जशास तस

एकदा कोल्हीणबाईला दोन पिले झाली. तिला खूप आनंद झाला. सहसा ती आपल्या पिलांना एकटे सोडून ती कुठे जात नसे. पण एकदा फारच भूक लागल्याने थोडक्या वेळात काही तरी खाऊन यावे, म्हणून कोल्हीण बाहेर पडली आणि जरा पुढे जात नाही, तोच एका गरुड पक्षिणीने झडप घालून त्यातील एक पिलू चोचीत धरले. ते पाहून कोल्हीण पक्षिणीला म्हणाली, बाई गं, दया दाखव माझ्यावर. देवाला किती नवस बोलले., तेव्हा किती तरी दिवसांनी मला ही पिलं झाली. त्यातील एक नेऊन मला दुःखात लोटू नकोस. पाहिजे तर मी तुझे पाय धरते, पण माझ्या पिलांना सोड बाई.’’ पण कोल्हीणीची विनवणी गरूड पक्षिणीने झिडकारून लावीत चोचीत धरलेले कोल्हिणीचे पिलू आपल्या घरट्यात नेऊन आपल्या पिलांना खाऊ घातले. ते पाहून कोल्हीण संतापाने पेटून उठली. या बाईला चांगला धडा शिकवावा, म्हणून ती कामाला लागली. पलीकडे पेटलेला विस्तव दिसताच त्यातील एक कोलीत तिने झाडाच्या बुंध्याजवळ आणून टाकले. त्यावर वाळलेली ढीगभर गवतकाडी टाकताच गवताने पेट घेतला. त्या धगीने ते झाडही पेटले. त्या आगीने झाडावर असलेली गरुड पक्षिणीची पिले होरपळून खाली पडताच कोल्हीण बाईने ती खाऊन परतफेड केली.

तात्पर्य – आपल्या सामर्थ्याचा वृथा गर्व करु नये.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज- सेप्ट्रॉनचे औषध घेतल्यानंतर रिऍक्शन येते का?

तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर तपासणी झाल्यावर औषध लिहून देण्यापूर्वी ‘‘तुम्हाला सेप्ट्रॉनची रिऍक्शन येते का?’’ असा प्रश्‍न डॉक्टरांनी नक्कीच विचारला असेल. सेप्ट्रॉन हे एक अत्यंत उपयुक्त असे औषध आहे. सल्फामेथोक्झॅझोल व ट्रायमिथोप्रीम या दोन्ही औषधांचे ५ः१ या प्रमाणात मिश्रण म्हणजे सेप्ट्रॉन होय. अनेक जिवाणूंना मारण्यासाठी या प्रभावी औषधाचा वापर केला जातो. बरेचदा सुरुवातीस हेच औषध दिले जाते.

कोणत्याही द्रव्याला शरीराकडून स्विकारले जाईलच असे नाही. काही वेळा शरीर असे द्रव्य नाकारते. यालाच आपण ऍलर्जी किंवा वावडे असे म्हणतो. पेनिसिलीनसारख्या इंजेक्शनद्वारे दिल्या जाणार्‍या औषधाला रिऍक्शन येऊ शकते. ती फार गंभीर स्वरूपाची असते व क्वचित मृत्यूही येऊ शकतो. सेप्ट्रॉनलाही रिऍक्शन येऊ शकते. कोणत्याही द्रव्याला शरीराच्या प्रतिकारशक्तीने नष्ट करण्यासाठी दिलेला प्रतिसाद म्हणजेच रिऍक्शन होय. सेप्ट्रॉनला येणारी विशिष्ट प्रकारची रिऍक्शन म्हणजे अंगावर सर्वत्र पुरळ येतो. हा पुरळ नंतर लाक्षणिक चिकित्सेनंतर बरा होतो. क्वचित प्रसंगी जास्त गंभीर रिऍक्शन येऊ शकते. मृत्यूही येण्याची शक्यता नसली तरी शारीरिक त्रास बराच होतो. त्यामुळे एकदा सेप्ट्रॉन व सल्फरला रिऍक्शन आल्यास ते लक्षात ठेवून डॉक्टरांना तसे सांगावे, म्हणजे पुढील धोके टळतील.

हसा आणि शतायुषी व्हा!

इंग्रजी माध्यमात पदवीधर झालेल्या सुनेने सासुला विचारलं:

’तडफड’ म्हणजे नेमके काय असतं ?

सासु शांतपणे उठली, आणि वायफायचा स्विच बंद केला.

म्हणाली… ‘घे अनुभव’.

वास्तू

तुमच्या घराच्या जर वायव्य दिशेस स्वयंपाकगृह अथवा मुख्य शयनगृह असेल तर त्या पतीपत्नीमध्ये खटके उडण्याचे प्रमाण फारच मोठ्या प्रमाणावर असते. अशा वास्तू म्हणजे भांडणे, अशांतता व असमन्वय यांचे माहेरघरच असते व एकंदरीत त्या कुटुंबाची अधोगतीकडे वाटचाल होत असते.

सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल / खोबरेलतेल किंवा हे बोटाने लावावे. च्यवनप्राश १० ग्रॅम सकाळी सेवन करणे

केसांची मुळे बळकट होण्यासाठी

डोक्यावरील सर्व केस पुढे पाडून विंचरा, डोके डावीकडे झुकवून केस डावीकडे पाडून व उजवीकडे डोके करून केस उजवीकडे पाडून विंचरावेत. यामुळे केसांची मुळे बळकट होऊन केस चमकदार व निकोप होतात.

टोमॅटोच्या साली काढण्यासाठी

जर टोमॅटोच्या साली काढावयाच्या असतील थोडा वेळ गरम पाण्यात ठेवून नंतर त्यांच्या साली काढा. साली सहजतेने निघतील.

