कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित ‘मन वढाय वढाय’ कार्यक्रमास नगरकरांचा उदंड प्रतिसाद

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे सुरु असलेल्या विविध उपक्रमांचे नगरकरांकडून कौतुक

नगर – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने कवयित्री बहिणाबाई  चौधरी यांच्या जीवनावर आधारित, ’मन  वढाय वढाय…’ हा कार्यक्रम २३ मार्च रोजी सावेडी उपनगरातील
देशभक्त रावसाहेब पटवर्धन सभागृहात सायंकाळी झाला. या कार्यक्रमातून कवयित्री बहिणाबाईंवर आधारित गाणी, एकपात्री नाटिका व नृत्यातून त्यांचा जीवनप्रवास हळुवारपणे उलगडत गेला. कवयित्री बेबीताई गायकवाड
यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या
मध्यवर्ती शाखेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे नियामक मंडळ सदस्य क्षितिज झावरे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, नाट्यकर्मी अविनाश कराळे, निवेदक उद्धव काळापहाड आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अभिनेत्री तेजा पाठक हिच्या एकपात्री नाटीकेने कार्यक्रम सुरु झाला. त्यानंतर वैष्णवी कुलकर्णी यांच्या
बालचमूने सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. उत्तरार्धात प्रा.आदेश चव्हाण, ऋतुजा
पाठक, रेणुका पवार, श्रुती चव्हाण या सदाबहार गायकांच्या मन वढाय वढाय, सदा जगाच्या कारणे, माझी
माय सरसोती, अरे संसार संसार, खोप्यामंदी खोपा, विठ्ठल मंदिर या सारख्या गाण्यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
यासाठी हर्षद भावे यांनी तबला, अँडविन पेरेपाडम यांनी कीबोर्ड तर रमेश कार्ले यांनी ऑटोपॅडवर
संगीताची साथ देत सूर, ताल अन लयीचा त्रिवेणी संगमाचे अनोखे दर्शन या कार्यक्रमातून नगरकरांना घडवले.
दीप्ती शुक्रे यांच्या दिलखुलास निवेदनाने कार्यक्रमात रंगत आली. सांस्कृतिक कार्य आणि माहिती
तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती. नगरकर रसिकांसाठी हा सांगीतिक कार्यक्रम विनामूल्य होता. या कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद देत आयोजकांचे आभार मानले. सागर मेहेत्रे यांनी प्रास्ताविक केले. दीप्ती शुक्रे यांनी सूत्रसंचालन तर जालिंदर शिंदे यांनी आभार मानले.

सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरण, १३ एप्रिलला नगर शहरातून जिल्हाव्यापी आक्रोश मोचा

नगर – मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या व सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी जनतेने दबाव निर्माण करावा
तरच या प्रकरणी या कुटुंबियांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांनी केले. शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित मराठा समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी अहिल्यानगर येथे लवकरच सर्व जातीधर्मिय, सर्वपक्षीय महा जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. त्याच्या नियोजनासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला.

जिल्ह्याच्या विविध भागातून मराठा समाजासह विविध जाती धर्मातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रामुख्याने संजीव भोर पाटील, अ‍ॅड. अनुराधा येवले, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष स्वाती जाधव, माजी नगरसेवक दिलीप सातपुते, अनिल शिंदे, डॉ.दिलीप पवार, डॉ.अविनाश मोरे, राजूभाऊ शेटे, भरत मोरे, वैभव लाळगे, नितीन पठारे, टिळक भोस, गणेश निमसे, उद्धव माने, लालाभाई शेख, शाहीर मुकुंदा भोर, सुनील साळुंखे, विनय भगत, ज्ञानदेव पांडुळे, शिवश्री दारकुंडे, अनिल शेटे, देवेंद्र लांबे, प्रकाश निपुंगे, बाबा भांड, सोमनाथ शिंदे, संदीप काटे, पांडुरंग पवार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ.निमसे यांनी बीडमध्ये जो प्रकार सुरू आहे तो भयानक आहे. अनेक हत्या या
जिल्ह्यात घडल्या आहेत. बीडसारख्या जिल्ह्यात एक विशिष्ट जात पाहून अधिकारी नेमले जातात. गुन्हे करणारे
आणि त्यांना साथ देणार्‍या, बेहिशोबी संपत्ती असणार्‍या गुंड, या गुंडांचे पाठीराखे आणि भागीदार नेत्यांविरूध्द
अजूनही इडी का लावली जात नाही. आता जनतेनेच याविरूध्द उठाव करावा.

संजीव भोर यांनी मोर्चामागील भूमिका स्पष्ट करून कोपर्डी आंदोलनाप्रमाणेच हा महा जनआक्रोश
मोर्चा जास्तीत यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन केले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात
ज्या ज्या बाबी दडपल्या गेल्या आहेत त्या या मोर्चातून चव्हाट्यावर आणल्या जातील, हा मोर्चा राज्यात पुन्हा
एकदा एक वेगळे उदाहरण घालून देईल असा आमचा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले.

बैठकीत अ‍ॅड. अनुराधा येवले, भाऊसाहेब वाघ, गणेश निमसे, टिळक भोस, दिलीप सातपुते, भरत मोरे,
राजूभाऊ शेटे, गोरख दळवी, शिवशाहीर मुकुंदा भोर, आबासाहेब सोनवणे, श्रीपाद दगडे, लालाभाई शेख,
राजेंद्र कर्डिले, महेश घावटे आदींनी विचार व्यक्त केले. एक कोअर कमिटी बनवून त्यात प्रत्येक

तालुयातील प्रमुख दोन कार्यकर्त्यांचा समावेश केला जाईल. मोर्चाच्या प्रचार प्रसारासाठी प्रत्येक तालुयात
बैठका घेतल्या जाणार आहेत असेही आयोजन कमिटीच्या वतीने यावेळी जाहीर करण्यात आले. प्रास्ताविक निलेश
म्हसे पाटील यांनी मांडले.

 

शहिददिनी विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ ची केली ‘होळी

नगर – भारतीय कम्युनिस्ट पक्ष, डाव्या प्रागतिक पक्ष व संघटनांच्या वतीने २३ मार्च रोजी व्यक्ति आणि संघटनांचे घटनात्मक
अधिकार संपूर्णपणे नष्ट करणारे, लोकशाहीविरोधी असलेले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४ विधेयकाची होळी करण्यात आली. शहरातील पत्रकार चौक येथील शहीद भगतसिंह उद्यानात शहीद दिनीच्या पार्श्वभूमीवर सदर
विधेयक मागे घेण्याची मागणी करत त्याची होळी करण्यात आली. प्रारंभी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन
करुन इन्कालब जिंदाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात भाकपचे राज्य सेक्रेटरी कॉ. अ‍ॅड.सुभाष लांडे, बन्सी सातपुते, सुधीर टोकेकर, स्मिता पानसरे,
महेबुब सय्यद, अशोक सब्बन, अजित कुर्‍हाडे, आनंद गोलवड, आबीद खान, बापू चंदनशिवे, संध्या मेढे, युनूस तांबटकर, श्याम शिंदे आदी सहभागी झाले होते. प्रस्तावित विधेयक हे लोकशाही विरोधी असून, अशा प्रकारचे विधेयक पब्लिक सेफ्टी बील म्हणून १९१८ साली ब्रिटिश सरकारने  आणले होते. शहीद भगतसिंग, बटुकेश्वर दत्त यांनी त्यावेळी असेम्ब्लीत मनुष्यहानी होणार नाही, सभागृहात आवाज होऊन लक्ष वेधण्यासाठी बॉम्ब टाकून आवाज केला
होता व विरोध दर्शविला होता. त्या वेळी ते बील रद्द करण्यात आले होते. तशाच प्रकारचे विधेयक महाराष्ट्र सरकारने आणलेले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या घटनात्मक अधिकारावर दूरगामी परिणाम होणार आहेत. सत्तेला विरोध करणार्‍या राजकीय  पक्ष, व्यक्ती, संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जाईल. अर्बन नक्षलच्या नावाखालीश्रमिक, कामगार, कर्मचारी, शेतकरी यांच्या  चळवळींना मोडून काढण्यासाठी वापर केला जाणार आहे. सरकारचा उद्देश विरोधकांचा आवाज दाबण्याचा असल्याचा आरोप भाकपच्या वतीने करण्यात येणार आहे. अशा
जनविरोधी, घटनाविरोधी विधेयकाला सर्व स्तरातून विरोध व्हायला हवा व हे विधेयक कुठल्याही परिस्थितीत मंजूर होणार नाही, या साठी राज्यातील सर्व लोकशाहीवादी पक्ष, संघटनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कॉ. अ‍ॅड. सुभाष लांडे यांनी केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने २३ मार्च ते १४ एप्रिल केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणाविरोधात बेरोजगारी, महागाई, सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी, लोकशाही, समाजवाद, राज्य
घटना जनजागृती देशव्यापी मोहीम सुरू झाली आहे.  या मोहिमेचा प्रारंभ शहरात शहीद दिनापासून सुरु करण्यात आला आहे.

