महाजन गल्ली येथील जैन मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह मुर्तीवरील सोन्याचे दागिने केले लंपास

0
58

नगर – मंदिराच्या पाठीमागील बाजूने शिडीच्या सहाय्याने वर चढून कोणीतरी अज्ञात चोट्याने मंदिराच्या पाठीमागील दरवाज्याची कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला, आतील तीन दानपेटी फोडून रोख रक्कम व मूर्तीवरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शहरातील महाजन गल्ली येथील १००८ महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिरामध्ये ९ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबतची मिळालेली माहिती अशी की महाजन गल्ली येथील १००८ महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर आहे. या ठिकाणी मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत १० एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या भगवान महावीर जयंती उत्सवाची तयारी सुरु होती. त्यामुळे तेथे च्या पाठीमागील बाजूस असलेल्या मोठ्या जागेत मंडप उभारणी व इतर कामासाठी शिडी व इतर साहित्य ठेवलेले होते. अज्ञात चोरट्यांनी ८ एप्रिलच्या रात्री ११ ते ९ एप्रिलच्या पहाटे ५ या कालावधीत तेथील शिडी मंदिराच्या पाठीमागील बाजूला भिंतीला लावून वरच्या बाजूला गेले. वरील बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटे खाली मंदिरात उतरले, त्यांनी मंदिरातील २ छोट्या व १ मोठी अशा ३ दानपेट्या फोडल्या. त्यातील रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर मंदिराच्या गर्भगृहात असलेल्या मूर्तीवरील सोन्याचे दागिने चोरून नेले.

सकाळी काही जण मंदिरात दर्शनासाठी तसेच महावीर जयंती कार्यक्रमाच्या तयारीसाठी आले असता त्यांच्या निदर्शनास चोरीची घटना आली. त्यांनी याबाबत कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली. या परिसरात सीसीटीव्ही नसल्याने मंदिराच्या मागील बाजूस आणि परिसरात असलेले सीसीटीव्ही तपासण्याचे काम पोलिसांनी सुरु केले. दुपारी उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता.