विस्मरण वाढलंय?

0
207

विशिष्ट वयानंतर स्मरणशक्तीवर परिणाम होऊ लागतो. वैद्यकीय भाषेत या स्थितीला अल्झायमर किंवा स्मृतीभ्रंश असं म्हटलं जातं. अल्झायमर हा वार्धक्याशी संबंधित विकार असला तरी 65 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीलाही तो जडू शकतो. वयोपरत्वे अल्झायमरची तीव्रता वाढू लागते. हा डिमेन्शियाचा सर्वसाधारणपणे आढळून येणारा विकार आहे. यामुळे माणसाची विचार करण्याची शक्ती आणि पद्धत, स्मरणशक्ती आणि वागणूक यावर परिणाम होतो. मेंदूतल्या पेशी मृतवत झाल्याने अल्झायमर जडतो. अल्झायमरमागील नेमकी कारणं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. मेंदूत ऍमिलॉइड प्लाक आणि ताउ टँगल्स या घटकांची निर्मिती झाल्याने स्मरणशक्तीवर परिणाम होऊ लागतो असं तज्ज्ञ सांगतात. यामुळे मज्जासंस्थेच्या पेशींच्या कार्यात अडथळे येऊ न मेंदूतल्या पेशी नष्ट होतात. अल्झायमरच्या रूग्णांच्या मेंदूत विशिष्ट रसायनांची कमतरता निर्माण होते. यामुळे संदेशवहन योग्य पद्धतीने होत नाही. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना हा विकार जडण्याची शक्यता दुपटीने जास्त असते.