छत्रपती अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी राबविले श्री क्षेत्र धरमपुरी परिसरात स्वच्छता अभियान

नगर – ’जिथे स्वच्छता असे, तिथे आरोग्य वसे’ हे ब्रीद घेवून नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी २३ एप्रिल रोजी श्री क्षेत्र धरम पुरी, निंबळक जवळचा परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली. ‘परिसर स्वच्छ ठेवाल तर निरोगी व्हाल’, असा स्वच्छतेचा मंत्र राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सतत कानावर पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या स्वच्छता अभियानामध्ये धरमपुरी मंदिरा नजदीकच्या परिसरातील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. या मोहिमेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांनी स्वच्छतेच्या
विविध घोषणा देत सहभाग नोंदवला.

आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी आणि समाजासाठी आवश्यक असणारी स्वच्छता ही सवय विद्यार्थ्यांनी अंगीकारली तर शालेय व सामाजिक जीवनात त्याचा फायदा होऊन शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी व्यक्त केले.

स्वच्छता अभियान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. अक्षय देखणे, प्रा. अमोल कोल्हापुरे व प्रा. शीतल शेरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा. पी. जी. निकम (सिव्हील विभागप्रमुख), डॉ. एम. के. भोसले (प्रथम वर्ष समन्वयक), प्रा. एस. एम. वाळके (ई अ‍ॅण्ड टी सी विभाग प्रमुख), प्रा. ए. बी.
काळे (मेकॅनिकल विभागप्रमुख), प्रा. एस. पी. विधाते (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख), डॉ. व्ही. व्ही. पाटील (ए.आय. विभागप्रमुख) आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

गुडघे, सांधेदुखी खुबे व मणयाचे विकारांसाठी नगरमध्ये १९ एप्रिलला आंतरराष्ट्रीय किर्तीचे सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य यांची खास ओपीडी

नगर – पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलतर्फे गुडघेदुखी, सांधेदुखी, खुबा आणि मणयांच्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी  पीडीचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपण तज्ज्ञ डॉ.नरेंद्र वैद्य हे १९ एप्रिल रोजी सकाळी ८:३० ते १०:३०: या वेळेत अरुणोदय हॉस्पिटल, पुणे बस स्टॅन्ड जवळ, अहिल्यानगर येथे गुडघेदुखी, खुबा, संधिवात तसेच इतर हाडाचे दुखीने त्रस्त असणार्‍या रुग्णांची तपासणी करणार आहेत. रुग्णांनी तपासणीसाठी येताना आपले पूर्वीचे रिपोर्ट,
एसरे आणि अन्य काही रिपोर्ट आपल्यासोबत आणणे आवश्यक आहे.

डॉ.नरेंद्र वैद्य हे पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. विविध गावात सुपर स्पेशालिटी ओपीडी आयोजित करून रुग्णांना गुडघेदुखी, मणयाच्या आजारा विषयी मार्गदर्शन करणे,
अत्याधुनिक उपचाराची माहिती व तपासणी केली जात आहे. गुडघेदुखी ही समस्या ही आता ज्येष्ठ नागरिकांपुरती मर्यादित न राहता तरुणांमध्येही मोठ्याप्रमाणात असल्याचे दिसुन येत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे, वाढत्या वजनामुळे गुडघ्यांच्या समस्यांनी अधिकच गुडघेदुखी होते. गुडघ्याची तपासणी जर सुरुवातीच्या अवस्थेत केली तर औषधे व्यायामांनी आराम होतो. पण जर गुडघ्यातील कुर्चेची झीज झाली असेल तर मात्र आजकाल दुर्बिणीद्वारे उपचार, पी आर पी इंजेशन याव्दारे करता येतात. अंतिम टप्प्यातील झीज, पायाला बाक आला तर मात्र सांधेरोपण शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. यात आता आमुलाग्र बदल होवुन रोबोटीकचा सहभाग यशस्वी ठरतो आहे. ही यंत्रणा भारतात आणुन रुग्णांना उपलब्ध करुन देणारे तज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य स्वतः रुग्णांची तपासणी करणार आहेत.

