समाज हितासाठी विद्यार्थ्याने काम केले पाहिजे

कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला.

नगर – विद्यार्थी हा समाज घडवण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. समाजहितासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला  हिजे. तसेच  विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा फायदा हा त्यांना त्यांच्या फक्त वैयक्तिक फायद्यासाठी न होता समाजासाठी पण झाला पाहिजे ही अपेक्षा उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना रामचंद्र दरे म्हणाले यांनी व्यक्त केली. समाजात शांतता, स्थिरता व समानता प्रस्थापित व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असे ते म्हणाले. याच प्रकारचे काम कै. ह. कृ.
तथा बाळासाहेब काळे यांनी त्यांच्या आयुष्यभर केले असे ते याप्रसंगी म्हणाले. त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी हे व्रत सर्वांनी अनुकरणात आणावे असे मत त्यांनी मांडले.
कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धे चा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी भूषविले. तसेच सदर कार्यक्रमासाठी माजी प्राचार्य खासेराव शितोळे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचा समारोप समारंभ संस्थेचे सह-सचिव जयंत वाघ यांच्या
उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयातील स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले होते. वक्तृत्व कलेच्या
माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांची प्रभावी मांडणी करता यावी यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात
आले होते. खासेराव शितोळे यांनी आपल्या भाषणात कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे यांनी केलेल्या शैक्षणिक,
सामाजिक, सहकार तसेच सांस्कृतिक कार्याच्या योगदानाची माहिती दिली. यावेळी प्राचार्य डॉ. बी. बी. सागडे यांनी संस्थेची
व महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली. तसेच सहभागी स्पर्धकांचे व उपस्थितांचे स्वागत केले.
समारोप प्रसंगी बोलताना जयंतराव वाघ यांनी वक्तृत्व कलेचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की आजच्या
युगात प्रभावी वक्तृत्व कौशल्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे तसेच उत्कृष्ट वक्तृत्व ही फक्त वक्तृत्व कला नसून
प्रेरणा देणारे साधन आहे. याप्रसंगी संस्थेच्या कार्यकारणी सदस्या अरुणाताई काळे, कै. काळे-काकांचे नातेवाईक अशोकराव काळे, प्रा. पोपटराव काळे, प्रा. सुनील मांढरे, प्रा. आरतीताई साबळे-मांढरे, प्रा. वर्षाताई काळे, श्री. व सौ. अ‍ॅड भाऊसाहेब काळे, विभागातील विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. स्पर्धेमध्ये राज्यातील विविध महाविद्यालयातील २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून तुकाराम म्हस्के व निलेश मोरे यांनी
परीक्षक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा कदम यांनी केले. प्रास्ताविक डॉ. ए. के. अंबाडे तर उद्घाटन समारंभाचे आभार डॉ. मीना साळे यांनी मानले. डॉ. राजेंद्र साबळे यांनी समारोप समारंभाचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. निलेश लंगोटे, डॉ. निखिल गोयल, डॉ. अशोक गायकवाड, डॉ. नितीन काळे, प्रा. मयूर रोहकले, डॉ. बळीराम उंद्रे, प्रा. अनिकेत डमाळे यांनी अथक परिश्रम घेतले. स्पर्धेतील विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे: १) प्रथम क्रमांक : ह. कृ. तथा बाळासाहेब काळे फिरता करंडक
: आदित्य दराडे, एम. पी. लॉ कॉलेज संभाजीनगर.
२) द्वितीय क्रमांक : साईराज घाटपांडे, नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज, पुणे. ३) तृतीय क्रमांक : अक्षदा
वडवणीकर, अ.नगर होमिओपॅथिक कॉलेज, अ. नगर.
४) एक उत्तेजनार्थ पारितोषिक : प्रमोद भालेराव, गोखले
इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिस अँड इकॉनॉमिस, पुणे.

सारडा महाविद्यालयाचे मैदान व जिमखाना माझे जीव की प्राण असायचे

पद्मश्री पोपटराव पवार यांचे प्रतिपादन; सारडा महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप

नगर – सारडा महाविद्यालयातील ब्लेझर घातलेल्या विद्यार्थी खेळाडूंचा गौरव
करताना खूप हेवा वाटला. येथे आल्यावर महाविद्यालयीन काळात क्रिकेटच्या
आठवणींना उजाळा देता आला. मी जरी न्यू आर्ट्स महाविद्यालयाचा
विद्यार्थी होतो तरी सारडा महाविद्यालयाचे हे मैदान व येथील जिमखाना
माझा जीव की प्राण असायचे. या मैदानामुळेच मी न थकता आज
काम करू शकत आहे. युवा पिढीला मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक
असल्याने मी महाविद्यालयातील कार्यक्रमांना कायम प्राधान्य देत आहे.
येणारा काळ हा कुत्रिम बुद्धिमत्तेचा असल्याने मानवाचे सर्वकाही त्यावरच
चालणार आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेचे किती ऐकायचे हे आपल्या हातात
असल्याने संस्कारात कमी पडू नका. मानवी कल्याणासाठीच कुत्रिम
बुद्धिमत्तेचा झाला नाहीतर भविष्यात सर्वत्र फक्त रोबोटच दिसतील
व मानवी अस्तिवाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती पद्मश्री पोपटराव
पवार यांनी व्यक्त करून कुत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी न जाता सर्वांनी
आपले संस्कार जपावेत, असे आवाहन केले.
पेमराज सारडा महाविद्यालयात गेल्या ८ दिवसापासून सुरु
असलेल्या ‘रंग शारदा २०२५’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप
व वार्षिक परितोषिक वितरण प्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार यांनी
उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील गुणवंत व
क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध पुरस्कारप्राप्त प्राध्यापकांचा
सत्कार पोपटराव पवार व प्रमुख पाहुणे बडीसाजन ओसवाल श्री संघाचे अध्यक्ष व उद्योजक
पेमराज बोथरा यांच्या हस्ते करण्यात आला.
हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास
शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सचिन गुजर, संस्थेचे सचिव संजय जोशी, महाविद्यालयाचे
चेअरमन सुमतिलाल कोठारी, उपाध्यक्ष हेमंत गोखले, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा,
संचालिका प्रा.ज्योती कुलकर्णी, माजी क्रिकेटपटू सुधीर माळवदे, प्राचार्य डॉ.माहेश्वरी
गावित, उपप्राचार्य मिलिंद देशपांडे, प्रबंधक अशोक असेरी, पर्यवेक्षक सुजित कुमावत, प्रा.
राजू रिक्कल, स्नेहसंमेलनाचे निमंत्रक प्रा.शैलेश निकम आदींसह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी
उपस्थित होते.
पेमराज बोथरा म्हणाले, मी सारडा महाविद्यालयाचाच माजी विद्यार्थी आहे. येथे बर्‍याच
वर्षांनी आल्याने मला शिकवणार्‍या सर्व प्राध्यापकांचे स्मरण करत त्या दिवसांच्या आठवणी
जागृत झाल्या. या महाविद्यालयातून जी प्रेरणा व संस्कार मिळेल त्यामुळेच मी
पारस उद्योग देशभर नेऊ शकलो. त्यामुळे माझ्या प्रगतीत सारडा महाविद्यालयाचे
मोठे योगदान आहे.
सुमतिलाल कोठारी म्हणाले, पेमराज सारडा महाविद्यालय
शैक्षणिक, पोपटराव पावार यांनी देशात जलसंधारानाचे कार्य खूप
महान व कौतुकास्पद आहे. त्यांना पद्मश्री देऊन उचित सन्मान झाला
आहे. उद्योजक पेमराज बोथरा यांच्या मुळे आपले अहिल्यानगर पूर्ण
देशात नावाजले आहे. असे दिग्गज पाहुणे सारडा महाविद्यालयाच्या
स्नेहसंमेलनास लाभणे भाग्याचे आहे.
संजय जोशी म्हणाले, पेमराज सारडा महाविद्यालयाची
चौफेर प्रगतीत सर्व प्राध्यापकांचे मोलाचे योगदान आहे. सर्व प्राध्यापक
व विद्यार्थी उत्साही असल्यानेच दरवर्षी सारडा महाविद्यालयाचे
स्नेहसंमेलन तब्बल ८ दिवस मोठ्या धुमधडायात होत असते.
प्रा.शिरीष मोडक म्हणाले, पेमराज सारडा महाविद्यालयातील
बहुतांशी प्राध्यापक हे डॉटरेट पदवीधारक असल्यने हे महाविद्यालय
डॉटरांचे महाविद्यालय म्हणून सुपरिचित आहे. त्यामुळेच महाविद्यालय
सर्व क्षेत्रात उतुंग भरारी घेत आहे.
प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित यांनी महाविद्यालयाच्या वर्षभराच्या प्रगतीचा अहवाल सादर
करताना विद्यार्थ्यांनी केलेल्या चौफेर प्रगतीची सविस्तर माहिती दिली. प्रा.शैलेश निकम
यांनी प्रास्ताविकात स्नेहसंमेलनाच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
प्रा.प्रसाद बेडेकर यांनी केले. प्रा. राजू रीक्कल यांनी आभार मानले. यावेळी झालेल्या विविध
गुणदर्शन कार्यक्रमात महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी विविध पारंपारिक नृत्य प्रकार, गाणे
सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

महापालिका कर्मचाऱ्याच्या पत्नीचा भरदिवसा डोक्यात वार करून खुन

पिंपळगाव माळवी शिवारातील घटना, घरातच रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

नगर – अहिल्यानगर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीचा भरदिवसा  त्यांच्या घरातच अज्ञात इसमाने डोक्यात कशाने तरी वार करत खुन केल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी गावच्या शिवारात असलेल्या आढाव वस्ती वर १३ फेब्रुवारीला सायंकाळी उघडकीस आली आहे. लताबाई नानाभाऊ कराळे (वय ५०, रा. भोपते तलावाजवळ, आढाव वस्ती, पिंपळगाव माळवी, ता.नगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत नानाभाऊ नामदेव कराळे (वय ५९) यांनी रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे पिंपळगाव माळवी (ता. नगर) शिवारातील आढाव वस्तीवर पत्नी व मुलासोबत रहावयास आहेत. ते महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात १९८५ पासून वॉटर सप्लायर म्हणून नोकरीस आहेत. तर त्यांचा मुलगा जालिंदर हा ही गेल्या ५ महिन्यापासून महापालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहेत. दोघे पितापुत्र दररोज सकाळी ९ च्या दरम्यान नगरमध्ये कामावर येतात व सायंकाळी ६ वाजेपर्यंत परत गावी जातात. त्यांच्या पत्नी लताबाई या दिवसभर एकट्याच घरी थांबून पाळीव जनावरांना चारापाणी तसेच शेतात काम करत असत.

