नगर पुणे महामार्गावरील घाटात मकाच्या गोण्यांचा ट्रक पलटी

0
59

चालक गंभीर जखमी, मृत्युंजय दूताच्या तत्परतेने मिळाले उपचार

नगर – नगर पुणे महामार्गावर कामरगाव (ता.नगर) घाटातील धोकादायक वळणावर मकाच्या गोण्या घेवून चाललेल्या मालट्रकला ११ एप्रिल रोजी दुपारी भीषण अपघात झाला. हा मालट्रक रस्त्यावर पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झाला आहे. हरी मारुती खेडकर (वय २३, रा. दहीगाव शे, ता.शेवगाव) असे जखमी चालकाचे नाव आहे. त्यास कामरगाव येथील मृत्युंजय दूत म्हणून काम पाहणाऱ्या सिद्धांत आंधळे या तरुणाने तत्परता दाखवत उपचारासाठी तातडीने नगरच्या रुग्णालयात पाठविले. त्यामुळे त्यास वेळेत उपचार मिळाले आहेत.

चालक हरी खेडकर हा सौरभ संतोष सूर्यवंशी (रा.दौंड, जि. पुणे) यांच्या मालकीचा मालट्रक (क्र. एमएच १२ एच डी ७५१५) या मध्ये सिन्नर (नाशिक) येथून सुमारे ६०० ते ७०० मकाच्या गोण्या भरून त्या खाली करण्यासाठी नगर मार्गे शिरूर कडे जात होता. ११ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास कामरगाव घाटात असलेल्या धोकादायक वळणावर त्याचा ट्रक वरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात चालक खेडकर हा गंभीर जखमी होवून ट्रक मध्ये अडकला होता.

या अपघाताची माहिती मिळताच कामरगाव येथील मृत्युंजय दूत सिद्धांत आंधळे या तरुणाने अपघातस्थळी धाव घेत चालक खेडकर यास बाहेर काढले, तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यास उपचारासाठी नगरमधील पॅसिफिक हॉस्पिटल मध्ये पाठविले. आंधळे याच्या तत्परतेने चालक खेडकर याला वेळेत उपचार मिळाले. त्यानंतर आंधळे याने नगर तालुका पोलिस तसेच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले यांना फोन करून घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच नगर तालुका पोलिस तातडीने घटनास्थळी गेले व त्यांनी महामार्गावर पडलेला मालट्रक व त्यातून खाली पडलेल्या मकाच्या गोण्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. मृत्युंजय दूत सिद्धांत आंधळे याच्या तत्परतेचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले यांनी कौतुक केले.