नगर – अहिल्यानगर येथील वसंत टेकडी जवळील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ. ना.ज.पाऊलबुद्धे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला बीएडच्या प्राचार्या कॅम्पस इन्चार्ज डॉ.रेखाराणी खुराणा, बी फार्मसी चे प्राचार्य डॉ. श्याम पंगा, डी फार्मसी च्या प्राचार्या अनुराधा चव्हाण, डॉ. वेणू कोला, डॉ.रोशनी सूर्यवंशी, डॉ. प्रसाद घुगरकर उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत डी फार्मसी व बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी पेशंट कौन्सलिंग मध्ये फार्मसी चा रोल किती महत्त्वाचा असतो हे दर्शविणारे नाट्यप्रदर्शन सादर करण्यात आले.
डॉ.रेखाराणी खुराणा यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना यशस्वी जीवन जगण्याचा कानमंत्र देत पुढील कारकिर्दीसाठी मार्गदर्शन केले. डॉ.पंगा यांनी विद्यार्थ्यांना स्टार्ट अप अँड इनोवेशन प्रोग्राम अंतर्गत नवीन संशोधन करण्यास प्रेरणा दिली.
सूत्रसंचालन श्रद्धा मुंदडा यांनी केले. सुवर्णा येमुल यांनी आभार मानले.
डॉ.पाऊलबुधेमध्ये नॅशनल एज्युकेशन फार्मसी डे साजरा
उद्योगांसाठी स्वस्त दरात वीजपुरवठा करा
नगर – महाराष्ट्रातील औद्योगिक विजेचे दर हे देशात सर्वाधिक असल्याने राज्यातील उद्योगधंद्यांवर मोठा आर्थिक ताण येत आहे. वाढत्या वीजदरांमुळे अनेक उद्योग अन्य राज्यांत स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी उद्योगांना स्वस्त, मुबलक आणि अखंडित वीज मिळावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली.
नाशिक येथील अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅचरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेच्या विनंतीवरून आमदार तांबे यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला. महाराष्ट्रातील औद्योगिक विजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत, तर सेवा-सुविधांच्या बाबतीत राज्य मागे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग टिकून राहावेत आणि अधिक सक्षम बनावेत,
यासाठी स्वस्त दरात वीजपुरवठा होणे अत्यंत गरजेचे असल्याचे आ. सत्यजीत तांबे यांनी म्हंटले. महाराष्ट्र देशातील प्रमुख औद्योगिक केंद्र असूनही, येथील उच्च वीजदरांमुळे उत्पादन खर्च वाढतो. परिणामी, वस्तूंच्या किमती वाढतात आणि उद्योगांना स्पर्धात्मक टिकाव धरणे कठीण जाते. यामुळे अनेक लघु, मध्यम आणि मोठे उद्योग इतर राज्यात स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत. जर ही परिस्थिती कायम राहिली, तर महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आमदार तांबे यांनी राज्य सरकारच्या महावितरण या वीज वितरण कंपनीने लघु व मध्यम उद्योगांसाठी
सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. उद्योगांना सवलतीच्या दरात वीज मिळाल्यास ते अधिक सक्षम होतील आणि रोजगारनिर्मिती वाढेल. तसेच, उद्योगांना पूर्ण दाबाची, अखंडित आणि विश्वासार्ह वीज उपलब्ध करून देण्याची गरज
असल्याचेही आ. तांबे यांनी अधोरेखित केले.
आमदार तांबे यांच्या या मागणीवर राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उद्योगवाढ आणि वीजपुरवठ्याच्या समस्येवर अभ्यास करून आवश्यक उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच, राज्यातील उद्योगधंद्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असे सरकारने स्पष्ट केले.
उद्योगांसाठी वीजदर कमी करण्याची गरज का?
महाराष्ट्रातील वाढत्या औद्योगिक वीजदरांमुळे अनेक उद्योगधंदे अन्य राज्यांत स्थलांतर करण्याच्या
तयारीत आहेत. उच्च वीजदरांमुळे उत्पादन खर्च वाढत असून, त्याचा थेट परिणाम वस्तूंच्या किंमतींवर
होत आहे. तसेच, राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी उद्योगधंद्यांचा विकास महत्त्वाचा असल्याने उद्योगांसाठी
स्वस्त आणि अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करणे गरजेचे आहे.
