नगर – जिल्ह्यातील जनतेने महायुतीला मोठा कौल दिला असून
१० आमदार निवडून आले आहे. त्यामुळे जनतेची अपेक्षा देखील
वाढली आहे. आता आपली जबाबदारी देखील वाढली असून मोठे
काम करावे लागणार आहे. नगर जिल्ह्यात ३ एमआयडीसी मंजूर
झाल्या असून औद्योगिक वातावरण निर्माण करायचे आहे. किमान
जिल्ह्यातील १० हजार भूमिपुत्रांना रोजगार निर्माण होईल. लवकरच
उद्योजकांशी बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. एमआयडीसी
भागामध्ये खंडणीबहाद्दरांचा उद्रेक झाला असून त्यांचा बंदोबस्त
करणार. जिल्ह्यातील पाणी प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा आहे.
जिल्ह्याचा विकास आपणच करू शकतो. बाहेरच्या पुढार्यांनी आपले
प्रश्न सोडवले नाही! भांडणे लावून स्वतःची पोळी भाजून घेण्याचे काम
केले आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला साकळाई पाणी योजना
मंजूर केली आहे. आता आपल्या जिल्ह्याच्या हक्काचे पाणी मिळणार
आहे. ६५ टीएमसी पाणी गोदावरी खोर्यात आणल्याशिवाय स्वस्थ
बसणार नाही, त्यामुळे दुष्काळी भागातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी
सोडविला जाणार आहे. नगर जिल्ह्याचे पर्यटन वाढवण्यासाठी पुढाकार घेतला असून
राजमाता अहिल्याबाई यांचे स्मारक उभे राहणार आहे. जनतेने टाकलेला विश्वास सार्थ
ठरविण्याचे काम केले जाणार आहे. आमदार, मंत्रीपद हे शोभेचे पद नसून जबाबदारीची
जाण असणारे पद आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले यांना मंत्रीपदाची इच्छा आहे, आणि
त्यांना माझी सहमती देखील आहे. त्यांनी जिल्ह्यातील सर्व आमदारांना एकत्रित करून त्यांचा
सत्कार केला व चांगले काम करण्यासाठी ऊर्जा व प्रेरणा देण्याचे काम केले असल्याचे
प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
नगर तालुयाच्यावतीने पालकमंत्री, विधान परिषदेचे सभापती व महायुतीचे नवनिर्वाचित
आमदारांचा सत्कार सोहळा झाला. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान
परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आ.शिवाजीराव कर्डिले, आ.संग्राम जगताप, आ.मोनिकाताई
राजळे, आ.काशिनाथ दाते, आ.विठ्ठलराव लंघे, आ.विक्रम पाचपुते, आ.अमोल खताळ,
माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील, भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, बाबुशेठ
टायरवाले, नितीन दिनकर, अभय आगरकर, अनिल शिंदे, विनायक देशमुख, अशोक
सावंत, सुनील साळवे, शहाजीराजे भोसले आदींसह नागरिक उपस्थित होते.
विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे म्हणाले की, जीवनामध्ये वावरत असताना ’श्रद्धा
आणि सबुरी’ ठेवावी लागते. विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्यात सर्वात मोठे
बहुमत मिळाले आहे. पालकमंत्री यांच्या माध्यमातून मागील अडीच वर्षांमध्ये लोकभिमुख
विकास कामे झाले असल्यामुळेच महायुतीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले आहेत.
आ. कर्डिले यापूर्वी राज्यमंत्री झाले होते आता कॅबिनेट मंत्री करण्यासाठी आम्ही प्रयत्न
करू. माझी निष्ठा आणि देवाभाऊंची पुण्याई यामुळेच मी सभापती पदावर पोचलो आहे.
शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करावे
लागणार आहे. राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम केले
जाणार असल्याचे ते म्हणाले.
आ.शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, जिल्ह्यातील महायुतीचे आमदार, पालकमंत्री व
विधान परिषदेचे सभापती यांचा सत्कार सोहळा नगर तालुयाच्या वतीने झाला आहे.
विकासाची कामे पूर्ण करायची असेल तर सत्तेशिवाय होत नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली असल्यामुळेच
मोठ्या संख्येने आमदार निवडून आले आहे. आता जनतेच्या अपेक्षा देखील वाढले आहेत.
शेतकर्यांचा विजेचा प्रश्न गंभीर असून तो सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जलसंपदा खाते पूर्वी पुण्याकडे असायचे त्यामुळे आपल्या जिल्ह्यावर
अन्याय होत होता! मात्र आता आपल्या जिल्ह्यामध्येच असल्यामुळे
पाणी योजना पूर्ण होतील. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेला साकळाई पाणी योजनेचा
शब्द पूर्ण केला आहे. जिरायत भागाला न्याय देण्याचे काम झाले
पाहिजे. सुजय विखे पाटील माजी खासदार झाले असले तरी आता
त्यांना आपल्याला राज्यसभेवर पाठवावे लागणार आहे. मंत्रीपदाची
संधी मला दिली नसली तरी माझ्या मतदारसंघातील विकासाचे कामे
मार्गी लावावीत. सभापती प्रा. राम शिंदे यांनी जिल्ह्याच्या विकास
कामासाठी पुढाकार घ्यावा. राहुरी तालुयातील वावरथ जांभळी
पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी प्रयत्न करणार आहे. लोकांची
अपेक्षा मोठी आहे. पुढील काही महिन्यात जिल्हा परिषद महापालिका
नगरपालिका निवडणुका होणार असून आपण महायुती म्हणून संघटित
राहिलो तर यश हमखास मिळणार आहे असे ते म्हणाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेने १० आमदार आणि एक सभापती
असे अभूतपूर्व यश मिळाले आहे. मागच्या निवडणुकीत ’मी आजी होतो मात्र हे माजी होते’
आता हे आजी झालेत आणि मी माजी झालोय आता मी एकटा माजी आहे तरी मला आजी
करा अजून ४ वर्षे बाकी आहे. तोपर्यंत लोक विसरून जातील माझा भाषनापुरता उपयोग
करून घेऊ नका! अहिल्यानगर जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी एमआयडीसी साखळाई
पाणी योजना घोडच्या प्रकल्पातून २ टीएमसी पाणी आरक्षित केले आहे. अहिल्यानगर
जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आजी असणार्या पेक्षा मी ५० टक्के काम
जास्त करीत आहे असे मत सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
जनतेने टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवीत विकास कामाच्या माध्यमातून जिल्ह्यालापुढे घेऊन
जावे लागणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासाची कामे पूर्ण केली
जातील असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
यावेळी मोनिकाताई राजळे म्हणाल्या की, मंजूर महाविद्यालय हे शेवगाव पाथर्डी विधानसभा
मतदार संघात व्हावे यासाठी सर्व आमदारांनी सहकार्य करावे. तसेच आमदार काशिनाथ दाते म्हणाले
की, साकळाई पाणी योजनेमध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघातील गावांचा समावेश करण्यासाठी
सर्वांनी मदत करावी. यावेळी विक्रम पाचपुते, विठ्ठल लंघे, अमोल खताळ आदींची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय कर्डिले यांनी तर स्वागत दिलीप भालसिंग यांनी केले.