जगातील दहा देशात डॉ.नरेंद्र वैद्य यांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. ३५,००० हून अधिक गुडघेरोपण शस्त्रक्रिया १५,००० रोबोटीक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि १,५०,००० हुन अन्य अस्थिरोग शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. रोबोटीक शस्त्रक्रियेचे अमेरिका, जर्मनी आणि स्वीडन येथे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेतील रोबोच्या सहाय्याने सांधेरोपण हे तंत्रज्ञान अमेरिकेबाहेर भारतात प्रथम आणुन त्यांनी १५,००० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.

वैद्य यांनी बी जे मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस पदवी संपादन केली. नंतर ऑर्थो पीडिसमध्ये उच्च शिक्षण घेऊन सुवर्णपदक मिळवले. १०० हुन अधिक त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॅगझीनमध्ये त्यांचे शोध प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. देश विदेशात शंभरहून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते मानद सदस्य
असून अनेक महत्त्वाच्या समित्यांवर त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. ऑर्थोपेडिक हॉस्पिटलची साखळी त्यांनी स्थापन केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य जनतेला उपचार मिळावेत यासाठी ते कार्यरत आहेत.

सहकारमहर्षी सुवालाल गुंदेचा यांच्या ९१ व्या जयंती कार्यक्रमात उपस्थितांनी दिला त्यांच्या स्मृतींना उजाळा

नगर – येथील कापडबाजारलगत असलेल्या सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेत सुवालाल गुंदेचा यांची ९१ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आली. पतसंस्थेच्या मुख्यालयात सुवालाल गुंदेचा यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. पुष्प वाहून नमस्कार करताना अनेकांनी त्यांच्या सहवासातील
स्मृतींना उजाळा दिला.

पतसंस्थेचे सभासद राजेंद्र चोपडा, माजी व्हाईस चेअरमन राजेंद्र गांधी, चेअरमन समीर बोरा, व्हाईस चेअरमन अभय पितळे, माजी चेअरमन व विद्यमान संचालक संतोष गांधी, मनोज गुंदेचा, चेतन भंडारी, विनय भांड, तज्ज्ञ संचालक शांतीलाल गुगळे, प्रतिक बोगावत, सरव्यवस्थापक प्रशांत भंडारी, सहाय्यक व्यवस्थापक नयना बोगावत यांच्यासह कर्मचारी वृंद, सभासद, ठेवीदार, कर्जदार उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना राजेंद्र चोपडा म्हणाले, आपल्या जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी या पतसंस्थेने केली आहे. सुवालाल गुंदेचा यांची शिस्त, सचोटी, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता समोर ठेवून पतसंस्थेची वाटचाल सुरू आहे, हे कौतुकास्पदच आहे.

राजेंद्र गांधी म्हणाले, भाऊंनी सर्वसामान्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे महत्वाचे कार्य या पतसंस्थेच्या माध्यमातून केले आहे. आजही हे कार्य सुरू आहे. युवकांसमोर भाऊंनी आपल्या कार्यामधून आदर्श उभे केले. सहकारक्षेत्रातील ते दीपस्तंभ ठरले.
संतोष गांधी म्हणाले, भाऊंच्या विचारांचा वारसा आम्ही पतसंस्थेच्या माध्यमातून जपतो आहोत. त्यांचे आदर्शवत कार्य समोर ठेवून शिस्तबद्धतेने आणि विश्वासाने पतसंस्थेचे कामकाज सुरू आहे. भाऊंनी २४ वर्षापूर्वी पाहिलेले पतसंस्थेचे स्वप्न साकारण्याचे भाग्य आम्हास लाभले आहे.

