अहिल्यानगर हिंदू मोची समाज सेवा संघ व ‘जिनगर’तर्फे श्री रामदेव बाबांची महाआरती

नगर – माजी आमदार अरुण जगताप यांची प्रकृती अचानकपणे बिघडली असून तातडीने सुधारणा व्हावी यासाठी अहिल्यानगर हिंदू मोची समाज सेवा संघ आणि जिनगर महिला मंडळाच्या वतीने श्री रामदेव बाबा मंदिरात महाआरती करत साकडे घातले.

लाडके अरुणकाका यांच्या प्रकृतीत तातडीने सुधारणा होऊन, नगरकरांच्या सेवेसाठी लवकर बरे व्हावे, अशी  मनोभावना प्रार्थना करण्यात आली. यावेळी सौ. अरुणाताई गोयल, सौ. प्रमिला गोयल, सौ. ज्योति गोयल, ओमप्रकाश बायड, देवीचंद बायड, मनोहर चव्हाण, चंदन पवार, श्याम गोयल, अमित सोनग्रा, रामेश्वर चव्हाण आदीसह समाजातील नागरिक उपस्थित होते.

अरुण जगताप हे आपल्या कुटुंबातील व्यक्ति असल्यासारखे वाटतात. ते नेहमीच आपल्याशी चर्चा करीत असताना आदराने विचारपूस करत असतात. तसेच नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याचे काम करत आहे. काका आणि आमचा गेल्या अनेक वर्षांपासून जुना परिचय आहे, त्यांच्याबाबत आपलेपणाची भावना आहे. त्यांच्या प्रकृतीत तातडीने सुधारणा व्हावी यासाठी श्री रामदेव बाबा मंदिरात महारती करण्यात आली अशी माहिती अरुणा गोयल यांनी दिली

महाजन गल्ली येथील जैन मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह मुर्तीवरील सोन्याचे दागिने केले लंपास

नगर – मंदिराच्या पाठीमागील बाजूने शिडीच्या सहाय्याने वर चढून कोणीतरी अज्ञात चोट्याने मंदिराच्या पाठीमागील दरवाज्याची कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला, आतील तीन दानपेटी फोडून रोख रक्कम व मूर्तीवरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शहरातील महाजन गल्ली येथील १००८ महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिरामध्ये ९ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबतची मिळालेली माहिती अशी की महाजन गल्ली येथील १००८ महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर आहे. या ठिकाणी मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत १० एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या भगवान महावीर जयंती उत्सवाची तयारी सुरु होती. त्यामुळे तेथे च्या पाठीमागील बाजूस असलेल्या मोठ्या जागेत मंडप उभारणी व इतर कामासाठी शिडी व इतर साहित्य ठेवलेले होते. अज्ञात चोरट्यांनी ८ एप्रिलच्या रात्री ११ ते ९ एप्रिलच्या पहाटे ५ या कालावधीत तेथील शिडी मंदिराच्या पाठीमागील बाजूला भिंतीला लावून वरच्या बाजूला गेले. वरील बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटे खाली मंदिरात उतरले, त्यांनी मंदिरातील २ छोट्या व १ मोठी अशा ३ दानपेट्या फोडल्या. त्यातील रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर मंदिराच्या गर्भगृहात असलेल्या मूर्तीवरील सोन्याचे दागिने चोरून नेले.

सकाळी काही जण मंदिरात दर्शनासाठी तसेच महावीर जयंती कार्यक्रमाच्या तयारीसाठी आले असता त्यांच्या निदर्शनास चोरीची घटना आली. त्यांनी याबाबत कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली. या परिसरात सीसीटीव्ही नसल्याने मंदिराच्या मागील बाजूस आणि परिसरात असलेले सीसीटीव्ही तपासण्याचे काम पोलिसांनी सुरु केले. दुपारी उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

राजरोसपणे चालू असलेले गांजा, दारू, मटका लब व इतर अवैध धंदे बंद करा

अन्यथा आमरण उपोषण करणार : नागरिकांकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन

नगर – अहिल्यानगर शहर परिसरात दारू, गांजा, मटका लब व इतर अनेक अवैध धंदे राजरोसपणे चालू आहे. या अवैध
धंद्यामुळे परिसरातील धार्मिक स्थळाला त्रास होत असून हे अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे व हे अवैद्य धंदे लवकरात लवकर बंद करण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात
आले. यावेळी इसरार शेख, अयुब शेख, अयुब सैय्यद आदी उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटले आहे की,
अहिल्यानगर शहरामध्ये कोठला बस स्टॅन्ड समोरील शेजारील आजूबाजूच्या परिसरामध्ये गांजा, दारू, मटका लब व
इतर अवैध धंदे चालू असून, सदरचा परिसर हा रहदारीचा असून त्यामध्ये वरील अवैद्य धंदे चालू असून या
परिसरामध्ये धार्मिक स्थळे असून,  धार्मिक विधीच्या वेळी अडथळा निर्माण होत असल्याने सदरील हद तोफखाना पोलीस स्टेशन अंतर्गत असून, या अवैध धंद्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. त्यामुळे या अवैध धंद्यांवर लवकरात लवकर कारवाई करून बंद करण्यात यावे अन्यथा येत्या १५ दिवसात कारवाई झाली नाही तर
आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

भगवान महावीर जन्मकल्याणक (जयंती) निमित्त १० एप्रिल रोजी आनंदधाममध्ये भक्तिसंध्या सोहळा

नगर – भगवान महावीर जन्मकल्याणक (जयंती) निमित्त जैन सोशल फेडरेशनतर्फे १० एप्रिल रोजी  सायंकाळी ७ वाजता
आनंदधाम मध्ये भक्तिसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सौ. सरोजताई कटारिया
यांनी दिली. त्या म्हणाल्या, भक्तिसंध्या सादर करणारे पवन भाटिया हे इंदूरचे रहिवासी असून त्यांनी सरकारी संगीत महाविद्यालय, इंदौर येथे संगीत विषयात पदवी संपादन केली. स्टेजवर कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यामधून त्यांनी देशभरातील विविध संस्था व संघटनांशी दृढ स्नेह निर्माण केला. गायक, गीतकार व संगीतकार अशा तिन्हीही भूमिका ते समर्थपणे पार पाडतात. आतापर्यंत त्यांचे १२० अल्बम तयार झाले आहेत. नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे ते प्रथम कर्तव्य समजतात. भारतीय संगीत संस्कृतीची वैश्विक ओळख निर्माण व्हावी यासाठी ते परिश्रम घेत आहेत. दूरदर्शन
आणि चित्रपट यामध्ये त्यांनी आपल्या कामाचा वेगळेपणाचा ठसा उमटवला आहे. सोनाली पुराणिक या वयाच्या १४ व्या वर्षापासून व्यासपीठावर गायन सेवा करत आहेत. खैरागढ विश्वविद्यालयात सतार वादन विषयात त्यांनी एम.ए. ची पदवी
संपादन केली. कथ्थक नृत्यामध्येही त्या पारंगत आहेत. देवी अहिल्या विश्वविद्यालयात त्यांनी कथ्थक नृत्यामध्ये एम.ए. ची
पदवी संपादन केली आहे. शास्त्रीय व सुगम संगीत क्षेत्रात त्या गुणी गायक व संगीतकारांसोबत देशभर कार्यक्रम करत आहेत. अशा दिग्गज कलाकारांच्या भक्ती संध्या कार्यक्रमाचा शहरातील भाविकांनी आणि संगीत प्रेमींनी लाभ घ्यावा,
असे आवाहन जैन सोशल फेडरेशनतर्फे करण्यात आले आहे.

ना.राधाकृष्ण विखे पा. यांच्या दुरदृष्टीमुळे महिला सक्षमीकरणास चालना

अकोले – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्यातील एकल महिला सक्षमीकरण कार्यक्रमास गती मिळाली आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख यांनी केले.

अकोले येथे साऊ एकल महिला संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात श्री. देशमुख बोलत होते. याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील हेरंब कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंतराव मनकर, साउ संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा
कुलकर्णी, अहिल्यानगर येथील आय. एस. डी. टी. च्या संचालिका पूजा देशमुख, नगरसेविका प्रतिभा मनकर, रवींद्र मालुंजकर, विद्याचंद्र सातपुते, निलेश तळेकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना श्री. देशमुख म्हणाले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तिसर्‍या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने ना. राधाकृष्ण विखे पा. यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. प्रामुख्याने एकल महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यांच्यासाठी प्रशिक्षण, उत्पादन, बाजारपेठेची सांगड या माध्यमातून कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याची ना. विखे यांची संकल्पना आहे. यादृष्टीने जिल्ह्यातील एक महिलांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून लवकरच याबाबतची पुढील दिशा स्पष्ट केली जाईल.
जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात नुकतीच कौशल्य विकास समितीची एक बैठक झाली असून जिल्हाधिकार्‍यांनी एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी कृती कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

