नगर – भगवान महावीर जयंतीनिमित्त नगरमध्ये सकल जैन समाजाच्यावतीने . शोभायात्रा काढण्यात आली. भगवान महावीर यांचा अहिंसा, शांतीचा संदेश यानिमित्त देण्यात आला. यावेळी आयोजित चौक सजावट व रांगोळी स्पर्धेत सलग दुसर्या वर्षी चितळे रोड येथील गुगळे परिवाराने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. गुगळे परिवाराने भगवान महावीर
समवशरण विषयावरील सजावट केली तसेच रांगोळीव्दारे अहिंसा परमो धर्म, एक पेड माँ के नाम हा संदेश दिला. आई ही प्रत्येकासाठी देवासमान असते. जशी ती आयुष्यभर मुलांना मायेची सावली देते तसेच वृक्ष हे आपल्याला सावली देतात. जगण्यासाठी ऑसिजन देतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे पूर्ण संगोपन केले पाहिजे असे आवाहन यानिमित्त करण्यात आले.
चौक सजावट करताना गुगळे परिवाराने आकर्षक व्यासपीठ उभारून जैन ध्वज फडकावला होता. सजावट व रांगोळीसाठी दरवर्षी संपूर्ण गुगळे परिवार एकत्रित राबत असतो. रांगोळीसाठी स्नेहल गुगळे, काजल गुगळे, प्रतिक्षा गुंदेचा, मीना गुगळे, कोमल गांधी, कु.सिया गुगळे, निखिल गुगळे, शामली रातडीया यांनी परिश्रम घेतले. तसेच चौक सजावटीसाठी नितेश, रोहित, संपतलाल, निखील गुगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. चितळे रोडवरील मिरावली बाबा दर्गाह येथील ट्रस्टींनी तसेच जय श्री महाकाल ग्रुप, चितळे रोड यांनी या सजावटीसाठी विशेष सहकार्य करून एकतेचे दर्शन घडविले.
संपतलाल गुगळे यांनी सांगितले की, मागील ३६ वर्षांपासून गुगळे परिवार महावीर जयंतीनिमित्त रांगोळी व चौक सजावट करीत आहे. यात परिवारातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे उत्साहात सहभागी होतात. दरवर्षी महावीर जयंती आधी पंधरा दिवसांपासून परिवारात तयारीला सुरुवात होते. यंदा चौक सजावट व रांगोळी अशा दोन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याने आमचा आनंद व्दिगुणित झाला आहे. यावेळी भाविकांना लाडू वाटप करण्यात आले.