मधुमेह हिरावून घेऊ शकतो दृष्टी

0
130

मधुमेह ही सध्या सर्वात वेगाने वाढणारी शारीरिक समस्या आहे. यामुळे रक्तातील साखरेची झपाट्याने वाढ होते; मात्र जखमा लवकर बर्‍या होत नाहीत. मधुमेहामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. रक्तातील साखरेची वाढलेली पातळी दृष्टी हिरावून घेऊ शकते. म्हणजेच मधुमेहामुळे डोळ्यांच्या दृष्टीशी संबंधित समस्या असू शकतात. त्याला डायबेटिक रेटिनोपॅथी असे म्हणतात. डायबेटिक रेटिनोपॅथी मधुमेही रुग्णांची दृष्टी हिरावून घेऊ शकते. याचा परिणाम रेटिनामधील रक्तवाहिन्यांवर होतो. मधुमेहामुळे होणार्‍या डोळ्यांच्या समस्यांमुळे रक्तवाहिन्या ङ्गुगतात. त्यातून गळती होण्याचा धोका असतो. या कारणामुळे ते कमी दृश्यमान होतात. कालांतराने समस्या आणखी गंभीर होऊ शकते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी वर्षातून एकदा तरी डोळे तपासले पाहिजेत. रक्तातील साखरेची पातळी वाढणे आणि मधुमेहामध्ये डोळ्यांच्या समस्या वाढणे हे त्यामागील प्रमुख कारण आहे.

रक्तातील साखर लहान रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आणते आणि त्यामुळे डोळे नवीन रक्तवाहिन्या बनवण्याचा प्रयत्न करतात. या वाहिन्या व्यवस्थित तयार होत नसल्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथीचा त्रास सुरू होतो. मधुमेहाकडे योग्य लक्ष न देणे, उच्च रक्तदाब किंवा साखरेची पातळी सतत जास्त राहणे आणि मद्यपान, सिगारेटचे व्यसन यामुळे ही समस्या उद्भवू शकते. सुरुवातीला अनेक मधुम ेही रुग्णांमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथीची लक्षणे दिसत नाहीत; पण समस्या वाढत जाते तशी दृष्टी धूसर होणे, कमी होणे, चक्कर येणे, डोकेदुखीचा त्रास आदी जाणवू शकते. म्हणूनच मधुमेहावर चोख उपचार करणे गरजेचे ठरते. मधुमेहामध्ये डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी नियमितपणे डोळे तपासत राहणे, रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे, सकस आहार आणि निरोगी जीवनशैलीबरोबरच शारीरिक हालचाली, व्यायाम करत राहणे, आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस नियमित व्यायाम करणे आदी उपाय आवश्यक ठरतात. धावणे, चालणे किंवा सायकल चालवल्यास डोळे चांगले काम करतात.