विश्व नवकार महामंत्र दिनानिमित्त नगरमध्ये ९ एप्रिलला ‘विशेष जाप’ कार्यक्रमाचे आयोजन
नगर – जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) च्या वतीने संपूर्ण भारतासह
आंतरराष्ट्रीय स्तरावर ९ एप्रिल रोजी ’विश्व नवकार महामंत्र’ दिवस भव्य स्वरूपात
साजरा करण्यात येणार आहे. नगर शहरात यादिवशी धार्मिक परीक्षा बोर्ड येथे सकाळी
७.०२ ते ९.३६ यावेळेत नवकार जाप केला जाणार आहे. तसेच यावेळी धार्मिक गीत
संगीत, सांस्कृतिक कार्यक्रमही रंगणार आहेत. या विश्वव्यापी उपक्रमात ७४ जितो
चॅप्टर्स, ९ झोन, ३१ आंतरराष्ट्रीय चॅप्टर्स, १०८ देश, १०८ पेक्षा अधिक धार्मिक
अनुष्ठान स्थळे, ६ हजारांहून अधिक जैन देरासर, उपाश्रय, स्थानकांतून भाविक
सहभागी होणार आहेत. एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून सामूहिक नवकार महामंत्र
जपाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती जितो अहमदनगरचे चेअरमन
आलोक मुनोत, सेक्रेटरी तुषार कर्नावट यांनी दिली.
या उपक्रमाच्या प्रचार पत्रकाचे अनावरण नुकतेच करण्यात आले. यावेळी
इंदिरा मुनोत, गौतम मुनोत, अमित मुथा, अक्षय नरेंद्र बाफना, अभिजित विनोद गांधी,
सुधीर, निलेश चोपडा, आलोक मुनोत, तुषार कर्नावट, विजय गुगळे, अमित पोखरणा,
सौरभ भंडारी, प्रितेश दुगड, पारस चुडीवाल, सुमंगला मुनोत, प्रणिल मुनोत, युथ विंग
चेअरमन चेतन भंडारी, सेक्रेटरी यश भंडारी, गौतम मुथा, खुशबू मुनोत, निखिल गांधी,
ऋबभ बोरा, रितेश पटवा, सूरज कर्नावट, लेडीज विंग सेक्रेटरी अंशु मुनोत, सोनाली
डुंगरवाल, वैशाली ओस्तवाल आदी उपस्थित होते.
या दिव्य आयोजनाचा उद्देश नवकार महामंत्राच्या अद्भुत शक्तीचा प्रचार व प्रसार
करणे आणि अधिकाधिक लोकांना या आध्यात्मिक साधनेसाठी प्रेरित करणे हा आहे.
प्रत्येकाने आपल्या शहरातील, गावातील प्रमुख धार्मिक स्थळे, समाज, प्रतिष्ठित व्यक्ती
आणि श्रद्धाळूंना या महान कार्यात सहभागी घ्यावे. स्थानिक पातळीवर जास्तीत जास्त
भाविकांनी नजीकच्या स्थानकात किंवा घरी बसूनही माळ जपावी.
या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवकार महामंत्राचे महत्त्व संपूर्ण
भारतासमोर सादर करणार आहेत. याशिवाय देशातील दिग्गज राजकारणी, गौतम
अदानी, मुकेश अंबानी यांच्यासह मोठे उद्योजक, बॉलिवूड स्टार, दिग्गज खेळाडू,
सेलिब्रिटींही यात सहभागी होणार आहेत. अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की नवकार
महामंत्राची शक्ती आणि महत्त्व आज जागतिक स्तरावर मान्यता मिळवत आहे. या
ऐतिहासिक कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी अधिकाधिक भाविकांची नोंदणी यु आर
कोड द्वारे किंवा ऑनलाईन लिंकवर करावी असे आवाहन जितो अहमदनगरच्या वतीने
करण्यात आले आहे.
