नगर – नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात असलेल्या महामानव, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासारखाच पूर्णाकृती पुतळा अहिल्यानगर शहरात उभारण्याची प्रक्रिया पूर्ण
झाली आहे. दोन-तीन दिवसांवर, १४ एप्रिल रोजी सालाबादप्रमाणे डॉ.आंबेडकर यांची जयंती आहे. हा दिवस तमाम भीमप्रेमी तसेच संविधानप्रेमी सर्वच नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मोठ्या संख्येने नागरिक डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी एकत्र येत असतात. मात्र पुतळ्याचे काम पूर्ण होऊन देखील
त्याचे अनावरण झालेले नसल्यामुळे सदर पूर्णाकृती पुतळा हा अद्यापही नागरिकांसाठी खुला झालेला नाही. जयंतीदिनी भीमप्रेमी, संविधानप्रेमी नागरिकांना अभिवादन करता यावे, यासाठी पुतळा खुला करण्यात यावा, अशी मागणी आंबेडकरी समाजाच्या वतीने योगेश साठे, सुशील कदम, आकाश आल्हाट, अतुल साळवे, मुकेश झोडगे, निखिल शेलार, हनीफ शेख आदींनी मनपा आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेव्दारे ७५
लाख रूपये खर्चून स्टेशन रस्त्यावरील मार्केट यार्ड चौकात सुमारे २८ फुटी (पुतळा दहा फूट व चौथरा अठरा फूट) पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळा, चौथरा, नवीन संसद भवनाच्या प्रतिकृतीसह परिसर सुशोभिकरण, संरक्षण भिंत, बगीचा व अन्य आवश्यक सुविधा आदी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. सदर काम हे महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य
संस्थेच्यावतीने पूर्ण झाले आहे. महानगरपालिका ही एक सरकारी यंत्रणा आहे. पुतळ्याचे काम पूर्ण झाले असल्याने मनपाने सदर पुतळा नागरिकांना जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी उपलब्ध करून देणे ही मनपाची जबाबदारी आहे. तशी तमाम
भीमसैनिक आणि नागरिकांची भावना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागील ३० ते ३२ वर्षापासून आंबेडकरप्रेमी जनतेची मागणी होती. ती स्वप्नपूर्ती झाली आहे. सबब जनभावना लक्षात घेता डॉ. आंबेडकरांचा
पुतळा जयंतीदिनी अभिवादन करण्याकरिता तातडीने नागरिकांसाठी खुला करावा.