वनौषधींनी स्मरणशक्तीत करा वाढ

अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅमपर्यंत गाईच्या धारोष्ण 250 ग्रॅम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसांपर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते. अशोकचे साल, ब्राह्मी पूड समप्रमाणात एकत्र करून एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ एक कप दुधाबरोबर नियमितपणे काही महिने घेतल्याने बुद्धीत वाढ होते. शंखपुष्पीची 3-6 ग्रॅम पूड मधात घालून चाटावी आणि वरून दूध प्यावे. याच्या सेवनाने बुद्धीचा योग्य विकास होतो.

असा आहे फॉरबिडन ग्रह

खगोलशास्त्रज्ञांनी अवकाशात नव्या एक्सोप्लॅनेटचा शोध लावला आहे. सूर्याऐवजी इतर तार्‍यांभोवती फिरत असल्यामुळे त्यांना एक्सोप्लॅनेट असं म्हटलं जातं. काही खास वैशिष्ट्यांमुळे याला फॉरबिडन प्लॅनेट असं नाव देण्यात आलं आहे. एनजीटीएस-4 बी असं या ग्रहाचं शास्त्रीय नाव आहे. या ग्रहावरचं वातावरण खूप उष्ण असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. सूर्याच्या अगदी जवळ असणार्‍या बुध ग्रहापेक्षाही फॉरबिडन प्लॅनेटचं तापमान अधिक आहे. मंथली नोटिसेस ऑफ रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी नावाच्या जर्नलमध्ये हा शोध प्रकाशित करण्यात आला आहे. हा ग्रह अवकाशातल्या नेपच्युनिअन डेझर्ट नावाने ओळखल्या जाणार्‍या भागात सापडला आहे. या भागात उष्णता आणि किरणोत्सर्गाचं प्रमाण बरंच जास्त असतं.

आगळी ग्रीनरुफ बस

सध्या इंधन बचतीसाठी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जात आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न होत आहेत. झाडं लावण्याची, हिरवे पट्टे निर्माण करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. मात्र ही झाडं फक्त जमिनीवर किंवा घराच्या गच्चीवरच लावता येतात असं नाही. सार्वजनिक बसच्या टपांवरही बाग फुलवता येते. वाचून थोडं आश्‍चर्य वाटलं असलं तरी सिंगापूरमध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे. इथे आशिया खंडातली पहिली ग्रीन रूफटॉप असणारी बस सुरू झाली आहे. ‘गार्डन ऑन द मूव्ह’ या अभियानाअंतर्गत ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसच्या टपावर 1.8 गुणिले 1.5 मीटर आकाराचे दोन ग्रीन पॅनल बसवण्यात आले आहेत. माती भरलेल्या ग्रीन पॅनलचं वजन 250 ते 300 किलोपर्यंत असतं. मात्र या बसेसवरच्या ग्रीन पॅनलमध्ये मातीऐेवजी कार्बन फायबरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे या पॅनलचं वजन फक्त 40 किलो भरतं. या झाडांना जास्त पाणी द्यावं लागत नाही. वर्षातून दोन किंवा तीन वेळा देखरेखीची गरज भासते. ग्रीनरूफ बसेसमध्ये एसी लावावा लागत नाही. यामुळे 20 टक्के इंधनाची बचत होते. सध्या इथल्या चार मार्गांवर दहा ग्रीन रूफ बस चालवल्या जात असून काही चाचण्यानंतर 400 ग्रीन बसेस तयार केल्या जातील. बसच्या टपावर आणि आतमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.

