थेट मध्यप्रदेशातून नगर जिल्ह्यात होतेयं गांजाची तस्करी

२ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले, २९.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नगर – थेट मध्यप्रदेशातुन नगर जिल्ह्यात गांजाची तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. गांजा विक्रीसाठी घेवून आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २९ लाख ६४ हजारांच्या मुद्देमालासह पकडल्यानंतर ही बाब उघड झाली आहे. अनिल बाबासाहेब बडे (वय ३४) व बाबासाहेब धनाजी बडे (वय ७०, दोघे रा.हातगाव, ता.शेवगाव) अशी या पकडलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्या  माहिती काढुन
त्यांचेविरुध्द कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिनेश आहेर यांना दिलेले आहेत. त्या नुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार गणेश लोंढे, बिरप्पा करमल, संतोष खैरे, विशाल तनपुरे व शिवाजी ढाकणे यांचे पथक कारवाई साठी नेमलेले आहे. सदर पथक ५ मार्च रोजी शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्दे करणार्‍या इसमांची माहिती काढत असताना उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना माहिती मिळाली की बाबासाहेब
बडे व अनिल बडे यांनी मोठ्या प्रमाणात गांजा हा अंमली पदार्थ २ कारमधुन विक्रीसाठी आणुन तो त्यांचे घराशेजारील जनावराचे गोठ्यामधील खोलीमध्ये ठेवला असल्याची माहिती मिळाली. पथकाने मिळालेली माहिती शेवगावचे पो.नि.समाधान नागरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांना दिली.उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच शेवगाव पोलीस स्टेशनचे पो.नि.समाधान नागरे, स.पो.नि.अशोक काटे, उपनिरीक्षक महाले व पोलीस अंमलदार कृष्णा मोरे, अर्जुन
मुंढे, आदिनाथ शिरसाठ, मारोती पाखरे, किशोर काळे, पाथरकर, संभाजी धायतडक व पांडुरंग मनाळ यांचे संयुक्त
पथक तयार करण्यात आले. या पथकाने बोधेगाव ते हातगाव जाणारे रोडवर बाबासाहेब बडे याचे घरी जाऊन जनावराचे
गोठयात जाऊन खात्री केली असता गोठ्यातील खोलीमध्ये दोघे आढळून आले. त्या गोठ्यामधील खोली व घरासमोरील दोन कारची झडती घेतली असता तेथे ६६.७१० किलो वजनाचा गांजा, २ मोबाईल, १ मारूती सुझुकी कंपनीची स्वीफ्ट कार
(क्र. एमएच-११-बीडी-५७५४) व एक मारूती सुझुकी कंपनीची इरटिगा कार (क्र. एमएच-४३ -बीवाय-७७८४ असा एकूण २९ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यातील आरोपी अनिल बडे याचेकडे जप्त करण्यात आलेल्या
गांजा बाबत विचारपुस केली असता त्याने हा गांजा मध्यप्रदेशातील मोतीराम (पुर्ण नाव माहित नाही) याचेकडून विक्रीकरीता आणला असून, आणलेला गांजा तो व त्याचे वडील बाबासाहेब बडे असे मिळून स्थानिक परिसरामध्ये विकत असल्याची माहिती सांगीतली. याबाबत पो.कॉ.शिवाजी ढाकणे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात दोघांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सरस्वती हॉस्पिटलतर्फे महिला दिनानिमित्त ‘एक पाऊल स्त्री आरोग्याकडे’ उपक्रमांतर्गत अहिल्यानगरमध्ये ८ मार्चपर्यंत महिलांची मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर

नगर – जागतिक महिला दिनानिमित्त माळीवाडा येथील सरस्वती हॉस्पिटलच्यावतीने ‘एक पाऊल स्त्री आरोग्याकडे’ या उपक्रमांतर्गत ८ मार्चपर्यंत दु.३ ते ५ या वेळेत महिलांची मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे माजी नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी स्त्री रोगतज्ञ डॉ.अमोल जाधव, डॉ.प्राजक्ता जाधव, अर्चना परकाळे, स्वाती गहिले, सावेरी सत्रे, मनिषा शिंदे,
आशा शिंदे, कविता रसाळ, शाहिन भाभी, किरण लोंढे, आदेश जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सुवर्णा जाधव म्हणाल्या की, महिला दिनानिमित्त हॉस्पिटलच्यावतीने स्तुत्य उपक्रम राबवुन आई व बाळाची परिपूर्ण  काळजी घेत आरोग्यसेवेत बांधिलकीचा नवा मापदंड निर्माण करणार्या माळीवाडा येथील सरस्वती हॉस्पिटल गेली अनेक वर्षापासून कार्यरत आहे. डॉ.अमोल जाधव व डॉ.प्राजक्ता जाधव यांनी या कालावधीत सामाजिक जाणीव ठेवून अत्याधुनिक रूग्णसेवा देण्याचा प्रयत्न केला. त्याला अहिल्यानगरसह जिल्ह्यातून रूग्णांचा प्रतिसाद मिळाला आहे. विश्वासार्हता, प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता या त्रिसूत्रीमुळे आरोग्य क्षेत्रात सरस्वती हॉस्पिटलने ठसा उमटवला आहे. आरोग्य सेवेचा हा नंदादीप असाच तेवत राहील असा विश्वास यानिमित्त व्यक्त केला आहे. डॉ.अमोल जाधव म्हणाले की, सालाबादप्रमाणे याहीवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त एक पाऊल स्त्री आरोग्याकडे या उपक्रमांतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात तपासणी, वेदना
विरहित प्रसूती, किशोरवयीन  समुपदेशन, लग्नापूर्वी व गर्भधारणेपूर्वीचे समुपदेशन सल्ला केंद्र, अनियमित पाळी व पीसीओडी उपचार, मेनोपॉज मार्गदर्शन तसेच वंध्यत्व निवारण आदींवर मार्गदर्शन व तपासणी केली जाणार आहे. तसेच सवलतीच्या दरामध्ये शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
पुढे बोलतांना डॉ.जाधव म्हणाले की, सक्षमीकरणाची सुरुवात एखाद्याच्या आरोग्याची मालकी घेण्यापासून होते. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यामुळे सर्वांगीण आरोग्य चांगले राहते. स्वत: ची काळजी घेण्याच्या पद्धतींना प्राधान्य देणे, आरोग्याची उद्दिष्टे निश्चित करणे आणि आवश्यकतेनुसार मार्गदर्शन मिळवणे ही महिलांचे आरोग्य प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने आवश्यक पावले आहेत. त्यासाठी हॉस्पिटलच्यावतीने आतापर्यंत महिला सक्षमीकरणासाठी
जोडी तुझी माझी, दिल ये जिद्दी है, पत्र लेखन, प्रेगनन्सी फॅशन शो, अहिल्यानगर फॅशन शो असे अनेक उपक्रम राबवून महिलांना निखळ आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. रूग्णांवर उपचार करण्याबरोबरच त्यांना आनंदी जीवनाचा मंत्र देण्याचा प्रयत्न असतो, असे डॉ.जाधव म्हणाले. डॉ.प्राजक्ता जाधव म्हणाल्या की, आरोग्यसेवेतील आधुनिक
तंत्रज्ञान सरस्वती हॉस्पिटलमध्ये आणून त्याव्दारे रूग्णसेवा देण्यावर कायम भर देण्यात आला आहे. या जोडीलाच डॉ.जाधव  यांनी आनंदी समाजाच्या निर्मितीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले आहे. आरोग्यसत्ताक चळवळीतून त्यांनी
संपूर्ण अहिल्यानगर शहर निरोगी, आरोग्यसंपन्न आणि आनंदी राहिल यादृष्टीने महत्वाचे पाउल उचलले आहे. यावेळी अर्चना परकाळे, स्वाती गहिले आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक किरण लोंढे यांनी केले. तर आभार सुवर्णा जाधव यांनी मानले.

डॉ. दीपक हरके यांना एशिया लीडरशिप अवॉर्ड प्रदान

जगभरात १४३ देशात ८५०० हून अधिक सेवाकेंद्राच्या माध्यमातून निशुल्क ध्यानधारणा शिकविणार्‍या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक ब्रह्माकुमार डॉ. दीपक हरके यांना भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार
व प्रचार करण्यासाठी दिल्ली येथील रॅडिसन हॉटेलमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते डॉ दीपक हरके यांना एशिया  लीडरशिप अवॉर्ड प्रदान करण्यात आला. ब्रह्माकुमार डॉ. दीपक हरके हे १८३ विश्वविक्रम करणारे १ ले भारतीय
आहेत. तसेच त्यांनी विविध विश्वविक्रम हे भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार करण्यासाठी केले आहेत. यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे दिल्ली येथील बी के विकास भाई व बी के सुरेंदर गोयल उपस्थित होत

वॉशिग्टन इंटरनॅशनल डिजिटल युनिर्व्हसिटीची डॉटरेट पदवी डॉ. बाळासाहेब गदादे यांना प्रदान

नगर – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले बाळासाहेब नारायण गदादे यांना नुकताच अमेरिका स्थित वॉशिग्टन इंटरनॅशनल डिजिटल युनिर्व्हसिटीने नवी दिल्ली येथे डॉटरेट ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
शैक्षणिक क्षेत्रात काम करताना शिक्षकास शिक्षक सोडून वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. तरीही दुर्दम्य
इच्छाशक्तीच्या जोरावर दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन आणि अध्यापन यांचा मेळ घालून उत्कृष्ट शैक्षणिक कार्य कसे करावे या सर्व बाबींचा विचार या विद्यापीठाने करून त्यांना डॉटरेट पदवीने सन्मानीत केले.
डॉ. बाळासाहेब गदादे हे मूळ चांडगाव (ता.श्रीगोंदा) येथील रहिवासी असून ते टाकळी (ता. श्रीगोंदा) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना याकामी अ‍ॅड. डॉ. रावसाहेब दरेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. डॉ. गदादे यांचे सरपंच रविंद्र म्हस्के, टाकळीचे सरपंच प्रफुल्ल इथापे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवले, सुदाम खामकर, श्रीगोंदा पं.स.चे गटशिक्षण अधिकारी सत्यजित मच्छिंद्र, विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे, सिताराम भूजबळ, केंद्रप्रमुख माणिक आढाव यांच्यासह शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी दिनेश लोखंडे

नगर – अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी दिनेश लोखंडे यांची नियुक्ती झाली असून त्याला आरबीआयने देखील मान्यता दिले आहे. दिनेश लोखंडेंच्या प्रामाणिक कामामुळे तसेच बँकेबद्दल असलेले प्रेम पाहता ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करत आहे. त्यांच्या अनुभवाचा नक्कीच बँकेला फायदा होईल. दिनेश लोखंडे यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देत असल्याचे प्रतिपादन चेअरमन सी.ए गिरीश घैसास यांनी केले.]

मुख्य कार्यकारी अधिकारी पदी दिनेश लोखंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करताना चेअरमन गिरीश घैसास, ज्येष्ठ संचालक सुभाष गुंदेचा, अशोक कानडे, संजय घुले, डॉ.विजयकुमार भंडारी, जयंत येलुलकर, डॉ.भुषण अनभुले, दत्तात्रय रासकोंडा, सेवक प्रतिनिधी. संतोष मखरे, वरिष्ठ अधिकारी प्रकाश वैरागर, संजय मुळे आदी उपस्थित होते.

