कत्तलीकरीता म्हशींची बेकायदा वाहतूक करणारा टेम्पो पकडला

0
29

पोलिसांनी ८ म्हशींची केली सुटका,९ लाखाच्या मुद्देमालासह एकाला घेतले ताब्यात

नगर – टेम्पोमध्ये म्हशी दाटीवाटीने कोंबून कत्तलीकरता घेऊन जाणारा टेम्पो कोतवाली पोलिसांनी पकडला. या कारवाईत
आठ म्हशींची सुटका करून एकास ताब्यात घेतले. ही कारवाई नगर पुणे रोडवरील केडगाव बायपास येथे २२ मार्च रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास केली.

कोतवाली पोलीस रात्री शहर हद्दीत गस्त घालीत असताना त्यांना माहिती मिळाली की एक  आयशर कंपनीचा टेम्पोमध्ये म्हशी दाटीवाटीने कोंबून कत्तलीकरिता पुणे रोडने नगर शहराकडे येत आहे. अशी माहिती मिळाल्याने कोतवाली पोलीस पथक तातडीने त्या ठिकाणी गेले असता एक आयशर टेम्पो (क्र. एम एच ०४ एच वाय ५५४०) नगर कडे येताना दिसला. पोलिसांनी टेम्पो थांबवून टेम्पो चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अमर इलाही शेख (वय ४० रा. उंदरी गाव, ता. हवेली जि. पुणे ) असे असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या टेम्पोची झडती घेतली असता
टेम्पोत दाटीवाटीने बांधलेल्या आठ म्हशी मिळून आल्या.

पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो व ४ लाख रुपये किमतीच्या ८ म्हशी असा ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सहाय्यक फौजदार लक्ष्मण बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अमर
शेख याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (च) (घ) (ड), सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ६, ९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली.