जगाने कर्तृत्वाची नोंद घेणे कौतुकास्पद

समर्थ सूर्यनमस्कार सोहळ्याची जागतिक विश्वविक्रमात नोंद

नगर – निरोगी शरीर आनंद, उत्साह आणि ऊर्जा यांचे निवासस्थान असते. समर्थ रामदास स्वामींनी सूर्यनमस्काराचे
महत्त्व ओळखून आपली दिनचर्या आखली होती. आधुनिक विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिनीमध्ये सूर्यनमस्कार समाविष्ट करावा.
समर्थ सूर्यनमस्कार सोहळ्याची जागतिक पातळीवर विश्वविक्रमाच्या माध्यमातून नोंद घेतली गेली. ही अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार ह.भ.प.मुकुंदकाका  जाटदेवळेकर महाराज यांनी काढले. श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने
आयोजित दासनवमी सोहळ्यामध्ये समर्थ सूर्यनमस्कार उपक्रमाची सुमारे जागतिक विश्वविक्रमाची सहा प्रमाणपत्रे
श्री जाटदेवळेकर यांच्या हस्ते संस्थाचालकांना प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. स्टार रेकॉर्ड
बुक ऑफ इंटरनॅशनल, किंगडम ऑफ टॅलेंट वर्ल्ड रेकॉर्ड बुक, नॅशनल स्टार एसलन्स रेकॉर्ड बुक, एम्परर बुक
ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एमिका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आदी विविध देशांतील राष्ट्रीय व
आंतरराष्ट्रीय विश्वविक्रमाची प्रमाणपत्रे प्राप्त झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे व्हाईस चेअरमन तथा दासनवमी उत्सव समिती प्रमुख श्रीपाद कुलकर्णी, संस्थेचे सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर, खजिनदार संजय कुलकर्णी, कार्यकारणी सदस्य तथा माध्यमिक विभागाचे शालेय समिती चेअरमन अ‍ॅड.किशोर देशपांडे, कार्यकारणी सदस्य स्वप्निल कुलकर्णी,          सौ.संध्या कुलकर्णी, संस्थेचे निमंत्रित सदस्य राहुल जोशी, श्रीमती स्वाती कुलकर्णी, मुख्याध्यापिका धनश्री गुंफेकर, श्रीमती वसुधा जोशी, प्राचार्या श्रीमती संगीता जोशी, मुख्याध्यापक अजय महाजन यांच्यासह पर्यवेक्षक सुनील कानडे, शिक्षक डॉ.अमोल  बागुल, पोपट लोंढे, संकेत शिंदे आदी उपस्थित होते. विद्यादानाचा यशस्वी सुवर्ण महोत्सव साजरा करणार्‍या
श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने दासनवमी, रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त आरोग्यदृष्ट्या संपन्न व समृद्ध विद्यार्थी घडविण्यासाठी सावेडीतील नवीन समर्थ प्रशालेच्या सुमारे २५,००० स्क्वेअर फुट मैदानावर १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी १०० शिक्षकांच्या मदतीने ११ हजार सूर्यनमस्कार व ११ हजार मनाचे श्लोक सादर केले होते.

कागदावर उतरलेले आईचे काळीज म्हणजे ‘उर्णा’