‘श्रीरामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडीट सोसायटी’ च्या ‘सद्भावना’च्या स्नेहमेळाव्यास सभासदांचा प्रतिसाद

नगर – श्रीरामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडीट सोसायटी लि., च्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक रिंगणातील सद्भावना
पॅनलचा स्नेहमेळावा राजेंद्र बोथरा व मित्र परिवाराने सिताबन लॉनमध्ये आयोजित केला होता.  पतसंस्थेचे संस्थापक
अध्यक्ष श्रीगोपाल धूत यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीस सामोरे जात आहे. यामधील राजकमल मणियार व शोभा राठी या
महिला राखीव मतदारसंघामधून साईनाथ कावट हे विमुक्त जाती व भटया जमाती मतदार संघामधून अनुरिता झगडे या इतर मागासवर्गीय विभागामधून तर देवराव साठे हे अनुसूचित जाती/जमाती विभागामधून बिनविरोध निवडून आले आहेत.
सर्वसाधारण मतदार संघातील सद्भावना पॅनलचे उमेदवार असे – राजेंद्रकुमार कंत्रोड, विश्वनाथ कासट, राजेंद्र गुजराथी, प्रकाश गांधी, ओमप्रकाश चांडक, लक्ष्मीकांत झंवर, सुधीर झालानी, अनुराग धूत, श्रीगोपाल धूत, प्रदिप पंजाबी,  अ‍ॅड.अशोक बंग, किसनलाल बंग, गोपाल मणियार, राजेंद्र मालू आणि मधुसुदन सारडा. श्रीगोपाल धूत म्हणाले, वै.डोंगरे महाराज यांच्या  आशीर्वादाने आणि स्व.काकासाहेब धूत यांच्या प्रेरणेने ४० वर्षांपासून या सोसायटीची वाटचाल प्रगतीपथावर
सुरू आहे. ध्येय कितीही उच्च असले तरी साधन शुध्द असले पाहिजे. माझी ही शेवटची निवडणूक आहे. सद्भावना पॅनलला
एकमुखी मतदान करा. आजच्या मेळाव्यात सभासदांनी व्यक्त केलेल्या मनोगतांनी आम्ही सर्वच भारावून गेलो आहोत. मतदान करून हा आपलेपणा वृद्धींगत करा, असे आवाहन करतो. मेळाव्यात कु.हर्षा गुजराथी,  ब्रिजलाल सारडा, अनिल पोखरणा, प्रा.डॉ. शरद कोलते, मोहनलाल मानधना, नंदलाल मणियार, सीए अजय मुथा, अ‍ॅड.शरद पलोड, डॉ.
श्यामा मंत्री, प्रा.मधुसूदन मुळे, राजेंद्र चोपडा, राजेंद्र बोथरा, डॉ.कैलास झालानी, डॉ.विजय भंडारी, श्यामसुंदर सारडा, डॉ.श्रीकांत गांधी, जितेंद्र बिहाणी, आदेश चंगेडिया, नंदकुमार झंवर, प्रविण बजाज, राजेश झंवर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन लक्ष्मीकांत झंवर यांनी केले. ओमप्रकाश चांडक यांनी आभार मानले. मेळाव्यात सीए
रमेश फिरोदिया, आर.डी.मंत्री आदी उपस्थित होते.

बाबासाहेबांनी प्रतिशोध न घेता, न्याय आणि समतेच्या तत्त्वांवर संविधानाची निर्मिती केली

 

नगर – दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरुपी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही ही योजना राबविण्यात येत असून योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी
भारतीय जैन संघटनेने जबाबदारी स्विकारली आहे. मृदा व जलसंधारण विभाग व बीजेएसच्या संयुक्त विद्यमाने
या योजनेच्या प्रसारासाठी जलरथ तयार करण्यात आला असून याचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते झाला.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी आकाश परदेशी, बीजेएसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया, जिल्हाध्यक्ष प्रशांत गांधी, राज्य कार्यकारिणी सदस्य मनसुखलाल चोरडिया, विश्वजीत गुगळे, संजय शिंगवी, अमोल पटवा, दर्शन गांधी, नरेश सुराणा, नयन पोखर्णा, प्रसाद शहा, संतोष लोढा, आशिष राका, इपिटोम कंपनीचे अनुराग धूत, उपविभागीय अभियंता शिंदे, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, करण भळगट, आदिनाथ पवार, प्रतिक जगदाळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया म्हणाले, जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. तलावातून गाळ काढल्याने पाणी साठवण क्षमतेत वाढ होण्यास मदत होईल. तसेच काढलेला गाळ शेतकर्‍यांच्या शिवारापर्यंत पोहचविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतीलाही याचा उपयोग होणार आहे. बीजेएसच्या  हकार्यातून ही योजना जिल्ह्यातील गावांमध्ये राबविण्यात येणार असून जलरथाव्दारे याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे.
आदेश चंगेडिया यांनी सांगितले की, दुष्काळमुक्तीसाठी भारतीय जैन संघटना मागील अनेक वर्षांपासून राज्यातील ग्रामीण भागात काम करीत आहे. याही वर्षी शासनाच्या सहकार्याने या योजनेच्या अंमलबजावणासाठी बीजेएसची टिम सज्ज झाली
आहे. जलरथ गावोगावी जावून जनजागृती करणार असून आवश्यक अर्ज भरून घेत प्रशासनामार्फत मंजुरी मिळाल्यावर संबंधित गावांत गाळ काढण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त गावे सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

