सध्या इंधन बचतीसाठी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जात आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न होत आहेत. झाडं लावण्याची, हिरवे पट्टे निर्माण करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. मात्र ही झाडं फक्त जमिनीवर किंवा घराच्या गच्चीवरच लावता येतात असं नाही. सार्वजनिक बसच्या टपांवरही बाग फुलवता येते. वाचून थोडं आश्चर्य वाटलं असलं तरी सिंगापूरमध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे. इथे आशिया खंडातली पहिली ग्रीन रूफटॉप असणारी बस सुरू झाली आहे. ‘गार्डन ऑन द मूव्ह’ या अभियानाअंतर्गत ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसच्या टपावर 1.8 गुणिले 1.5 मीटर आकाराचे दोन ग्रीन पॅनल बसवण्यात आले आहेत. माती भरलेल्या ग्रीन पॅनलचं वजन 250 ते 300 किलोपर्यंत असतं. मात्र या बसेसवरच्या ग्रीन पॅनलमध्ये मातीऐेवजी कार्बन फायबरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे या पॅनलचं वजन फक्त 40 किलो भरतं. या झाडांना जास्त पाणी द्यावं लागत नाही. वर्षातून दोन किंवा तीन वेळा देखरेखीची गरज भासते. ग्रीनरूफ बसेसमध्ये एसी लावावा लागत नाही. यामुळे 20 टक्के इंधनाची बचत होते. सध्या इथल्या चार मार्गांवर दहा ग्रीन रूफ बस चालवल्या जात असून काही चाचण्यानंतर 400 ग्रीन बसेस तयार केल्या जातील. बसच्या टपावर आणि आतमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.