चंदन प्लास्टिकला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली मात्र कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान
नगर – जामखेड रोडवर नगर तालुयातील सारोळा बद्धी येथील प्लास्टिक ताडपत्री बनविणारी चंदन प्लास्टिक ही कंपनी १६ मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. आगीत कंपनीची मोठी आर्थिक हानी झाली.
रविवारी सकाळी अकराच्या सुमारास सारोळा बद्दी येथील प्लास्टिक ताडपत्र्या बनविणार्या कंपनीस अचानक आग
लागली. काही क्षणातच धुराचे लोळ बाहेर पडू लागले. आगीने रौद्ररूप धारण केले. ही माहिती अहिल्यानगर महापालिकेच्या अग्निशमन दलास देण्यात आली. जवान तत्काळ दोन बंब व तीन मोठे पाणी टँकरसह घटनास्थळी पोहोचले व मदतकार्य सुरू केले. त्यानंतर एमआयडीसी, राहुरी नगरपालिका, एमआयआरसीच्या . अग्निशमन दलाचीही मदत
घेण्यात आली. रात्री उशिराही आग आटोयात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. यात स्थानिक ग्रामस्थांनीही वैयक्तिक पाणी टँकर आणून आग आटोयात आणण्यासाठी मदत केल्याची माहिती मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर मिसाळ
यांनी सांगितली. आग आटोयात आणण्यासाठी अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ, वाहन चालक अशोक काळे, अंकुश कुटे, सिकंदर वाकरे, चंदू भांगरे, फायरमन मोहन रासकर, सागर जाधव, अशोक चितळे, करण राठोड, संदेश सांगळे, सूरज कारले, संकेत साठे, अविनाश साठे, धीरेश जावळे, शुभम साठे, प्रभात साठे आदींसह इतर जवानांनी प्रयत्न केले.
केडगावच्या बायपास जवळ बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने लावला पिंजरा
नगर – केडगाव मधील बायपास चौका लगत असलेल्या कांबळे वस्ती जवळील सलीम रंगरेज यांच्या शेतात १५ मार्चला रात्री बिबट्या दिसल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. याची माहिती मिळाल्यावर वनपारिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या मार्गदर्शना नुसार वन विभागाच्या कर्मचार्यांनी तातडीने भेट देत पाहणी केली. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी १६ मार्चला या परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे. या भागात बिबट्या दिसल्याचा व्हिडीओ काही
नागरिकांनी काढला होता तसेच या ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसेही आढळून आले. या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी बिबट्याने एका कालवडीची शिकार केली होती. याची गांभीर्याने दखल घेत रविवारी सकाळी वनरक्षक विजय चेमटे, चालक संदीप ठोंबरे, वन्यजीव अभ्यासक हर्षद कटारीया यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच परिसरातील नागरिकांना काही सूचना केल्या. बिबट्याला पकडण्यासाठी सायंकाळी या भागात पिंजरा लावण्यात आला आहे. केडगाव परिसरात बिबट्याचे वास्तव्य या आधीही आढळून आले आहे. नागरिकांनी कोणत्याही आफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच खोट्या भीती व गैरसमज पसरवणार्या व्हिडीओ लिप सोशल मीडियावर प्रसारित करू नये, असे आवाहन वनपारिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांनी नागरिकांना केले आहे.
केडगाव बायपास रोडवर स्क्रॅप गोडावूनला भीषण आग, मोठ्या प्रमाणात नुकसान महापालिका व एमआयडीसी अग्निशामक दलाने २ तासानंतर आग आणली नियंत्रणात
नगर – केडगाव बायपास रोडवर स्क्रॅप गोडावूनला १२ मार्च ला रात्री ११.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोडावून मधील सर्व साहित्य जळून खाक झाले. महापालिका अग्निशामक दलाचे २ बंब आणि एमआयडीसी अग्निशामक दलाचा १ बंब यांनी २ तास अथक प्रयत्न करून सदर आग आटोक्यात आणली. परंतु तो पर्यंत आगीत मोठे नुकसान झाले होते.