१३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता नेहमी प्रमाणे पितापुत्र नगरला कामावर आले. नानाभाऊ यांनी दिवसभर निर्मलनगर, लेखा नगर, ढवण वस्ती या भागात पाणी सोडून ते सायंकाळी ६ वाजता घरी गेले. त्यांना त्यांची पत्नी घरी दिसून आली नाही तसेच गोठ्यातील जनावरांना चारा पाणी दिले नसल्याचे दिसले. त्यामुळे ते शेतात पत्नीला शोधायला गेले. मोठ्याने हाक मारूनही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने ते पुन्हा घराजवळ आले. तो पर्यंत त्यांचा मुलगाही आला होता. दोघांनी घराचा दरवाजा उघडला आणि आत गेले असता त्यांना लताबाई या जमिनीवर पडलेल्या दिसल्या. त्यांच्या डोक्याजवळ रक्ताचे थारोळे दिसले. तसेच शेजारी एक वाकलेला चाकू दिसून आला.

त्यावेळी दोघांनी आरडाओरडा केल्यावर परिसरातील नागरिक तेथे जमा झाले. त्यातील काहींनी पोलिसांना फोन केला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे पोलिस पथकासह घटनास्थळी गेले. त्यांच्या पाठोपाठ पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपतराव भोसले यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. रुग्णवाहिका बोलावून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. रात्री उशिरा  नानाभाऊ नामदेव कराळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात हल्लेखोराविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून खुनाच्या कारणाचा शोध सुरु

मयत लताबाई कराळे यांचा डोक्यात काहीतरी वस्तूने वार करून किंवा डोके जमिनीवर आपटून खून करण्यात आला असावा. असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. भरदुपारी हा खून करण्यात आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मयत लताबाई या वस्तीवर एकट्याच असल्याने हा खून लुटीच्या उद्देशाने करण्यात आला असण्याची शक्यता आहे. मात्र खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडून खुनाचा उद्देश काय असावा याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीचे अनुकरण करत आपल्या संस्कृतीवर प्रेम करावे

आ. संग्राम जगताप यांचे प्रतिपादन; छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर परिसरात स्वच्छता अभियान

नगर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचे अनुकरण करून आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीवर तरुण पिढीने प्रेम करावे, उड्डाणपुलाचे असणारे नगरकरांचे स्वप्न पूर्ण झाले असून पिलर वर छत्रपती शिवाजी महाराज यांचा
जीवनपट रेखाटला आहे त्यांचा इतिहास महान आहे, डीएसपी चौक ते शिल्पा गार्डन पर्यंत स्वच्छता मोहीम राबवली
असून महापालिकेने दोन महिन्यातून एकदा उड्डाणपूल परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवावे १९ फेब्रुवारी रोजी
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असून त्या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाखालील फुटपाथ, डिव्हायडर, गटारीची स्वच्छता
करण्यात आली असून माती उचलण्यात आली, तसेच खांबावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्रे पाण्याने धुवून
काढण्यात आली असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महापालिका यांच्या वतीने उड्डाणपूल परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात
आले, यावेळी आ. संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा
आठरे, जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, अजिंय बोरकर, युवक अध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, युवराज शिंदे, वैभव ढाकणे, साधना बोरुडे आदी उपस्थित होते
संपत बारस्कर म्हणाले की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्माच्या युवकांचे
संघटन करून लढवय्ये मावळे तयार केले. त्यांच्याच प्रेरणेतून आज युवकांनी संघटित होऊन समाजोपयोगी कार्य केले
पाहिजे. स्वच्छता मोहीम ही काळाची गरज आहे. आपण समाजामध्ये वावरात असताना समाजाचे काहीतरी देणे लागते
या भावनेतून प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुतळा परिसर आणि उड्डाणपूल परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात
आली असे ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी उड्डाणपूल परिसरामध्ये महापालिकेला स्वच्छता अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र महापालिकेने स्वच्छतेचा फक्त दिखावा केला होता. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी उड्डाणपूल परिसरातील स्वच्छता मोहिमेची फिरून पाहणी केली असता नाराजी व्यक्त करत प्रभाग अधिकार्‍यांना सूचना देत सांगितले की, शिल्पा गार्डन ते महेश टॉकीज पर्यंतची स्वच्छता मोहीम आज पूर्ण करावी. शहरातील काही नागरिक उड्डाणपूल परिसर व खांबावर आपल्या व्यवसायाची जाहिरात लावतात त्यामुळे शहराचे विद्रोपीकरण होत आहे, यापुढे कोणत्या व्यावसायिकांनी उड्डाण फुलाच्या खांबावर जाहिरात लावली तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल तसेच त्याच्या व्यवसायाचे ठिकाण देखील सील केले जाईल असा इशारा प्रभाग अधिकारी बबन काळे यांनी दिला.