औद्योगिक वसाहतीमुळे १० हजार भूमिपुत्रांना रोजगार निर्मिती होईल : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

नगर – जिल्ह्यातील जनतेने महायुतीला मोठा कौल दिला असून
१० आमदार निवडून आले आहे. त्यामुळे जनतेची अपेक्षा देखील
वाढली आहे. आता आपली जबाबदारी देखील वाढली असून मोठे
काम करावे लागणार आहे. नगर जिल्ह्यात ३ एमआयडीसी मंजूर
झाल्या असून औद्योगिक वातावरण निर्माण करायचे आहे. किमान
जिल्ह्यातील १० हजार भूमिपुत्रांना रोजगार निर्माण होईल. लवकरच
उद्योजकांशी बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. एमआयडीसी
भागामध्ये खंडणीबहाद्दरांचा उद्रेक झाला असून त्यांचा बंदोबस्त
करणार. जिल्ह्यातील पाणी प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा आहे.
जिल्ह्याचा विकास आपणच करू शकतो. बाहेरच्या पुढार्‍यांनी आपले
प्रश्न सोडवले नाही! भांडणे लावून स्वतःची पोळी भाजून घेण्याचे काम
केले आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला साकळाई पाणी योजना
मंजूर केली आहे. आता आपल्या जिल्ह्याच्या हक्काचे पाणी मिळणार
आहे. ६५ टीएमसी पाणी गोदावरी खोर्‍यात आणल्याशिवाय स्वस्थ
बसणार नाही, त्यामुळे दुष्काळी भागातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी
सोडविला जाणार आहे. नगर जिल्ह्याचे पर्यटन वाढवण्यासाठी पुढाकार घेतला असून
राजमाता अहिल्याबाई यांचे स्मारक उभे राहणार आहे. जनतेने टाकलेला विश्वास सार्थ
ठरविण्याचे काम केले जाणार आहे. आमदार, मंत्रीपद हे शोभेचे पद नसून जबाबदारीची
जाण असणारे पद आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले यांना मंत्रीपदाची इच्छा आहे, आणि
त्यांना माझी सहमती देखील आहे. त्यांनी जिल्ह्यातील सर्व आमदारांना एकत्रित करून त्यांचा
सत्कार केला व चांगले काम करण्यासाठी ऊर्जा व प्रेरणा देण्याचे काम केले असल्याचे
प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
नगर तालुयाच्यावतीने पालकमंत्री, विधान परिषदेचे सभापती व महायुतीचे नवनिर्वाचित
आमदारांचा सत्कार सोहळा झाला. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान
परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आ.शिवाजीराव कर्डिले, आ.संग्राम जगताप, आ.मोनिकाताई
राजळे, आ.काशिनाथ दाते, आ.विठ्ठलराव लंघे, आ.विक्रम पाचपुते, आ.अमोल खताळ,
माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील, भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, बाबुशेठ
टायरवाले, नितीन दिनकर, अभय आगरकर, अनिल शिंदे, विनायक देशमुख, अशोक
सावंत, सुनील साळवे, शहाजीराजे भोसले आदींसह नागरिक उपस्थित होते.
विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे म्हणाले की, जीवनामध्ये वावरत असताना ’श्रद्धा
आणि सबुरी’ ठेवावी लागते. विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्यात सर्वात मोठे
बहुमत मिळाले आहे. पालकमंत्री यांच्या माध्यमातून मागील अडीच वर्षांमध्ये लोकभिमुख
विकास कामे झाले असल्यामुळेच महायुतीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले आहेत.
आ. कर्डिले यापूर्वी राज्यमंत्री झाले होते आता कॅबिनेट मंत्री करण्यासाठी आम्ही प्रयत्न
करू. माझी निष्ठा आणि देवाभाऊंची पुण्याई यामुळेच मी सभापती पदावर पोचलो आहे.
शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करावे
लागणार आहे. राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम केले
जाणार असल्याचे ते म्हणाले.
आ.शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, जिल्ह्यातील महायुतीचे आमदार, पालकमंत्री व
विधान परिषदेचे सभापती यांचा सत्कार सोहळा नगर तालुयाच्या वतीने झाला आहे.
विकासाची कामे पूर्ण करायची असेल तर सत्तेशिवाय होत नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली असल्यामुळेच
मोठ्या संख्येने आमदार निवडून आले आहे. आता जनतेच्या अपेक्षा देखील वाढले आहेत.
शेतकर्‍यांचा विजेचा प्रश्न गंभीर असून तो सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जलसंपदा खाते पूर्वी पुण्याकडे असायचे त्यामुळे आपल्या जिल्ह्यावर
अन्याय होत होता! मात्र आता आपल्या जिल्ह्यामध्येच असल्यामुळे
पाणी योजना पूर्ण होतील. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेला साकळाई पाणी योजनेचा
शब्द पूर्ण केला आहे. जिरायत भागाला न्याय देण्याचे काम झाले
पाहिजे. सुजय विखे पाटील माजी खासदार झाले असले तरी आता
त्यांना आपल्याला राज्यसभेवर पाठवावे लागणार आहे. मंत्रीपदाची
संधी मला दिली नसली तरी माझ्या मतदारसंघातील विकासाचे कामे
मार्गी लावावीत. सभापती प्रा. राम शिंदे यांनी जिल्ह्याच्या विकास
कामासाठी पुढाकार घ्यावा. राहुरी तालुयातील वावरथ जांभळी
पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी प्रयत्न करणार आहे. लोकांची
अपेक्षा मोठी आहे. पुढील काही महिन्यात जिल्हा परिषद महापालिका
नगरपालिका निवडणुका होणार असून आपण महायुती म्हणून संघटित
राहिलो तर यश हमखास मिळणार आहे असे ते म्हणाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेने १० आमदार आणि एक सभापती
असे अभूतपूर्व यश मिळाले आहे. मागच्या निवडणुकीत ’मी आजी होतो मात्र हे माजी होते’
आता हे आजी झालेत आणि मी माजी झालोय आता मी एकटा माजी आहे तरी मला आजी
करा अजून ४ वर्षे बाकी आहे. तोपर्यंत लोक विसरून जातील माझा भाषनापुरता उपयोग
करून घेऊ नका! अहिल्यानगर जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी एमआयडीसी साखळाई
पाणी योजना घोडच्या प्रकल्पातून २ टीएमसी पाणी आरक्षित केले आहे. अहिल्यानगर
जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आजी असणार्‍या पेक्षा मी ५० टक्के काम
जास्त करीत आहे असे मत सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
जनतेने टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवीत विकास कामाच्या माध्यमातून जिल्ह्यालापुढे घेऊन
जावे लागणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासाची कामे पूर्ण केली
जातील असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
यावेळी मोनिकाताई राजळे म्हणाल्या की, मंजूर महाविद्यालय हे शेवगाव पाथर्डी विधानसभा
मतदार संघात व्हावे यासाठी सर्व आमदारांनी सहकार्य करावे. तसेच आमदार काशिनाथ दाते म्हणाले
की, साकळाई पाणी योजनेमध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघातील गावांचा समावेश करण्यासाठी
सर्वांनी मदत करावी. यावेळी विक्रम पाचपुते, विठ्ठल लंघे, अमोल खताळ आदींची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय कर्डिले यांनी तर स्वागत दिलीप भालसिंग यांनी केले.