केडगाव बायपास रोडवर नेप्ती कांदा मार्केटजवळ फिरोज खान यांचे प्लास्टिक स्क्रॅप गोडावून आहे. या गोडावूनला रात्री ११.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ, चालक ज्ञानेश्वर चाकणे, फायरमन संजय शेलार, भरत पडघे, पांडुरंग झिने, बाबा कदम, मच्छिंद्र धोत्रे हे घटनास्थळी दाखल झाले. आगीचे रौद्र रूप पाहून सावेडी विभागाची गाडीही बोलावण्यात आली. त्यानंतर एमआयडीसी अग्निशामक दलालाही बोलावण्यात आले. एमआयडीसीचे अग्निशमन अधिकारी जगतसिंग जाट, प्रमुख फायरमन नितीन जाधव, राकेश चौधरी, गणेश कदम, बालाजी ओव्हाळ, कैलास नांगरे, राहुल भालगावकर, निलेश भालेराव, चालक प्रकाश शिंगाडे यांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. या ३ बंबांनी आगीवर पाण्याचा मारा करत सुमारे २ तास अथक परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळविले.
गोडावून मध्ये प्लास्टिकचे स्क्रॅप असल्याने आगीने काही काळातच रौद्र रूप घेतले होते. त्यामुळे आग नियंत्रणात येईपर्यंत गोडावून मधील सर्व स्क्रॅप जळून खाक झाले होते. या आगीच्या ज्वाला लांबूनही दिसत होत्या. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी तसेच बायपास ने जाणाऱ्या वाहनचालकांनी गर्दी केली होती. आगीत किती नुकसान झाले याची निश्चित माहिती मिळू शकली नाही.
संभाजी ब्रिगेडचे नाव बदलण्यासाठी शिवधर्म फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्रात १८ मार्च पासून आंदोलन सुरु करणार
नगर – संभाजी ब्रिगेडच्या नावाबाबत शिवधर्म फाउंडेशनचे संपूर्ण महाराष्ट्रात १८ मार्च पासून आंदोलन सुरु करणार असून अहिल्यानगर येथे २८ मार्च रोजी मोर्चा काढणार असल्याची माहिती शिवधर्म फाउडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी दिले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर पुत्र तसेच स्वराज्याचे दुसरे छत्रपती आहेत. त्यांच्या पराक्रमाची, त्यागाची व धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची कीर्ती संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. हिंदू धर्माच्या रक्षणार्थ दिलेल्या अतुलनीय योगदाना मुळेच संपूर्ण रयतेने त्यांना “धर्मवीर” ही उपाधी बहाल केली. परंतु, संभाजी ब्रिगेड ही संघटना आणि पक्ष सातत्याने छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत असून, हा प्रकार महाराष्ट्रातील करोडो शिवभक्त आणि संभाजी महाराजांवर निस्सीम श्रद्धा असलेल्या जनतेच्या भावनांना गंभीर धक्का पोहोचवणारा आहे. याशिवाय, संभाजी ब्रिगेड संघटनेचे नाव ‘संभाजी’ या एकेरी शब्दाने प्रसिद्ध होत असल्याने महाराष्ट्रातील लाखो नागरिक अज्ञानात किंवा नकळत छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करत आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मिता धोक्यात येत आहे.
संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव बदलावे. जर त्यांनी नाव बदलण्यास नकार दिला, तर या संघटना व पक्षांची नोंदणी तत्काळ रद्द करण्यात यावी. संभाजी महाराज यांचा सन्मान कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर भूमिका घ्यावी व तातडीने योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी दीपक काटे यांनी केली आहे.
शिवधर्म फाउंडेशनच्या या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीर पाठिंबा दिला असून ते म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचा अपमान कोणीही सहन करणार नाही. प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत.
शिवधर्म फाउंडेशनने यास तीव्र विरोध दर्शवला असून या नावांमध्ये त्वरित बदल करण्याची मागणी केली आहे. या मागणी साठी पुणे येथे १८ मार्च, सातारा: २० मार्च, कोल्हापुर: २१ मार्च, सांगली: २९ मार्च, सोलापुर: २५ मार्च, अहिल्यानगर: २८ मार्च, जालना: २९ मार्च, छत्रपती संभाजी नगर: ७ एप्रिल, नाशिक: ९ एप्रिल , ठाणे, रायगड: ११ एप्रिल रोजी आंदोलन केले जाणार असल्याचे दीपक काटे यांनी सांगितले.
बिहारच्या महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, निदर्शन
बौद्ध धर्माची अस्मिता असलेल्या महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्याची मागणी
नगर – बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहारचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी
जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी (दि.१२ मार्च) मोर्चा काढण्यात आला. शासकीय विश्रामगृह येथून निघालेल्या मोर्चात बौध्द धर्माचे
प्रतिक असलेले पंचशील ध्वजासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सम्राट अशोक यांच्या प्रतिमा
घेऊन समाजबांधव सहभागी झाले होते.
बौद्ध धर्माची अस्मिता असलेल्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया
समोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण,
राज्य प्रवक्ते अॅड. अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे,
जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, जिल्हा सल्लागार जे. डी. शिरसाठ, शहराध्यक्ष
हनीफ शेख, तथागत बुध्दीस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे, राम गायकवाड, माधवराव चाबूकस्वार,
दिपक पाटोळे, लक्ष्मण माघाडे, संतोष गायकवाड, विजय हुसळे, सतिश ओहोळ, बाबाजी वाघमारे,
बाळासाहेब धस, गायकवाड आण्णा, भगवंत गायकवाड, संपत पवार, प्रवीण ओरे, अमर निरभवने, राजीव
भिंगारदिवे, रविकिरण जाधव, तेजस धीवर, बाबासाहेब धीवर, संजय कांबळे, अण्णासाहेब गायकवाड, गौतम
पाचारणे, मेहेर भिंगारदिवे, राम गायकवाड, दीपक पाटोळे, भाऊसाहेब देठे, पोपट शेटे, सोमनाथ भैलूमे,
गनी इनामदार, दीपक गायकवाड, संजय शेलार, रूपाली आढाव, लता भांड, प्रमिला शिंदे, पी.के. गवारे, दिलीप
साळवे, राजेंद्र करदींकर, प्रकाश कांबळे, धोंडिबा राक्षे, संतोष जवंजाळ, महेश पवार, संतोष कांबळे, दादासाहेब
पंडीत, नवनाथ रामफळे, शांताराम ऊबाळे, बाळासाहेब लहानसे, संतोष पटवेकर, पंडीत मोरे, भगवान बच्छाव
आदींसह फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या समविचारी संघटनांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते.
सम्राट अशोक यांनी इ.स. पूर्व तिसर्या शतकात महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले. तथागत बुद्धाला
ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. त्यामुळे देशातील
नव्हे, तर जगभरातील बौद्ध अनुयायी भिखू आणि पर्यटक या स्थळाला भेट देतात; मात्र या महाविहाराचे
नियंत्रण आणि व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही. महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे,
यासाठी १९९२ पासून आंदोलन होत आहेत. तरी सुद्धा महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा बदलण्यात
आला नाही. त्यामुळे पाच हिंदू धर्मीय यांचे प्राबल्य असल्याने बौध्द गया येथील महाविहारात पुजा आणि
कर्मकांड सुरु आहे. मात्र बौद्ध धर्म गुरुंना त्यांच्या विधीप्रमाणे पूजेचा अधिकार मिळत नाही. ज्या रूढी
परंपरांना तथागत गौतम बुद्ध यांनी नाकारले तेच कर्मकांड येथे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आपला देश स्वातंत्र्य झाल्यावर २६ जानेवारी १९५० पासून घटना लागू झाली आहे. त्यावेळी भारतीय
राज्यघटनेचे कलम १३ नुसार घटना लागू होण्यापूर्वी केलेले सर्व कायदे आणि नियम निरस्त केले आहेत. मात्र तरी
देखील देशात १९४९ चा नियमबाह्य कायदा लावून बौध्द समूहाचे धार्मिक अधिकार काढून घेण्यात आले
असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महाबोधी महाविहार (बोधगया, बिहार) हे पवित्र बौद्ध धर्मस्थळ असून, बोधगया महाविहार कायदा १९४९ चा अन्यायकारक कायदा रद्द करावा, बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे, जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष विकास
निधी आणि सुविधा तात्काळ देण्यात याव्या, केंद्र सरकार आणि बिहार सरकारने आपले विशेष अधिकार
वापरून १९४९ चा कायदा दुरुस्त करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर मागणीचे
निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले आहे.
