे. यावेळी भाविकांना लाडू वाटप करण्यात आले.

भगवान महावीर यांनी विश्वाला शांतता आणि अहिंसेचा संदेश दिला

नगर – महावीरांनी देशाला शांततेचा अहिंसेचा आणि सत्यता, धर्म पालन करण्याचा मोठा संदेश दिलेला आहे. या संदेशाचे मनोभावे पालन करून जैन समाज आजही सर्वात मोठा दानशूर म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. भगवान महावीर यांनी विश्वाला शांतता आणि अहिंसेचा संदेश दिला, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी
केले. आमदार अरुण जगताप हे रुग्णालयातून लवकर बरे होतील व पुन्हा आरोग्यमय जीवन व्यतीत करतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रा.शिरीष मोडक, विद्यालयाचे चेअरमन अजित बोरा, डॉ.पारस कोठारी, प्रा.ज्योती कुलकर्णी, मुख्याध्यापिका डॉ. श्रीमती मंगला भोसले, विठ्ठल उरमुडे, पर्यवेक्षक गोविंद धर्माधिकारी, अशोक डोळसे, दीपक शिरसाठ, नितीन केने, अनंत जोशी, अमोल कदम आदी उपस्थित होते. गुलाब पुष्प देऊन व शब्द सुमनांनी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका डॉ.
मंगला भोसले यांनी केले

भगवान महावीरांबद्दल श्रीमती क्रांती मुंदानकर व रवींद्र चोभे या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयात एन.एम.एम.एस. या परीक्षेत विशेष यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थी चि.प्रतीक सागर वडागळे व त्याच्या पालकांचा विद्यालयाचे ज्येष्ठ लेखनिक गोवर्धन पांडुळे यांचा उत्कृष्ट कामाबद्दल अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे शिक्षक सुनील कुलकर्णी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक दीपक आरडे यांनी
केले. याप्रसंगी शिक्षक व पालक उपस्थित होते.

बाल हनुमान हर्षद आनेचा यांचा अहिल्यानगर शहरामध्ये ‘डंका

नगर – दरवर्षी अहिल्यानगर येथे श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट, श्रीराम मंदिर, नवीपेठ यांच्या वतीने अखंड ३१ दिवसीय सामूहिक हनुमान चालीसा पठण व भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन संध्या कार्यक्रमात बाल हनुमान हर्षद आनेचा उपस्थित असतात.

हर्षद आनेचा बाल हनुमान म्हणून नगर शहराला परीचीत आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून बाल कलाकार हर्षद आनेचा हनुमानाची मनमोहक व आकर्षक वेशभूषा करून बाल हनुमान म्हणून सेवा देत आहेत. श्री हनुमान चालीसा, रामजी की निकली सवारी, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, दुनिया चले ना श्रीराम के बिना, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…, बोल बजरंग बली की जय अशा अनेक संगीतमय भजनांवर नृत्य करून बाल हनुमान हर्षद आनेचा यांनी सर्व नगरकरांना मंत्रमुग्ध केले आहे.

हर्षद आनेचा यांना श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम मुथा, उपाध्यक्ष निखिल शेटीया, मंडळाचे ज्येष्ठ सदस्य अशोक खंडेलवाल, वडील योगेश आनेचा व आई सौ. नंदा आनेचा यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे बाल हनुमान हर्षद आनेचा यांच्यावर बाल वयातच धार्मिक संस्कार झालेले आहेत. अहिल्यानगर शहरामध्ये बाल हनुमान हर्षद आनेचा आणि श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट यांचा डंका गाजत आहे.

महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करुन पुढे जावे

नगर – रूढी परंपरेने बरबटलेल्या समाजाला महापुरुषांनी दिशा देण्याचे कार्य केले. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी करुन समाजाला प्रकाशवाट दाखवली. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांच्या समतेच्या विचारांचा जागर त्यांनी केल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. तर महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या विचारांचा अंगीकार करुन समाजाच्या प्रगतीसाठी पुढे जाण्याचे त्यांनी आवाहन केले.

आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. माळीवाडा वेस
येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम ासाठी राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, पंडितराव खरपुडे, अशोक कानडे, ज्ञानेश्वर रासकर, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, ओबीसी विभागाचे अमित खामकर, डॉ. उध्दव शिंदे, विष्णुपंत म्हस्के, बजरंग भुतारे, अजय दिघे, डॉ. रणजित सत्रे, अशोक हिंगे, सुरज शहाणे, आकाश पांढरे, संतोष हजारे, रेणुका पुंड, बेबीताई गायकवाड, सुरेश कावळे आदी उपस्थित होते.

