कागदावर उतरलेले आईचे काळीज म्हणजे ‘उर्णा’

0
23

साहित्यिक भारत सासणे यांचे प्रतिपादन

नगर – सुमारे १०० वर्षापूर्वीच्या तत्कालीन परिस्थितीत कुटुंब व्यवस्थेशी सामावून घेत पुरुषप्रधान संस्कृतीला सामोरे जाताना स्त्रीने दिलेली झुंज ही आजही सुन्न करते. अशा परिस्थितीवर जात्यावर बसून आपल्या व्यथा, भावभावना, ओवीच्या माध्यमातून तिने प्रकट केलेले संतत्व हे वेदनेचा ‘वेद’ करणारे आहे. भूपाली निसळ यांनी यासाठी घेतलेला ध्यास आणि कागदावर उतरवलेलं आईचं काळीज म्हणजे ‘उर्णा’ अशा संवेदनशील शब्दात व्यक्त झाले ते साहित्यिक लेखक व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे. औचित्य होते ते भूपाली निसळ लिखित व छायाचित्रकार संजय दळवी यांच्या आईच्या जीवनावर आधारित ‘उर्णा’या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. लेखक भारत सासणे यांच्या हस्ते ‘उर्णा’ प्रकाशन झाले. इन्किंग इनोवेशन मुंबईने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. यावेळी साहित्य प्रेमी उपस्थित होते.
‘उर्णा’ या पुस्तकावर तसेच एकंदर स्त्री साहित्यिक, लेखिका, जीवन भावभावना संघर्ष यांचे अभ्यासपूर्ण विवेचन भारत सासणे यांनी मनोगतात व्यक्त केले. त्यांनी भाषणात लेखिका भूपाळी निसळ यांनी प्राथमिक स्वरूपात स्त्रीचे तत्कालीन जीवन त्यातील संघर्ष संवेदनशीलता यांचे भेदक व वास्तव चित्र लेखन ओवी व काव्यात्मक पद्धतीने अतिशय भेदकपणे मांडले आहे. लेखक सासणे यांनी पुढे बोलताना तत्कालीन परिस्थितीत संत जनाबाई, संत वेण्णा, बहिणाबाई यांच्यासारख्या स्त्रिया लिहिता झाल्या व त्यांनी स्त्री जीवनाचे, मनुष्याच्या जीवनातील भावभावनांचा संघर्ष हा साहित्यातून ओवीच्या माध्यमातून मांडला जो आजही आपल्याला चिंतन करायला भाग पाडतो. भूपाली निसळ यांनी त्यांचा वारसा पुढे चालवताना स्त्रीच्या अंतरंगातील दुःखाचा दाह, तिच्या मनातील अस्वस्थता आणि तरीही तिच्यातील पराकोटीची क्षमाक्षिलता यांचे  संवेदनशील लेखन आजच्या परिस्थितीतही अंजन घालणारे आहे. ‘उर्णा’ हे पुस्तक भविष्यात संदर्भ ग्रंथ
म्हणून वाचक व अभ्यासकांना मार्गदर्शक ठाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भूपाळी निसळ यांनी यावेळी प्रास्ताविकात ‘उर्णा’ माध्यमातून तिसरे पुस्तक
लिहिताना मी १०० वर्ष मागे जाऊन तत्कालीन जीवन समजण्या साठी अनेकांशी संवाद
साधताना अनेक गोष्टी उलगडल्या. १९४० ते १९७० या कालखंडातील परिस्थिती
जाणून घेण्यासाठी संदेशच्या तत्कालीन अंकांनी मला साथ दिली. संजय दळवी यांच्या
आईच्या जीवनावर विठाईच्या माध्यमातून वेध घेताना एक
संघर्ष करणारी हालअपेष्टा, नैसर्गिक संकटे, पुरुषप्रधान
संस्कृतीशी, जुळून घेणारी तरीही क्षमाशील असणारी आई
मला भेटली. काव्य, प्रसंग अशा वेगवेगळ्या माध्यमातून ती
लेखणीतून ‘उर्णा’ उतरत गेली… काळजाशी भिडत गेली.
पहिल्या कल्लोळतीर्थ तीस वर्ष जुन्या परिस्थितीवर तर
दुसरी अनाधीसिद्धा हे पंधराशे वर्ष जुनी भाषा असलेले
पुस्तक लिहिताना एका वेगळ्या विश्वाचा प्रचितीचा अनुभव
होता. ‘उर्णा’ माध्यमातून शंभर वर्षे जुनी भाषा, शब्द,
प्रसंग, व्यक्तिरेखा, हे साकारणं करता आव्हानात्मक होते.
परंतु अनेक व्यक्तींशी सुसंवाद साधताना, भेटी देताना मी
त्यातील एक होऊन गेले. विठाईचा सगळा संघर्ष, प्रसंग
हे ओवी, काव्य व लेखनातून उतरत गेले. वाचकांनाही ते
भावेल अशी आशा भूपाळी निसळ यांनी व्यक्त केली.
छायाचित्रकार संजय दळवी यांनी मनोगतात आईचे
आमच्या सगळ्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण स्थान आहे.
अशिक्षित असूनही आठ आपत्यांचा संगोपन करताना ती
जीवाची परवा न करता संघर्ष करत राहील. दिवसभर राबून, जात्यावर ओव्या गाताना
ती जीवनाचे तत्त्वज्ञान सांगून गेली. कुटुंब, समाज, परिस्थिती यातून ती संघर्ष करताना
ती आनंदी व क्षमाशील राहिली. ‘उर्णा’ माध्यमातून विठाई सारखा असंख्य स्त्रियांनी
हा संघर्ष केला. ‘उर्णा’च्या माध्यमातून भूपाली मिसळ यांनी आई साकारताना ती
त्यांची मुलगी झाली व आम्हाला आमची आई मिळाली असा भावनिक संवाद त्यांनी
साधला. याच कार्यक्रमात लेखिका भूपाळी निसळ यांच्या हस्ते साहित्यिक भारत
सासणे यांच्या हस्ते कल्लोळतीर्थ या तिसर्या कादंबरीच्या आवृत्तीचे आणि अनादीसिध्दा
या कादंबरीच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
‘उर्णा’च्या प्रकाशन कार्यक्रमाचे औचित्य साधून गायिका सौ. गौरी कुलकर्णी व
शिरीष कुलकर्णी यांनी भूपाली मिसळ यांनी या पुस्तकात लिहिलेल्या ओव्या, बल्लारी,
भजन यांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यामधून उपस्थित मंत्रमुग्ध
झाले. शेता, जात्यावरचा या ओव्यांच्या कार्यक्रमाचे निवेदन कु.सृजन निसळ यांनी
करून कार्यक्रमांत रंगत आणली. सूत्रसंचालन स्वरूपा चव्हाण यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंकिंग इनोवेशनचे आनंद लिमये, प्राजक्ता खैरनार, सविता
दळवी, चिन्मय सुकटणकर, राजू ढोरे, ज्ञानेश शिंदे, गणेश गाडेकर, रोहित भवर, दत्ता
पवार, बंडू साठे, विनय शिवरात्री यांचे सहकार्य लाभले.