नगर – भगवान महावीर जन्मकल्याणक (जयंती) निमित्त जैन सोशल फेडरेशनतर्फे १० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता
आनंदधाम मध्ये भक्तिसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सौ. सरोजताई कटारिया
यांनी दिली. त्या म्हणाल्या, भक्तिसंध्या सादर करणारे पवन भाटिया हे इंदूरचे रहिवासी असून त्यांनी सरकारी संगीत महाविद्यालय, इंदौर येथे संगीत विषयात पदवी संपादन केली. स्टेजवर कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यामधून त्यांनी देशभरातील विविध संस्था व संघटनांशी दृढ स्नेह निर्माण केला. गायक, गीतकार व संगीतकार अशा तिन्हीही भूमिका ते समर्थपणे पार पाडतात. आतापर्यंत त्यांचे १२० अल्बम तयार झाले आहेत. नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे ते प्रथम कर्तव्य समजतात. भारतीय संगीत संस्कृतीची वैश्विक ओळख निर्माण व्हावी यासाठी ते परिश्रम घेत आहेत. दूरदर्शन
आणि चित्रपट यामध्ये त्यांनी आपल्या कामाचा वेगळेपणाचा ठसा उमटवला आहे. सोनाली पुराणिक या वयाच्या १४ व्या वर्षापासून व्यासपीठावर गायन सेवा करत आहेत. खैरागढ विश्वविद्यालयात सतार वादन विषयात त्यांनी एम.ए. ची पदवी
संपादन केली. कथ्थक नृत्यामध्येही त्या पारंगत आहेत. देवी अहिल्या विश्वविद्यालयात त्यांनी कथ्थक नृत्यामध्ये एम.ए. ची
पदवी संपादन केली आहे. शास्त्रीय व सुगम संगीत क्षेत्रात त्या गुणी गायक व संगीतकारांसोबत देशभर कार्यक्रम करत आहेत. अशा दिग्गज कलाकारांच्या भक्ती संध्या कार्यक्रमाचा शहरातील भाविकांनी आणि संगीत प्रेमींनी लाभ घ्यावा,
असे आवाहन जैन सोशल फेडरेशनतर्फे करण्यात आले आहे.