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, अंधारलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देऊन महात्मा फुले यांनी शैक्षणिक क्रांती
केली. शिक्षणची शक्ती त्यांनी जाणल्यामुळे बहुजन समाजासह महिलांना शिक्षण देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रयत्नाने महिलांना शिक्षणाची दारे उघडी झाली. मुलींसाठी शाळा काढून स्त्री सक्षमीकरणाचा पाया त्यांनी रोवला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सर्वोत्तम जिल्ह्याचा ‘अहिल्यानगर’ला पुरस्कार प्रदान

नगर – अहिल्यानगर जिल्ह्याला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत राज्यात प्रति लाभार्थी अनुदान वितरणामध्ये अहिल्यानगर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. ही कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार बालेवाडी, पुणे येथे राज्यस्तरीय कृषि अधिकारी कार्यशाळे प्रसंगी कृषि मंत्री माणिकराव कोकाटे व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी स्वीकारला. या प्रसंगी
प्रधान सचिव विकास रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषि संचालक विजयकुमार आवटे आदी उपस्थित होते.

अहिल्यानगर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत यावर्षी ५०१ अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आले असून, तीन
वर्षांत ही संख्या १४३५ वर पोहोचली आहे. यामध्ये दुग्धजन्य पदार्थांच्या ३९०, फळे व भाजीपाला प्रक्रियेच्या ४२७, कडधान्य
प्रक्रियेच्या १३०, पशुखाद्य प्रक्रियेच्या ७१, तेलबिया प्रक्रियेच्या ५५, बेकरी प्रक्रियेच्या ५५ तसेच इतर विविध प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व बँका, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक, जिल्हा संसाधन व्यक्तींनी एक संघभावनेने उत्कृष्ट काम केले. याच कामाची पावती मिळाली असून, अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असल्याचे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत राज्यात प्रतिलाभार्थी अनुदान वितरणामध्ये अहिल्यानगर
जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळून राज्यात जिल्ह्याचे नाव राज्याच्या नकाशावर कोरले आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी
प्रति प्रकल्प कर्ज ११ लाख रुपये व ६ लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात ९० कोटी रुपयांचे अनुदान
अन्नप्रक्रिया उद्योगांना वितरित झाले आहे. ह्या वर्षी देखील जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थ्यांना योजनेत सामावून पिकांची
मुल्यसाखळी विकासासाठी काम करण्याच्या सूचना कृषी विभागास दिल्या आहेत, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृतीसाठी मिरावली बाबा दर्ग्यात मुस्लिमांकडून विशेष दुवा

नगर – कापूरवाडी (ता.नगर) येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत सय्यद इसहाक शाह कादरी (रहमतुल्ला अलाहै) मिरावली दर्गा, पहाड येथे माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. या प्रार्थना सोहळ्याचे आयोजन मिरावली दर्ग्याच्या मुजावर कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मिरावली बाबांच्या पवित्र मजारवर चादर अर्पण करून अरुण जगताप यांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी अल्लाहकडे विशेष दुवा करण्यात आली. यावेळी परिसरातील भाविक, श्रद्धाळू आणि वंशावळ विश्वस्त मुजावर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. सध्या अरुण जगताप यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार  सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी उपस्थितांनी एकमुखाने प्रार्थना केली. मिरावली दर्गा हे
विविध धर्म आणि समाजातील लोकांचे श्रद्धास्थान आहे.

येथे नेहमीच लोक एकत्र येऊन एकतेचा आणि सद्भावनेचा संदेश देत असतात. याच परंपरेला पुढे नेत ही विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बाबासाहेब जहागीरदार, हाजी गोटू जहागीरदार, मोईनुद्दीन जहागीरदार, पप्पूभाई जहागीरदार, अल्ताफ जहागीरदार, इरफान जहागीरदार, इम्रान जहागीरदार, राजू जहागीरदार, साहेबान
जहागीरदार, फैजान जहागीरदार, मुन्तजिम जहागीरदार, राजकिन जहागीरदार, मारूफ जहागीरदार, सज्जाद जहागीरदार, कैफ जहागीरदार आदींसह अनेक भाविक उपस्थित होते.

यावेळी एकत्र आलेल्या सर्व श्रद्धाळूंनी अरुणकाकांच्या लवकर बरे होण्यासाठी मनोभावे दुवा केली.