भंगार साहित्याच्या नावाखाली तांब्याच्या धातूच्या साहित्याची अवैध वाहतूक; संशयित कंटेनर पकडला

१ कोटी ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

नगर – भंगार साहित्याच्या नावाखाली तांब्याच्या धातूच्या
साहित्याची अवैध वाहतूक करत सदर साहित्य काळ्याबाजारात विक्री
साठी घेवून चाललेला संशयित कंटेनर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने
नगर एमआयडीसी परिसरात १३ फेब्रुवारीला सायंकाळी पकडला आहे.
या कारवाईत कंटेनर सह १ कोटी ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे
शाखेचे पो.नि.दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार
संतोष लोढे, फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, किशोर
शिरसाठ व प्रशांत राठोड यांचे पथक अवैध धंद्यांची माहिती घेत
असताना पथकाला खबर्‍यामार्फत गोपनीय माहिती मिळाली की, एक
कंटेनर बेकायदेशीरपणे तांबे व ऍ़ल्युमिनीअमचा भंगार माल काळ्या
बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने पुणे येथून दिल्लीकडे जात असून तो
सध्या दिल्ली पुना ट्रान्सपोर्ट एजन्सी, एमआयडीसी, अहिल्यानगर येथे
थांबलेला आहे, ही माहिती मिळताच पथकाने एमआयडीसी येथे जाऊन
खात्री केली असता संशयीत कंटेनर मिळून आला. कंटेनर चालकाकडे
चौकशी केली असता त्याचे नाव शैलेंद्र सोरन सिंह (वय ४५, रा.
स्वरूपनगर, नॉर्थ वेस्ट दिल्ली) असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे कंटेनरमधील मालाबाबत विचारपूस
केली असता तो अर्धवट व दिशाभुल करणारी माहिती सांगु लागला. पथकाने कंटनेरचा दरवाजाचा
उघडून पाहणी केली असता त्यामध्ये तांब्याचे पाईप असलेले बंडल, तांब्याचे जुने भांडे, तांब्याची
तार, ऍ़ल्युमिनीअमची वेगवेगळया आकाराचे तुकडे असलेला माल मिळून आला. कंटेनर चालकाकडे
मुद्देमालाचे पावतीबाबत विचारपूस केली असता त्याने मुद्देमालाची पावती
दाखविली. त्यात मुद्देमालाबाबत बिल्टी व प्रत्यक्षात असलेला मुद्देमाल
यामध्ये तफावत दिसुन आली.
त्यामुळे पथकाने कंटनेर चालक शैलेंद्र सोरन सिंह यास ताब्यात
घेऊन, ३० लाखांचा कंटनेर, १ कोटी ८ लाख रुपये किमतीचे एकुण
१८ हजार किलोग्रॅम वजनाचे तांबे व ऍ़ल्युमिनीअम धातुचे साहित्य
असा एकुण १ कोटी ३८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला.
ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत
विचारपूस केली असता त्याने ट्रान्सपोर्टचे मालक पुरूषोत्तम तिलकराज
अग्रवाल, रा.पुणे (फरार) यांचे सांगणेवरून मालाचे पुरवठादार एच.
एस. ट्रेडींग कंपनी, तामीळनाडू यांचेकडील मालापैकी तांब्याचे पाईप
असलेले बंडल हे बब्बु (पुर्ण नाव माहिती नाही) व बब्बु याचा मित्र यांनी
वाघोली, जि.पुणे येथून कंटेनरमध्ये भरून दिला.कंटनेरमधील मुद्देमाल
हा दिल्ली येथे गेल्यानंतर माल कोठे पोहच करावयाचा आहे याबाबत
माहिती नंतर सांगणार होते अशी माहिती सांगीतली.
त्यामुळे पोलिसांनी कंटनेर चालक, वाहनाचे मालक, मालाचे
खरेदीदार व पुरवठादार यांचे मदतीने तांबे व ऍ़ल्युमिनीअमचा भंगार माल बेकायदेशीरपणे भरून, खोटी
व बनावट बिल्टी तयार करून, सदरचा मुद्देमाल काळया बाजारात विक्री करण्याचे हेतुने दिल्ली येथे
घेऊन जाण्याकरीता मिळून आल्याने ५ आरोपीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात बीएनएस २०२३
चे कलम ३०३ (२), ३३६ (३), ३४० (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय बजेट लघु उद्योगांना प्रोत्साहन देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी देणारे

सी.ए. आयपी अजय मुथा यांचे प्रतिपादन; जितो अहमदनगरच्या कार्यक्रमात सी.ए. आयपी अजय मुथा यांनी सहज सोप्या शब्दात उलगडले बजेटचे अंतरंग