कत्तलीकरीता म्हशींची बेकायदा वाहतूक करणारा टेम्पो पकडला

पोलिसांनी ८ म्हशींची केली सुटका,९ लाखाच्या मुद्देमालासह एकाला घेतले ताब्यात

नगर – टेम्पोमध्ये म्हशी दाटीवाटीने कोंबून कत्तलीकरता घेऊन जाणारा टेम्पो कोतवाली पोलिसांनी पकडला. या कारवाईत
आठ म्हशींची सुटका करून एकास ताब्यात घेतले. ही कारवाई नगर पुणे रोडवरील केडगाव बायपास येथे २२ मार्च रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास केली.

कोतवाली पोलीस रात्री शहर हद्दीत गस्त घालीत असताना त्यांना माहिती मिळाली की एक  आयशर कंपनीचा टेम्पोमध्ये म्हशी दाटीवाटीने कोंबून कत्तलीकरिता पुणे रोडने नगर शहराकडे येत आहे. अशी माहिती मिळाल्याने कोतवाली पोलीस पथक तातडीने त्या ठिकाणी गेले असता एक आयशर टेम्पो (क्र. एम एच ०४ एच वाय ५५४०) नगर कडे येताना दिसला. पोलिसांनी टेम्पो थांबवून टेम्पो चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अमर इलाही शेख (वय ४० रा. उंदरी गाव, ता. हवेली जि. पुणे ) असे असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या टेम्पोची झडती घेतली असता
टेम्पोत दाटीवाटीने बांधलेल्या आठ म्हशी मिळून आल्या.

पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो व ४ लाख रुपये किमतीच्या ८ म्हशी असा ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सहाय्यक फौजदार लक्ष्मण बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अमर
शेख याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (च) (घ) (ड), सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ६, ९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली.

आनंदऋषीजी हॉस्पिटलची एका छत्राखाली मिळणारी आरोग्यसेवा कल्पवृक्षाप्रमाणेच

माणकचंद कटारिया यांचे प्रतिपादन, उच्च रक्तदाब व मधुमेह व इतर सर्व आजारांवर उपचार व तपासणी शिबिरास प्रतिसाद

नगर – आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये येणारा रुग्णास दवा बरोबर दुवाही मिळते. आचार्य आनंदऋषीजींच्या आशीर्वादाने
पावन झालेल्या हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण बरे होऊन आनंदाने घरी जातात. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डायलेसिस, जनरल सर्जरी, दंत चिकित्सा अशा अनेक विविध प्रकारच्या
आजारांसाठी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात. आनंदऋषीजी हॉस्पिटलची एका छत्रा खाली मिळणारी आरोग्यसेवा कल्पवृक्षाप्रमाणेच आहे, असे प्रतिपादन हॉस्पिटलच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले माणकचंद कटारिया यांनी केले आहे.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांच्या ३३ व्या पुण्यस्मृती दिना निमित्त उच्च रक्तदाब व मधुमेह व इतर
सर्व आजारांवर उपचार व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन माणकचंद कटारिया
व सज्जनबाई कटारिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी डॉ.मितेश कटारिया, डॉ.
निखीता कटारिया, वैशालीताई मुथा, अभय मुथा आदींसह जैन सोशल फेडरेशनचे सदस्य डॉ.प्रकाश
कांकरिया, निखीलेंद्र लोढा, सतीश लोढा, सुभाष मुनोत, अभय गुगळे, प्रकाश छल्लाणी, डॉ.आशिष भंडारी
तसेच शिबिराचे तज्ञ डॉटर डॉ.वसंत कटारिया, डॉ. गजेंद्र गिरी, डॉ.रविराज गवळी, डॉ.प्राजक्ता पारधे आदी
उपस्थित होते.

डॉ.निखीता कटारिया म्हणाले, या आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांची सेवा घडत आहे. आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने व जैन सोशल फेडरेचशन यांच्या सहकार्याने खारीचा वाटा उचलण्याची संधी कटारिया परिवाराला मिळाली आहे. प्रास्ताविकात डॉ.वसंत कटारिया म्हणाले, माणकचंद कटारिया हे आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या स्थापनेपासून आजपर्यंत जैन सोशल फेडरेशनचे कार्यक्षम सदस्य म्हणून कार्य करीत आहेत. तसेच तसेच डॉ.मितेश व डॉ.
निखीता कटारिया हे देखील आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुग्णसेवेच्या कार्यात जोडले गेलेले आहेत. माणकचंद कटारिया व कटारिया कुटुंब तन-मन-धनाने निस्वार्थ सेवा करीत आहेत. समाजातील अशा दानशूर व्यक्तींमुळे अतिशय
महागडी असणारी उपचार पद्धती सवलतीच्या दरात व मोफत देण्यासाठी मदत होत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. देशात पंधरा टक्के लोक वजन जास्त असल्यामुळे, मानसिक तणाव
असल्यामुळे मधुमेहा चे बळी पडत आहे. मधुमेह होऊ नये. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे
आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने जीवन शैलीत बदल करुन योग्य तो आहार घेणे व व्यायाम करणे आवश्यक
आहे. डॉ.प्राजक्ता पारधे म्हणाले, मधुमेहाच्या रुग्णांनी डॉटरच्या सल्ल्याने औषधोपचार केल्यास रक्तातील
साखरेवर नियंत्रण मिळवता येते. मधुमेह होऊ नये. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे.
वयाच्या चाळीशी नंतर मधुमेह ची तपासणी करणे आवश्यक आहे. डॉ.आशिष भंडारी यांनी सुत्रसंचलन
केले. स्वागत निखिलेंद्र लोढा यांनी केले. प्रकाश छल्लाणी यांनी आभार मानले. उच्च रक्तदाब व मधुमेह व ईतर सर्व
आजारांवर उपचार तपासणी शिबिरात २०१ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