साहित्यिक भारत सासणे यांचे प्रतिपादन

नगर – सुमारे १०० वर्षापूर्वीच्या तत्कालीन परिस्थितीत कुटुंब व्यवस्थेशी सामावून घेत पुरुषप्रधान संस्कृतीला सामोरे जाताना स्त्रीने दिलेली झुंज ही आजही सुन्न करते. अशा परिस्थितीवर जात्यावर बसून आपल्या व्यथा, भावभावना, ओवीच्या माध्यमातून तिने प्रकट केलेले संतत्व हे वेदनेचा ‘वेद’ करणारे आहे. भूपाली निसळ यांनी यासाठी घेतलेला ध्यास आणि कागदावर उतरवलेलं आईचं काळीज म्हणजे ‘उर्णा’ अशा संवेदनशील शब्दात व्यक्त झाले ते साहित्यिक लेखक व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे. औचित्य होते ते भूपाली निसळ लिखित व छायाचित्रकार संजय दळवी यांच्या आईच्या जीवनावर आधारित ‘उर्णा’या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. लेखक भारत सासणे यांच्या हस्ते ‘उर्णा’ प्रकाशन झाले. इन्किंग इनोवेशन मुंबईने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. यावेळी साहित्य प्रेमी उपस्थित होते.
‘उर्णा’ या पुस्तकावर तसेच एकंदर स्त्री साहित्यिक, लेखिका, जीवन भावभावना संघर्ष यांचे अभ्यासपूर्ण विवेचन भारत सासणे यांनी मनोगतात व्यक्त केले. त्यांनी भाषणात लेखिका भूपाळी निसळ यांनी प्राथमिक स्वरूपात स्त्रीचे तत्कालीन जीवन त्यातील संघर्ष संवेदनशीलता यांचे भेदक व वास्तव चित्र लेखन ओवी व काव्यात्मक पद्धतीने अतिशय भेदकपणे मांडले आहे. लेखक सासणे यांनी पुढे बोलताना तत्कालीन परिस्थितीत संत जनाबाई, संत वेण्णा, बहिणाबाई यांच्यासारख्या स्त्रिया लिहिता झाल्या व त्यांनी स्त्री जीवनाचे, मनुष्याच्या जीवनातील भावभावनांचा संघर्ष हा साहित्यातून ओवीच्या माध्यमातून मांडला जो आजही आपल्याला चिंतन करायला भाग पाडतो. भूपाली निसळ यांनी त्यांचा वारसा पुढे चालवताना स्त्रीच्या अंतरंगातील दुःखाचा दाह, तिच्या मनातील अस्वस्थता आणि तरीही तिच्यातील पराकोटीची क्षमाक्षिलता यांचे  संवेदनशील लेखन आजच्या परिस्थितीतही अंजन घालणारे आहे. ‘उर्णा’ हे पुस्तक भविष्यात संदर्भ ग्रंथ
म्हणून वाचक व अभ्यासकांना मार्गदर्शक ठाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भूपाळी निसळ यांनी यावेळी प्रास्ताविकात ‘उर्णा’ माध्यमातून तिसरे पुस्तक
लिहिताना मी १०० वर्ष मागे जाऊन तत्कालीन जीवन समजण्या साठी अनेकांशी संवाद
साधताना अनेक गोष्टी उलगडल्या. १९४० ते १९७० या कालखंडातील परिस्थिती
जाणून घेण्यासाठी संदेशच्या तत्कालीन अंकांनी मला साथ दिली. संजय दळवी यांच्या
आईच्या जीवनावर विठाईच्या माध्यमातून वेध घेताना एक
संघर्ष करणारी हालअपेष्टा, नैसर्गिक संकटे, पुरुषप्रधान
संस्कृतीशी, जुळून घेणारी तरीही क्षमाशील असणारी आई
मला भेटली. काव्य, प्रसंग अशा वेगवेगळ्या माध्यमातून ती
लेखणीतून ‘उर्णा’ उतरत गेली… काळजाशी भिडत गेली.
पहिल्या कल्लोळतीर्थ तीस वर्ष जुन्या परिस्थितीवर तर
दुसरी अनाधीसिद्धा हे पंधराशे वर्ष जुनी भाषा असलेले
पुस्तक लिहिताना एका वेगळ्या विश्वाचा प्रचितीचा अनुभव
होता. ‘उर्णा’ माध्यमातून शंभर वर्षे जुनी भाषा, शब्द,
प्रसंग, व्यक्तिरेखा, हे साकारणं करता आव्हानात्मक होते.
परंतु अनेक व्यक्तींशी सुसंवाद साधताना, भेटी देताना मी
त्यातील एक होऊन गेले. विठाईचा सगळा संघर्ष, प्रसंग
हे ओवी, काव्य व लेखनातून उतरत गेले. वाचकांनाही ते
भावेल अशी आशा भूपाळी निसळ यांनी व्यक्त केली.
छायाचित्रकार संजय दळवी यांनी मनोगतात आईचे
आमच्या सगळ्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण स्थान आहे.
अशिक्षित असूनही आठ आपत्यांचा संगोपन करताना ती
जीवाची परवा न करता संघर्ष करत राहील. दिवसभर राबून, जात्यावर ओव्या गाताना
ती जीवनाचे तत्त्वज्ञान सांगून गेली. कुटुंब, समाज, परिस्थिती यातून ती संघर्ष करताना
ती आनंदी व क्षमाशील राहिली. ‘उर्णा’ माध्यमातून विठाई सारखा असंख्य स्त्रियांनी
हा संघर्ष केला. ‘उर्णा’च्या माध्यमातून भूपाली मिसळ यांनी आई साकारताना ती
त्यांची मुलगी झाली व आम्हाला आमची आई मिळाली असा भावनिक संवाद त्यांनी
साधला. याच कार्यक्रमात लेखिका भूपाळी निसळ यांच्या हस्ते साहित्यिक भारत
सासणे यांच्या हस्ते कल्लोळतीर्थ या तिसर्या कादंबरीच्या आवृत्तीचे आणि अनादीसिध्दा
या कादंबरीच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
‘उर्णा’च्या प्रकाशन कार्यक्रमाचे औचित्य साधून गायिका सौ. गौरी कुलकर्णी व
शिरीष कुलकर्णी यांनी भूपाली मिसळ यांनी या पुस्तकात लिहिलेल्या ओव्या, बल्लारी,
भजन यांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यामधून उपस्थित मंत्रमुग्ध
झाले. शेता, जात्यावरचा या ओव्यांच्या कार्यक्रमाचे निवेदन कु.सृजन निसळ यांनी
करून कार्यक्रमांत रंगत आणली. सूत्रसंचालन स्वरूपा चव्हाण यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंकिंग इनोवेशनचे आनंद लिमये, प्राजक्ता खैरनार, सविता
दळवी, चिन्मय सुकटणकर, राजू ढोरे, ज्ञानेश शिंदे, गणेश गाडेकर, रोहित भवर, दत्ता
पवार, बंडू साठे, विनय शिवरात्री यांचे सहकार्य लाभले.

