सरोष कँटीन मध्ये लागली भीषण आग ; सुदैवाने जीवितहानी नाही

नगर – शहरातील मध्यवस्तीत सरोष पेट्रोल पंप मागे असलेल्या सरोष कँटीन मध्ये १७ मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास भीषण आग लागली. आंतरराष्ट्रीय अवतार मेहेरबाबा केंद्राजवळ असणाऱ्या या कँटीन मधील एका पत्र्याच्या शेडला भीषण आग लागून शेडमध्ये असणाऱ्या फोम गाद्या जळून खाक झाल्या. यावेळी मेहेरबाबा केंद्रातून सुरवातीला पाण्याचा पाईप लावून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आग अत्यंत भीषण असल्याने  ती आटोक्यात येत नव्हती त्यानंतर अग्निशमन गाडी आली त्या गाडीने आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला

शेजारी पेट्रोल पंप आणि याठिकाणी आग वाढली असती तर शेजारी शेकडो घरांची वस्ती पेट्रोल पंपाला आग लागून मोठा स्फोट होउन आणखी मोठं नुकसान झालं असत आणि दुसरीकडे आग वाढत असताना अग्निशमन दलाची मोठी गाडी तातडीने दाखल होत असताना या सरोष कँटीन परिसरात मातीचे मोठं-मोठे ढिगारे आणि कचऱ्याचे ढीग टाकून येथे अतिक्रमण करून रस्ते बंद करण्यात आले आहेत त्यामुळे या गाडीला येण्यासाठी अडथळे आले मात्र पेट्रोल पंपाकडून गाडी आत आली आणि अर्धा तास शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले

सुद्यवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. बंद पडलेली दीपाली टॉकीज आणि सरोष कँटीन परिसर याठिकाणी १०० ते १५० ट्रॅक्टर मातीचे ढिगारे टाकून जाणून बुजून रस्ते बंद करण्यात आले असून या जागेत किती प्रमाणात कचरा आणि मातीचे ढिगारे करण्यात आले असून नगर मनपाने तातडीने याठिकाणी स्वच्छता करावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

आग लागली त्याच्या शेजारी मेहेर बाबा यांचे आंतरराष्ट्रीय केंद्र असून याठिकाणी अमेरिका,जर्मनी,फ्रांस,इंग्लड,रशिया,इराण आणि जगभरातील मेहेरभक्त येत असतात अशा ठिकाणी आग लागून पुढील मोठा अनर्थ सध्या तरी टळला परंतु मनपा प्रशासनाने याठिकाणी तातडीने स्वछता करणे अत्यावश्यक आहे.

क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटवा

विहिंप व बजरंग दलाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन; ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ बजरंग दल मैदानात’ घोषणा

नगर – उझबेगी परकीय आक्रमक बाबर याचा वंशज क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजी महाराजनगर
या शहरात आहे. वास्तविक, औरंग्या अहिल्यादेवीनगर येथे मेला व नंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे
पुरले व त्याठिकाणी त्याची कबर करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजनगर या शहरातील हिंदू द्वेष्टा, क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटविण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया
यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे महाराष्ट्र -गोवा क्षेत्राचे संयोजक विवेक कुलकर्णी, माजी जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, जिल्हा मंत्री अनिल जोशी, जिल्हा सहमंत्री शरदराव नगरकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर, बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक साहिल पवार, शहर मंत्री श्रीकांत नांदापूरकर, मिलिंद मोभारकर, मुकुल गंधे, नगर तालुका प्रखंड मंत्री विश्वास बेरड, देविदास मुदगल, दिनेश जोशी, भागवत कुरधने, गणेश कराळे, उत्कर्ष गीते, वीरेंद्र शिंदे, नाना मोरे, सचिन पळशीकर, योगेश राऊत, मनोहर भाकरे, दिनेश हिरगुडे, दिनेश दातरंगे, सत्यम गुजर, ऋषी जुम्मीवाले, वारणोक आदींसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
अश्या क्रूरकर्मा व  आततायी औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही पुर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचेच, अनंत यातनांचे प्रतिक आहे. आम्ही सर्व आपणांस विनंती करतो की, आपण ही कबर पूर्णपणे नष्ट करावी. परकीयांचे कुठलेही नामोनिशाण हे नष्ट झाले पाहिजे. आपण योग्य पद्धतीने ही कबर पुर्णपणे काढून टाकावी व हे न  झाल्यास पूर्वसुचित करून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल हिंदू समाजाबरोबर छत्रपती संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कूच करतील व औरंग्याची कबर उद्ध्वस्त करतील, असा इशारा बजरंग दलाचेवतीने देण्यात आला आहे.

