प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सर्वोत्तम जिल्ह्याचा ‘अहिल्यानगर’ला पुरस्कार प्रदान

0
29

नगर – अहिल्यानगर जिल्ह्याला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत राज्यात प्रति लाभार्थी अनुदान वितरणामध्ये अहिल्यानगर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. ही कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार बालेवाडी, पुणे येथे राज्यस्तरीय कृषि अधिकारी कार्यशाळे प्रसंगी कृषि मंत्री माणिकराव कोकाटे व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी स्वीकारला. या प्रसंगी
प्रधान सचिव विकास रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषि संचालक विजयकुमार आवटे आदी उपस्थित होते.

अहिल्यानगर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत यावर्षी ५०१ अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आले असून, तीन
वर्षांत ही संख्या १४३५ वर पोहोचली आहे. यामध्ये दुग्धजन्य पदार्थांच्या ३९०, फळे व भाजीपाला प्रक्रियेच्या ४२७, कडधान्य
प्रक्रियेच्या १३०, पशुखाद्य प्रक्रियेच्या ७१, तेलबिया प्रक्रियेच्या ५५, बेकरी प्रक्रियेच्या ५५ तसेच इतर विविध प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व बँका, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक, जिल्हा संसाधन व्यक्तींनी एक संघभावनेने उत्कृष्ट काम केले. याच कामाची पावती मिळाली असून, अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असल्याचे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत राज्यात प्रतिलाभार्थी अनुदान वितरणामध्ये अहिल्यानगर
जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळून राज्यात जिल्ह्याचे नाव राज्याच्या नकाशावर कोरले आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी
प्रति प्रकल्प कर्ज ११ लाख रुपये व ६ लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात ९० कोटी रुपयांचे अनुदान
अन्नप्रक्रिया उद्योगांना वितरित झाले आहे. ह्या वर्षी देखील जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थ्यांना योजनेत सामावून पिकांची
मुल्यसाखळी विकासासाठी काम करण्याच्या सूचना कृषी विभागास दिल्या आहेत, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.