संभाजी ब्रिगेडचे नाव बदलण्यासाठी शिवधर्म फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्रात १८ मार्च पासून आंदोलन सुरु करणार

0
70

नगर –  संभाजी ब्रिगेडच्या नावाबाबत शिवधर्म फाउंडेशनचे संपूर्ण महाराष्ट्रात १८ मार्च पासून आंदोलन सुरु करणार असून अहिल्यानगर येथे २८ मार्च रोजी मोर्चा काढणार असल्याची माहिती शिवधर्म फाउडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी दिले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर पुत्र तसेच स्वराज्याचे दुसरे छत्रपती आहेत. त्यांच्या पराक्रमाची, त्यागाची व धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची कीर्ती संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. हिंदू धर्माच्या रक्षणार्थ दिलेल्या अतुलनीय योगदाना मुळेच संपूर्ण रयतेने त्यांना “धर्मवीर” ही उपाधी बहाल केली. परंतु, संभाजी ब्रिगेड ही संघटना आणि पक्ष सातत्याने छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत असून, हा प्रकार महाराष्ट्रातील करोडो शिवभक्त आणि संभाजी महाराजांवर निस्सीम श्रद्धा असलेल्या जनतेच्या भावनांना गंभीर धक्का पोहोचवणारा आहे. याशिवाय, संभाजी ब्रिगेड संघटनेचे नाव ‘संभाजी’ या एकेरी शब्दाने प्रसिद्ध होत असल्याने महाराष्ट्रातील लाखो नागरिक अज्ञानात किंवा नकळत छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करत आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मिता धोक्यात येत आहे.

संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव बदलावे. जर त्यांनी नाव बदलण्यास नकार दिला, तर या संघटना व पक्षांची नोंदणी तत्काळ रद्द करण्यात यावी. संभाजी महाराज यांचा सन्मान कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर भूमिका घ्यावी व तातडीने योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी दीपक काटे यांनी केली आहे.

शिवधर्म फाउंडेशनच्या या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीर पाठिंबा दिला असून ते म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचा अपमान कोणीही सहन करणार नाही. प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत.

शिवधर्म फाउंडेशनने यास तीव्र विरोध दर्शवला असून या नावांमध्ये त्वरित बदल करण्याची मागणी केली आहे. या मागणी साठी पुणे येथे १८ मार्च, सातारा: २० मार्च, कोल्हापुर: २१ मार्च, सांगली: २९ मार्च, सोलापुर: २५ मार्च, अहिल्यानगर: २८ मार्च, जालना: २९ मार्च, छत्रपती संभाजी नगर: ७ एप्रिल, नाशिक: ९ एप्रिल , ठाणे, रायगड: ११ एप्रिल  रोजी आंदोलन केले जाणार असल्याचे दीपक काटे यांनी सांगितले.