दिनेश लोखंडे म्हणले की मी १९९७ साली अहमदनगर शहर सहकारी बँकेमध्ये लर्क या पदावर नोकरीला लागलो आहे. त्यानंतर २०१२ साली जुनिअर ऑफिसर २०२० साली सीनियर ऑफिसर आणि आता बँकेच्या मुख्य कार्यकारी  अधिकारी पदावर संचालक मंडळांनी संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहत बँकेला पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल बँकेत मी गेली २८ वर्ष प्रामाणिकपणे आणि सोचोटीने काम केले
असल्यामुळेच बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळाली असल्याचे ते म्हणाले.

निव्वळ धनंजय मुंडेंचा राजीनामा पुरेसा नाही; त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि अख्खे मंत्रिमंडळ बरखास्त करा

नगर – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर जे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ते पाहता हा खून अत्यंत निघृणपणे केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी केवळ धनंजय मुंडे यांच्या राजीनामा पुरेसा नाही; त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व अख्ख्ये राज्य मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य सेक्रेटरी कॉ.अ‍ॅड. सुभाष लांडे यांनी केली आहे. याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात अ‍ॅड. लांडे यांनी
म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांचा या खून प्रकरणातील संबंध उघड झाले असताना, त्यांचा राजीनामा घ्यायला ८५ दिवस का लावले? याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिले पाहिजे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून, पैशाचा वारेमाप वापर करून, गुंडांच्या मदतीने निवडून आलेल्या
भाजपा-महायुतीच्या सत्ताधार्‍यांनी बहुमताच्या जोरावर राज्यात थैमान घातले आहे. परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस ठाण्यात मारहाण करून खून केला जातो. महापुरुषांची बदनामी व विटंबना केली जाते. इंद्रजित सावंत यांच्यासारख्या इतिहास अभ्यासकांना धमकावले जाते. तरी मुख्यमंत्री मख्खपणे राहत, काहीही बोलत नाहीत अथवा कारवाई करत नाहीत. यात सत्ताधार्‍यांचा आलेला सत्तेचा माज दिसून येतो. संतोष देशमुख यांच्या खुनानंतर आरोपींनी जे कृत्य केले, त्याचे फोटो बघून जनमानसात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. पण फडणवीस, शिंदे, पवार यांच्यासह मंत्रिमंडळ मात्र अतिशय असंवेदनशील असून, त्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी अनेक दिवस वाया घालवत, तो सन्मानपूर्वक शरण येण्याची वाट पाहत राहिले. इतकेच नव्हे, तर मुंडेचा राजीनामा घ्यायला तीन महिने लावले. एकूणच भाजपा सरकार संवैधानिक संस्थांचे अवमूल्यन करून, त्यांचा गैरवापर, असंवैधानिक पध्दतीने राज्य कारभार करत जातीधर्मांत तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसून, राज्यातील अख्खे मंत्रिमंडळ बरखास्त करावे, अशी मागणी कॉ.अ‍ॅड. सुभाष लांडे यांनी केली आहे.

आमदार अबू आजमीच्या प्रतिमेला शिवसेनेकडून जोडे मारो आंदोलन

संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणार्‍या आरोपींना फाशीची शिक्षा द्या

