व्यवसाय शैलीदार स्वाक्षर्‍यांचा

0
56

याजगात अर्थार्जनाचे अनेक मार्ग आहेत. फक्त आपल्याकडे चांगली संकल्पना असणं गरजेचं असतं. आपल्या डोक्यातली कल्पना विकण्याचं तंत्र अवगत व्हायला हवं. सध्या विविध ऑनलाईन व्यवसायांना प्रचंड वाव आहे. इंस्टाग्राम, फेसबुकसारख्या ऑनलाईन माध्यमांवर विविध फोटो अपलोड करून उत्पन्न मिळवता येतं. रशियातल्या एका विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर डिझायनर म्हणजे विशिष्ट शैलीत सही करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. यातून त्याने पाच महिन्यात 30,500 डॉलर्स म्हणजे 22 लाख रुपये उत्पन्न मिळवलं. आपली स्वाक्षरी शैलीदार असावी, अशी अनेकांची इच्छा असते. स्वाक्षरीद्वारे आपली छाप पाडता येते. पण अशी स्टायलिश स्वाक्षरी प्रत्येकाला जमतेच असं नाही. इवान कुजिन या रशियन विद्यार्थ्याची स्वाक्षरीही सर्वसाधारण म्हणावी अशीच होती. पासपोर्ट तयार करण्यापूर्वी इवानला स्वाक्षरी बदलायची होती. यासाठी त्याने मैत्रीण अनास्तासिया डोरची मदत घ्यायचं ठरवलं. तिला कॅलिग्राफीचं ज्ञान होतं.तिने आपल्या या मित्राची खास स्वाक्षरी तयार केली. या स्वाक्षरीचा सरावही करून घेतला. इथूनच इवानच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अशा प्रकारे त्याने डिझायनर स्वाक्षर्‍यांचा ऑनलाईन व्यवसाय करायचं ठरवलं. यासाठी त्याने राइट टाईट नावाने इंस्टाग्राम हँडल तयार केलं. यात त्याने अनास्तासियालाही सहभागी करून घेतलं. व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी त्याने 15 हजार रुबल म्हणजे 16 हजार रुपये खर्च केले. हँडल सुरू केल्यानंतर बारा तासांच्या आत त्याला पहिलं काम मिळालं.