नगर – श्री हनुमान जयंतीनिमित्त नालेगाव येथील गाडगीळ पटांगणामध्ये भव्यपालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उत्सव- मूर्तीच्या पालखीची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या साथीत आणि जयघोषात भक्तिमय
वातावरणात पार पडली. या पालखी सोहळ्यात गावातील महिला, पुरुष, युवक आणि लहानग्यांनी मोठ्या उत्साहाने
सहभाग घेतला. भक्तगणांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून भगवंताच्या नामस्मरणात सहभागी होत सोहळ्याची
शोभा वाढवली आणि टाळ मृदूंगाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी परिसरात सर्वत्र उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी ग्रामस्तांनी सडा रांगोळी टाकत पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी भक्तांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.नालेगाव गाडगीळ पटांगण येथे हनुमान जयंती- निमित्त पालखी सोहळा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल, सुनीता मुदगल उपस्थित होते.
दत्तात्रय मुदगल म्हणाले की, आज आपण प्रभू श्रीरामाचे प्रिय भक्त, श्री हनुमानजींच्या जयंतीनिमित्त येथे एकत्र आलो आहोत. हनुमानजी हे पराक्रम, भक्ती, नम्रता आणि निष्ठेचं मूर्तिमंत प्रतीक आहेत. हनुमानजींचं चरित्र हे अत्यंत प्रेरणादायी आहे. रामायणात त्यांच्या पराक्रमाने आणि बुद्धीने संपूर्ण विश्व थक्क झाले. त्यांचा नम्र स्वभाव आणि प्रभू रामावर असलेली अखंड भक्ती. त्यांनी कधीही आपला अभिमान केला नाही, उलट मी प्रभू रामाचा सेवक आहे असे म्हणत, नम्रतेने जीवन जगले. आपल्याला हनुमान जयंती निमित्त हाच संदेश घेऊन जायचा आहे, की आपण ही त्यांच्या गुणांचा आदर्श घेऊन, सत्य, निष्ठा, मेहनत आणि भक्ती या मूल्यांनी आपले जीवन घडवूया, असे ते म्हणाले