नगर – समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी मुघल शासक औरंगजेबाचे गोडवे गाऊन शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात
आली. आजमी यांच्या प्रतिमेस जोडे मारुन महाराष्ट्रातून चले जावचा इशारा दिला. तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे झालेल्या हत्येचा देखील निषेध नोंदवून यामधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
आजमी यांच्या निषेधार्थ घोषणा देत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नराधमांना फाशी देण्याच्या जोरदार घोषणा
यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संभाजी कदम, संजय शेंडगे, सचिन शिंदे, संतोष ग्यानप्पा, सुरेश तिवारी, सुनील लालबोंद्रे, रविंद्र लालबोंद्रे, संदीप दातरंगे, घनश्याम घोलप, दत्तात्रय कावरे, अरुण झेंडे, विनोद शिरसाठ, दीपक थोरात, अभी हुच्चे, शुभम कावळे, अक्षय कोंडावार, आनंदराव शेळके, अभी दहिंडे, दिगंबर गेंट्याल, कुणाल (बंटी) खैरे, सुनील भिंगारदिवे, डॉ. गाडे, पै. महेश लोंढे, ओमकार शिंदे, अविनाश भिंगारदिवे
आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. अनिल शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात औरंगजेबाचे गोडवे सहन केले जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून, त्यांच्या राज्यात शत्रूंचे गोडवे गाऊन
शिवप्रेमींच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. याचा शिवसैनिक निषेध करत आहे. औरंगजेबाचे गोडवे गाणार्‍यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, अशा प्रवृत्तींना औरंगजेबाच्या कबरी खाली गाडू, असा इशारा त्यांनी दिला. तर संतोष देशमुख यांची क्रूरपणे झालेली हत्या ही मानव जातीला काळीमा फासणारी असल्याचे स्पष्ट केले. संभाजी कदम म्हणाले की, महाराष्ट्रात राहून औरंगजेबाचे गोडवे गाणारी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. ज्या औरंगजेबाने आपल्या वडिलांना ९ वर्षे कैदेत ठेवले, अशा व्यक्तीला आजमी आदर्श प्रशासक मानतात हे निषेधार्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात
हे सहन केले जाणार नाही. अशा व्यक्तींना महाराष्ट्रात राहायचा अधिकार नसून, त्यांना वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन उत्तर दिले जाणार आहे. तसेच संतोष देशमुख हत्येच्या दोषारोपपत्रातील फोटोतून अमानुषपणे हत्या झाल्याचे समाजासमोर आले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाले असल्याचे त्यांनी सांगितले

हिंद सेवा मंडळाच्या कार्याध्यक्षपदी डॉ.रमेश झरकर यांची बिनविरोध निवड

हिंद सेवा मंडळाच्या कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक डॉ.रमेश झरकर यांची बिनविरोध निवड झाल्यावर त्याचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक व सचिव संजय जोशी. समवेत मावळते कार्याध्यक्ष अ‍ॅड.अनंत फडणीस, अजित बोरा, सुमतीलाल कोठारी व संचालक.

नगर – हिंद सेवा मंडळाच्या कार्याध्यक्षपदी कर्जत येथील ज्येष्ठ संचालक डॉ.रमेश झरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निवड झाली. या निवडीबद्दल प्रा.मोडक व मानद सचिव संजय जोशी यांनी डॉ. झरकर यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी मावळते कार्याध्यक्ष अ‍ॅड. अनंत फडणीस, अजित बोरा, संचालक अशोक उपाध्ये, सुमतीलाल कोठारी,
अनंत देसाई, प्रा.मकरंद खेर, प्रा.ज्योती कुलकर्णी, जगदीश झालानी, डॉ.पारस कोठारी, दिलीप शहा, सहाय्यक सचिव
बी. यू. कुलकर्णी, सेवक प्रतिनिधी प्रा.गिरीश पाखरे, कल्याण लकडे, विठ्ठल उरमुडे, आदिनाथ जोशी, योगेश देशमुख
व कैलास बालटे आदी उपस्थित होते. अभिनंदनपर भाषणात प्रा.शिरीष मोडक म्हणाले, डॉ.रमेश झरकर हे
बर्‍याच वर्षांपासून हिंद सेवा मंडळाच्या कार्यात योगदान देत आहेत. संस्थेच्या जडणघडणीत त्यांचे योगदान आहे.
त्यामुळे डॉ.झरकर हे हिंद सेवा मंडळाची शान आहे. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक अशा क्षेत्रात त्यांचे प्रभावी काम आहे.
सचिव संजय जोशी म्हणाले, अ‍ॅड. अनंत फडणीस यांच्या कारकीर्दीत संस्थेने मोठी प्रगती केली. ते जेव्हढे
कडक स्वभावाचे आहेत तेव्हढेच मृदुही आहेत. नूतन कार्याध्यक्ष डॉ.झरकर हे अनुभव संपन्न असल्याने ते अ‍ॅड.
फडणीस यांची परंपरा पुढे नेत संस्थेलाही प्रगतीपथावर नेतील. अ‍ॅड.अनंत फडणीस म्हणाले, हिंद सेवा मंडळाच्या सर्व संचालकांनी माझ्यावर दोन वर्ष कार्याध्यक्षपदाची मोठी जबाबदारी टाकली. या पदावरून काम करताना सर्वांचे मोठे सहकार्य लाभले. संस्थेचे व सारडा महाविद्यालयाचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवता आले. सत्कारास उत्तर देताना डॉ.रमेश
झरकर म्हणाले, माझ्यावर नुकताच एक मोठा दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यातून सावरण्यासाठी हिंद सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी मोठा धीर दिला. स्व.गोपीनाथ मुंडे यांनी विधानपरिषदेसाठी माझ्या नावाची शिफारस केली होती. पण ती संधी हुकली. तरीही दु:खी झालो नाही व पक्षाचे निष्ठेने काम करत राहिलो. तसेच हिंद सेवा मंडळाचेही अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करत आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष पद प्रथमच ग्रामीण भागाला मिळाले आहे. दिलेल्या संधीबद्दल आभार मानून हिंद सेवा मंडळाला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी कटिबद्ध राहील याची ग्वाही देतो.

खेळाच्या माध्यमातून सांघिक भावना वाढून शारीरिक स्वास्थ सुधारण्यासाठी मदत होते

आ. संग्राम जगताप यांचे प्रतिपादन; एसा स्पोर्ट्स विकची पारितोषिक वितरणाने सांगता

नगर – खेळाच्या माध्यमातून सांघिक भावना वाढून शारीरिक स्वास्थ सुधारण्यास मदत होते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अश्या स्पर्धेच्या माध्यमातून कुठल्यातरी एका क्रीडा प्रकारच्या माध्यमातून आपण मैदानावर हजेरी लावण्याची
आवश्यकता असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. एसा आणि पोलाद स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित स्पोर्ट्स विक २०२५ चा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम तसेच आमदार संग्राम जगताप यांची आमदरकीची निवडणूक जिंकल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्पर्धेत पारितोषिक विजेत्या सभासदांसह सर्व सहभागी सभासदांचे त्यांनी अभिनंदन केले. या क्रीडासप्ताहातील विविध स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे मॅरेथॉन मध्ये – प्रथम धनंजय गुंड, द्वितीय उदित हिरे तर तृतीय प्रदिप तांदळे. चेस स्पर्धेत – विजेते रोशन गुगळे, उपविजेते भूषण पांडव तर तृतीय अतुल गांधी, बॅडमिंटन मध्ये प्रदिप तांदळे यांची टीम विजेती तर सुरेश परदेशी यांच्या टीमने उपविजेतेपद पटकावले.
कॅरम मध्ये पंकज जहागिरदार आणि विजय उजनीमठ हे विजेते तर अभिजित आणि अविनाश देवी हे उपविजेते
ठरले. फुटबॉलमध्ये ओजस नवले कप्तान असलेली टीम विजेती तर गौरव मांडगे कप्तान असलेली टीम उपविजेती
ठरली. प्रथमेश सोनवणे यांना गोल्डन बुट प्रदान करण्यात आला. स्विमिंग स्पर्धेत राजेंद्र भगत प्रथम, धनंजय गुंड
द्वितीय तर उदित हिरे तृतीय क्रमांकासह विजयी झाले. टेबल टेनिस स्पर्धेत अमेय कुलकर्णी विजेते तर वैशाखी
हिरे उपविजेती झाल्या. क्रिकेट स्पर्धेच्या ज्येष्ठ संघात मधुकर बालटे यांचा संघ विजेता आणि शिरीष कुलकर्णी
यांचा संघ उपविजेता तर महेश पवार हे सामनावीर झाले. साखळी सामन्यात जितेश सचदेव, अभिजित
देवी, प्रिन्स फुलसौंदर, सुशांत गव्हाणे हे सामनावीर  घोषित करण्यात आले. अभिजित देवी कप्तान असलेली
टीम विजेती, प्रिन्स फुलसौंदर असलेली टीम उपविजेती तर संकेत पादिर कप्तान असलेली टीम तिसर्‍या
क्रमांकावर राहिली. जितेश सचदेव यांना मालिकावीर पुरस्कार मिळाला. क्रीडा समिती प्रमुख जितेश सचदेव
यांच्यासह अविनाश देवी, झोहेब खान, गौरव मांडगे, ओमकार म्हसे, प्रमोद भाळवणकर, प्रथमेश
सोनावणे, संकेत पादिर यांनी कमिटी सदस्यपदी काम पाहिले. या स्पर्धेच्या आयोजनात
भुषण पांडव, अभिजित देवी, वसिम सय्यद, रोशन गुगळे, अमोल येनगंदुल, गौरव मांडगे, अनिल पाटील, प्रथमेश सोनावणे, अविनाश देवी, अभिजित शिंदे, शैलेश सप्रे, ओमकार म्हसे, ओजस नवले, प्रीतेश कांकरिया,
सागर ढगे, अमेय कुलकर्णी, वैशाखी हिरे, संकेत पादिर, प्रिन्स फुलसौंदर यांनी विविध स्पर्धांचे आयोजन समन्वयकाचे काम
पाहिले. एसा अध्यक्ष आदिनाथ दहिफळे, उपाध्यक्ष विनोद काकडे, सचिव अभिजित देवी, स्पोर्ट्स कमिटी हेड जितेश सचदेव, पोलाद स्टीलचे सुशांत गव्हाणे तसेच एसाचे यश शहा, वैभव निमसे, संतोष खांडेकर, अविनाश कुलकर्णी, सचिन डागा, सुरेश परदेशी, वैशाखी हिरे, श्वेता मुळे, शुभम खोले, नंदकिशोर घोडके, सय्यद इबाल, विजय पादिर यांच्यासह सभासद उपस्थित होते. कार्यक्रम आयोजनास स्पोर्टस कमिटी सदस्य अविनाश देवी, झोहेब खान, गौरव मांडगे, ओंकार म्हसे, प्रमोद भाळवणकर, प्रथमेश सोनावणे, संकेत पादिर यांनी काम पाहीले. सूत्रसंचालन अजय दगडे यांनी केले
तर सचिव अभिजित देवी यांनी आभार मानले.

महाकुंभाच्या महापर्वातील आनंद दिव्यानुभूती देणारा

बालिकाश्रम रोडवरील बोरूडे मळ्यामधील जागृत महादेव मंदिराच्या प्रांगणात प्रवचनकार मिलिंद चवंडके महाशिवरात्री उत्सवात प्रवचन झाले

नगर – प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभाच्या महापर्वकालातील महाशिवरात्री उत्सवाचा आनंद शिवभक्तांना
दिव्यानुभूती देणारा ठरला, असे प्रतिपादन प्रवचनकार मिलिंद चवंडके यांनी केले. बालिकाश्रम रोडवरील
बोरूडे मळ्यामधील जागृत महादेव मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात पंच मंडळाने आयोजित केलेल्या महाशिवरात्री उत्सवात
आदिनाथांचा जागर या विषयावर प्रवचन करताना ते बोलत होते. माजी उपमहापौर अनिल बोरूडे यांच्या हस्ते मिलिंद
चवंडके यांना पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर सुदाम देशमुख,
रमेश बोरूडे, अनिल शिंदे, शरद बोरूडे व प्रविण फुलसौंदर होते. महाशिवरात्रीचे व्रत माघ कृष्ण चतुर्दशीला
संकल्पपूर्वक कसे करावे? याची अध्यात्म शास्त्रानुसार माहिती देताना मिलिंद महाराज चवंडके पुढे म्हणाले,
महाशिवरात्रीला शिवतत्व नेहेमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. शिवाची भावपूर्ण पूजा करण्यासह ॐ नमः
शिवाय हा षडक्षर मंत्राचा नामजप श्रध्देने अधिकाधिक केल्याने शिवकृपा होते. उपवास, पूजा आणि जागरण
ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत. सायंकाळी ६ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत ४ प्रहरात ४ पूजा
करतात. या पूजेस याम पूजा म्हणतात. पहाटे शिवपूजेने सांगता करतात. शिव सत्य, शिव अनंत, शिव अनादी, शिव
भगवंत, शिव ओंकार, शिव ब्रह्म, शिव भक्ती आणि शिव शक्ती आहे. शक्त्त्यासहितः शंभु: शिव दाम्पत्यांचा
देव. आदर्श वैदिक परंपरेनुसार, सामाजिक प्रथेनुसार आणि परिवारांच्या संमतीनेच विवाह व्हावा, हा आदर्श
शिव-पार्वतीने मानवासमोर ठेवला आहे. ते त्याग, सेवा, समर्पण यांचे मूर्तीमंत आदर्श आहेत. भक्तांना तात्काळ प्रसन्न होवून वर प्रदान करणारे भोळासांब, पत्नीला स्वतःत सामावून घेणारे अर्धनारी नटेश्वर, समुद्रमंथनातील हलाहल विष प्राशन करणारे
निलकंठ, तांडव नृत्य करणारे नटराज हे देवाधिदेव महादेवांचे अलौकीक अवतार आजही प्रेरणादायीच आहेत.
श्रीगुरूचरित्र ग्रंथामधील ७ व्या, ४१ व्या आणि ४३ व्या अध्यायात भगवान शिवाची महती वर्णिलेली आहे. नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ तर आदिनाथांचा जागरच करतो आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे आदिनाथांवर अतीव प्रेम आहे. भगवान शंकर हे ज्ञानेश्वरांच्या गुरूपरंपरेचे आदिगुरू आहेतच पण निवृत्तीनाथांच्या रूपाने प्रत्यक्ष सद्गुरू देखील आहेत. प्रापंचिक व पारमार्थिक उन्नती जलद व्हावी. आपल्या कुटूंबातील शारिरीक, मानसिक, अध्यात्मिक, आर्थिक अडीअडचणी, दुःख, संकट यांचे निवारण व्हावे. मनाला शांतता, आनंद, समाधान भरभरून मिळावे यासाठी महाशिवरात्र हे व्रत सपरिवार करण्याची
पिढीजात परंपराच चालत आलेली दिसते. महादेवांचा सिध्द मंत्र महामृत्यूंजय हा आहे. जीवन प्रदान करणाऱ्या या मंत्राला वेदांचे ह्रदय म्हटले जाते. जीवनातील दुःखांचा लय होवून आनंद व समाधान मिळावे यासाठी महामृत्यूंजय जप यज्ञ महत्वाचा ठरतो, अशी श्रध्दा आहे. महाशिवरात्रीचे व्रत श्रध्देने केल्यास फळ निश्चित मिळतेच. भगवान शिवाशी एकरूप होण्याचे
भाग्यही प्राप्त होते, असे स्पष्ट करताना त्यांनी महाशिवरात्र व्रताने उध्दार झालेल्या कथाही रसाळपणे सांगितल्या.
यावेळी विक्रम बोरूडे, सौरभ बोरूडे, सत्यम बोरूडे, दिनेश बोरूडे, गणेश दळवी, ओंकार बोरूडे यांच्यासह
स्त्री-पुरूष भाविक उपस्थित होते.