ना.राधाकृष्ण विखे पा. यांच्या दुरदृष्टीमुळे महिला सक्षमीकरणास चालना

0
32

अकोले – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्यातील एकल महिला सक्षमीकरण कार्यक्रमास गती मिळाली आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख यांनी केले.

अकोले येथे साऊ एकल महिला संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात श्री. देशमुख बोलत होते. याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील हेरंब कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंतराव मनकर, साउ संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा
कुलकर्णी, अहिल्यानगर येथील आय. एस. डी. टी. च्या संचालिका पूजा देशमुख, नगरसेविका प्रतिभा मनकर, रवींद्र मालुंजकर, विद्याचंद्र सातपुते, निलेश तळेकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना श्री. देशमुख म्हणाले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तिसर्‍या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने ना. राधाकृष्ण विखे पा. यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. प्रामुख्याने एकल महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यांच्यासाठी प्रशिक्षण, उत्पादन, बाजारपेठेची सांगड या माध्यमातून कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याची ना. विखे यांची संकल्पना आहे. यादृष्टीने जिल्ह्यातील एक महिलांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून लवकरच याबाबतची पुढील दिशा स्पष्ट केली जाईल.
जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात नुकतीच कौशल्य विकास समितीची एक बैठक झाली असून जिल्हाधिकार्‍यांनी एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी कृती कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

श्री. देशमुख पुढे म्हणाले, अकोले येथील साऊ महिला संस्थेचे संघटन लक्षात घेता अकोले येथे लवकरच यासंदर्भात प्रशिक्षण सुरू करण्यात येईल.यावेळी बोलताना साऊ एकल महिला संस्थेचे मार्गदर्शक हेरंब कुलकर्णी म्हणाले, कोरोनाच्या  जागतिक संकटानंतर २०२० पासून साऊ संस्थेने एकल महिलांचे संघटन सुरू केले. सध्या २० जिल्ह्यातील ७५ तालुयात एकल महिलांचे संघटन असून आतापर्यंत अकोले तालुयातील २७ महिलांना व्यवसाय उभे करून देण्यात आले आहेत. केवळ शासनाच्या अनुदानावर अवलंबून न राहता एकल महिलांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतः
च्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य करावे, अशी अपेक्षा श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

यावेळी वसंतराव मनकर यांनी, महिलांच्या प्रशिक्षणासाठी व त्यांनी तयार केलेल्या मालाच्या विक्रीसाठी आपण आवश्यक जागा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले. आय.एस.डी.टी. च्या संचालिका पूजा देशमुख यांनी आपले अनुभव सांगताना विस्तारत चाललेला गारमेंट उद्योग लक्षात घेता महिलांनी याचा जास्तीत जास्त लाभ करून घेणे आवश्यक आहे. असे सांगितले.

प्रारंभी साऊ एकल महिला संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी उपस्थित एकल महिलांनी त्यांचे अनुभव सांगून त्यांना आवश्यक असलेल्या सहकार्याची आणि मार्गदर्शनाबाबत अपेक्षा व्यक्त केली.