शालेय स्तरावर झालेल्या विविध स्पर्धेत समृद्धी नजान हिने मिळविले पारितोषिक

नगर – अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूल अहिल्यानगरची इयत्ता ३ री मधील विद्यार्थीनी कु. समृद्धी सोमनाथ नजान हिने शालेय स्तरावर झालेल्या विविध स्पर्धेमध्ये चार पारितोषिके प्राप्त
केले. शाळेचा शेष पारितोषिक वितरण समारंभ नुकताच झाला. यामध्ये कु. समृद्धी हिला इंग्रजी कथाकथन स्पर्धा प्रथम क्रमांक, मराठी कथाकथन स्पर्धा द्वितीय क्रमांक, मिठाई बनवणे स्पर्धा द्वितीय क्रमांक, विज्ञान प्रदर्शन स्पर्धा तृतीय
क्रमांक, कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे क्रीडा अधिकारी आकाश थोरात यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी उपप्राचार्या कविता सुरतवाला, शिक्षिका आदिती कोकाटे उपस्थित होत्या.
शाळेतील विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये कु. समृद्धी हिने हे यश संपादन केले. समृद्धीने ज्या स्पर्धमध्ये सहभाग नोंदवला त्यामध्ये तिला यश प्राप्त झाले. समृद्धीला वर्गशिक्षिका अर्चना जाधव व विविध विषय अध्यापिका, स्पर्धा प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले. आई सुरेखा सोमनाथ नजान नेहमी तिला प्रोत्साहन देत असते.
यशाबद्दल अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य प्रभाकर भाबड, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे प्राचार्य उल्हास दुगड, रुपीबाई बोरा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अजयकुमार बारगळ, श्री रामकृष्ण  सेवा ट्रस्टचे अध्यक्ष नंदलाल मनियार, गीता परिवार दक्षिण अहमदनगरच्या अध्यक्षा सौ. सुनंदाताई सोमाणी, समृद्धीचे आजोबा शिवाजीराव कजबे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या

समाजापुढे मानवी तस्करी गंभीर प्रश्न

सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांचे प्रतिपादन; जिल्हा न्यायालयात मानवी तस्करी, वेठ बिगार निर्मूलन कायदा प्रशिक्षण व प्रक्रिया कार्यशाळा उत्साहात