भीमराव माझा झाला… पहिला बॅरिस्टर… बौद्ध संस्कार संघाची भीम पहाट रंगली

नगर – राखिले कुळाचे नाव तो भीमराव… खरंच सांगतो भीमराव माझा झाला
पहिला बॅरिस्टर…. अंगार विषमतेचा तुडवून भीम गेला, न घडणारे आमचे जीवन
घडवून भीम गेला…. अशा अनेकविध भीमगीतांनी सोमवारची पहाट भीममव झाली…
ठिकाण होते… छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील चेतना लॉन्सचे व निमित्त होते…
येथील बौद्ध संस्कार संघाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
आयोजित केलेल्या भीमपहाट संगीत मैफिलीचे. डॉ. आंबेडकरांच्या जीवन
चरित्रावरील गाण्याचे सुरेख सादरीकरण उपस्थितांकडून टाळ्यांची दाद मिळवून गेले.
बौद्ध संस्कार संघाद्वारे मागील १७ वर्षांपासून डॉ. आंबेडकर जयंतीच्या दिवशी पहाटे
भीम गीतांची मैफल आयोजित केली जाते. यंदाच्या १८ व्या वर्षी ऑकेस्ट्रा संगीत
सितारे परिवाराच्या कलावंतांनी अनेकविध भीमगीते सादर करून बहार आणली.
नव्हतं मिळत पोटाला, आता कमी नाही नोटाला, माझ्या भीमाची पुण्याई, अंगठी सोन्याची
बोटाला…. लई चळ आलं माझ्या दुबळ्या पोरात, बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात…..
हक्कासाठी व न्यायासाठी लढले भीमराय… अशी भीमगीते विनय कसबेकर, गायक अतुल थोरात,
आशा बडागळे, रंजना मेहेत्रे, शितल शिंदे, धनश्री पोखरणा यांनी सादर केली. तर लोकशाहीर
शिवाजी शिंदे यांनी राखिले कुळाचे नाव तो भीमराव.. व खरंच सांगतो भीम माझा झाला पहिला
बॅरिस्टर… असे दोन पोवाडे सादर केले. मूळच्या नगर जिल्ह्यातील जामगावच्या, पण मुंबईत
वास्तव्यास असलेल्या व महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार मिळवलेल्या गायिका कल्पना
सूर्यवंशी यांनी गाते भीमाची गाणी, गाते बुद्धाची गाणी… पहाट होताच बाई दीपू लागली प्रगतीची
ती वाट… गाणे सादर केले. तर महाराष्टाचे गायक नरेश बडेकर यांनी.. भीम बनला
सावली कोटी कोटीच्या माध्यावर… गाणे आणि नगरचे गायक राजेंद्र टाक यांनी…
छाती ठेवून सांगू जगाला असा विद्वान होणार नाही…. गाणे सादर केले.
या भीम पहाट मैफिलीला अबालवृद्धांची गर्दी होती. टाळ्यांचा ठेका अनेकांनी
धरला होता. या मैफिलीला ऑटोपॅडवर शशिकांत काकडे व अजित गुंदेचा यांनी
ढोलकीवर साथसंगत केली. बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे यांनी प्रास्ताविक केले. प्रतिभा
देठे यांनी भीमवंदना सादर केली. यावेळी निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.
एम. सोनवणे, निवृत्त विक्रीकर अधिकारी एम. बी. साळवे, प्रा. दिलीप गायकवाड,
प्रा. विश्वासराव कांबळे, गिरीश गायकवाड, श्रीराम जोशी, बालकुणाल अहिरे, डॉ.
रमेश भिंगारदिवे, शांतीनाथ धनवे, मिलिंद जाधव, अरविंद जाधव, प्रा. दिलीप गायकवाड, किरण
साळवे, पांडुरंग गायसमुद्रे, गजानन गायकवाड डॉ. प्रसाद सायगावकर, मिलिंद जाधव, बाळासाहेब
धनवे, प्रा. डॉ. रवींद्र गायकवाड, कल्पनाताई कांबळे, अ‍ॅड. अरुंधती शिंदे आदींसह आंबेडकर प्रेमी
उपस्थित होते. डॉ. पाचारणे व डॉ. प्राजक्ता सावेडकर यांनी सूत्रसंचालन केले.