व्यवसाय शैलीदार स्वाक्षर्‍यांचा

याजगात अर्थार्जनाचे अनेक मार्ग आहेत. फक्त आपल्याकडे चांगली संकल्पना असणं गरजेचं असतं. आपल्या डोक्यातली कल्पना विकण्याचं तंत्र अवगत व्हायला हवं. सध्या विविध ऑनलाईन व्यवसायांना प्रचंड वाव आहे. इंस्टाग्राम, फेसबुकसारख्या ऑनलाईन माध्यमांवर विविध फोटो अपलोड करून उत्पन्न मिळवता येतं. रशियातल्या एका विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर डिझायनर म्हणजे विशिष्ट शैलीत सही करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. यातून त्याने पाच महिन्यात 30,500 डॉलर्स म्हणजे 22 लाख रुपये उत्पन्न मिळवलं. आपली स्वाक्षरी शैलीदार असावी, अशी अनेकांची इच्छा असते. स्वाक्षरीद्वारे आपली छाप पाडता येते. पण अशी स्टायलिश स्वाक्षरी प्रत्येकाला जमतेच असं नाही. इवान कुजिन या रशियन विद्यार्थ्याची स्वाक्षरीही सर्वसाधारण म्हणावी अशीच होती. पासपोर्ट तयार करण्यापूर्वी इवानला स्वाक्षरी बदलायची होती. यासाठी त्याने मैत्रीण अनास्तासिया डोरची मदत घ्यायचं ठरवलं. तिला कॅलिग्राफीचं ज्ञान होतं.तिने आपल्या या मित्राची खास स्वाक्षरी तयार केली. या स्वाक्षरीचा सरावही करून घेतला. इथूनच इवानच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अशा प्रकारे त्याने डिझायनर स्वाक्षर्‍यांचा ऑनलाईन व्यवसाय करायचं ठरवलं. यासाठी त्याने राइट टाईट नावाने इंस्टाग्राम हँडल तयार केलं. यात त्याने अनास्तासियालाही सहभागी करून घेतलं. व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी त्याने 15 हजार रुबल म्हणजे 16 हजार रुपये खर्च केले. हँडल सुरू केल्यानंतर बारा तासांच्या आत त्याला पहिलं काम मिळालं.

चांगल्या नोकर्‍या सोडून तरुण बनतात वेटर आणि सफाई कामगार!

अधिक पगारासह चांगल्या सुविधा देणारी नोकरी करणे हे तरुण-तरूणीचे स्वप्न असते. पैशांसोबतच तुम्हाला म ान-सन्मान मिळेल अशी नोकरी मिळवण्यासाठी सर्वांची घडपड सुरू असते; मात्र चीनमधील तरुण चांगल्या पगाराची व्हाईट कॉलर नोकरी सोडून वेटर आणि सफाई कामगाराची नोकरी स्वीकारत आहेत. एवढेच नाही तर, ही नोकरी करत असताना खूश असल्याचे हे तरुण सांगत आहेत. चीनमधील मोठा तरुण वर्ग एका हॅशटॅगशी जोडला गेला असून इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आहे. चीनमधील तरुण या हॅशटॅगवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत आहेत. ‘बिजनेस इनसाइडर’ने दिलेल्या माहितीनुसार, 12 जून पर्यंत या हॅशटॅगला तीन कोटी लोक जोडले गेले आहे. रिपोर्टनुसार एक वर्षापासून तरुणांमध्ये हा बदल दिसत आहे. या ट्रेंडच्या मागे एक जुनी कथा आहे. या कथेनुसार कॉन्ग यिजी नावाच्या व्यक्तीने पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतरदेखील त्याच्याकडे व्यावहारिक ज्ञान नसते; मात्र पदवी आणि पदवीनंतर त्याला मिळालेला गाऊन यामुळे कॉन्ग यिजीला खूप सन्मान मिळतो. त्यामुळे यिजी रोज हा गाऊन घालून फिरत असे. त्याने कधीच तो गाऊन काढला नाही. आजही जगभरातील विद्यापीठामध्ये पदवीप्रदान सोहळ्यात गाऊन घातला जातो. या ट्रेंडला संपवण्यासाठी आणि कॉन्ग यिजीचा गाऊन उतरवण्यासाठीदेखील हा ट्रेंड सुरू करण्यात आल्याचे म्हटले जाते. या ट्रेंडनुसार तरुण व्हाईट कॉलर जॉब म्हणजे जी नोकरी हुशार, इंटेलेक्च्युअल लोकांसाठी असते. ती नोकरी सोडून जिथे डिग्रीची गरज नसते, अशी नोकरी स्वीकारत आहे. इन्स्टाग्रामवरील एका पोस्टवर कॅप्शन लिहिले आहे, नोकरी सोडल्यानंतर तरुण फास्ट फूड रेस्टॉरंट सुरू करत आहे. सफाई कामगार बनत आहे, ज्या नोकरीमध्ये जास्त बुद्धीचा वापर केला आहे. असे करत तरुण आपले आयुष्य आपल्या पद्धतीनुसार जगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.’’ तर दुसर्‍या महिलेने लिहिले आहे की, मी बाईट डान्समध्यो नोकरी करत होते; परंतु ही नोकरी आता मी सोडली आहे. कंपनी सोडल्यानंतर मी खूश आहे. आता मला महिन्याच्या रिपोर्टसची चिंता करण्याची गरज नाही. मी फक्त माझ्या फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये जेवण बनवते आणि विकते. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ती तिच्या रेस्टॉरंटमध्ये दररोज 140 डॉलर्स म्हणजेच सुमारे 11,000 रुपये कमवते. कामामुळे माझे शरीर थकते; परंतु मी आनंदी आहे. दुसर्‍या एका महिलेने लिहिले की, मी माझी उच्च पगाराची सल्लागाराची नोकरी सोडली. नोकरीसोबतच इमेल, मुलाखती आणि पीपीटीच्या मागे धावणे हा सर्व ताण गेला आहे. आता मी एका कॉफी शॉपमध्ये काम करते, जिथे मला अगोदरच्या नोकरीपेक्षा कितीतरी पट कमी पगार मिळतो; परंतु अगोदरच्या नोकरीपेक्षा मी आता जास्त आनंदी आहे.