भीमशतीची अहिल्यानगर शहर कार्यकारिणी जाहीर

नगर – अहिल्यानगर शहरातील शासकीय विश्राम गृह येथे भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार भीमशक्तीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली. यात
शहराची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी भीमशक्तीचे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब साठे, शहर जिल्हा
अध्यक्ष संजय जगताप, जिल्हा प्रभारी अध्यक्ष सुदामराव सरोदे, दक्षिण जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद शिंदे, उत्तर जिल्हा
अध्यक्ष संदीप मतकर, कार्याध्यक्ष हुसेन देशमुख, जिल्हा सचिव पोपटराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड
करून पत्र वाटप करण्यात आले.

यावेळी सुदाम सरोदे, विनायक साठे, सोमनाथ  भोसले, अभिजीत सिंग, यश गायकवाड, ओम अहिरे,  मयूर पांढरे, प्रथमेश वाघ, कौस्तुभ आडेप, पियुष वाघमारे, वेदांत थोरात, सुनील आडोळे, तेजस पांढरकर, तुषार साळवे, सनी गाढवे, प्रेम साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शहर कार्यकारणी शहर जिल्हा अध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष अभय गायकवाड, शहर सचिव विशाल भिंगारदिवे, संघटक भाऊसाहेब भिंगारदिवे, संघटक रिजवान सय्यद, शहर जिल्हा संपर्कप्रमुख विनायक साठे, शहर संघटक सुनील ठाकरे, संघटक विवेक चंदनशिव, प्रसिद्धीप्रमुख अशोक खंडागळे अधिक पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.

आपल्यासाठी डोळ्यांत पाणी येणारेच आपल

नगर – आजच्या व्हॉटसअप, फेसबुक, इन्स्ट्राग्राम- च्या जगातील एकही जण आपल्या अडीअडचणीत-दुःखद प्रसंगात
आपल्या जवळ बसून पाठीवर हात ठेवत आधार देत नाही की आपण  हॉस्पीटलच्या आयसीयूमध्ये उपचार घेताना आपल्या काळजीने भेटायला येत नाही. आपल्यासाठी डोळ्यांत पाणी येणारे मोजकेच मित्र आणि रक्ताचे नातेवाईकच आपले असतात, या वास्तवावर प्रवचनकार प्रा.डॉ.विनोद बाबर (कराड) यांनी बोट ठेवले.
राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्य स्मृतीदिन व १२५ व्या जन्मोत्सवानिमित्त जैन सोशल फेडरेशनने प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या भगवान महावीर व्याख्यानमालेचे पहिले
पुष्प काही तरी चुकतंय आपलं या विषयावर गुंफताना आनंदधाममध्ये ते बोलत होते. सौ.मनिषा व निखिलेंद्र
लोढा यांच्या हस्ते वक्त्यांचा सन्मान करण्यात आला. सरोजताई कटारिया यांनी सूत्रसंचालन केले. श्री. बाबर पुढे म्हणाले, आज जग जवळ आले असे म्हटले जात असले तरी एका घरात रहाणारे एकमेकांपासून दुरावत चालले आहेत. घरातील आपल्या माणसांसोबत आपलेपणाने दिलखुलास संवाद झाला पाहिजे. तो न करता आपण मोबाईलच्या आभासी जगात वावरणे पसंत करत असू तर आपणास मानसोपचार तज्ज्ञास भेटणे अत्यंत आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. मोबाईलचा
वापर आवश्यक कामापुरता केल्यावर मोबाईलपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा. झोपताना-झोपेमधून उठताना
मोबाईल पहाणे टाळा. आपल्या घरातील लहान मुलांच्या हाती मोबाईल ठेवून तो मोबाईलशिवाय रहात नाही, हा
खोटा मोठेपणा मिरवू नका. घरातील ५० वर्षांचा नवरा तुमचं ऐकतो मग २ वर्षाचा नातू का ऐकत नाही? त्याच्या
हातातून मोबाईल काढून घेवून त्याच्याशी बोलण्यासाठी सुसंस्कार करण्यासाठी वेळ द्या. आपण कष्टाने कमावलेल्या पैशांचा आनंद घ्या. अधिक संपत्ती, अधिक बचत, अधिक गुंतवणूक करण्याच्या नादात जगायचे राहून गेले असे होवू देऊ
नका. आपल्या शब्दाने आपल्या कृतीने कुणीही दुखावले जाणार नाही याची सदैव काळजी घ्या. जर असे घडले
तर लगेच भेटून माफी मागा. माफी मागण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. आपलं जीवन कधी थांबणार हे माहिती
नसल्याने हे जग सोडून जाताना कोणाशीही वैर राहू नये, याची काळजी घेत देवाने दिलेल्या जीवनाचा
आनंद घ्या. आपले शरीर ही अनमोल संपत्ती आहे. ज्याचे शरीर उत्तम तो जगात सर्वात श्रीमंत. धाव-धाव करून
कोट्यवधीची इस्टेट कमवली तरी आपल्याला साथ फक्त शरीरच देणार हे विसरू नका. आपले आई-वडिल हेच आपले आयडॉल असले पाहिजेत. आपल्याला जन्म दिला हे सुंदर शरीर दिले. लहानाचं मोठं केलं. आपल्याला
जगवण्यासाठी अपार कष्ट घेतले तरीही आमच्यासाठी काय केलं? असं म्हणून आई-बापरूपी देवाला
कधीही दुखवू नका. भाड्याच्या घरात जीवन घालवलेल्या आई- वडिलांना बंगल्यात रहाण्याचा आनंद मिळवून द्या. माझी गाडी माझी माडी माझ्या बायकोची गोल गोल साडी या संकुचित विचारातून वेळीच बाहेर पडा. जर्मनीत
मृत्यू झाल्यावर रडण्यासाठी भाड्यानं माणसं आणावी लागतात. आपल्या मृत्यूनंतर असे होवू नये याकरिता
आपल्या मायेची माणसं मिळवा. खिशात पैसे असले तरच मैत्रीचे हात पुढे येतात, अशा मित्रांपासून दूर रहा. त्यांच्यासोबत जीवनातील वेळ वाया घालवू नका. आपली पारखं असलेल्यांसोबतच रहा. आज सर्व आजारांवर मेडिकलमध्ये औषधे मिळतात पण मनाचा आजार दूर करायला जीवाभावाचीच माणसं लागतात. ईश्वर संकट ज्यांच्या वाट्याला देतो ज्यांची
संकट पेलण्याची ताकद असते. ते येरा-गबाळ्याचं काम  नाही! झोपण्यासाठी झोपेची गोळी घ्यावी लागणे ही
दुर्देवाची गोष्ट आहे. स्वतःपुरता विचार करण्याचे सोडून द्या. आयुष्य खुप सुंदर आहे जगून घ्या, असे आवाहन
श्री.बाबर यांनी केले. सिमा मुनोत यांनी आभार मानले.

