38 कोटींची लॉटरी लागली; पण पैसे घ्यायलाच येईना!

0
60

बहुतेकजण मेहनत करून स्वत:चे भविष्य बनवतात तर काहीजण नशिबावर विश्‍वास ठेवतात. काहीजण एका रात्रीत नशीब पालटेल, या उद्देशाने लॉटरी खरेदी करतात. एक दिवस आपल्याला नशिबाची साथ मिळेल आणि आपण श्रीमंत होऊ असे स्वप्न तेपाहतात. काहींचे हे स्वप्न आयुष्यभर स्वप्न राहते, तर काही मोजक्याच जणांचे हे स्वप्न सत्यात उतरते. अशाच एका व्यक्तीला 38 कोटी रुपयांची लॉटरी लागली; पण बक्षिस घेण्यासाठी ती पुढेच आली नाही! ब्रिटनमधील एका भाग्यवान व्यक्तीला ही 38 कोटी रुपयांची लॉटरी लागली. ब्रिटन सरकारच्या राष्ट्रीय लॉटरीने ‘सेट फॉर लाईफ लॉटरी’ खेळणार्‍या ग्राहकांना आवाहन केले की आपापली लॉटरीची तिकिटे नीट तपासून लॉटरी लागली आहेका, याची खात्री करून घ्यावी. ब्रिटन सरकार समर्थित राष्ट्रीय लॉटरीचा लकी ड्रॉ एका भाग्यवान व्यक्तीला लागला आहे. ‘सेट फॉर लाईफ ड्रॉ’ ही लॉटरी जिंकणार्‍या भाग्यवान व्यक्तीला दरमहा 10 हजार पाऊंड म्हणजे सुमारे 11 लाख रुपये दिले जातील. ही लॉटरी जिंकणार्‍या व्यक्तीला पुढील 30 वर्षे दर महिन्याला ही रक्कम दिली जाईल; पण आतापर्यंत ‘सेट फॉर लाईफ लॉटरी’चा भाग्यवान विजेता सापडलेला नाही. त्यामुळे सरकारने ही लॉटरी खरेदी करणार्‍या ग्राहकांना तिकीट तपासण्यास सांगितले आहे. दरम्यान, या व्यक्तीकडे डिसेंबर 2023 पर्यंतचा वेळ आहे. या वर्षाच्या डिसेंबरपर्यंत हा भाग्यवान विजेता त्याची बक्षिसाची मालकी घेऊ शकतो. भाग्यवान विजयी तिकीट ब्रिटनमधील दक्षिण हॉलंड येथून विकत घेतले होते, अशी माहिती ब्रिटनच्या ‘द मेट्रो न्यूज वेबसाइट’ ने दिली आहे. या माहितीनुसार, या तिकिटाच्या बक्षिसावर दावा करण्यासाठी भाग्यवान विजेत्याकडे 2 डिसेंबर 2023 पर्यंत वेळ आहे. 5 जून रोजी या विजेत्याला 38 कोटींची लॉटरी लागली; पण भाग्यवान विजेता अद्याप न सापडल्यामुळे शोध सुरू आहे. लॉटरी कंपनीने याबाबत माहिती देताना सांगितले आहे की ते या भाग्यवान रहस्यमय माणसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.