नगर – भारत स्वतंत्र होऊन ७८ वर्ष होवून देखील आज ही अनेक ठिकाणी गरीब माणसाना प्राण्यासारखी वागणूक
दिली जात आहे. मानवी हक्काची जपवणुक होण्यासाठी त्यांना त्यांच्या अधिकाराची माहिती व्हायला हवी. समाजापुढे मानवी
तस्करी गंभीर प्रश्न निर्माण होत असताना नागरिकांमध्ये जागृती आवश्यक आहे. मानवी तस्करी, वेठबिगारी कमी करण्यासाठी अनेक संस्था पुढे येवून काम करत आहे. अमृवाहिनी या संस्थेने मागील काही वर्षात वेठबिगार निर्मूलनासाठी
केलेले काम कौतुकास्पद आहेच आणि गरजेचे देखील असल्याचे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी तस्करी, वेठ बिगार निर्मूलन कायदा प्रशिक्षण व प्रक्रिया या एकदिवशीय कार्यक्रम जिल्हा सत्र न्यायालयात पार पडले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश शेंडे बोलत होत्या.
जिल्हा विधी प्राधिकरणच्या सचिव तथा न्यायाधीश भाग्यश्री पाटील म्हणाल्या की, श्री अमृतवाहीनी ग्रामविकास मंडळ तर्फे वेळोवेळी मानवी तस्करी रोखणे व वेठबिगारी मुक्ततेसाठी प्रयत्न केले जाते, ही खूप मोठी सामाजिक चळवळ आहे. वेठबिगारी निर्मूलन व मानवी तस्करी कायदा व प्रक्रिया ही एकदिवशीय कार्यशाळेमुळे जनजागृती तर होईलच तसेच कायद्यातील कलम, पुनर्वसन प्रक्रिया, शासनाकडून मिळणारे आर्थिक मदत, अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी या कार्यशाळेमुळे पॅनल वकील व अधिकार मित्र यांना नव्याने शिकायला मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सिराज शेख यांनी अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ ही संस्था मागील दोन दशकापासून सामाजिक काम करत आहे, रस्त्यावरील बेवारस मनोरुग्ण, अनाथ, निराधार, वंचित, महिला, पुरुष व बालकांकरिता अहोरात्र परिश्रम घेत आहे. हे सामाजिक काम करत असताना मागील दोन वर्षापासून वेठबिगाराचे प्रमाण वाढत असल्याचे संस्थेच्या संचालक मंडळाच्या लक्षात आले, तेव्हा संस्थेमार्फत वेगवेगळ्या शाळा, कॉलेज, शासकीय यंत्रणा, पोलिस प्रशासन व ग्रामपंचायत आदी स्तरावर वेठबिगार कार्यक्रमाचे नियोजन करून जनजागृती करण्यात येत
असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात मानवी तस्करी प्रक्रियेवर पॅनल वकील व अधिकार मित्र (पीएलव्ही) यांना
वेठबिगार निर्मूलन कायदा १९७६ व मानवी तस्करी, बालमजुरी, बालविवाह यासारख्या कायद्यांवर मार्गदर्शन करुन प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी अ‍ॅड. तृप्ती पाटील (डीएलएसए पॅनल लॉयर ठाणे स्पेशल सेल), गोरख जाधव (सिनियर असोसिएट, इंटरनॅशनल जस्टिस मिश, मुंबई) व अमृतवाहिनी संस्थेचे सदस्य अंबादास गुंजाळ यांची उपस्थित होती.

या कार्यक्रमाप्रसंगी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. सुरेश लगड, अ‍ॅड. राजाभाऊ शिर्के, अ‍ॅड. सागर पादीर,
अ‍ॅड. संदीप वांढेकर, अ‍ॅड. रावसाहेब बर्डे, अ‍ॅड. वृषाली तांदळे, अ‍ॅड. भक्ती शिरसाठ, अ‍ॅड. बेबी कोरडे, अ‍ॅड.
मनीषा पंढरी, अ‍ॅड. अरुणा राशिनकर, अ‍ॅड. निशिता देशमुख, अ‍ॅड. आशा गोंधळे, अधिकार मित्र (पीएलव्ही)
प्रभाकर धिरडे, किशोर धोटे, तनिज शेख, शोभा गाडे आदी उपस्थित होते. संस्थेचे सचिव दिलीप गुंजाळ यांच्या
मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिराज शेख,
आंबादास गुंजाळ, मंगेश थोरात, संध्या कुलकर्णी, मयूरी वनवे, राहुल साबळे आदींनी परिश्रम घेतले. शिवानी
शिंगवी यांनी सूत्रसंचालन केले. संध्या कुलकर्णी यांनी आभार मानले.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आझाद मैदानावरील आंदोलन स्थगित

ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा न देता ३४ हजार कोटीचा अपहार; भारत ब्रॉडबँड कंपनी, केंद्र व राज्य सरकार विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार

नगर – भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड कंपनीने राज्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा देण्याच्या नावाखाली ३४ हजार
कोटी रुपयांचा अपहार केला असल्याच्या आरोपावर आधारित सरपंच परिषदेचे मुंबई येथील आझाद मैदानावर सुरु असलेले
उपोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. सरपंच परिषदेचे पुणे जिल्हा समन्वयक कुंडलिक कोहिनकर यांच्या पुढाकाराने सुरु असलेले उपोषण पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले. सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश उपाध्यक्ष विकास जाधव, राज्य कोर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे यांच्या हस्ते उपोषणकर्ते कोहिनकर यांना लिंबू पाणी देऊन उपोषण स्थगित केले. उपोषणकर्ते कोहिनकर यांच्यासह सरपंच परिषदेच्या राज्याच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव अमोल पाटणकर यांची भेट घेतली. भारत ब्रॉडबँड कंपनीची चौकशी करून राज्यातील सर्व ग्रामपंचायत यांना सक्षमपणे ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. यानंतर मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव, ग्राम विकास खात्याचे मुख्य सचिव, माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मुख्य सचिव यांची संयुक्त बैठक घेऊन यासंबंधी आढावा घेण्यात येईल आणि पंधरा दिवसानंतर सर्व खात्यांचे सचिव यांच्या बरोबर सरपंच
परिषदेच्या राज्यातील पदाधिकारी यांच्यासोबत आढावा घेऊन यावर ठोसा असा सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्य सचिव पाटणकर यांनी दिले. शासनाने नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क या योजनेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड इंटरनेट कनेशन उपलब्ध करून देण्यासाठी १२ एप्रिल २०१३ रोजी ही योजना आणली. ही योजना प्रभावीपणे
राबविण्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन व भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला आहे. परंतु या कंपनीने कराराचा भंग केला आहे कोणत्याही प्रकारची इंटरनेट सुविधा राज्यातील ग्रामपंचायतींना न देता
बोगसपणे खर्च करून ३४ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात
आला आहे. राज्यातील कोणत्याही ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून न देता, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाने खोटी आणि बोगस माहिती या संदर्भात दिली आहे. या योजनेत ३४ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होऊन जनतेच्या पैश्यांची लूट करण्यात आली आहे. शासनाने याबाबत ठोस भूमिका घेऊन सदर सुविधा राज्यातील ग्रामपंचायतींना पुरवली नाही. याबाबत सरपंच परिषद भारत ब्रॉडबँड नेटवर्क कंपनी, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना न्याय देण्यास कटिबद्ध राहील, अशी माहिती राज्य कोर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे यांनी दिली. सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. विकास जाधव, राज्य सरचिटणीस राजू पोतनीस, राज्य कोर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे, राज्य प्रसिद्ध प्रमुख संजयबापू
जगदाळे, राज्य कोर कमिटी उपाध्यक्ष जी.डी. टेमगिरे यांच्यासह सरपंच परिषदेचे अनेक राज्यातील पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. सरपंच परिषदेने आमदार श्रीकांत भारती, आमदार सुरेश धस, आमदार कैलास पाटील यांच्यामार्फत या विषयासंदर्भात लक्ष वेधण्याचे काम केले. या आंदोलनासाठी खेड सरपंच परिषदेचे मनोहर
पोखरकर, सरपंच चंद्रकांत भालेराव यांनी सहकार्य केले.

लंडनमधील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी शहरातील युवा साहित्यिक स्वप्निल खामकर यांची निवड

जगभरातील शास्त्रज्ञ, अभ्यासक, धोरणकर्ते आणि कायदेतज्ज्ञांचा असणार सहभाग

नगर – शहरातील युवा साहित्यिक स्वप्निल संजय खामकर यांची लंडनमधील ग्रेस इन येथे २४ व २५ एप्रिल रोजी होणार्‍या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली आहे. ही परिषद महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, मुंबई विद्यापीठ आणि ग्रेस इन, यूके यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते. या परिषदेत डॉ. आंबेडकर यांच्या कायद्याशी संबंधित योगदान, सामाजिक न्यायाची कल्पना आणि आर्थिक धोरणांवर चर्चा
केली जाणार आहे. विशेषतः त्यांच्या लंडनमधील शिक्षणाचा प्रभाव या विषयावर भर दिला जाणार आहे. स्वप्निल खामकर यांच्या निवडीमुळे शहरासह महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या परिषदेत जगभरातील शास्त्रज्ञ, अभ्यासक,
धोरणकर्ते आणि कायदेतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. प्रमुख चर्चेचे विषय आंबेडकरांचे कायदेशीर योगदान, समावेशक विकास, सामाजिक न्याय चळवळी आणि आजच्या काळातील त्यांचे विचार किती लागू आहेत, यावर आधारित असणार
आहेत.