विविध मागण्यांसाठी बँक कर्मचार्यांचे धरणे आंदोलन; लालटाकी येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर निदर्शन
१७ मार्च रोजी मुख्य कार्यालयसमोर धरणे आंदोलन तर २० मार्च रोजी देशव्यापी लाक्षणिक संप करण्याचा दिला इशारा
नगर – ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन संलग्न बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन अहिल्यानगर शाखेच्या वतीने महाराष्ट्र बँकेतील कर्मचार्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी बुधवारी (दि.१२ मार्च) लालटाकी येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखे समोर धरणे आंदोलन करण्यात आले. बँकेच्या अधिकार्यांचे लक्ष वेधण्यासाठी बँक कर्मचार्यांनी घोषणाबाजी रुन देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. या आंदोलनात ऑर्गनायझेशन सेक्रेटरी प्रकाश कोटा, उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, कार्यकारणी सदस्य वीरेंद्र भालसिंग, दत्ता म्याना, डिस्ट्रिक कॉर्डिनेशनचे अध्यक्ष कॉ. माणिक अडाणे, जनरल सेक्रेटरी कॉ. कांतीलाल वर्मा, कॉम्रेड गुजराती, महाराष्ट्र ग्रामीण बँक जनरल सेक्रेटरी
सुजय नळे, हरिभाऊ गायकवाड, सचिन म्हसे, कॉ. उमाकांत कुलकर्णी, विनायक मेरगू, राहुल मोकाशी, योगेश सोन्नीस, विजय भोईटे, गणेश मेरगू, अमोल संत, भारतीय असुधानी, विजय साळवे, नाना उपाध्ये, कॉम्रेड नंदलाल जोशी, एन.डी. तांबडे, वाल्मीक बोर्डे, सुभाष गर्जे, गोरख चौधरी, दत्ता खडके, सुनील शिंदे, सचिन राहींज, संदीप सुद्रिक, सोमनाथ मैड, प्रवीण उल्हारे, दिलीप कापसे, गणेश चितळे, सोमनाथ वावरे आदींसह संघटनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र बँकेतील कर्मचारी सहभागी झाले होते. २० फेब्रुवारी रोजी ऑल इंडिया फेडरेशनचे सचिव कॉम्रेड धनंजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे प्रतिनिधी आणि व्यवस्थापन प्रतिनिधी दरम्यान औद्योगिक संबंध विषयक बैठक झाली. या बैठकीदरम्यान व्यवस्थापन प्रतिनिधींनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर नकारात्मक व असंवेदनशील भूमिका कायम ठेवल्याने देशातील महाराष्ट्र बँकेच्या कर्मचार्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
टेम्पररी (हंगामी) पीटीएस ना कायम घेऊन पीटीएसची भरती करावी, सबस्टाफ आणि लिपिक संवर्गात पुरेशी नोकर भरती करावी, कराराप्रमाणे विशेष सहाय्यक पदे भरावी, द्विपक्षीय संबंध पद्धतीची पुनर्स्थापना व्हावी, संघटना कार्यालये संघटनांना पुन्हा उपलब्ध करून द्यावे, डी-ज्यूरे कराराचे काटेकोर पालन करण्याची मागणी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनच्या वतीने करण्यात आलेली आहे.