ठेवी परत मिळण्यासाठी पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

नगर – शहरातील पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवी परत मिळाव्या व पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ठेवीदारांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दोन महिन्यांपूर्वी तक्रार दाखल करुनही कारवाई होत नसल्याने कारवाई
करण्याची मागणी लावून धरण्यात आली. यावेळी सायली कुलकर्णी, गायत्री जोशी, मनीषा कडेकर, रसाळ काकू,        सौ. जोशी, प्रीतम गुगळे, अमेय मुदकवी, प्रमोद कुलकर्णी, संजय कुलकर्णी, शरद नगरकर, वसंत कुलकर्णी, सुबोध कुलकर्णी, शाम कडेकर, मोहन जोशी, भास्कर जावळे, व्यंकटेश देशपांडे, दीपक दीकोंडा आदींसह ठेवीदार उपस्थित होते. पतसंस्थेच्या ठेवीदारांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शहरातील जुने कोर्ट येथील पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ही शाखा कार्यान्वीत आहे. ठेवीदारांनी सदर पतसंस्थेमध्ये संबंधित संचालक तसेच व्यवस्थापक यांच्या भूलथापांना बळी पडून १२ ते १४ कोटींच्या ठेवी ठेवलेल्या आहेत. या ठेवी परत मिळत नसल्याने पतसंस्थेत
अडकून पडल्या आहेत. या प्रकरणी ठेवीदारांनी १३ डिसेंबर २०२४ रोजी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रार केलेली
आहे. सदर तक्रारीवर आवश्यक ते आदेश देखील पारित केलेले असून, वरिष्ठ अधिकार्‍यांनी कोतवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश भ्रमणध्वनीद्वारे दिलेले होते. असे असताना देखील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेण्यात आलेला नसल्याचे म्हंटले आहे. सदर ठेवी परत मिळत नसल्याने सर्व ठेवीदार अस्वस्थ असून, पतसंस्थेवर कारवाई केली जात नसल्याने असंतोष निर्माण झाला असल्याचे स्पष्ट करुन पूर्णवाद
नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणी ठेवीदारांनी केली आहे.

अरणगावच्या माऊंट लिटेरा झी स्कूलमध्ये विज्ञान व गणित प्रदर्शन उत्साहात

नगर – माऊंट लिटेरा झी स्कूल, अरणगाव, दौंड रोड, अहिल्यानगर येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान व गणित प्रदर्शन
उत्साहात झाले. यात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक व गणितीय संकल्पना सृजनशील पद्धतीने सादर केल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रा. शैलजा लोटके यांच्या हस्ते विज्ञान व गणित प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील लोटके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रयोग, मॉडेल्स, गणितीय स्फूर्तिदायक सादरीकरणे व विज्ञानातील नवकल्पना पाहून उपस्थितांनी कौतुक केले. मुख्याध्यापिका प्रा. शैलजा लोटके यांनी
विद्यार्थ्यांचे कौतुक करताना, शिक्षण हे प्रयोगशील असावे. अशा प्रदर्शनांमधून विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्टिकोन व बौद्धिक क्षमता विकसित होते, असे मत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील लोटके यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विज्ञान व गणित विषयातील गोडी वाढवण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. विज्ञान आणि गणित विषयाचे शिक्षक तसेच इतर शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रदर्शनाला पालक व विद्यार्थी उपस्थित होते. माऊंट लिटेरा झी स्कूल दौंड