महिला सफाई व कर्मचार्‍यांना कामावरून काढल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु

नगर – शिर्डी नगरपंचायतीने महिला सफाई व स्वच्छता कर्मचार्‍यांना कामावरून अचानकपणे काढल्याने त्या महिलांना पुन्हा कामावर हजर करण्याच्या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करताना सुनील उमाप, पावलास पवार, प्रेम गाडे, रमेश नवगिरे, बाळासाहेब नेटके, कविताताई नेटके, कर्मचारी सौ. संगीता आरने, नूतन रणदिवे, सुरेखा दिवेकर, हमिदा सय्यद, बेबी खैरे, निर्मला पाचोरे, अनिता कुसळकर, सरिता
गुंजाळ आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी नगरपंचायतीमध्ये १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी सफाई व स्वच्छता कामगार म्हणून काम करीत आहेत तरी सर्व कर्मचारी हे गरीब परिवारातील असून त्यांचा प्रपंच व परिवार याच कामावर अवलंबून आहे. सर्व कर्मचारी अनेक वर्षापासून संबंधित नगरपंचायतीमध्ये प्रामाणिकपणे स्वच्छतेचे व सफाईचे काम करीत आहे. अनेक वर्षापासून त्यांच्या कामापासून नगरपंचायतीचे प्रामाणिक सेवा करीत आहे. हे सर्व महिला कर्मचारी असून कामावरून अचानक कमी केल्यामुळे अन्याय व उपासमारीची वेळ आलेली आहे. या महिलांना पुन्हा कामावर हजर करून घ्यावे.

माजी आमदार अरुण जगताप यांची प्रकृती सुधारण्यासाठी विजय हनुमान मंदिर येथे महाआरती व हनुमान चालीसा पाठ

नगर – माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृतीत तातडीने सुधारणा व्हावी, यासाठी एकत्र येत विविध संघटनांच्या वतीने स्टेट बँक चौक येथील विजय हनुमान मंदिरात महाआरती व हनुमान चालीसा पाठ करण्यात आले. या भक्तिपूर्ण उपक्रमात
परिसरातील नागरिकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व मनपा कर्मचारी व ठेकेदार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात हनुमान चालीसा पठणाने झाली. शेकडो भक्तांनी एकत्र येत भक्तिभावाने ११ वेळा हनुमान चालीसा म्हणत भगवान हनुमान चरणी अरुणकाका यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर
महाआरती करण्यात आली. यावेळी इंजि. सुरेश इथापे, शहर अभियंता मनोज पारखे, इंजि. श्रीकांत निंबाळकर, स्वाती जाधव, सोनू चौधरी, महादेव काकडे, किशोर कानडे, उदय अनभुले आदी उपस्थित होते.

