टोळीत नागापूर, बोल्हेगाव येथील आरोपींचा समावेश, ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
नगर – नगर – पुणे महामार्गावर प्रवाशांना कारमध्ये बसवून चाकूचा धाक दाखवत लुटणारी टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली आहे. या चौघांच्या टोळीतील १ नागापुरचा, दोघे बोल्हेगावचे तर एक श्रीगोंदा तालुयातील आरोपीचा समावेश आहे. समीर गफ्फार शेख (वय ३०, रा.बोल्हेगाव), वैभव सुरेश कोठाळे (वय ३२, रा.इरिगेशन कॉलनी, देवदैठण, ता.श्रीगोंदा), अक्षय दशरथ पडवळ (वय २९, रा.बोल्हेगाव) या तिघांना पकडण्यात आले आहे तर त्यांचा आणखी एक साथीदार खंडू उर्फ संदीप मिठू काळे (रा. नागापूर, ता.अहिल्यानगर) हा फरार आहे. या टोळीने
११ फेब्रुवारीला रात्री ८.३० च्या सुमारास सतीष मधुकर पठारे (रा.बँक कॉलनी, सुपा, ता.पारनेर) यांना सुपा येथील वाळवणे चौकात गाडी बंद असल्याचा बहाणा करून मदत करण्यास कारमध्ये बसविले. कारमध्ये बसल्यानंतर कार सुपा येथून वाळवणे गावाकडे घेवून जात पठारे यांना चाकुचा धाक दाखवून बळजबरीने त्यांच्या मोबाईलमधील फोन पे वरून ७९
हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर पठारे यांना त्या परिसरात कार मध्ये फिरवून त्यांचे कपडे काढुन घेत
त्यांना नगर पुणे महामार्गावर सुप्याजवळील पवारवाडी घाटात सोडून दिले होते. याबाबत सुपा पोलीस ठाण्यात
जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप पवार, अतुल लोटके, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड व उमाकांत गावडे हे करत होते. १३ फेब्रुवारीला हे पथक तांत्रीक विश्लेषणाचे आधारे गुन्हयाचा तपास करीत असताना त्यांना सदर गुन्हा बोल्हेगावच्या समीर गफ्फार शेख याने त्याचे साथीदारासह केला असल्याची
माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचा एमआयडीसी परिसरात शोध घेवून त्याला पकडले. त्याने साथीदारांसह गुन्हा
केल्याची कबुली दिल्यावर वैभव कोठाळे व अक्षय पडवळ यांना ही पकडण्यात आले. तर खंडू उर्फ संदीप मिठू काळे
हा फरार झाला आहे. पोलिसांनी समीर शेख याने गुन्ह्यात वापरलेली हुंडाई कार (क्र. एमएच १२ ईएस ६७७८) सह
१५ हजारांची रोकड जप्त केली. आरोपींना सुपा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास महिला पोलिस
उपनिरीक्षक मोनिका जेजोट या करत आहेत