कोबीच्या वड्या

साहीत्य – ३०० ग्रॅम कोबी, १ वाटी हरभर्‍याची डाळ, १/२ वाटी तूरीची डाळ, १ चमचा गरम मसाला, १ लिंब, कढीपत्ता, कोथींबीर, १/२ चमचा साखर, मीठ, तेल, हिंग, हळद.

कृती – दोन्ही डाळी दोन तास भिजत घाला. नंतर वाटून घ्या. कोबी किसून घ्या. नंतर सर्व एकत्र करून गोळा तयार करून घ्या. एका थाळीला तेलाचा हात फिरवा. त्यात वरील गोळा थापा. नंतर कुकरमध्ये ठेवून वाफवून घ्या. गार झाल्यावर चौकोनी वड्या कापा व तव्यावर तेल घालून तळा.

मुलांना वेळ कसा द्यावा

जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर तुमच्यासोबत तुमच्या मुलांनाही त्यात सामील करा. त्यांनाही तुमच्यासोबत मॉर्निंग वॉकसाठी बाहेर घेऊन जा. त्यामुळे त्यांनाही चांगल्या सवयी लागून आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होईल. त्यासोबतच तुम्ही एकमेकांसोबत अधिक वेळ घालवू शकाल.

विस्मरण वाढलंय?

विशिष्ट वयानंतर स्मरणशक्तीवर परिणाम होऊ लागतो. वैद्यकीय भाषेत या स्थितीला अल्झायमर किंवा स्मृतीभ्रंश असं म्हटलं जातं. अल्झायमर हा वार्धक्याशी संबंधित विकार असला तरी 65 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीलाही तो जडू शकतो. वयोपरत्वे अल्झायमरची तीव्रता वाढू लागते. हा डिमेन्शियाचा सर्वसाधारणपणे आढळून येणारा विकार आहे. यामुळे माणसाची विचार करण्याची शक्ती आणि पद्धत, स्मरणशक्ती आणि वागणूक यावर परिणाम होतो. मेंदूतल्या पेशी मृतवत झाल्याने अल्झायमर जडतो. अल्झायमरमागील नेमकी कारणं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. मेंदूत ऍमिलॉइड प्लाक आणि ताउ टँगल्स या घटकांची निर्मिती झाल्याने स्मरणशक्तीवर परिणाम होऊ लागतो असं तज्ज्ञ सांगतात. यामुळे मज्जासंस्थेच्या पेशींच्या कार्यात अडथळे येऊ न मेंदूतल्या पेशी नष्ट होतात. अल्झायमरच्या रूग्णांच्या मेंदूत विशिष्ट रसायनांची कमतरता निर्माण होते. यामुळे संदेशवहन योग्य पद्धतीने होत नाही. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना हा विकार जडण्याची शक्यता दुपटीने जास्त असते.

मधुमेह हिरावून घेऊ शकतो दृष्टी

मधुमेह ही सध्या सर्वात वेगाने वाढणारी शारीरिक समस्या आहे. यामुळे रक्तातील साखरेची झपाट्याने वाढ होते; मात्र जखमा लवकर बर्‍या होत नाहीत. मधुमेहामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. रक्तातील साखरेची वाढलेली पातळी दृष्टी हिरावून घेऊ शकते. म्हणजेच मधुमेहामुळे डोळ्यांच्या दृष्टीशी संबंधित समस्या असू शकतात. त्याला डायबेटिक रेटिनोपॅथी असे म्हणतात. डायबेटिक रेटिनोपॅथी मधुमेही रुग्णांची दृष्टी हिरावून घेऊ शकते. याचा परिणाम रेटिनामधील रक्तवाहिन्यांवर होतो. मधुमेहामुळे होणार्‍या डोळ्यांच्या समस्यांमुळे रक्तवाहिन्या ङ्गुगतात. त्यातून गळती होण्याचा धोका असतो. या कारणामुळे ते कमी दृश्यमान होतात. कालांतराने समस्या आणखी गंभीर होऊ शकते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी वर्षातून एकदा तरी डोळे तपासले पाहिजेत. रक्तातील साखरेची पातळी वाढणे आणि मधुमेहामध्ये डोळ्यांच्या समस्या वाढणे हे त्यामागील प्रमुख कारण आहे.

रक्तातील साखर लहान रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आणते आणि त्यामुळे डोळे नवीन रक्तवाहिन्या बनवण्याचा प्रयत्न करतात. या वाहिन्या व्यवस्थित तयार होत नसल्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथीचा त्रास सुरू होतो. मधुमेहाकडे योग्य लक्ष न देणे, उच्च रक्तदाब किंवा साखरेची पातळी सतत जास्त राहणे आणि मद्यपान, सिगारेटचे व्यसन यामुळे ही समस्या उद्भवू शकते. सुरुवातीला अनेक मधुम ेही रुग्णांमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथीची लक्षणे दिसत नाहीत; पण समस्या वाढत जाते तशी दृष्टी धूसर होणे, कमी होणे, चक्कर येणे, डोकेदुखीचा त्रास आदी जाणवू शकते. म्हणूनच मधुमेहावर चोख उपचार करणे गरजेचे ठरते. मधुमेहामध्ये डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी नियमितपणे डोळे तपासत राहणे, रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे, सकस आहार आणि निरोगी जीवनशैलीबरोबरच शारीरिक हालचाली, व्यायाम करत राहणे, आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस नियमित व्यायाम करणे आदी उपाय आवश्यक ठरतात. धावणे, चालणे किंवा सायकल चालवल्यास डोळे चांगले काम करतात.