एक कोटी पगार- तरी नोकरीसाठी कुणीच नाही तयार!

फक्त लाईट बल्ब बदलण्यासाठी एक कोटी रुपये पगार मिळणार… करणार का नोकरी? ही ऑफर ऐकून अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला; पण सध्या अशीच ‘जॉब ऑफर सोशल मीडिया’वर चर्चे त आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, लोक ही ऑफर ऐकून फक्त आश्‍चर्य व्यक्त करतात. एवढा भरघोस पगार मिळूनही या नोकरीसाठी कोणीच तयार होताना दिसत नाही. कारणही तसेच आहे. या व्यक्तिकडे लाईट बल्ब बदलणे एवढेच काम आहे, हे अगदी खरे आहे; पण हा लाईट बल्ब बदलण्यासाठी तब्बल 600 मीटर उंचीच्या टॉवरवर चढावे लागणार आहे. काम क्षुल्लक वाटले, तरी धोक्याचे असल्यामुळे कोणीच ही नोकरी स्विकारण्यास तयार नाही. ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झालेल्या जाहिरातीनुसार, ही नोकरी टॉवर लँटर्न चेंजरची आहे. हे काम अमेरिकेतील साऊथ डकोटा येथे आहे. ही नोकरी स्विकारणार्‍याला तब्बल 600 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या सिग्नल टॉवरवर चढून त्याचा बल्ब बदलावा लागेल. हा टॉवर सामान्य टॉवरपेक्षा थोडा वेगळा आहे. जसजसे वर जातो, तसतशी त्याची रुंदी कमी होत जाते. त्यांच्या माथ्यावर पोहोचणे आणि बल्ब बदलण्यासाठी तिथे उभे राहणे हे खरेच अत्यंत कठीण काम आहे.

वर चढण्यासाठी सुरक्षितता म्हणून फक्त दोरीचा म्हणजेच, सेफ्टी केबल्बचा वापर केला जातो. ‘मिरर यूके’ने दिलेल्या वृत्तानुसार, या नोकरीची सर्वात आवश्यक अट म्हणजे अर्जदाराला उंचीची भीती वाटू नये. तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा. एक वर्षापेक्षा कमी अनुभव असलेल्या व्यक्तीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. वेतन अनुभवावर आधारित असेल; पण सुरुवातीचे उत्पन्नदेखील कोणत्याही सामान्य व्यक्तीपेक्षा नक्कीच खूप जास्त असेल. जमिनीपासून 600 मीटरवर उंच असलेल्या टॉवरच्या माथ्यावर चढण्यासाठी सुमारे तीन तास लागतात, असे सांगितले जात आहे. हे काम करण्यासाठी चढायला तीन तास आणि उतरायलाही तेवढाच वेळ लागेल. म्हणजे काम सहा-सात तासांचे असेल. याशिवाय टॉवरच्या वरच्या बाजूला शंभर किलोमीटर तास वेगाने वारे वाहत असतात. त्यामुळे टॉवरवर चढणे आणखी आव्हानात्मक होते. हे काम करणार्‍या व्यक्तीला एक लाख पौंड (सुमारे 1 कोटी रुपये) वार्षिक पॅकेज मि ळेल.

एक किलो चहाची किंमत कोटीत!

