शहिददिनी विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ ची केली ‘होळी

0
36

नगर – भारतीय कम्युनिस्ट पक्ष, डाव्या प्रागतिक पक्ष व संघटनांच्या वतीने २३ मार्च रोजी व्यक्ति आणि संघटनांचे घटनात्मक
अधिकार संपूर्णपणे नष्ट करणारे, लोकशाहीविरोधी असलेले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४ विधेयकाची होळी करण्यात आली. शहरातील पत्रकार चौक येथील शहीद भगतसिंह उद्यानात शहीद दिनीच्या पार्श्वभूमीवर सदर
विधेयक मागे घेण्याची मागणी करत त्याची होळी करण्यात आली. प्रारंभी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन
करुन इन्कालब जिंदाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात भाकपचे राज्य सेक्रेटरी कॉ. अ‍ॅड.सुभाष लांडे, बन्सी सातपुते, सुधीर टोकेकर, स्मिता पानसरे,
महेबुब सय्यद, अशोक सब्बन, अजित कुर्‍हाडे, आनंद गोलवड, आबीद खान, बापू चंदनशिवे, संध्या मेढे, युनूस तांबटकर, श्याम शिंदे आदी सहभागी झाले होते. प्रस्तावित विधेयक हे लोकशाही विरोधी असून, अशा प्रकारचे विधेयक पब्लिक सेफ्टी बील म्हणून १९१८ साली ब्रिटिश सरकारने  आणले होते. शहीद भगतसिंग, बटुकेश्वर दत्त यांनी त्यावेळी असेम्ब्लीत मनुष्यहानी होणार नाही, सभागृहात आवाज होऊन लक्ष वेधण्यासाठी बॉम्ब टाकून आवाज केला
होता व विरोध दर्शविला होता. त्या वेळी ते बील रद्द करण्यात आले होते. तशाच प्रकारचे विधेयक महाराष्ट्र सरकारने आणलेले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या घटनात्मक अधिकारावर दूरगामी परिणाम होणार आहेत. सत्तेला विरोध करणार्‍या राजकीय  पक्ष, व्यक्ती, संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जाईल. अर्बन नक्षलच्या नावाखालीश्रमिक, कामगार, कर्मचारी, शेतकरी यांच्या  चळवळींना मोडून काढण्यासाठी वापर केला जाणार आहे. सरकारचा उद्देश विरोधकांचा आवाज दाबण्याचा असल्याचा आरोप भाकपच्या वतीने करण्यात येणार आहे. अशा
जनविरोधी, घटनाविरोधी विधेयकाला सर्व स्तरातून विरोध व्हायला हवा व हे विधेयक कुठल्याही परिस्थितीत मंजूर होणार नाही, या साठी राज्यातील सर्व लोकशाहीवादी पक्ष, संघटनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कॉ. अ‍ॅड. सुभाष लांडे यांनी केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने २३ मार्च ते १४ एप्रिल केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणाविरोधात बेरोजगारी, महागाई, सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी, लोकशाही, समाजवाद, राज्य
घटना जनजागृती देशव्यापी मोहीम सुरू झाली आहे.  या मोहिमेचा प्रारंभ शहरात शहीद दिनापासून सुरु करण्यात आला आहे.