नगर – राखिले कुळाचे नाव तो भीमराव… खरंच सांगतो भीमराव माझा झाला
पहिला बॅरिस्टर…. अंगार विषमतेचा तुडवून भीम गेला, न घडणारे आमचे जीवन
घडवून भीम गेला…. अशा अनेकविध भीमगीतांनी सोमवारची पहाट भीममव झाली…
ठिकाण होते… छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील चेतना लॉन्सचे व निमित्त होते…
येथील बौद्ध संस्कार संघाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
आयोजित केलेल्या भीमपहाट संगीत मैफिलीचे. डॉ. आंबेडकरांच्या जीवन
चरित्रावरील गाण्याचे सुरेख सादरीकरण उपस्थितांकडून टाळ्यांची दाद मिळवून गेले.
बौद्ध संस्कार संघाद्वारे मागील १७ वर्षांपासून डॉ. आंबेडकर जयंतीच्या दिवशी पहाटे
भीम गीतांची मैफल आयोजित केली जाते. यंदाच्या १८ व्या वर्षी ऑकेस्ट्रा संगीत
सितारे परिवाराच्या कलावंतांनी अनेकविध भीमगीते सादर करून बहार आणली.
नव्हतं मिळत पोटाला, आता कमी नाही नोटाला, माझ्या भीमाची पुण्याई, अंगठी सोन्याची
बोटाला…. लई चळ आलं माझ्या दुबळ्या पोरात, बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात…..
हक्कासाठी व न्यायासाठी लढले भीमराय… अशी भीमगीते विनय कसबेकर, गायक अतुल थोरात,
आशा बडागळे, रंजना मेहेत्रे, शितल शिंदे, धनश्री पोखरणा यांनी सादर केली. तर लोकशाहीर
शिवाजी शिंदे यांनी राखिले कुळाचे नाव तो भीमराव.. व खरंच सांगतो भीम माझा झाला पहिला
बॅरिस्टर… असे दोन पोवाडे सादर केले. मूळच्या नगर जिल्ह्यातील जामगावच्या, पण मुंबईत
वास्तव्यास असलेल्या व महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार मिळवलेल्या गायिका कल्पना
सूर्यवंशी यांनी गाते भीमाची गाणी, गाते बुद्धाची गाणी… पहाट होताच बाई दीपू लागली प्रगतीची
ती वाट… गाणे सादर केले. तर महाराष्टाचे गायक नरेश बडेकर यांनी.. भीम बनला
सावली कोटी कोटीच्या माध्यावर… गाणे आणि नगरचे गायक राजेंद्र टाक यांनी…
छाती ठेवून सांगू जगाला असा विद्वान होणार नाही…. गाणे सादर केले.
या भीम पहाट मैफिलीला अबालवृद्धांची गर्दी होती. टाळ्यांचा ठेका अनेकांनी
धरला होता. या मैफिलीला ऑटोपॅडवर शशिकांत काकडे व अजित गुंदेचा यांनी
ढोलकीवर साथसंगत केली. बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे यांनी प्रास्ताविक केले. प्रतिभा
देठे यांनी भीमवंदना सादर केली. यावेळी निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.
एम. सोनवणे, निवृत्त विक्रीकर अधिकारी एम. बी. साळवे, प्रा. दिलीप गायकवाड,
प्रा. विश्वासराव कांबळे, गिरीश गायकवाड, श्रीराम जोशी, बालकुणाल अहिरे, डॉ.
रमेश भिंगारदिवे, शांतीनाथ धनवे, मिलिंद जाधव, अरविंद जाधव, प्रा. दिलीप गायकवाड, किरण
साळवे, पांडुरंग गायसमुद्रे, गजानन गायकवाड डॉ. प्रसाद सायगावकर, मिलिंद जाधव, बाळासाहेब
धनवे, प्रा. डॉ. रवींद्र गायकवाड, कल्पनाताई कांबळे, अॅड. अरुंधती शिंदे आदींसह आंबेडकर प्रेमी
उपस्थित होते. डॉ. पाचारणे व डॉ. प्राजक्ता सावेडकर यांनी सूत्रसंचालन केले.