महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे सुरु असलेल्या विविध उपक्रमांचे नगरकरांकडून कौतुक
नगर – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित, ’मन वढाय वढाय…’ हा कार्यक्रम २३ मार्च रोजी सावेडी उपनगरातील
देशभक्त रावसाहेब पटवर्धन सभागृहात सायंकाळी झाला. या कार्यक्रमातून कवयित्री बहिणाबाईंवर आधारित गाणी, एकपात्री नाटिका व नृत्यातून त्यांचा जीवनप्रवास हळुवारपणे उलगडत गेला. कवयित्री बेबीताई गायकवाड
यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या
मध्यवर्ती शाखेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे नियामक मंडळ सदस्य क्षितिज झावरे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, नाट्यकर्मी अविनाश कराळे, निवेदक उद्धव काळापहाड आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अभिनेत्री तेजा पाठक हिच्या एकपात्री नाटीकेने कार्यक्रम सुरु झाला. त्यानंतर वैष्णवी कुलकर्णी यांच्या
बालचमूने सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. उत्तरार्धात प्रा.आदेश चव्हाण, ऋतुजा
पाठक, रेणुका पवार, श्रुती चव्हाण या सदाबहार गायकांच्या मन वढाय वढाय, सदा जगाच्या कारणे, माझी
माय सरसोती, अरे संसार संसार, खोप्यामंदी खोपा, विठ्ठल मंदिर या सारख्या गाण्यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
यासाठी हर्षद भावे यांनी तबला, अँडविन पेरेपाडम यांनी कीबोर्ड तर रमेश कार्ले यांनी ऑटोपॅडवर
संगीताची साथ देत सूर, ताल अन लयीचा त्रिवेणी संगमाचे अनोखे दर्शन या कार्यक्रमातून नगरकरांना घडवले.
दीप्ती शुक्रे यांच्या दिलखुलास निवेदनाने कार्यक्रमात रंगत आली. सांस्कृतिक कार्य आणि माहिती
तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती. नगरकर रसिकांसाठी हा सांगीतिक कार्यक्रम विनामूल्य होता. या कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद देत आयोजकांचे आभार मानले. सागर मेहेत्रे यांनी प्रास्ताविक केले. दीप्ती शुक्रे यांनी सूत्रसंचालन तर जालिंदर शिंदे यांनी आभार मानले.