एकदा तरी स्नेहन, स्वेदन, शिरोधारा, मात्राबस्ती हे पंचकर्मातील उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावेत. घरच्या घरी रोज अंघोळीच्या आधी किंवा आठवड्यातून एकदा अंघोळीच्या आधी औषधीयुक्त तेल लावावे.
ब) डोळे : चाळिशी आल्याची सूचना सर्वांत आधी डोळे देतात. कारण एखादे पुस्तक, वर्तमानपत्र वाचताना डोळे दुखतात, कमी उजेडात वाचता येत नाही. अशी लक्षणे दिसल्यावर डॉक्टरांकडे जाऊन डोळे तपासून घ्यावेत. नंबर लागला असेल तर नियमित चष्मा वापरावा. सुरुवातीला चष्मा लावण्याची सवय नसल्यामुळे लाज, कटकट किंवा त्रासदायक वाटणे असे प्रकार होतात. परंतु तरीही डोळ्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी नियमितपणे चष्मा वापरावा. डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी रात्री 7-8 तास नियमित झोप घ्यावी. चाळिशीमध्ये डोळ्यांच्या खोबणीतील चरबी कमी होते. तसेच डोळेही थोड्या प्रमाणात आकसतात. त्यामुळे सुंदर टपोरे डोळे खोल दिसू लागतात. याकरिता आठवड्यातून एकदा चांगल्या क्रीमने डोळ्यांचा मसाज करावा. तसेच डोळ्यावर गुलाब पाण्यामध्ये भिजवलेला कापूस किंवा काकडीचा काप ठेवावा. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळून डोळे ताजेतवाने होतात. काम करताना दोन ते तीन वेळेला थंड पाण्याने डोळे धुवावेत. याने डोळ्यांवरचा ताण कमी होतो व डोळे पुन्हा काम किंवा वाचन करण्यास तयार होतात. महिन्यातून एकदा पंचकर्मातील नेत्रतर्पण, शिरोधारा, नेत्रबस्ती हे उपक्रम डोळ्यांच्या आरोग्यासाठी करावेत.
क) दात वाढत्या वयाबरोबर दातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सहा महिन्यांतून एकदा तपासणी करून घ्यावी. चाळिशीमध्ये दात विरळ व्हायला लागतात. त्यांच्यातील अंतर वाढते. असे होऊ नये म्हणून हिरड्यांचे आरोग्य चांगले राखणे गरजेचे असते. दात घासताना हिरड्यांनासुद्धा बोटांनी मसाज करावा. तसेच आहारामध्ये लिंबू, मोसंबी, संत्री, आवळा असा ’क’ जीवनसत्त्वयुक्त आहार घ्यावा. दातांची काळजी नीट घेतली, तर वार्धक्य उशिरा येते. सकाळी-संध्याकाळी दोन वेळा दात घासावेत. दातांमध्ये अन्नकण अडकत असतील, हिरड्यांमधून रक्त येत असेल, दात किडलेला असेल तर वेळीच दंतवैद्यांना दाखवून उपचार करावेत.
ड) अस्थी : वय वाढते तसे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते. हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे लहानशा अपघाताने हाडे मोडू शकतात. म्हणून चाळिशीमध्ये अपघात होणार नाही याची काळजी घ्या. स्त्रियांमध्ये मान, कंबर दुखणे व गुडधे दुखणे या तक्रारी जास्त प्रमाणात असतात. मणके व त्यांच्यामधील कूर्चा झिजल्याने पाठदुखी, कंबरदुखी उद्भवते. मणक्यांमधील अंतर कमी झाल्यामुळे तेथील नसांवर दाब पडतो. त्यामुळे हात व पायांमध्ये मुंग्या येणे, बधीरपणा येणे, दुर्बलता येणे ही लक्षणे दिसतात.
डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे
दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर
अहमदनगर मोबाईल नं- 8793400400