नगर – जागतिक आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणार्‍या भारताचे यंदाचे केंद्र सरकारचे बजेट अर्थकारणाला
मोठी बळकटी देणारे आहे. कृषी, उद्योग, गुंतवणूक, निर्यात हे चार आधारस्तंभ समोर ठेवून तसेच आयकर दात्यांसाठी या
बजेटमध्ये अनेक दूरगामी परिणाम करणार्‍या चांगल्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बजेट सादर करून देशाच्या भविष्यातील सक्षम अर्थकारणाचा भक्कम पाया रचला आहे, असे मत नगर येथील मर्चंटस बँकेचे माजी चेअरमन तथा सी. ए. असोसिएशनचे माजी अध्यक्ष सी. ए. आयपी अजय मुथा यांनी केले.
जितो अहमदनगरच्या वतीने केंद्र सरकारच्या सन २०२५- २६ या आर्थिक वर्षाच्या बजेटबाबत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी जितो अहमदनगरचे चेअरमन आलोक मुनोत, सेक्रेटरी तुषार कर्नावट, सल्लागार समिती सदस्य तथा
मर्चंटस बँकेचे व्हाईस चेअरमन अमित मुथा, जितो अहमदनगरचे व्हाईस चेअरमन
विजय गुगळे, अमित पोखरणा, प्रितेश दुगड, जितेंद्र लोढा, जितो युथ विंग चेअरमन
चेतन भंडारी, गौतम मुथा, कार्यक्रमाचे कन्व्हेनर मनोजकुमार चोपडा आदींसह सभासद
उपस्थित होते.
सी ए. आयपी अजय मुथा यांनी अतिशय सोप्या भाषेत बजेटमधील तरतुदी व
त्याचा होणारा लाभ उलगडून सांगितला. ते म्हणाले की, यंदाच्या केंद्रीय बजेटमध्ये
कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली आहे. पंतप्रधान धनधान्य योजना मिशन अंतर्गत
कृषी क्षेत्रासाठी सिंचनाची सोय करण्यात येणार आहे. डाळींच्या उत्पादन वाढीसाठी
विशेष प्रयत्न करून आत्मनिर्भरता आणली जाणार आहे. काढणी पश्चात पिकांसाठी
स्टोरेजची क्षमता वृद्धी करण्यात येणार आहे. पीक कर्जाची उपलब्धता वाढविण्यासाठी
विशेष प्रयत्न केले जातील. त्यामुळे शेतकर्‍यांना अधिक पाठबळ मिळण्यास मदत
होईल. त्याचा दूरगामी परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू शकतो.
शेती क्षेत्राबरोबरच एम एस एम ई क्षेत्रावर यंदा बजेटमध्ये विशेष लक्ष केंद्रित
करण्यात आले आहे. एम एस एम ई या क्षेत्राची व्याख्येची व्याप्ती वाढवून या क्षेत्रातील
गुंतवणूक अडीच पट वाढवून टर्न ओव्हर लिमिट दुप्पट करण्यात आला आहे. को
लॅटरल फ्री क्रेडिट लिमिट ५ कोटी वरून १० कोटी करण्यात आले आहे. याचा फायदा
देशातील बहुतेक लघु उद्योगांना होईल. स्टार्ट आपला प्रोत्साहन देताना को लॅटरल फ्री
क्रेडिट लिमिटवर २० कोटींपर्यंतचे पाठबळ दिले गेले आहे. रोजगार निर्मितीसाठी पोषक
असलेल्या फुटवेअर, लेदर तसेच टॉईज इंडस्ट्रीवर अधिक लक्ष
केंद्रित करण्यात आले आहे. यामुळे चीनच्या जागतिक वर्चस्वाला
आव्हान दिले गेले आहे. लघु उद्योगांना प्रोत्साहन देताना केंद्र
सरकारने नवनवीन उद्योजक घडवतात रोजगार निर्मितीसाठी
विशेष प्रयत्न केले आहेत.
गुंतवणूक क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी
सरकारने यंदा ११.२४ लाख कोटींची तरतूद केली आहे. रस्ते तसेच
इतर पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करून देशाच्या भविष्याच्या
गरजांचा विचार करण्यात आला आहे. याशिवाय सरकारने १
लाख कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचा महत्वकांक्षी
प्रोजेट हाती घेतला आहे. वाढत्या शहरीकरणात सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी
हा फंड गेमचेंजर ठरेल. याशिवाय सर्व राज्य सरकारांनाही अर्बन डेव्हलपमेंटसाठी
बिनव्याजी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. भारताला मोठा सागरी
किनारा लाभला आहे. त्यामुळे शिपिंग इंडस्ट्रीला बळ देण्यासाठी २५ हजार कोटींचा
सागरी विकास फंड यंदाच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे. हायस्पीड रेल्वेला चालना
तसेच अणुऊर्जेतून १ गिगा मेगा वॅट ऊर्जेचे लक्ष्य या गोष्टी देशाला स्वयंपूर्ण होण्याच्या
मार्गावर नेणार्‍या आहेत.
पब्लिक, प्रायव्हेट गुंतवणूक केंद्र सरकारच्या अजेंड्यावर आहे. यामुळे
उद्योजकता विकास, रोजगार निर्मिती आणि एकूणच अर्थकारण जागतिक स्तरावर
बळकट कसे होईल यादृष्टीने सरकारने ठोस पाऊले उचलली आहेत. आयकराच्या
रचनेतही सरकारने आमूलाग्र बदल अंगिकारले आहेत. आयकराच्या कलम ८७ ए
तरतुदीत मोठा बदल करून १२ लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे.
थेट करदात्यांची दरमहा ५ ते २० हजार रुपये कराची बचत होऊ शकते. याशिवाय
आयकरात अधिकाधिक सुटसुटीतपणा आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलली गेली
आहेत. टिडिएस, टिसीएस मधील लिष्टता सुलभ पद्धतीने होईल अशी व्यवस्था
करण्यात आली आहे. आयकर सेशन २०६ सी (१ एच) तरतूद रद्द करण्याचा
अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या आर्थिक
कारभारात अधिक सुटसुटीतपणा आणण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले आहेत.
एकूणच यंदाचे केंद्रीय बजेट सर्वसमावेशक आणि अर्थकारणाला बळकटी देणारे आहे,
असे मत सी ए, आय पी अजय मुथा यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात उपस्थितितांचे
स्वागत तुषार कर्नावट यांनी केले. आभार आलोक मुनोत यांनी मानले.

डॉ.सुधा कांकरिया लिखित ‘औंदा लग्नाचा इचार नाय’ पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. सुधा कांकरिया लिखित ‘औंदा लग्नाचा इचार नाय’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले.

