जशास तस

0
63

एकदा कोल्हीणबाईला दोन पिले झाली. तिला खूप आनंद झाला. सहसा ती आपल्या पिलांना एकटे सोडून ती कुठे जात नसे. पण एकदा फारच भूक लागल्याने थोडक्या वेळात काही तरी खाऊन यावे, म्हणून कोल्हीण बाहेर पडली आणि जरा पुढे जात नाही, तोच एका गरुड पक्षिणीने झडप घालून त्यातील एक पिलू चोचीत धरले. ते पाहून कोल्हीण पक्षिणीला म्हणाली, बाई गं, दया दाखव माझ्यावर. देवाला किती नवस बोलले., तेव्हा किती तरी दिवसांनी मला ही पिलं झाली. त्यातील एक नेऊन मला दुःखात लोटू नकोस. पाहिजे तर मी तुझे पाय धरते, पण माझ्या पिलांना सोड बाई.’’ पण कोल्हीणीची विनवणी गरूड पक्षिणीने झिडकारून लावीत चोचीत धरलेले कोल्हिणीचे पिलू आपल्या घरट्यात नेऊन आपल्या पिलांना खाऊ घातले. ते पाहून कोल्हीण संतापाने पेटून उठली. या बाईला चांगला धडा शिकवावा, म्हणून ती कामाला लागली. पलीकडे पेटलेला विस्तव दिसताच त्यातील एक कोलीत तिने झाडाच्या बुंध्याजवळ आणून टाकले. त्यावर वाळलेली ढीगभर गवतकाडी टाकताच गवताने पेट घेतला. त्या धगीने ते झाडही पेटले. त्या आगीने झाडावर असलेली गरुड पक्षिणीची पिले होरपळून खाली पडताच कोल्हीण बाईने ती खाऊन परतफेड केली.

तात्पर्य – आपल्या सामर्थ्याचा वृथा गर्व करु नये.