श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक विज्ञान दिन सोहळा

नगर – श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेज येथे विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेत विज्ञान प्रयोगाचे प्रदर्शन, वैज्ञानिक प्रात्यक्षिके यासारखे उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये
बर्‍याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी शाळेचे सहशिक्षिका सौ. प्रिया मल्होत्रा, सौ. तंझीला शेख यांनी विज्ञान
दिन या विषयावर भाषणे दिली. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा ’विज्ञान दिन’ विषयावर भाषणे केली. प्रथमेश दहिफळे हा विद्यार्थी एलेन ह्युम तर प्रणाली दहिफळे हिने आईजैक न्यूटन होऊन गुरुत्वाकर्षणाचे नियम आणि गतीचा सिद्धांत सांगितला. तसेच शाळेतील अगदी एलकेजी व युकेजीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा वेगवेगळे विज्ञान प्रयोगाचे प्रदर्शन सादर केली. याप्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे यांनी या चिमूरड्यांचे व इतर  विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना शाबासकी दिली.
शाळेचे एज्युकेशन डायरेटर नंदकिशोर भावसार यांनीही मुलांचे कौतुक करून शाबासकी दिली. या विज्ञान प्रयोगाचे प्रदर्शन, वैज्ञानिक प्रात्यक्षिके याचे परिवेक्षण शाळेचे प्राचार्या सौ. तनुजा लोंढे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या
पार पाडण्यासाठी सौ. तलवार, सौ.महाजन, सौ. रुखया शेख, सौ. नारंग व इतर शिक्षक यांनी मिळून यशस्वीरित्या जागतिक विज्ञान दिन सोहळा पार पाडला.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ६ मार्च रोजी ‘अयोध्ये’साठी होणार रवाना

प्र. जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांची माहिती : ७५० ज्येष्ठ नागरिक होणार रवाना

नगर- मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत ७५० ज्येष्ठ नागरिकांना घेऊन विशेष रेल्वे ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अयोध्येकडे रवाना होणार असून अधिकार्‍यांनी त्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी
बाळासाहेब कोळेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या आढावा बैठकीत
ते बोलत होते. बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रवीण
कोरगंटीवार, तहसीलदार शरद घोरपडे आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,
गट विकास अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. लाभार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून घ्यावे, नोंदणी करून येण्यास इच्छुक नसलेल्या नागरिकांच्या ऐवजी प्रतीक्षा यादीतील नागरिकांची नावे निश्चित करावी. लोकप्रतिनिधींना नियोजनात सहभागी करून घ्यावे. लाभार्थ्यांनी आधारकार्ड, दोन छायाचित्रे,
आवश्यक औषधे, पाच दिवसाचे आवश्यक साहित्य आणण्याबाबात सूचना द्याव्यात. सकाळी ९ वाजेपर्यंत लाभार्थी अहमदनगर रेल्वे स्थानकावर पोहोचतील याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. विशेष रेल्वे ७ तारखेला रात्री अयोध्येला पोहोचणार आहे आणि १० तारखेला सकाळी अहिल्यानगरला परत येईल. प्रवासादरम्यान लाभार्थ्यांची सर्व व्यवस्था आयआरटीसीटीतर्फे करण्यात येणार आहे. रेल्वेत वैद्यकीय उपचारासाठी पथक नियुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

प्रेमदान चौकातील सिग्नल बंद असल्याने होतेय वाहतूकीची कोंडी

महामार्गावरील पथदिवेही बंद, वाहन चालक, नागरिकांना होतोय प्रचंड त्रास  

नगर – नगर-मनमाड महामार्गावरील अतिशय वर्दळीच्या असलेल्या प्रेमदान चौकातील वाहतूक सिग्नल आणि पथदिवेही गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने सायंकाळ नंतर अंधाराच्या साम्राज्यामुळे या चौकात वारंवार वाहतूक कोंडी होवून वाहनचालकांसह पादचारी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्यंतरी या चौकात अनेक अपघात झाले होते, हे अपघातांचे सत्र पुन्हा सुरु होण्याची आणि त्यात नागरिकांचे बळी जाण्याची वाट प्रशासन पाहतेय काय? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

प्रोफेसर कॉलनीकडून येणारी-जाणारी वाहने या चौकातून वळतात. मनमाड रस्त्याने येणारी वाहने भरधाव जातात. त्यांच्या अनियंत्रित वेगामुळे अनेकदा अपघात होतात. या चौकात वाहतूक सिग्नल व्यवस्था बसवण्यात आलेले आहेत. मात्र, बऱ्याचदा सिग्नल बंद असतात. वाहतूक पोलिस या चौकात थांबत नसल्याने वाहतुकीचे नियोजन वाहनचालकच आपल्या पद्धतीने करतात. काही चालक सिग्नल तोडून तसेच पुढे जातात, त्यामुळे दुर्घटना घडतात.

