महामार्गावरील पथदिवेही बंद, वाहन चालक, नागरिकांना होतोय प्रचंड त्रास
नगर – नगर-मनमाड महामार्गावरील अतिशय वर्दळीच्या असलेल्या प्रेमदान चौकातील वाहतूक सिग्नल आणि पथदिवेही गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने सायंकाळ नंतर अंधाराच्या साम्राज्यामुळे या चौकात वारंवार वाहतूक कोंडी होवून वाहनचालकांसह पादचारी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्यंतरी या चौकात अनेक अपघात झाले होते, हे अपघातांचे सत्र पुन्हा सुरु होण्याची आणि त्यात नागरिकांचे बळी जाण्याची वाट प्रशासन पाहतेय काय? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
प्रोफेसर कॉलनीकडून येणारी-जाणारी वाहने या चौकातून वळतात. मनमाड रस्त्याने येणारी वाहने भरधाव जातात. त्यांच्या अनियंत्रित वेगामुळे अनेकदा अपघात होतात. या चौकात वाहतूक सिग्नल व्यवस्था बसवण्यात आलेले आहेत. मात्र, बऱ्याचदा सिग्नल बंद असतात. वाहतूक पोलिस या चौकात थांबत नसल्याने वाहतुकीचे नियोजन वाहनचालकच आपल्या पद्धतीने करतात. काही चालक सिग्नल तोडून तसेच पुढे जातात, त्यामुळे दुर्घटना घडतात.
नगर-मनमाड रस्त्याला समांतर असणाऱ्या बालिकाश्रम रस्त्याकडे जाण्यासाठी नागरिक या चौकाचाच वापर करतात. या चौकाजवळ अनेक हॉटेल्स व रुग्णालये झाली आहेत. त्यामुळे चौकात मोठी रहदारी असते. संबंधितांनी पार्किंगची पुरेशी व्यवस्था केली नसल्याने गाड्या महामार्गाच्या कडेलाच गाड्या लावल्या जातात. रिक्षाचालकांचा गराडाही या चौकाला पडलेला असतो.
चौकातील सिग्नल सतत सुरू ठेवावेत. वाहतूक पोलिसही नेमावा म्हणजे सिग्नल तोडण्याचा प्रयत्न होणार नाही.बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक व्हायला पाहिजे. मात्र शहर वाहतूक शाखा याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे या चौकात पुन्हा एकदा अपघातांची मालिका सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तातडीने सिग्नल व पथदिवे सुरु करावेत – अॅड. सुधीर टोकेकर
प्रेमदान चौकामधील सिग्नल गेल्या पंधरा दिवसापासून बंद आहेत. हा चौक गजबजलेल्या असून सदर सिग्नल कशामुळे बंद आहेत. हे समजत नाही. बंद असलेले सिग्नल आणि पथदिवे यामुळे चौकात अंधाराचे साम्राज्य असून त्यामुळे या ठिकाणी वाहनांची प्रचंड गर्दी जमा होऊन चौक ओलांडून जाण्यासाठी खूप वेळ जात आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत पंधरा दिवस झाले तरी याकडे कोणीही लक्ष देत नाही अथवा याबाबत कोणी काही बोललेले नाही त्यामुळे सदर सिग्नल ताबडतोब सुरू करावे अशी मागणी शहर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अॅड. सुधीर टोकेकर यांनी केली आहे.