आपल्या देशात चहाप्रेमींची काही कमी नाही. गरमागरम चहा प्यायल्याशिवाय तर अनेकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. भारतात चहाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. हा चहा विदेशातही निर्यात केला जाते. साधारणपणे एक किलो चहाची किंमत 400 ते 500 रुपये असते; पण हाच चहा कोट्यवधींना मिळत असेल तर… जगातील सर्वात महागड्या चहाची किंमत प्रति किलोसुमारे दहा लाख डॉलर आहे. भारतीय रुपयामध्ये याची किंमत सुमारे सात कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. जगातील सर्वात महागडा चहा चीनमध्ये सापडतो. हा चहा अतिशय दुर्मीळ वनस्पतीपासून तयार केला जातो. त्यामुळे या चहाची किंमत जास्त आहे. चीनमधील फुजियान प्रांतामधील वुई पर्वतांवर या चहाची पाने आढळतात. 2005 मध्ये या चहाची कापणी करण्यात आली होती. जगातील या सर्वात महागड्या चहाचे नाव ‘दा हॉंग पाओ’ आहे. या काही ग्रॅम चहाची किंमत सोन्याच्या किंमतीपेक्षाही जास्त आहे. 2002 मध्ये 20 ग्रॅम चहा 180,000 युआन म्हणजेच 28 हजार डॉलरला विकला गेला. भारतीय चलनामध्ये याची किंमत सुमारे 23 लाख रुपये होते.

अतिशय दुर्लभ असल्यामुळे चीनने हा चहा राष्ट्रीय खजाना म्हणून घोषित केला आहे. ‘दा हॉंग पाओ’ चहाची लागवड चीनच्या मिंग राजवंशाच्या काळात सुरू झाली. हा चहा अतिशय खास आहे. चीन कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष माओ यांनी 1972 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना चीनच्या अधिकृत भेटी दरम्यान 200 ग्रॅम ‘दा हॉंग पाओ’ चहा भेट म्हणून दिला होता. 1849 मध्ये ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट फॉर्च्यून माउंट वुईवर गुप्त मोहिमेवर गेले. तेथून त्यांनी हा चहा भारतात आणला. जगातील सर्वात महागडा चहा ‘दा हॉंग पाओ’ बाजारात मिळत नाही. हा चहा फक्त लिलावाद्वारे विकत घेता येतो. कारण तो अतिशय दुर्मीळ आहे. हा चहा एका दशकापूर्वी चीनच्या सिचुआनच्या याआन पर्वतांमध्ये एक उद्योजक आणि काही व्यक्तींनी मि ळून पहिल्यांदा पिकवला होता. या चहाची 50 ग्रॅमची पहिली बॅच 3,500 डॉलर म्हणजेच सुमारे तीन लाख रुपयांना विकली गेली. यामुळे त्याला जगातील सर्वात महागहा चहा म्हटले जाते. चिनी लोकांचा श्‍विास आहे की, त्या वेळी मिंग राजवटीची राणी अचानक आजारी पडली होती. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हा चहा पिण्याचा सल्ला देण्यात आला. हा चहा प्यायल्यानंतर राणी पूर्णपणे बरी झाली. यानंतर राजाने संपूर्ण राज्यात या चहाची लागवड करण्याचा आदेश दिला होता. मिंग राजाच्या लांब झग्यावरून या चहाच्या पानाला ‘दा- होंग पाओ’ असे नाव पडले.

38 कोटींची लॉटरी लागली; पण पैसे घ्यायलाच येईना!