तारकपूर स्थानकात एसटी बसेस येण्यास बंद

रस्त्याचे काम अर्धवट, डिएसपी चौक मार्गे बस जातात निघून; प्रवाशांची गैरसोय, धावपळ, पूर्वीप्रमाणे एसटी स्थानकात येण्यासाठी योग्य नियोजन करा

नगर – शहरातील तारकपूर रस्त्याचे काम काही महिन्यांपासून अर्धवट असल्याने तारकपूर बस स्थानकात एसटी बसेस  येण्यास बंद झाल्या असून, बस स्थानकातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. तर अनेक अडचणींचा सामना करुन प्रवाशांना एसटी धरावी लागत असून, तारकपूर आगार व्यवस्थापकाने पूर्वीप्रमाणे एसटी बसेस बस स्थानकात येण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी प्रवाश्यांकडून होत आहे. तारकपूर रस्त्याचे काम काही महिन्यांपासून सुरु आहे. तारकपूर बस स्थानक समोरील एका बाजूचे काम पूर्ण झाले असून, उर्वरीत बाजूचे काम प्रलंबीत आहे. मात्र वाहतुक कोंडी होत असल्याचे कारण पुढे करुन बस स्थानकात येणारे बसेस सकाळी ९ नंतर येण्याचे बंद झाल्या आहेत. मोजयाच काही बस येत असल्याने त्यासाठी प्रवाश्यांची मोठी गर्दी होत आहे. तारकपूर बस स्थानक येथून विविध कामानिमित्त गावाकडे आणि इतर शहरामध्ये जाणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहे.