नगर-मनमाड रस्त्याला समांतर असणाऱ्या बालिकाश्रम रस्त्याकडे जाण्यासाठी नागरिक या चौकाचाच वापर करतात. या चौकाजवळ अनेक हॉटेल्स व रुग्णालये झाली आहेत. त्यामुळे चौकात मोठी रहदारी असते. संबंधितांनी पार्किंगची पुरेशी व्यवस्था केली नसल्याने गाड्या महामार्गाच्या कडेलाच गाड्या लावल्या जातात. रिक्षाचालकांचा गराडाही या चौकाला पडलेला असतो.

चौकातील सिग्नल सतत सुरू ठेवावेत. वाहतूक पोलिसही नेमावा म्हणजे सिग्नल तोडण्याचा प्रयत्न होणार नाही.बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक व्हायला पाहिजे. मात्र शहर वाहतूक शाखा याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे या चौकात पुन्हा एकदा अपघातांची मालिका सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तातडीने सिग्नल व पथदिवे सुरु करावेत – अॅड. सुधीर टोकेकर

प्रेमदान चौकामधील सिग्नल गेल्या पंधरा दिवसापासून बंद आहेत. हा चौक गजबजलेल्या असून सदर सिग्नल कशामुळे बंद आहेत. हे समजत नाही. बंद असलेले सिग्नल आणि पथदिवे यामुळे चौकात अंधाराचे साम्राज्य असून  त्यामुळे या ठिकाणी वाहनांची प्रचंड गर्दी जमा होऊन चौक ओलांडून जाण्यासाठी खूप वेळ जात आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत पंधरा दिवस झाले तरी याकडे कोणीही लक्ष देत नाही अथवा याबाबत कोणी काही बोललेले नाही त्यामुळे सदर सिग्नल ताबडतोब सुरू करावे अशी मागणी शहर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अॅड. सुधीर टोकेकर यांनी केली आहे.

भरदिवसा बिनधास्तपणे युवकाने केली सक्कर चौकाजवळून मोटारसायकल चोरी

घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद; गुन्हा दाखल, चोरट्याचे पोलिसांसमोर आव्हान

नगर – शहरातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या स्टेशन रोडवर सक्कर चौक येथील कुंदन सुपर मार्केट दुकानासमोर
रस्त्याच्या कडेला लावलेली हिरो कंपनीची एच एफ डिलस मोटारसायकल (क्र. एम एच १६ बी पी ३६८३)
एका सराईत चोरट्याने अतिशय बिनधास्तपणे भरदिवसा चोरुन नेल्याची घटना ३ मार्च रोजी दुपारी घडली. चोरीची ही
घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या चोरट्याला पकडण्याचे मोठे आव्हान कोतवाली पोलिसांसमोर आहे.
या बाबत सुरज सोमनाथ केदारे (रा.मातोश्री अपार्टमेंट, संभाजी कॉलनी, रेल्वे स्टेशन अ.नगर) यांनी कोतवाली पोलिस
ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी केदारे हे त्यांच्या आईसह सुपर मार्केट येथे किराणा घेण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांची
मोटारसायकल दुकानाबाहेर रस्त्याच्या कडेला उभी केलेली होती. फिर्यादी व त्यांची आई हे दोघे दुकानात खरेदी करत असताना एक तरुण चोरटा दुकानात आला. त्याने माल खरेदीचे नाटक केले. काही वेळात फिर्यादी यांचा कानोसा घेत तो काहीही खरेदी न करता दुकानाच्या बाहेर गेला आणि त्याने मोटारसायकलला बनावट चावी लावून ती सुरु करून घेवून निघून गेला. थोड्या वेळाने फिर्यादी दुकानाबाहेर आले असता मोटारसायकल  चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच सुपर मार्केट येथील आतील व बाहेरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता फुटेज मध्ये एक अनोळखी तीस ते पस्तीस वयाचा चोरटा, त्याच्या अंगात काळसर हिरवट रंगाचा चेसचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट,
पायात काळे बूट, डोयास पुढील बाजूस टक्कल पडलेले असा इसम मोटारसायकल चोरून नेताना
दिसून आला. या प्रकरणी सुरज केदारे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. तसेच चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तपास पोलीस हवालदार डाके हे करीत आहे