श्री. देशमुख पुढे म्हणाले, अकोले येथील साऊ महिला संस्थेचे संघटन लक्षात घेता अकोले येथे लवकरच यासंदर्भात प्रशिक्षण सुरू करण्यात येईल.यावेळी बोलताना साऊ एकल महिला संस्थेचे मार्गदर्शक हेरंब कुलकर्णी म्हणाले, कोरोनाच्या  जागतिक संकटानंतर २०२० पासून साऊ संस्थेने एकल महिलांचे संघटन सुरू केले. सध्या २० जिल्ह्यातील ७५ तालुयात एकल महिलांचे संघटन असून आतापर्यंत अकोले तालुयातील २७ महिलांना व्यवसाय उभे करून देण्यात आले आहेत. केवळ शासनाच्या अनुदानावर अवलंबून न राहता एकल महिलांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतः
च्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य करावे, अशी अपेक्षा श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

यावेळी वसंतराव मनकर यांनी, महिलांच्या प्रशिक्षणासाठी व त्यांनी तयार केलेल्या मालाच्या विक्रीसाठी आपण आवश्यक जागा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले. आय.एस.डी.टी. च्या संचालिका पूजा देशमुख यांनी आपले अनुभव सांगताना विस्तारत चाललेला गारमेंट उद्योग लक्षात घेता महिलांनी याचा जास्तीत जास्त लाभ करून घेणे आवश्यक आहे. असे सांगितले.

प्रारंभी साऊ एकल महिला संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी उपस्थित एकल महिलांनी त्यांचे अनुभव सांगून त्यांना आवश्यक असलेल्या सहकार्याची आणि मार्गदर्शनाबाबत अपेक्षा व्यक्त केली.

‘रामकृष्ण अर्बन’ च्या निवडणुकीसाठी सदभावना पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

नगर- श्री रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटीच्या २० एप्रिल रोजी होणार्‍या पंचवार्षिक निवडणुकीचा संस्थापक अध्यक्ष श्रीगोपाल धूत प्रणित सदभावना पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी माळीवाडा येथील ग्रामदैवत श्री विशाल
गणेश मंदिरात संत रमाकांत व्यास यांच्या हस्ते करण्यात आला.

सुरुवातीला रमाकांत व्यास यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्या करिता प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी रमाकांत व्यास यांनी रामकृष्ण अर्बन सोसायटीच्या उत्तम कामगिरीचा गौरव केला. तसेच मी स्वतः संस्थेचा सभासद असून संस्थेची प्रगती पाहता या संस्थेला यंदा ४ कोटीचा
निव्वळ नफा होईल. अशी अपेक्षा व्यक्त करून संस्थेचा भक्कम आर्थिक पाया पाहता. श्रीगोपाल धूत यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे रूपांतर बँकेत करावे, असे आवाहन पॅनलच्या सर्व उमेदवारांना केले. तसेच रामकृष्ण सारख्या आर्थिक संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी व संस्थेचा निवडणुकीतील होणारा मोठा खर्च वाचावा. याकरिता अपक्ष उमेदवारांना निवडणूक बिनविरोध होण्याकरिता सहकार्य करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उपस्थितांचे उमेदवार लक्ष्मीकांत झंवर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पॅनलच्या वतीने उमेदवार किसनलाल बंग व विशाल गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर यांनी रमाकांत व्यास यांचा श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान केला.

