माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृतीसाठी मिरावली बाबा दर्ग्यात मुस्लिमांकडून विशेष दुवा

0
32

नगर – कापूरवाडी (ता.नगर) येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत सय्यद इसहाक शाह कादरी (रहमतुल्ला अलाहै) मिरावली दर्गा, पहाड येथे माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. या प्रार्थना सोहळ्याचे आयोजन मिरावली दर्ग्याच्या मुजावर कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मिरावली बाबांच्या पवित्र मजारवर चादर अर्पण करून अरुण जगताप यांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी अल्लाहकडे विशेष दुवा करण्यात आली. यावेळी परिसरातील भाविक, श्रद्धाळू आणि वंशावळ विश्वस्त मुजावर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. सध्या अरुण जगताप यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार  सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी उपस्थितांनी एकमुखाने प्रार्थना केली. मिरावली दर्गा हे
विविध धर्म आणि समाजातील लोकांचे श्रद्धास्थान आहे.

येथे नेहमीच लोक एकत्र येऊन एकतेचा आणि सद्भावनेचा संदेश देत असतात. याच परंपरेला पुढे नेत ही विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बाबासाहेब जहागीरदार, हाजी गोटू जहागीरदार, मोईनुद्दीन जहागीरदार, पप्पूभाई जहागीरदार, अल्ताफ जहागीरदार, इरफान जहागीरदार, इम्रान जहागीरदार, राजू जहागीरदार, साहेबान
जहागीरदार, फैजान जहागीरदार, मुन्तजिम जहागीरदार, राजकिन जहागीरदार, मारूफ जहागीरदार, सज्जाद जहागीरदार, कैफ जहागीरदार आदींसह अनेक भाविक उपस्थित होते.

यावेळी एकत्र आलेल्या सर्व श्रद्धाळूंनी अरुणकाकांच्या लवकर बरे होण्यासाठी मनोभावे दुवा केली.