संघटनेच्या प्रतिनिधींनी मांडलेली भूमिका तांत्रिकदृष्ट्या मान्य करण्यासारखी असली तरीही मागण्या मान्य न करण्यासाठी व्यवस्थापन प्रतिनिधींनी असमर्था व्यक्त केल्याचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. प्रत्येक तिमाहीच्या शेवटी विंडो ड्रेसिंग करून तसेच अनेक अनैतिक पद्धतीचा वापर करून आणि प्रोसिजरचे उल्लंघन करून ताळेबंद सजवला जात आहे. प्रगतीचे अभासी चित्र उभे केले जात आहे, तथापि हे चित्र टिकणारे नाही. कारण ते भ्रामक आहे, जे की बँकेच्या हिताला बाधा आणणारे आहे. कासा ठेवीमध्ये घट, किरकोळ एनपीएमध्ये वाढ आणि इतर काही बाबतीत काळजी करण्यासारखी परिस्थिती आकाराला येत असल्याचे धोके स्पष्ट करण्यात आले आहे. तरतुदीमध्ये बदल करून बँक अल्पावधीत चांगला नफा दाखवू शकते, परंतु हे तात्पुरते असेल. हे धोरण सध्या बँक प्रमुखांच्या कार्यकाळापुरते मेळ
घालणारे असेल. तरी या बँकेचे कर्मचारी म्हणून आपल्या संस्थेच्या दीर्घकालीन हिताचा संबंध आहे. ही सर्व वस्तुस्थिती प्रेक्षक म्हणून केवळ पाहू शकत नाही, म्हणूनच बँक ऑफ महाराष्ट्र कुठे घेऊन जाणार? हा प्रश्न उपस्थित करुन आंदोलन उभे करण्यात आलेले आहे. याविषयी संघटना म्हणून बँकेतील वरिष्ठ व्यवस्थापनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र संस्थेतील महत्त्वाचे घटक असलेल्या कर्मचार्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी वेळ नसल्यामुळे हे मुद्दे सार्वजनिक रित्या उपस्थित करण्यात आल्याचे म्हंटले आहे. या प्रमुख मुद्द्यांसाठी संघटनात्मक हस्तक्षेप करुन देशव्यापी
आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी सर्व झोनल ऑफिस समोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. १७ मार्च रोजी मुख्य कार्यालय (लोकमंगल) समोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. तर २० मार्च रोजी देशव्यापी लाक्षणिक संप करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बँक कर्मचार्यांच्या हिताच्या मागणीसाठी सर्व संघटनांनी एकजुटीने येऊन लढा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्वसूचना न देता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन; ११ जणांवर गुन्हा दाखल
नगर – जिल्हा प्रशासनाला आंदोलनाची कोणतीही पूर्व सूचना न देता जिल्हाधिकारी कार्यालय येथे
आंदोलन करून घोषणाबाजी करणार्या निर्भया महाराष्ट्र पार्टीचे पदाधिकारी व आंदोलकांवर तोफखाना
पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी की मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड कंपनीचे कर्जदार
यांनी निर्भया महाराष्ट्र पार्टीचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ११ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय
येथे धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनाबाबत आंदोलकांनी जिल्हा प्रशासनाला जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करण्यासंबंधी कोणतीही पूर्व सूचना न देता मोतीलाल ओसवाल
होम फायनान्स लिमिटेड कंपनी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. व पोलिसांनी दिलेल्या सूचनाचे
पालन न करता आंदोलन केले.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पो. कॉ. गोकुळ वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन निर्भया
महाराष्ट्र पार्टीचे पदाधिकारी जितेंद्र नरेश भावे (रा. नाशिक) व मोतीलाल ओसवाल होम फायनान्स
लिमिटेड कंपनीचे कर्जदार असीफ आयुब पठाण (रा. भेंडा, ता. नेवासा,) अरुण वैद्य व कैलास राजळे
(दोघे रा. शहर टाकळी, ता. शेवगाव) कचरू पठाडे व किशोर आरगडे (दोघे रा. नेवासा) राजेंद्र गवराज
हारदे (रा. टाकळीमिया, ता. राहुरी ) नवनाथ आढाव (रा. तपोवन रोड, अ.नगर), संगीता तिडके (रा.
नेवासा), शितल गोरे (रा. अकोला), रफिक गणी शेख (रा. तिसगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय
संहिता २२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.