गावाला आणि विविध शहरात जाणारे नागरिक तारकपूर बस स्थानकात येतात, मात्र बस येणार की नाही याची शाश्वती नसल्याने हिरमोड होवून माळीवाडा बस स्थानकाकडे वळतात. परिणामी तारकपूर येथील प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. तर काही बस आल्यास त्यामध्ये बसण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत आहे. एसटी बस गाड्या
तारकपूर बस स्थानकावर न थांबता माळीवाडा बस स्थानक किंवा पुणे बस स्थानकावर थांबून पुढे जात असल्याने बस धरण्यासाठी महिलांसह लहान मुले, शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची कसरत होत आहे.
पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई आदी ठिकाणी जाणार्‍या गाड्या तारकपूर बस स्थानकात न थांबता पुढे जात आहे. यासाठी नागरिकांना डीएसपी चौकात थांबून एसटी धरण्याची वेळ येत आहे. रस्त्याचे काम दोन ते तीन महिन्यांपासून सुरु असल्याने तारकपूर बस स्थानकातील एसटी सेवा विस्कळीत झाली आहे.

माळीवाडा बस स्थानकाचे देखील नुतणीकरणाचे काम सुरु असल्याने तेथे देखील एकाचवेळी अनेक एसटी बसेस येत असल्याने जागेची कमतरता भासत आहे. हा ताण पूर्णत: स्वास्तिक चौक येथील पुणे बस स्थानकावर येत असून, कमी जागा असताना तेथे मोठ्या  प्रमाणात गर्दी होत आहे.प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळ प्रशासनाकडून
योग्य नियोजनाची गरज आहे. तारकपूर रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण झालेले असताना एसटी बस गाड्यांना पूर्वीप्रमाणे तारकपूर बस स्थानकात थांबविणे आवश्यक आहे, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होणार आहे. परीक्षा कालावधी संपल्यानंतरच मोठ्या प्रमाणात सुट्ट्यामुळे एसटीला मागणी वाढणार असून याकडे एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष
देण्याची गरज आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने या समस्येचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

वारंवार गो हत्येचे गुन्हे करणार्‍यांवर आता मकोका अंतर्गत कारवाइ

आमदार संग्राम जगताप यांची लक्षवेधी सूचना त्वरित मान्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नगर – गोहत्या व गो तस्करी करणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असून त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल होऊनही ते गो हत्या करतच आहेत. अशांवर मकोका सारख्या कडक कायदेशीर कायद्याने कारवाई करण्याची मागणी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय  अधिवेशनात अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी लक्षवेधी सूचना मांडत केली. या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी सांगितले, जर एखाद्यावर गोहत्येचे वारंवार गुन्हे दाखल झाले तर आता त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा  मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा
करत निर्देश देत असल्याचे लक्षवेधी सूचना त्वरित मान्य केली. यावेळी गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनीही चर्चेत भाग घेतला.

आ. संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर मधील श्रीगोंदा तालुयात घडलेल्या घटनेचा आधार घेत त्यांनी ही लक्षवेधी मांडली. आ. जगताप म्हणाले, २ नोव्हेंबर २०२४ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे फटाके वाजवण्यावरून झालेल्या भांडणात गो तस्करी करणार्‍या अतिक कुरेशी याने केलेल्या मारहाणीत राम ससाणे यांचा मृत्यू झाला होता. गो हत्या व तस्करी तसेच गुटख्याची तस्करी करणार्‍या अतिक कुरेशी गँगची असलेल्या मोठ्या दहशतीमुळे कोणीही या विरोधात गुन्हा दाखल करण्यास पुढे आले नाही. पोलिसांनीही एव्हढ्या मोठ्या घटनेकडे दुर्लक्ष केले. या कुरेशीवर गो हत्येचे अनेक गुन्हे दाखल असूनही त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही, असे सांगितले.

या घटनेचा दाखला देत आ.संग्राम जगताप यांनी अहिल्यानगरमध्ये गो हत्या व तस्करी करणार्‍यांची मोठी
दहशत अहिल्यानगर जिल्ह्यात असल्याचे सरकारच्या निर्देशनास आणून दिले. त्यामुळे गो हत्या व तस्करी करणार्‍यांवर वारंवार गुन्हे दाखल होऊनही ते जेलमधून जामिनावर सुटतात व पुन्हा पुन्हा हाच गुन्हा करत असतात. त्यामुळे अशांवर कडक कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने जसा लव्ह जिहाद साठी कायदा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच गो हत्येचे वारंवार गुन्हे दाखल झालेल्यांवरही कारवाईसाठी मकोका, एम.पी.डी. या सारख्या कडक कायदे आणावेत. तसेच श्रीगोंदा येथे घटनेत सरकारने लक्ष घालून विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. यावेळी गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनीही श्रीगोंदा येथे मारहाणी घटने संदर्भात गुन्हेगारांवर पोलीस कारवाई
करत असल्याचे सांगितले.