नगर – येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुधा कांकरिया लिखित ‘औंदा लग्नाचा इचार नाय’ पुस्तकाचे प्रकाशन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नारायण कराळे यांच्या हस्ते झाले. सदर प्रसंगी कविवर्य चंद्रकांत पालवे, साहित्य परिषदेचे
विभागीय कार्यवाह व शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य जयंत येलूलकर, रोटरीचे दिपक गुजराथी, स्नेहालय परिवाराचे प्रविण कदम, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, डॉ. सुधा व डॉ. प्रकाश कांकरिया, प्रशांत
गायकवाड, महेश सुर्यवंशी उपस्थित होते. सुरूवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करण्यात आले. डॉ. सुधा कांकरिया यांनी स्वागत केले व पुस्तकाची भुमिका मांडली. त्या म्हणाल्या कि रोटरी व स्नेहालय
परिवाराच्या वतीने जिल्हाभर अनेक ग्रामपंचायत, विद्यालय, महाविद्यालयातुन बालविवाह मुक्त अ.नगर ही मोहिम राबविण्यात आली. त्यावेळेस लोकशिक्षण व जनजागृतीसाठी सदर नाटिका मी लिहिली. जिल्हाभरात
त्याचे चौकाचौकातुन सुमारे ३०० पेक्षा जास्त प्रयोग झाले. आकाशवाणी वरूनही ती प्रसारीत झाली. परंतु
पुस्तकाच्या रूपाने ती आज प्रकाशीत होत आहे. आज आदरणीय सरोजनी नायडू यांची १४६ वी जयंती आहे. हा
दिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला गव्हर्नर
होत्या तसेच त्या कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या ही होत्या. त्यामुळे बालविवाहाची क्रुर प्रथा नष्ट करण्यासाठी
सदर नाटिकेचे प्रकाशन त्यांच्या जयंतीच्या दिवशी होत आहे ही आनंदाची बाब आहे.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नारायण कराळे म्हणाले की, सकारात्मक सामाजिक परिवर्तनाची
प्रेरणा देणारे हे मार्गदर्शक पुस्तक आहे. बालविवाह हा समाजासाठी कलंक असुन आज ही भारतात ४०% पेक्षा
जास्त बालविवाह होतात ही चिंतेची बाब आहे. शासन व सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन हा कलंक पुसला
पाहिजे. लोकशिक्षण व समाजजागृतीसाठी सदर पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. लवकरच अहिल्यानगर तसेच
भारत बालविवाहमुक्त व्हावा अशी आशा मी बाळगतो. चंद्रकांत पालवे म्हणाले की, मी सुधाताईंना गेल्या
४० वर्षापासुन ओळखतो. समर्पित होऊन कार्य करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. आधी केले मग सांगितले हा त्यांचा
स्वभाव आहे. म्हणूनच सदर पुस्तकातील नाटिकेचे ३०० पेक्षा जास्त ठिकाणी प्रयोग झाले व आता ती पुस्तक रूपाने येत आहे. नाटिकेतील भाव मनाला भिडतात, चिंतन करायला लावतात. आणि त्यामुळे यातुनच परिवर्तन होण्याची
अपेक्षा आहे.  यंत येलूलकर म्हणाले कि, नाटिका अत्यंत सोप्या  शब्दात, सहज बोलया भाषेत, सर्वांना समजेल अशा
छोटया छोटया वायात प्रस्तुत  झाली आहे. त्यामुळे शाळकरी  मुलामुलींनाही ती समजणार आहे. आता योग्य वेळी
विवाह होण्याच्या दृष्टीने घराघरातुनही संस्कार व्हायला हवेत मी डॉ. सुधाताईंचे अभिनंदन करतो.
स्नेहालय परिवारातील प्रविण कदम म्हणाले की मी स्वत: सदर नाटिकेचे दिग्दर्शन केले असुन आमच्या
टिमने त्याचे जिल्ह्यातील कानाकोपर्यातुन सादरीकरण केले आहे. शाळा शाळातुन जेव्हा आम्ही सादरीकरण
करत होतो तेंव्हा तेथील मुल मुली ही उत्साहाने सहभागी होत होते. गांवागांवातुन त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
बालविवाहामुळे होणारे बालमृत्यू तसेच मातामृत्यू प्रमाण थांबविण्यासाठी, तसेच कोमल वयात होणारे अत्याचार
रोखण्यासाठी बालविवाह थांबलेच पाहिजेत. त्यासाठी ही नाटिका नक्कीच उपयोगी ठरते. डॉ. प्रकाश कांकरिया यांनी आभार मानले व म्हणाले की सदर पुस्तिका शाळेच्या लायब्ररीसाठी व या क्षेत्रात कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांसाठी मोफत देण्यात येईल

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचे २८ विद्यार्थी स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत

शाळेच्या गुणवत्तेबाबत असलेला रोल मॉडेल संस्थेत घेऊन जाणार : नवनाथ बोडखे

नगर – हिंद सेवा मंडळ आयोजित स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेच्या गुणवत्ता यादीत रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई
भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी चमकले. शाळेच्या ६० विद्यार्थ्यांनी जिल्हा व शहर गुणवत्ता यादीत स्थान मिळवून, सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे. जिल्हा गुणवत्ता यादीत २८, तर शहर गुणवत्ता यादीत ३२ विद्यार्थी आले आहेत. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, प्राचार्य छाया काकडे, मुख्याध्यापक शिवाजीराव लंके आदींसह शालेय शिक्षक उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता
वाढीसाठी विशेष उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धा
परीक्षेत बसविले जात आहे. यासाठी तज्ञ शिक्षक करत असलेल्या मार्गदर्शनाने विद्यार्थी
विविध परीक्षेत यश मिळवत असल्याचे स्पष्ट केले.
नवनाथ बोडखे म्हणाले की, ही प्राथमिक शाळा संस्थेत व राज्यात गुणवत्तेने
नावाजली आहे. अनेक स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी चमकत आहे. या शाळेने पुढाकार
घेऊन रयतची एक स्पर्धा परीक्षा निर्माण करावी. त्याला संस्थेचे पूर्ण सहकार्य राहणार
आहे. या शाळेचे गुणवत्तेबाबत असलेले वेगळेपण रोल मॉडेल म्हणून संस्थेत घेऊन
जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले.
ज्ञानदेव पांडुळे यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करुन सर्व गुणवंतांचे
अभिनंदन केले. तसेच यावेळी मार्गदर्शक शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख उर्मिला साळुंके, मीनाक्षी खोडदे, सुजाता दोमल,
शितल रोहोकले, जयश्री खांदोडे, शिल्पा कानडे, सोनाली अनभुले, रूपाली वाबळे,
भाग्यश्री लोंढे, भारती सुरसे आदींचे मार्गदर्शन लाभले. या परीक्षत यश प्राप्त करणार्‍या
विद्यार्थ्यांचे संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी
सदस्य अभिषेक कळमकर, सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी,
प्रमोद तोरणे, अर्जुनराव पोकळे, शौकतभाई तांबोळी यांनी अभिनंदन केले.
जिल्हा गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी खालील प्रमाणे
इयत्ता पहिली- जिल्ह्यात ६ वा क्रमांक- भोंडवे अपूर्वा अमोल, पवार सिद्धी
अरुण, मोकाटे स्वरणीम जयदीप,
जिल्ह्यात ११ वा क्रमांक- कोहक सानवी नितीन, अनभुले स्वरव नारायण,
गंभीरे आयुष योगेश, गारूडकर कैवल्य प्रदिप.
इयत्ता दुसरी- आराध्या रावसाहेब जाधव (जिल्ह्यात ३ क्रमांक), नाबगे विनय
सचिन (जिल्ह्यात ६ वा), अंधारे वेदांत प्रमोद (जिल्ह्यात ८ वा), गुंजाळ रुद्र कैलास (जिल्ह्यात ९ वा), बारगजे भक्ती बळीराम (जिल्ह्यात ९ वा), ठाणगे गार्गी संतोष (जिल्ह्यात ११ वा), हंबर्डे शामवी अमोल (जिल्ह्यात १२ वा).
इयत्ता तिसरी- शेख सरफराज शाकिर (जिल्ह्यात ७ वा), शिंदे सत्यजित
विठ्ठल (जिल्ह्यात १३ वा), धामणे अनुष्का विलास (जिल्ह्यात १५ वा), पार्थ विक्रम जाधव (जिल्ह्यात १७ वा).इयत्ता चौथी- अनभुले अथर्व विकास (जिल्ह्यात ४ था), बोरुडे अर्णव भारत (जिल्ह्यात ५ वा), टकले कपिश मीनीनाथ (जिल्ह्यात ६ वा), बडवे ओवी अशोक (जिल्ह्यात ८ वा), कीर्ती प्रवीण शिरसे (जिल्ह्यात ९ वा), रक्ताटे श्रेया रवींद्र (जिल्ह्यात १२ वा), भद्रे स्वरा अजय (जिल्ह्यात १६ वा), जाधव आर्या रवींद्र (जिल्ह्यात १७ वा), बनकर आरुषी मल्लिकार्जुन (जिल्ह्यात २० वा), वरद बाबाजी झावरे (जिल्ह्यात २१ वा)

महाविद्यालयातील संस्काराची शिदोरी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून जीवन घडविते

डॉ.प्रशांत पटारे यांचे प्रतिपादन; डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजचे र्‍हिदम वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