पाण्याचा प्रश्न गंभीर, सर्वत्र घाण; आरोग्य आले धोयात; अनागोंदी कारभाराविरोधात संतप्त ग्रामस्थांनी ठोकले टाळ

नगर – नगर एमआयडीसी परिसरात असलेल्या नवनागापूर ग्रामपंचायतच्या सुरु असलेल्या अनागोंदी कारभारामुळे मोठी
लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायत हद्दीत राहणारे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. सर्वत्र घाणीचे साम्राज्य, निर्माण झालेला पाणी प्रश्न या समस्यांनी हैराण झालेल्या ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतच्या या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ कार्यालयास टाळे ठोकत आपला संताप व्यक्त केला आहे. नवनागापूर ग्रामपंचायत अहिल्यानगर
जिल्ह्यामधील सर्वात मोठी व सधन ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते. पण याच ग्रामपंचायतीमध्ये मागील काही वर्षापासून
मोठे ग्रहण लागलेले आहे. ग्रामपंचायतीमध्ये एमआयडीसी असल्यामुळे येथील आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात
होतात व त्याचाच गैरफायदा काही ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी घेऊन आता नवनागापूर ग्रामपंचायत व समस्त कार्यकारी मंडळ वादाच्या भोवर्‍यात अडकलेले आहे. अनेक प्रकारच्या प्रशासनिक चौकशीला सामोरे जात आहेत.
नवनागापूरचे ग्रामपंचायत तीन वर्षापासून नेहमीच विवादाच्या घेर्‍यात अडकलेली दिसते. पाणी प्रश्नावरून ही खूप मोठा ग्राम सभेत गदारोळ झाला होता. मागील एक महिन्यापासून कचरा उचलणे बंद असल्यापासून मुळे व ग्रामपंचायतीच्या ढिसाळ व्यवस्थापनाबद्दल ग्रामस्थांमध्ये अत्यंत नाराजीचा सूर दिसून येत आहे. गावचे सरपंच व ग्रामसेवकांनी ग्रामस्थांना कसलीही पूर्वसुचना न देता अचानक कचरा संकलन करणार्‍या सर्व घंटागाडी बंद केल्या आहेत. त्यामुळे सुमारे २५ हजार लोकसंख्येच्या गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जागोजागी कचर्‍याचे ढिगारे व त्यातून पसरणारा दुर्गंध, तसेच
सदर कचरा गावातच पेटून दिल्यामुळे धुराचे साम्राज्य तयार झालेल आहे, प्लास्टिकच्या उग्र धुरामुळे नागरिकांना गुदमरल्यासारखं होत आहे. यामुळे गावातील सर्वसामान्य लोक वयस्क व लहान मुलांच्या
आरोग्याच्या अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांना
डायरिया सारखे गंभीर स्वरूपाचे साथीचे आजार होऊ लागले
आहेत. पण ग्रामपंचायत प्रशासनाला कसल्याही प्रकारची काळजी
घेतलेली नाही. सर्वांना वार्‍यावर सोडून सरपंच व ग्रामसेवक गाड
झोपेचे सोंग घेतलेल आहे. यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला जागे करण्यासाठी ३ मार्च
रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब सप्रे व
गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जनआक्रोश
आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला व घोषणाबाजी करत
घंटागाडी तात्काळ सुरू करण्याची मागणी
केली.
पण सरपंच आंदोलकांना उत्तर न देता
घरी निघून गेले. ग्रामसेवकांना दुसर्‍या गावाचा
चार्ज असल्यामुळे तेही खूप उशिरा आंदोलन
स्थळी आले. ग्रामअधिकारी व सरपंच यांचा
आपसातील ताळमेळ कमतरता लक्षात
आल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी नवनागापूर
ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्यात
आले व जाहीर इशारा दिला की गावातील
कचरा व्यवस्थापन पूर्ववत करून कचरा गाडी
पूर्ववत सुरु करत नाहीत, तोपर्यंत ग्रामपंचायत
कार्यालय बंदच राहील. याबद्दल जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष
येरेकर व गटविकास अधिकारी श्री. सोनकुसाळे
यांनी या प्रकारणात लक्ष घालून सखोल
चौकशी करून, समस्त ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा.
गटविकास अधिकारी आल्याशिवाय व लेखी दिल्याशिवाय
ग्रामपंचायतीचे टाळे उघडले जाणार नाही, असा इशारा सर्व नागरिक
व ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब सप्रे, संजय भोर, सागर
सप्रे, सुशीला जगताप, कल्पना गीते, रंजना दांगट, संगीता भापकर,
रेणुका पुंड, राधाबाई फापाळे, सुभाष दांगट, संजय गीते, महादेव
सप्रे, राम घाडगे, सोमनाथ काळे, राजेंद्र शिंदे, संतोष आजबे, डॉ.
संजीव गडगे, अशोक साळवे, हेमंत लगड, बाळासाहेब मोरे, विपुल
भोसले, विशाल बरे, बाबासाहेब शेवाळे, राम अडसुरे, पवन मोरे,
भास्कर घोरपडे, आकाश कोल्हाळ, संदीप गायकवाड, राजेंद्र नागुडे,
नितीन खंडारे, हेमंत राऊत, गुलाब ठुबे, दादा गडगे, सुनिल मते,
भास्कर घोरपडे, रामदास जाधव, दत्तात्रय लोखंडे यांच्यासह ग्रामस्थ
उपस्थित होत