प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी विशाल गणेश मंदिराचे ट्रस्टी अशोक कानडे, पंडितराव खरपुडे, ज्ञानेश्वर रासकर, विजय कोथिंबिरे यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मर्चंट बँकेचे संचालक अनिल पोखरणा, संजय चोपडा, आनंदराम मुनोत, कमलेश भंडारी, प्रा.शरद कोलते, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, गिरीश अग्रवाल, राजेंद्र बोथरा, अशोक पितळे,
आदेश चंगेडिया, डॉ.श्रीकांत गांधी, मोहनलाल मानधना, सुभाष जग्गी, सुवेंद्र गांधी, ब्रिजलाल सारडा, अ‍ॅड.शरद पल्लोड, सतीश लोढा, राजेंद्र चोपडा, दीपक काबरा, पराग धोकरीया, अशोक खंडेलवाल, अजय पंजाबी, ओमप्रकाश बंग,
बजरंग दरक, सत्यनारायण बंग, चंद्रकांत मुथा, मदन गुजराथी, मनोज मुंदडा, श्रीकुमार सोनी,राकेश गुप्ता, ललिता झंवर, रंजना सोनी, सुनीता कासट, अलका मुंदडा, ज्योती गांधी, अपर्णा नहार, प्रशांत जाजू, दर्शन गुजराथी, मनोज
गुजराथी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी उमेदवार श्रीगोपाल धूत, राजेंद्र गुजराथी, प्रदीप पंजाबी, सुधीर झालानी, प्रकाश गांधी, लक्ष्मीकांत
झंवर, किसनलाल बंग, ओमप्रकाश चांडक, विश्वनाथ कासट, गोपाल मणियार, राजेंद्र मालू, मधुसूदन सारडा,
अँड.अशोक बंग, राजेंद्रकुमार कंत्रोड, अनुराग धुत, राजकमल मणियार, शोभा राठी, साईनाथ कावट,
अनुरीता झगडे, देवराव साठे हे सर्व उमेदवार उपस्थित होते. ओमप्रकाश चांडक व गोपाल मणियार यांनी आभार
मानले.

अरुण जगतापांच्या प्रकृती सुधारण्यासाठी श्री काशी विश्वेश्वर मंदिरात ‘महाआरती’

नगर – माजी आमदार अरुण जगताप यांच्यावर पुणे येथे खाजगी रुग्णालय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर
आहे. अरुण जगताप यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा व्हावी यासाठी तोफखाना मित्र मंडळ व पंधाडे परिवाराच्यावतीने
श्री काशी विश्वेश्वर मंदिरात महाआरती माजी उपनगराध्यक्ष अंबादास पंधाडे यांच्या हस्ते झाली. यावेळी विजय नगरे, निसार
पठाण, सुशांत जाधव, योगेश पंधाडे, गौरव तापकिरे, श्रीयग पंधाडे, कौस्तुभ देशमुख, शीतल पंधाडे, सवितापंधाडे, शारदा पंधाडे, आशा तापकिरे, विमन नगरे, समर्थ तापकिरे, अक्षय माथेसूळ आदी उपस्थित होते.
अंबादास पंधाडे म्हणाले की, अरुण जगताप हे आमचे जुने राजकीय मित्र असून त्यांच्यावर आलेल्या आजारपणाचे
संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी मोहनबाग येथील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात महाआरती करून प्रार्थना करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरात लवकर ते बरे व्हावे यासाठी परमेश्वराकडे साकडे घातले  आहे. परमेश्वर निश्चित यश देईल आणि त्यांच्या तब्येतीला  दीर्घायुष्य लाभेल. अरुण जगताप यांनी नेहमीच सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केले असून सर्वांचे आशीर्वाद त्यांना लाभेल आणि ते लवकरच बरे होऊन नगर शहरात येतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

१० एप्रिलला होणार्‍या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभ कार्यक्रमास स्थगिती

नगर – अहिल्यानगर शहरातील मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम १० एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते व प्रमुख आरपीआय नेत्यांच्या उपस्थितीत होणार होते. परंतु नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण जगताप यांची
प्रकृती खालवल्याने या पुतळा अनावरण कार्यक्रमास तात्पुरती स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने मनपा उपायुक्त यांना पत्र देण्यात आले. तसेच अरुण जगताप यांनी आंबेडकरी चळवळीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या स्थापनेपासून कायम पूर्णाकृती पुतळा होईपर्यंत सहकार्य व
योगदान दिलेले आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगताप परिवाराच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीने घेतला असून पुतळा समिती पुढील महिन्यात पुन्हा एकदा सर्व
राष्ट्रीय नेत्यांच्या व गायकांच्या तारखा घेऊन पुतळा अनावरण कार्यक्रमाची तारीख जाहीर करतील. असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला व अरुण जगताप यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी सामूहिक बौद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी मनपाचे अभियंता परिमल निकम, सुरेश बनसोडे,  सुमेध गायकवाड, अजय साळवे, संजय कांबळे, सुनील शिंदे, सुनील
शेत्रे, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, योगेश साठे, प्रा.जयंत गायकवाड, संजय जगताप, अशोक
खंडागळे, महेश भोसले, नितीन कसबेकर, अंकुश मोहिते, सिद्धार्थ आढाव, विशाल गायकवाड, कौशल
गायकवाड, विशाल भिंगारदिवे, सागर ठोकळ, शुभम बडेकर, सचिन साठे, दिनेश पंडित, सचिन शेलार, निशांत चव्हाण, सिद्धांत गायकवाड, विश्वभूषण गायकवाड, संभाजी भिंगारदिवे, सुजल भिंगारदिवे, तुकाराम गायकवाड, भीम वाकचौरे,
योगेश घोडके, संदीप वाघमारे, विजय गायकवाड आदीसह समितीचे पदाधिकारी उपस्थित होत