नगर – शालेय जीवनात स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या
कला-गुणांना वाव देणारे पहिले व्यासपीठ असते. त्यांच्या
कलागुणांचा चा विकास झाल्यास पुढे करिअरची दिशा ठरते.
ही दिशा योग्य ठरवण्यासाठी महाविद्यालयामधील संस्काराची शिदोरी विद्यार्थ्यांचा
आत्मविश्वास वाढवून जीवन घडविते. सेवा शिक्षण मंडळाने खुप मोठी संस्काराची
शिदोरी प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिल्याने कला, क्रिडा,
सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच स्पर्धा परिक्षांसह १०० टक्के निकाल विद्यालयाचे लागले.
राज्य, राष्ट्रीय पातळीवर या शाळेने नाव उंचावले असे प्रतिपादन अस्थिरोग तज्ञ डॉ.
प्रशांत पटारे यांनी केले.
अहिल्यानगर येथील वसंत टेकडी जवळील डॉ.ना.ज. पाउलबुधे कॉलेज ऑफ
फॉर्मसीचे फार्मा र्‍हिदम वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.प्रशांत पटारे, नेत्रतज्ञ डॉ.स्मिता पटारे सेवा शिक्षण
प्रसारक मंडळाचे रामभाऊ बुचकूल, रामकिसन देशमुख, दादासाहेब भोईटे, राघुनाथ
कारमपूरी, संजय पवार, साई पाऊलबुधे, डॉ.श्रध्दा पाऊलबुधे संकुलाच्या प्रमुख डॉ.
रेखाराणी खुराणा, एम.फार्मचे समन्वयक डॉ.वेणू कोला संकुलातील सर्व विद्यालय,
महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित होते.
डॉ.पटारे यांनी आपल्या भाषणातून कॉलेजच्या जुन्या अभ्यासक्रमाचा व नवीन
अभ्यासक्रमांमधील फरक स्पष्ट केला. तंत्रज्ञान युगात सोशल मिडीयात तरुण जास्त रमतात.
त्याचा योग्य तो वापर करुन स्वत:ला स्ट्राँग ठेवून आपण पुढे कसे जाऊ हा विचार
करावा. नवीन जनरेशला प्रगतीसाठी वेळ चांगली आहे. या फार्मसी क्षेत्रात नोकर्‍यांबरोबरच
व्यवसायाला खुप चांगल्या संधी आहेत असे सांगितले.
डॉ.स्मिता पटारे यांनी सेवा शिक्षण प्रसारक मंडळ
विद्यार्थ्यांसाठी एक संस्कार केंद्रच आहे. या माध्यमातून
सर्वसामान्य कुटूंबातील मुलांना चांगले शिक्षण सोयी-सुविधा
देत असल्याने विद्यार्थी सक्षम बनतात. डॉ.नाथ सरांचे स्वप्न खर्‍या अर्थाने विद्यार्थी,
शिक्षक हे पुर्ण करीत आहेत. असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात बी. फॉर्मसी कॉलेजचा वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्य डॉ.श्याम
पंगा यांनी केले तर डी. फार्मसीच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण यांनी वर्षभर राबविलेले
विविध उपक्रम, स्पर्धा, उत्सवांमधील विद्यार्थ्यांनी घडविलेले सांस्कृतिक कलेचे दर्शन,
क्रिडा स्पर्धेतील यशाचा अहवालात माहिती दिली.उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थ्यांना
पारितोषिक वितरण करण्यात आले.
फार्मा र्‍हिदम कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख गौरी ढवळे,
प्रियंका कर्डिले, खेळ विभाग प्रमुख मिलिंद क्षीरसागर, पल्लवी अडागळे सांस्कृतिक
विभागाचे सुधीर गर्जे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी परिश्रम
घेतले.
फार्मा र्‍हिदम कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विनय
पाऊलबुधे यांनी सर्वांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रोशनी सूर्यवंशी यांनी केले तर आभार सुवर्णा येमुल यांनी मानले.

नगर-पुणे महामार्गावर प्रवाशांना कारमध्ये बसवून लुटमार करणारी टोळी केली जेरबंद

टोळीत नागापूर, बोल्हेगाव येथील आरोपींचा समावेश, ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

नगर – नगर – पुणे महामार्गावर प्रवाशांना कारमध्ये बसवून चाकूचा धाक दाखवत लुटणारी टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली आहे. या चौघांच्या टोळीतील १ नागापुरचा, दोघे बोल्हेगावचे तर एक श्रीगोंदा तालुयातील आरोपीचा समावेश आहे. समीर गफ्फार शेख (वय ३०, रा.बोल्हेगाव), वैभव सुरेश कोठाळे (वय ३२, रा.इरिगेशन कॉलनी, देवदैठण, ता.श्रीगोंदा), अक्षय दशरथ पडवळ (वय २९, रा.बोल्हेगाव) या तिघांना पकडण्यात आले आहे तर त्यांचा आणखी एक साथीदार खंडू उर्फ संदीप मिठू काळे (रा. नागापूर, ता.अहिल्यानगर) हा फरार आहे. या टोळीने
११ फेब्रुवारीला रात्री ८.३० च्या सुमारास सतीष मधुकर पठारे (रा.बँक कॉलनी, सुपा, ता.पारनेर) यांना सुपा येथील वाळवणे चौकात गाडी बंद असल्याचा बहाणा करून मदत करण्यास कारमध्ये बसविले. कारमध्ये बसल्यानंतर कार सुपा येथून वाळवणे गावाकडे घेवून जात पठारे यांना चाकुचा धाक दाखवून बळजबरीने त्यांच्या मोबाईलमधील फोन पे वरून ७९
हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर पठारे यांना त्या परिसरात कार मध्ये फिरवून त्यांचे कपडे काढुन घेत
त्यांना नगर पुणे महामार्गावर सुप्याजवळील पवारवाडी घाटात सोडून दिले होते. याबाबत सुपा पोलीस ठाण्यात
जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप पवार, अतुल लोटके, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड व उमाकांत गावडे हे करत होते. १३ फेब्रुवारीला हे पथक तांत्रीक विश्लेषणाचे आधारे गुन्हयाचा तपास करीत असताना त्यांना सदर गुन्हा बोल्हेगावच्या समीर गफ्फार शेख याने त्याचे साथीदारासह केला असल्याची
माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचा एमआयडीसी परिसरात शोध घेवून त्याला पकडले. त्याने साथीदारांसह गुन्हा
केल्याची कबुली दिल्यावर वैभव कोठाळे व अक्षय पडवळ यांना ही पकडण्यात आले. तर खंडू उर्फ संदीप मिठू काळे
हा फरार झाला आहे. पोलिसांनी समीर शेख याने गुन्ह्यात वापरलेली हुंडाई कार (क्र. एमएच १२ ईएस ६७७८) सह
१५ हजारांची रोकड जप्त केली. आरोपींना सुपा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास महिला पोलिस
उपनिरीक्षक मोनिका जेजोट या करत आहेत