संविधानिक हक्क, अधिकारासाठी गप्प बसणे सोडा

निवडलेली ही राजसत्ता नसून, निवडणूक आयोगाच्या शक्तीवर निवडून आलेली ही राजसत्ता : मानव अधिकार कार्यकर्त्या व ज्येष्ठ पत्रकार तिस्ता सेटलवाड

नगर – देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वसमावेशक विशाल आंदोलन उभे राहिले. मात्र स्वातंत्र्यानंतर सामूहिक राष्ट्रवाद तोडण्याचे काम धर्मांध शक्ती करत आहे. पैशाच्या बळावर चालणारी लोकशाही आणि संविधानिक मार्गाने चालणारी लोकशाही यामध्ये
मोठा फरक आहे. नागरिकांनी निवडलेली ही राजसत्ता नसून, निवडणूक आयोगाच्या शक्तीवर निवडून आलेली ही राजसत्ता असल्याचा आरोप मानव अधिकार कार्यकर्त्या व ज्येष्ठ पत्रकार तिस्ता सेटलवाड यांनी केला. तर संविधानिक हक्क, अधिकारासाठी गप्प बसण्याचे सोडून, प्रश्न उपस्थित करण्याचे आवाहन त्यांनी केले. शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त शहरातील प्रोफेसर चौक येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात झालेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती व्याख्यान व स्मृती प्रबोधन पुरस्कार समारंभाप्रसंगी सेटलवाड बोलत होत्या. नांदेड व लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. अ‍ॅड. सुभाष लांडे, भारतीय महिला फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ. स्मिता पानसरे, कॉ. अ‍ॅड. बन्सी सातपुते, राष्ट्र सेवा दलाचे प्रा. सुभाष वारे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, कॉ. अ‍ॅड. सुधीर टोकेकर, आर्किटेट अर्शद शेख, कॉ. संतोष खोडदे, डॉ. बापू चंदनशिवे, कॉ. बाबा आरगडे, भगवान गायकवाड, आप्पासाहेब वाबळे, लक्ष्मण नवले, भारती न्यालपेल्ली, बबनराव सालके, आनंद शितोळे, अशोक सब्बन, संध्या मेढे, अ‍ॅड. सुभाष भोर, किसनराव लोटके आदींसह भाकप, आयटक, प्रगतशील लेखक संघ, पीस फाउंडेशन व डाव्या पुरोगामी विचारांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आजची राजकीय परिस्थिती व लोकशाहीचे भवितव्य या विषयावर मार्गदर्शन करताना सेटलवाड म्हणाल्या की, संविधानाची मुल्ये पायदळी तुडवून नागरिकांच्या विरोधात कायदे तयार केले जातात. राजसत्तेने मीडिया ताब्यात घेतली आहे. ही मीडिया जातीयवादाला खतपाणी घालत आहे. धार्मिक प्रश्न उपस्थित करून शेतकरी, साखर कामगार, महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रासह विविध जिव्हाळांच्या प्रश्नांपासून दुर्लक्षीत केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या राजसत्तेला अधिकार मागणारे नागरिक नको असून, भिक मागणारे नागरिक पाहिजे आहे. समाजात धार्मिक द्वेषाचे विष पेरले जात आहे. संविधान विरोधी शक्तींना तोंड देण्यासाठी नागरिकांना आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी प्रश्न उपस्थित करावे लागणार आहे. होत असलेल्या अन्याय, अत्याचार विरोधात गप्प बसणे सोडण्याचे आवाहन सेटलवाड यांनी केले. तर जनतेला सामूहिक पद्धतीने आवाज उठवावा लागणार आहे. सर्वजण गप्प बसल्यास अन्याय विरोधात आंदोलन उभे राहणे थांबतील, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड सुलाबाई आदमाने यांना कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती
प्रबोधन पुरस्काराने उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच भाकप पक्षावर पुणे विद्यापिठाला शोधनिबंध सादर करुन जिल्ह्यातील कम्युनिस्टांच्या चळवळीचे विशेष टप्प्यांचा इतिहास मांडून पीएचडी मिळवणारे शिर्डी येथील सौ.प्रा. डॉ. शितल धरम आणि प्रा. डॉ. गणेश विधाटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात बन्सी सातपुते यांनी कॉम्रेड पानसरे ही फक्त भाकपची मालमत्ता नसून, शोषित विरहित समाजव्यवस्था निर्माण व्हावी असे ज्यांना वाटते अशा सर्व बदल स्वीकारणार्‍यांचे ते नेतृत्व आहे. शाहू, फुले, आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचा विचार पुढे घेऊन जाणे म्हणजे गोविंद पानसरे यांच्या कार्याला पुढे घेऊन जाण्यासारखे आहे. सरकार विरोधात बोलले, तर देशद्रोही ठरविले जाते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोयात आले असल्याचे त्यांनी सांगितले. माजी कुलगुरु सर्जेराव निमसे म्हणाले की, सत्ताधार्‍यांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नसून, विरोधक हताश झाले आहे. स्थिर सरकार असले तरी गर्वनिष्ठ सरकार घटनेत बसत नाही. समाजकारण, राजकारणात जात, धर्म असू नये! धर्माचा सामाजिक
जीवनाशी संबंध असता कामा नये, मात्र प्रयागराज ते आपल्या जिल्ह्यातील मढीपर्यंत
धर्मांधतेने संविधानाची मूल्य पायदळी तुडविण्यात आली आहे. एकीकडे टोकाची बेकारी,
मुलांचे लग्न होत नाही, यावर तोडगा काढण्याऐवजी त्यांचे माथी भडकवली जात आहे.
शिक्षण क्षेत्रात देखील भ्रष्टाचार सुरू झाल्याने गुणवंतावर अन्याय होत आहे. भ्रष्टाचार
टोकाला पोहोचल्याने सर्वसामान्यांची पिळवणुक होत आहे. देशाच्या विकासाचे आभासी
चित्र निर्माण केले जात आहे. विकसित भारताचे स्वप्न पाहताना शंका उपस्थित होत
आहे. लोकशाहीच्या भविष्यासाठी पत्रकारितेचा चौथा स्तंभ बळकट होण्याची गरज
त्यांनी व्यक्त केली. अन्यथा देशात फॅसीझमचा शिरकाव झाल्याशिवाय राहणार नाही,
असे त्यांनी सांगितले.
सुभाष लांडे म्हणाले की, चळवळी बरोबर प्रबोधन व्हावे, हे सातत्याने पानसरे
यांचे विचार होते. त्याच विचाराने हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. समाजात उजव्या
शक्ती दुही निर्माण करत आहे. यासाठी प्रबोधनाची गरज आहे. झुंडशाही राबवून
सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यात धर्माधर्मात तेढ पसरवून दूषित
वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे. घटनेने निवडून आलेले आमदार
देखील घटने विरोधात कृत्य करून समाजाचे वाटोळे करायला निघाले आहेत.
धर्मांधशक्ती विरोधात एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले.
सत्काराला उत्तर देताना सुलाबाई आदमाने यांनी पानसरे यांच्या कार्यकाळातील
आठवणी सांगून, सरपंच असताना पाणी प्रश्न, एमएसईबीत डीपीसाठी केलेले आंदोलनाचा
संघर्ष सांगितला. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे असल्याचा प्रश्न उपस्थित करून, लोकशाही
राज्यात शासन जनमताप्रमाणे वागत नसल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष
खोडदे यांनी केले. आभार बापू चंदनशिवे यांनी मानले.