महाकुंभाच्या महापर्वातील आनंद दिव्यानुभूती देणारा

0
80

बालिकाश्रम रोडवरील बोरूडे मळ्यामधील जागृत महादेव मंदिराच्या प्रांगणात प्रवचनकार मिलिंद चवंडके महाशिवरात्री उत्सवात प्रवचन झाले

नगर – प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभाच्या महापर्वकालातील महाशिवरात्री उत्सवाचा आनंद शिवभक्तांना
दिव्यानुभूती देणारा ठरला, असे प्रतिपादन प्रवचनकार मिलिंद चवंडके यांनी केले. बालिकाश्रम रोडवरील
बोरूडे मळ्यामधील जागृत महादेव मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात पंच मंडळाने आयोजित केलेल्या महाशिवरात्री उत्सवात
आदिनाथांचा जागर या विषयावर प्रवचन करताना ते बोलत होते. माजी उपमहापौर अनिल बोरूडे यांच्या हस्ते मिलिंद
चवंडके यांना पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर सुदाम देशमुख,
रमेश बोरूडे, अनिल शिंदे, शरद बोरूडे व प्रविण फुलसौंदर होते. महाशिवरात्रीचे व्रत माघ कृष्ण चतुर्दशीला
संकल्पपूर्वक कसे करावे? याची अध्यात्म शास्त्रानुसार माहिती देताना मिलिंद महाराज चवंडके पुढे म्हणाले,
महाशिवरात्रीला शिवतत्व नेहेमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. शिवाची भावपूर्ण पूजा करण्यासह ॐ नमः
शिवाय हा षडक्षर मंत्राचा नामजप श्रध्देने अधिकाधिक केल्याने शिवकृपा होते. उपवास, पूजा आणि जागरण
ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत. सायंकाळी ६ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत ४ प्रहरात ४ पूजा
करतात. या पूजेस याम पूजा म्हणतात. पहाटे शिवपूजेने सांगता करतात. शिव सत्य, शिव अनंत, शिव अनादी, शिव
भगवंत, शिव ओंकार, शिव ब्रह्म, शिव भक्ती आणि शिव शक्ती आहे. शक्त्त्यासहितः शंभु: शिव दाम्पत्यांचा
देव. आदर्श वैदिक परंपरेनुसार, सामाजिक प्रथेनुसार आणि परिवारांच्या संमतीनेच विवाह व्हावा, हा आदर्श
शिव-पार्वतीने मानवासमोर ठेवला आहे. ते त्याग, सेवा, समर्पण यांचे मूर्तीमंत आदर्श आहेत. भक्तांना तात्काळ प्रसन्न होवून वर प्रदान करणारे भोळासांब, पत्नीला स्वतःत सामावून घेणारे अर्धनारी नटेश्वर, समुद्रमंथनातील हलाहल विष प्राशन करणारे
निलकंठ, तांडव नृत्य करणारे नटराज हे देवाधिदेव महादेवांचे अलौकीक अवतार आजही प्रेरणादायीच आहेत.
श्रीगुरूचरित्र ग्रंथामधील ७ व्या, ४१ व्या आणि ४३ व्या अध्यायात भगवान शिवाची महती वर्णिलेली आहे. नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ तर आदिनाथांचा जागरच करतो आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे आदिनाथांवर अतीव प्रेम आहे. भगवान शंकर हे ज्ञानेश्वरांच्या गुरूपरंपरेचे आदिगुरू आहेतच पण निवृत्तीनाथांच्या रूपाने प्रत्यक्ष सद्गुरू देखील आहेत. प्रापंचिक व पारमार्थिक उन्नती जलद व्हावी. आपल्या कुटूंबातील शारिरीक, मानसिक, अध्यात्मिक, आर्थिक अडीअडचणी, दुःख, संकट यांचे निवारण व्हावे. मनाला शांतता, आनंद, समाधान भरभरून मिळावे यासाठी महाशिवरात्र हे व्रत सपरिवार करण्याची
पिढीजात परंपराच चालत आलेली दिसते. महादेवांचा सिध्द मंत्र महामृत्यूंजय हा आहे. जीवन प्रदान करणाऱ्या या मंत्राला वेदांचे ह्रदय म्हटले जाते. जीवनातील दुःखांचा लय होवून आनंद व समाधान मिळावे यासाठी महामृत्यूंजय जप यज्ञ महत्वाचा ठरतो, अशी श्रध्दा आहे. महाशिवरात्रीचे व्रत श्रध्देने केल्यास फळ निश्चित मिळतेच. भगवान शिवाशी एकरूप होण्याचे
भाग्यही प्राप्त होते, असे स्पष्ट करताना त्यांनी महाशिवरात्र व्रताने उध्दार झालेल्या कथाही रसाळपणे सांगितल्या.
यावेळी विक्रम बोरूडे, सौरभ बोरूडे, सत्यम बोरूडे, दिनेश बोरूडे, गणेश दळवी, ओंकार बोरूडे यांच्यासह
स्त्री-पुरूष भाविक उपस्थित होते.