अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आचार्य गुंदेचा यांनी ही वाटचाल सुरु केली होती. त्यामागील कारण म्हणजे लहानपणापासूनच काही तरी वेगळ करायचं अशी मनाशी बांधलेली खूणगाठ, आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे काही देणं लागतो याची जाणीव ठेवत समाजासाठी काही तरी करावं हा विचार, अन्यायाविरुद्ध झगडण्याची वृत्ती, लढावू बाणा आचार्य गुंदेचा यांच्यात जन्मजातच होता असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यामुळे अगदी तरुण वयात स्वातंत्र्य संग्रामातही त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. महात्मा गांधींनी १९४२ मध्ये पुकारलेल्या अंग्रेजो भारत छोडो, चले जाव आंदोलनात सक्रीय सहभाग घेतल्यामुळे त्यांना इंग्रजांनी तब्बल १ वर्ष १० महिने अंधार कोठडीत डांबले होते.
नवामराठाची वाटचाल
सुमारे ५०० पेक्षा जास्त वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या तसेच देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्वाची भूमिका बजावणार्या अहमदनगर शहरात स्व. चंदनमल मोतीलाल गुंदेचा उर्फ आचार्य गुंदेचा यांनी २६ जानेवारी १९५७ रोजी दैनिक नवामराठा हे मराठी भाषेतील वृत्तपत्र सुरु केले. प्रारंभी साप्ताहिक रुपात ४ पाने असलेल्या या अंकाची किंमत १ आणा एवढी होती. शहरातील आनंदी बाजारात असलेल्या बंडोपंत क्षीरसागर यांच्या वाड्यात नवामराठाचे कार्यालय होते तर अंकाची छपाई जे. जे. गल्लीतील मारुती झेंडे यांच्या श्री दत्त प्रिटींग प्रेसमध्ये केली जात होती.
१५ ऑगस्ट १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. परंतु ज्या दिवशी स्वातंत्र्य भारताचे संविधान देशात लागू झाले तोच खरा स्वातंत्र्यदिन आहे, अशी त्यांची विचारधारा होती. कारण १५ ऑगस्टला देशाला जरी स्वातंत्र्य मिळाले असले तरी देशातील नागरीकाला स्वातंत्र्याचे खरे हक्क व अधिकार संविधानाने मिळवून दिलेले आहेत. त्यामुळे २६जानेवारी हाही स्वातंत्र्य दिनच आहे. या विचारधारेमुळेच नवामराठाचा पहिला अंक २६ जानेवारी १९५७ या दिवशी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र असावा या भूमिकेला त्यांचा पाठींबा होता. त्यामुळे या विषयावर त्यांनी अतिशय सडेतोडपणे लिखाण केले.
गंजबाजारात स्वतःची प्रेस सुरु…
प्रारंभी साप्ताहिक रुपात असलेल्या नवामराठाचे द्विसाप्ताहिक, त्रिसाप्ताहिक व नंतर दैनिकात रुपांतर झाले.नवामराठाचे दैनिकात रुपांतर झाल्यानंतर गंजबाजारात कार्यालय सुरु करण्यात आले. त्यावेळी स्वतःची प्रिंटींग प्रेस सुरु करण्यात आली. त्यावेळी ट्रेडल मशिन होती. या मशिनवर एकावेळी १ पान छापले जात असे. नंतर त्यापेक्षा आधुनिक अशी सिलेंडर मशिन आणण्यात आली. या मशिनमुळे एकाच वेळी २ पानांची छपाई होत असे.
नव्वदच्या दशकात संगणक युगास सुरुवात झाली. खिळे जूळविण्याची संकल्पना कालबाह्य झाली आणि संगणकावर कामकाज सुरु झाले. मग वेब ऑफसेट मशिन आणण्यात आली. प्रारंभी ४ पानी कृष्ण धवल अंक छापला जात होता. पुढे रंगीत मशिनचे युनिट आणण्यात आले व ८ पानी तर कधीकधी १६ पानी असा रंगीत अंक सुरु झाला.
संस्थापक आचार्य गुंदेचा यांनी १९५७ ते १९८२ पर्यंत दैनिक नवामराठाचे संपादक म्हणून काम पाहिले. ५ मे १९८२ रोजी आचार्य गुंदेचा यांचे निधन झाले. त्यानंतर नवामराठाचे संपादक पद त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुभाष गुंदेचा तर व्यवस्थापक पद कनिष्ठ चिरंजीव संजय गुंदेचा यांनी समर्थपणे सांभाळत आचार्य गुंदेचा यांच्या विचारांनुसार जनतेच्या अन्यायाला वाचा फोडणारे दैनिक हा नवामराठाचा असलेला लौकीक नुसता टिकवलाच नव्हे तर आणखी वाढवला. सन २०१० मध्ये संजय गुंदेचा यांचे आकस्मात निधन झाले. तेव्हापासून कार्यकारी संपादक म्हणून आचार्य गुंदेचा यांचे नातू व सुभाष गुंदेचा यांचे चिरंजीव अॅड. ललित गुंदेचा हे नवामराठाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांना स्व. संजय गुंदेचा यांचे चिरंजीव अनिकेत गुंदेचा यांची साथ लाभत आहे.