जुनी पेन्शनबाबत प्रस्ताव स्विकारण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतरांचे धरण

नगर – मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व त्यानंतर अनुदानावर आलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी शिक्षकांचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी जिल्हा परिषद येथील माध्यमिक शिक्षण विभाग समोर ८ एप्रिल रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. जुनी
पेन्शन योजना कोअर कमिटीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात शिक्षक, शिक्षकेतरांनी प्रस्ताव स्विकारण्यासाठी निर्दशने केली. या आंदोलनात माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे, संचालक बाबासाहेब बोडखे, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, कार्याध्यक्ष संजय ईघे, ज्ञानदेव बेरड, रमजान हवालदार, बाळासाहेब
राजळे, राज जाधव, संतोष अडकित्ते, देविदास खेडकर, सुनील दानवे, आप्पासाहेब जगताप, योगेश गुंड, वैभव सांगळे, सुभाष भागवत, संजय भुसारी, जाकिर सय्यद, बाबासाहेब मोहिते, संतोष भराट, तौसिफ शेख, राजू पठाण, सुदाम
दळवी, आबासाहेब गायकवाड, बद्रीनाथ शिंदे, निवृत्ती झाडे, मोहन उंडे, आदिनाथ नागवडे, देवीदास पालवे, शिवाजी नागवडे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. माध्यमिकचे शिक्षण अधिकारी अशोक कडूस व वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के यांनी आंदोलन स्थळी भेट देवून शिक्षकांशी संवाद साधला. सदर प्रश्न राज्य पातळीवरचा
असला तरीही, माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने सदरील प्रस्ताव स्विकारण्याचे आश्वासन देण्यात आले. आंदोलकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करुन आंदोलन मागे घेण्यात आले.

२७ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालय मुंबई यांनी जुनी पेन्शन बाबत निर्णय दिला असून, त्यामध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना (नियम १९८२) लागू करणे करिता शिक्षणाधिकारी यांना उपसंचालक यांच्याकडे स्क्रुटिनी सादर करण्याचे आदेश झालेले आहे. यामध्ये माध्यमिक शिक्षक, कर्मचार्‍यांचे प्रस्ताव  निकालापासून ४५ दिवसात संस्थाने विविध कागदपत्रासह शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे सादर करावे व उच्च माध्यमिकचे प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाकडे सादर करण्याचे
निर्देश देण्यात आलेले आहे. यासंबंधी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी करुन देखील प्रस्ताव मागविण्यात आले नसल्याने जुनी पेन्शन योजना कोअर कमिटीच्या वतीने प्रस्ताव स्विकारण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते.

स्विफ्ट डिझायर कार अचानक पेट घेऊन जळून खाक

नगर – छत्रपती संभाजीनगरकडून नगरमार्गे पुण्याकडे जात असलेल्या स्विफ्ट डिझायर कारने शहरातील सरोज पेट्रोल पंपाजवळ अचानक पेट घेतला. या आगीत कार जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली
नाही. ही घटना ८ एप्रिलला पहाटे पावणे दोनच्या सुमारास घडली. कारने पेट घेतल्यानंतर कारचालकाने आरडाओरडा केला. तो ऐकून परिसरातील असलम हमीद खान हे त्याचे मित्र बाबा शेख यांच्यासह मदतीस धावले. त्यावेळी कार मध्ये एक मुलगा दिसला त्यांनी त्या मुलास सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर महापालिकेच्या अग्नीशमन दलाला फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धावत घेत आग विझविली. मात्र तोपर्यंत कार
पूर्णपणे जळून खाक झाली होती.