यावेळी इंजि. सुरेश इथापे यांनी सांगितले की,  काका हे सर्वसामान्यांचे नेते आहेत. त्यांनी समाजाच्या प्रत्येक स्तरासाठी भरीव कार्य केले आहे. त्यांची प्रकृती लवकरात लवकर पूर्ववत व्हावी, हीच श्री हनुमंत चरणी आमची प्रार्थना आहे. महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम धार्मिकतेसह सामाजिक भावनेचं उत्तम उदाहरण ठरला. एका लोकनेत्याच्या आरोग्यासाठी समाजातील विविध घटक एकत्र आले, ही एकतेची आणि माणुसकीची भावना आहे. जगताप कुटुंबियांना धार्मिकतेचा वारसा लाभलेला आहे. त्यांच्या या कार्यामुळे परमेश्वर अरुणकाकांना शक्ती आणि ताकद देऊन नगरकरांची सेवा करण्यासाठी बरेकरेल असे ते म्हणाले.

अरुणकाकांसाठी श्री वैष्णवी माता मंदिरात महाआरती

नगर – माजी आ. अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत देवीसमोर मनोभावे प्रार्थना केली. विनायकनगर येथील श्री वैष्णवी माता मंदिरात विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या भाविकतेने भरलेल्या सोहळ्यात सामूहिक महाआरती करून काकांच्या उत्तम आरोग्यासाठी
सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. वैष्णवी माते, अरुणकाकांना बरे कर अशा भक्तिपूर्ण भावनेतून त्यांच्या आरोग्याबद्दलची काळजी आणि आत्मियता ठळकपणे जाणवत होती. या कार्यक्रमाचे आयोजन स्थानीय नागरिक व मंदिर समितीच्या वतीने
करण्यात आले. यावेळी प्रशांत नन्नवरे, हर्षद वालेकर,  धनंजय भोसले, चेतन अग्रवाल, आबा भोसले, नितीन
खैरे, गुड्डू म्हस्के, मयूर म्हस्के, सुमित सुगंधी, वेदांत दुशिंग, प्रसाद वाघमारे, किशोर श्रीश्रीमाळ, शुभम वालेकर, अंकित मोरे, दर्शन भंडारी, मनोज भंडारी, अभिजित कुर्‍हाडे, ऋषिकेश काळे, निखिल हजारे, ऋषिकेश रासकर, प्रतीक क्षीरसागर, शिवम गावडे, पद्माकर खेत्रे, सचिन रासकर, गणेश मोरे व अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळाच्या सदस्य, युवक, लहान मुलेही उपस्थित होती. प्रशांत नन्नवरे यांनी सांगितले की, काका यांनी अनेक वर्षे या परिसरातील लोकांसाठी काम करत आहे. आज आम्ही त्यांचं आरोग्य पूर्ववत व्हावं यासाठी देवीच्या चरणी प्रार्थना केली आहे. काका यांनी
नेहमीच श्री वैष्णवी माता मंदिर परिसराच्या विकासासाठी पुढाकार घेत असून नवरात्र उत्सवामध्ये महाप्रसादाचे आयोजन करत असतात. अरुणकाका धार्मिक कार्यक्रमासाठी नेहमीच अग्रेसर राहत असतात त्यांना श्री वैष्णवी माता नक्कीच या संकटातून बाहेर काढेल व समाजातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी ऊर्जा देईल असे ते म्हणाले.

पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक

नगर – जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात कृषी विभागाने पाणी वापर संस्थांसोबत समन्वय साधून पाण्याच्या उपलब्धतेनुसार  पीक पद्धतीत बदल घडवून आणण्यावर भर द्यावा आणि सर्व विभागांनी मिळून पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले. नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देण्याबरोबरच
जलसाक्षरता वाढीसाठी जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिल दरम्यान आयोजित जलव्यवस्थापन कृती पंधरवडाच्या उदघाटन प्रसंगी ते
बोलत होते. कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेट्ये, संतोष सांगळे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार्‍या या उपक्रमात सर्व शासकीय विभागांचा सहभाग अपेक्षित आहे. सर्वांनी समन्वयाच्या माध्यमातून उद्दिष्टानुसार कार्यक्रमाचे योग्य व्यवस्थापन करावे. तालुका स्तरावरील अधिकार्‍यांचाही यात सहभाग घ्यावा. जिल्ह्याला उन्हाळ्यात पाणी समस्येला सामोरे जावे लागते. शेतीसाठी पाणी आवश्यक असताना जिल्ह्याच्या विविध भागात पाण्याचे असमान वितरण आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाण्याचे महत्व पटवून द्यावे लागेल. जिल्ह्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आणि जलयुक्त शिवार योजना प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. प्रमुख नद्यांचे पुनरूज्जीवन लोकसहभागातून करण्याचा प्रयत्न करावा लागेल.