बहुतेकजण मेहनत करून स्वत:चे भविष्य बनवतात तर काहीजण नशिबावर विश्‍वास ठेवतात. काहीजण एका रात्रीत नशीब पालटेल, या उद्देशाने लॉटरी खरेदी करतात. एक दिवस आपल्याला नशिबाची साथ मिळेल आणि आपण श्रीमंत होऊ असे स्वप्न तेपाहतात. काहींचे हे स्वप्न आयुष्यभर स्वप्न राहते, तर काही मोजक्याच जणांचे हे स्वप्न सत्यात उतरते. अशाच एका व्यक्तीला 38 कोटी रुपयांची लॉटरी लागली; पण बक्षिस घेण्यासाठी ती पुढेच आली नाही! ब्रिटनमधील एका भाग्यवान व्यक्तीला ही 38 कोटी रुपयांची लॉटरी लागली. ब्रिटन सरकारच्या राष्ट्रीय लॉटरीने ‘सेट फॉर लाईफ लॉटरी’ खेळणार्‍या ग्राहकांना आवाहन केले की आपापली लॉटरीची तिकिटे नीट तपासून लॉटरी लागली आहेका, याची खात्री करून घ्यावी. ब्रिटन सरकार समर्थित राष्ट्रीय लॉटरीचा लकी ड्रॉ एका भाग्यवान व्यक्तीला लागला आहे. ‘सेट फॉर लाईफ ड्रॉ’ ही लॉटरी जिंकणार्‍या भाग्यवान व्यक्तीला दरमहा 10 हजार पाऊंड म्हणजे सुमारे 11 लाख रुपये दिले जातील. ही लॉटरी जिंकणार्‍या व्यक्तीला पुढील 30 वर्षे दर महिन्याला ही रक्कम दिली जाईल; पण आतापर्यंत ‘सेट फॉर लाईफ लॉटरी’चा भाग्यवान विजेता सापडलेला नाही. त्यामुळे सरकारने ही लॉटरी खरेदी करणार्‍या ग्राहकांना तिकीट तपासण्यास सांगितले आहे. दरम्यान, या व्यक्तीकडे डिसेंबर 2023 पर्यंतचा वेळ आहे. या वर्षाच्या डिसेंबरपर्यंत हा भाग्यवान विजेता त्याची बक्षिसाची मालकी घेऊ शकतो. भाग्यवान विजयी तिकीट ब्रिटनमधील दक्षिण हॉलंड येथून विकत घेतले होते, अशी माहिती ब्रिटनच्या ‘द मेट्रो न्यूज वेबसाइट’ ने दिली आहे. या माहितीनुसार, या तिकिटाच्या बक्षिसावर दावा करण्यासाठी भाग्यवान विजेत्याकडे 2 डिसेंबर 2023 पर्यंत वेळ आहे. 5 जून रोजी या विजेत्याला 38 कोटींची लॉटरी लागली; पण भाग्यवान विजेता अद्याप न सापडल्यामुळे शोध सुरू आहे. लॉटरी कंपनीने याबाबत माहिती देताना सांगितले आहे की ते या भाग्यवान रहस्यमय माणसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

… तर गमवावी लागेल नोकरी

एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करताना तेथील नियम पाळावे लागतात. सर्व कंपन्यांमध्ये सर्वसाधारणपणे सारख्या सोयीसुविधाही देण्यात येतात. कंपनीचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. अन्यथा, दंड भरावा लागतो. नोकरी जाण्याचा धोकाही असतो. कोणत्याही कंपनीत रुजू होताना आपल्याला या नियमांची माहिती दिली जाते. दरम्यान, काही कंपन्यांकडून काही विचित्र नियम लागू करण्यात येतात. अशाच एका कंपनीच्या नियम ानुसार कर्मचार्‍याचे विवाहबाह्य संबंध आढळल्यास नोकरीवरून काढून टाकले जाते. कर्मचार्‍याचे विवाहबाह्य संबंध असतील तर पत्नीला धोका देणार्‍या कर्मचार्‍याला या कंपनीत कामावरून हटवण्यात येते. विवाहबाह्य संबंध रोखण्यासाठी कंपनीने हा विचित्र नियम लागू केला आहे. पतीने पत्नीशी एकनिष्ठ राहावे, असा या मागचा हेतू आहे. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने म्हटलेआहे की या चिनी कंपनीने कोणत्याही कर्मचार्‍याने विवाहबाह्य संबंध ठेवल्यास नोकरी गमवावी लागू शकते. कंपनीने नऊ जूनपासून कर्मचार्‍यांसाठी हा विचित्र नियम लागू केला. कंपनीतील सर्वमहिला आणि पुरुष कर्मचार्‍यांसाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे. पत्नीने पतीला धोका दिल्यास तिलाही कंपनीकडून नारळ देण्यात येतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, विवाहबाह्य संबंधांवर बंदी घालण्याचा नियम संस्थेचे अंतर्गत व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी करण्यात आला आहे. कंपनीच्या मते, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कंपनीशी एकनिष्ठ रहावे लागते. कंपनी आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेचा विचार करणे महत्त्वाचे आहे या कंपनीने घटस्फोटालाही मनाई केली आहे. कंपनीच्या कर्मचार्‍यांसह ‘सोशल मीडिया’वर याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘साऊथ चायना पोस्ट’च्या रिपोर्टनुसार, कंपनीने एका वरिष्ठ कार्यकारी अधिकार्‍याला कामावरून हटवले आहे. हा कर्मचारी एका महिलेसोबत हातात हात घालून फिरताना दिसला. ही महिला त्याची पत्नी नव्हती. या दोघांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर कंपनीने ही कारवाई केली आहे.

आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र चाळीशीनंतरही टिकवा तारुण्य

एकदा तरी स्नेहन, स्वेदन, शिरोधारा, मात्राबस्ती हे पंचकर्मातील उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावेत. घरच्या घरी रोज अंघोळीच्या आधी किंवा आठवड्यातून एकदा अंघोळीच्या आधी औषधीयुक्त तेल लावावे.

ब) डोळे : चाळिशी आल्याची सूचना सर्वांत आधी डोळे देतात. कारण एखादे पुस्तक, वर्तमानपत्र वाचताना डोळे दुखतात, कमी उजेडात वाचता येत नाही. अशी लक्षणे दिसल्यावर डॉक्टरांकडे जाऊन डोळे तपासून घ्यावेत. नंबर लागला असेल तर नियमित चष्मा वापरावा. सुरुवातीला चष्मा लावण्याची सवय नसल्यामुळे लाज, कटकट किंवा त्रासदायक वाटणे असे प्रकार होतात. परंतु तरीही डोळ्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी नियमितपणे चष्मा वापरावा. डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी रात्री 7-8 तास नियमित झोप घ्यावी. चाळिशीमध्ये डोळ्यांच्या खोबणीतील चरबी कमी होते. तसेच डोळेही थोड्या प्रमाणात आकसतात. त्यामुळे सुंदर टपोरे डोळे खोल दिसू लागतात. याकरिता आठवड्यातून एकदा चांगल्या क्रीमने डोळ्यांचा मसाज करावा. तसेच डोळ्यावर गुलाब पाण्यामध्ये भिजवलेला कापूस किंवा काकडीचा काप ठेवावा. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळून डोळे ताजेतवाने होतात. काम करताना दोन ते तीन वेळेला थंड पाण्याने डोळे धुवावेत. याने डोळ्यांवरचा ताण कमी होतो व डोळे पुन्हा काम किंवा वाचन करण्यास तयार होतात. महिन्यातून एकदा पंचकर्मातील नेत्रतर्पण, शिरोधारा, नेत्रबस्ती हे उपक्रम डोळ्यांच्या आरोग्यासाठी करावेत.

क) दात वाढत्या वयाबरोबर दातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सहा महिन्यांतून एकदा तपासणी करून घ्यावी. चाळिशीमध्ये दात विरळ व्हायला लागतात. त्यांच्यातील अंतर वाढते. असे होऊ नये म्हणून हिरड्यांचे आरोग्य चांगले राखणे गरजेचे असते. दात घासताना हिरड्यांनासुद्धा बोटांनी मसाज करावा. तसेच आहारामध्ये लिंबू, मोसंबी, संत्री, आवळा असा ’क’ जीवनसत्त्वयुक्त आहार घ्यावा. दातांची काळजी नीट घेतली, तर वार्धक्य उशिरा येते. सकाळी-संध्याकाळी दोन वेळा दात घासावेत. दातांमध्ये अन्नकण अडकत असतील, हिरड्यांमधून रक्त येत असेल, दात किडलेला असेल तर वेळीच दंतवैद्यांना दाखवून उपचार करावेत.

ड) अस्थी : वय वाढते तसे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते. हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे लहानशा अपघाताने हाडे मोडू शकतात. म्हणून चाळिशीमध्ये अपघात होणार नाही याची काळजी घ्या. स्त्रियांमध्ये मान, कंबर दुखणे व गुडधे दुखणे या तक्रारी जास्त प्रमाणात असतात. मणके व त्यांच्यामधील कूर्चा झिजल्याने पाठदुखी, कंबरदुखी उद्भवते. मणक्यांमधील अंतर कमी झाल्यामुळे तेथील नसांवर दाब पडतो. त्यामुळे हात व पायांमध्ये मुंग्या येणे, बधीरपणा येणे, दुर्बलता येणे ही लक्षणे दिसतात.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400