नगर – भिंगार, गवळीवाडा येथे महावितरणच्या गंभीर हलगर्जीपणामुळे २ एप्रिल रोजी सचिन भोजेल्लू (वय अंदाजे ४०) यांचा विजेचा शॉक बसून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेतील दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, व मृताच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महावितरणकडे केली आहे. या प्रकरणी मयताच्या पत्नी रेखा भोजेल्लू, कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर
केले. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांच्यासह
अनेक नागरिक उपस्थित होते.
सचिन भोजेल्लू हे आपल्या घरातील पाण्याच्या टाकीतून पाणी घेण्यासाठी लोखंडी जिन्यावरून जात असताना त्यांना अचानक २३० व्हॉल्टचा विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, महावितरणच्या कर्मचार्यांनी घरातील संपूर्ण वीज बंद केली होती, तरीही जिन्यावर विद्युत प्रवाह सुरूच होता. हे पाहून कर्मचारी सुद्धा हादरले व संपूर्ण भिंगारचा वीजपुरवठा बंद करण्यात आला, तरीही त्यांना प्रवाहाचा स्त्रोत समजू शकला नाही.
दुर्दैवाने, दुसर्याच दिवशी मयताची मुलगी त्याच जागेवरून जात असताना तिलाही विजेचा धक्का बसला. सुदैवाने ती बचावली. यानंतर नागरिकांनी पुन्हा महावितरण अधिकार्यांना बोलावले. चौकशीनंतर समोर आले की, पाठीमागील गल्लीतील एका घरामध्ये केबल ऑपरेटरने अॅम्प्लिफायर लावून बेकायदेशीर वीज वापर सुरू ठेवला होता, ज्यामुळे विजेचा प्रवाह लोखंडी जिन्यावर पोहोचत होता. याप्रकरणी केबल ऑपरेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र विद्युत महावितरणने स्वत:वरील जबाबदारी झटकली असून, ते देखील या प्रकरणाला जबाबदार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. मृताच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी संबंधित दोषी असलेल्या महावितरण कर्मचार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. घराच्या गच्चीवर
महावितरणच्या वायरी उघड्यावर असून, कोणत्याही क्षणी पुन्हा दुर्घटना घडू शकते, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
एक कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबाला आता कोणत्याही प्रकारे आधार मिळालाच पाहिजे. महावितरणच्या दुर्लक्षित व्यवस्थेमुळे एखाद्याचा जीव गेला, ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कारवाई आवश्यक आहे, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कर्मचारीवर कठोर कारवाई करण्यात यावी, व मृत कुटुंबीयांना आर्थिक व कायदेशीर न्याय मिळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.