स्थानिक स्वराज्य संस्थांना पाण्याचे महत्व समजावणे आणि गावातील पाण्याचे बजेट तयार करणे गरजेचे आहे. पाण्याची कमतरता  असताना पाणी उपचारावरही भर देण्यात यावा. सर्व विभागांनी केवळ १५ दिवस उपक्रम न राबविता वर्षभर निश्चित उद्दिष्ट समोर ठेऊन नियोजनावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले. श्री. शेट्ये म्हणाले, पाण्याचे स्रोत मर्यादित असून पाण्याची मागणी वाढते आहे. ही तफावत दूर करून पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, बिगर सिंचनाच्या पाण्याची बचत करणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने जल व्यवस्थापन कृती आराखडा घरोघरी पोहोचविण्यासाठी हा उपक्रम रबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचार्‍यांनी गावपातळीवर पोहोचून पाण्याशी
निगडित नागरिकांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. पाणी व्यवस्थापनाचे नवे तंत्र, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याबाबत जागरूकता निर्माण करावी लागेल. पाण्याचे मोल सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. श्री. सांगळे म्हणाले, अन्न ही सजीवांची मूलभूत गरज असून त्यासाठी जमीन आणि पाणी आवश्यक आहे. पाण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. पाण्यावर सर्व सजीवांचा हक्क आहे. मात्र माणसाने विकासासोबत पाण्याचा अनिर्बंध वापर सुरू केल्याने पाण्याचे संकट निर्माण झाले, अनेक समस्या निर्माण झाल्या. त्या दूर करण्यासाठी पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. यात शासनाच्या विविध विभागांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. जलसंपदा विभागामार्फत या कालावधीत जलजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. बोराळे म्हणाले, जिल्ह्यातील बहुतांशी जनता शेती व्यवसायावर आधारित आहे. त्यांच्यासाठी हा उपक्रम
उपयुक्त ठरणार आहे. पाणी हे जीवन असल्याने त्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व जाणून घ्यायला हवे. शेतीसाठी योग्य सिंचनाची सुविधा निर्माण होणे तेवढेच महत्वाचे आहे. त्यादृष्टीने स्रोताचे योग्य व्यवस्थापन आणि त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. श्री. गायसमुद्रे म्हणाले, भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी पाण्याचे महत्व समजून घेण्याची आणि जलसंवर्धन करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने जलसंधारण विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रकल्पातील गाळ काढणे, जलयुक्त शिवार २.०, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना आदी उपक्रम राबविण्यात येतात. पाण्याचे महत्व नागरिकांना सांगण्यासाठी गावापातळीवर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. प्रस्ताविकात कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. पाण्याची उपलब्धता, नियोजन, पाण्याची बचत याबाबत जनजागृती
करण्यासाठी पंधरवड्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाभरात येत्या १५ दिवसात विविध कार्यक्रमांचे
आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ’जलसंपदा आपल्या गावी’ या उपक्रमाद्वारे शेतकर्‍यांच्या समस्या गावातच दूर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आमदार संग्राम जगताप यांच्या संदेशाचे यावेळी वाचन करण्यात
आले. कार्यक्रमपूर्वी जिल्ह्यातील सहा नद्यांचे जल असलेल्या कलशाचे पूजन करण्यात आले, तसेच उपस्थितांनी जलप्रतिज्ञा
घेतली. पंधरवड्यानिमित्त जनजागृती करणार्‍या चित्ररथाचा शुभारंभ डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.