या निवडीबद्दल खामकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय व समानतेच्या क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य आहे. ज्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतले, तिथे जाऊन त्यांच्या विचारांवर चर्चा करण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि जबाबदारीची बाब आहे. उद्योजकता विकास, युवक सशक्तीकरण आणि सामाजिक न्याय क्षेत्रात कार्यरत असलेल्या खामकर यांच्या सहभागातून चर्चा घडणार आहे. स्वप्निल खामकर याने
युवकांसाठी लिहिलेल्या झिरो टू लॉन्च आणि द सीईओ ऑफ द माईंड या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन नुकतेच उद्योग मंत्री उदय सामंत व शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले. तो २०१७ मध्ये इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या
वर्षात असताना वास्को-द-गामा वर आधारित ८ द गेम इज ऑन हा पुस्तक लिहिणारा महाराष्ट्रातील अत्यंत कमी वयाचा दुसरा युवक ठरला होता. त्याने ट्रॅडिशनल पब्लिशर ओथरचा मान मिळवला असून, त्याचे लिखाण युवकांना स्फुर्ती देणारे ठरत आहे.

सदर परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रेस इन मधून बार-ट-लॉफ झाल्याच्या १०० वर्षांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केली आहे आणि त्यांच्या मानवाधिकार, लोकशाही, आणि आर्थिक समतेवरील जागतिक प्रभावाला अधोरेखित करते.

आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्डियाक सेंटर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे हृदय बनले

प्रेमराज बोथरा यांचे प्रतिपादन; शिबिरात २६० रुग्णांची मोफत हृदय तपासणी

नगर – आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्डियाक सेंटर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे हृदय बनले आहे. महाराष्ट्रासह
देशातील कानाकोपर्‍यातून हृदयासंबंधी असलेल्या विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्ण येत आहेत. २००४ मध्ये
सेवाभावाने सुरु झालेल्या या सेवेने सर्वसामान्यांच्या हृदयात घर करुन मोठा विश्वास संपादन केला आहे. लहान मुलांपासून ते
ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हृदयासंबंधी सर्व शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या असून, आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्डियाक सेंटर सोशल हब म्हणून उदयास आले असल्याची भावना प्रेमराज बोथरा यांनी व्यक्त केली. राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये मोफत हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रेमराज बोथरा बोलत होते. बोथरा परिवारातील सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी संतोष बोथरा, सतीश बोथरा, मनिषा बोथरा, संगिता बोथरा, प्रतिभा बोथरा, मंगलताई रुनवाल (विजापूर कर्नाटक), सीए आयपी अजय मुथा, सतीश लोढा, डॉ. आशिष
भंडारी, अनिल मेहेर, डॉ. अमित थोपटे, डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. गिरी, डॉ. गवळी, डॉ. पारधे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात सीए आयपी अजय मुथा म्हणाले की, बोथरा परिवाराने उद्योग व सामाजिक क्षेत्रात नाव
उंचावले आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या निर्मितीपासून ते वर्धमान महावीर युनिव्हर्सिटी उभारण्यासाठी या परिवाराचे महत्त्वाचे योगदान मिळत आहे. हॉस्पिटलच्या प्रगतीच्या विविध टप्प्यांवर या परिवाराने भक्कमपणे योगदान दिले आहे. फक्त आर्थिक हातभार न लावता, तन व मनाने ते सेवा देत असून, शहरातील विविध महत्त्वकांशी सामाजिक प्रकल्पात ही त्यांचे मोलाचे योगदान आहे. समर्पण भावनेने बोथरा परिवाराचे कार्य सुरू असून, त्यांची नवीन पिढी देखील
या सेवा कार्यात योगदान देत आहे. वर्धमान महावीर युनिव्हर्सिटीसाठी त्यांची मोलाची साथ लाभत
असल्याचे त्यांनी सांगितले.  सतीश बोथरा यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या आरोग्य सेवेसाठी सर्व तन, मन,
धनाने योगदान देत आहे. येणार्‍या रुग्णांकडे माणुसकीच्या भावनेने पाहून त्याच्या जीवनातील वेदना
दूर करण्याचे काम हे आरोग्य मंदिर करत आहे. ही आरोग्यसेवा रुग्णांना आधार देणारी ठरत
असून, ही सेवा महाराष्ट्राची शान बनली असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरात २६० रुग्णांची मोफत  हृदय तपासणी करण्यात आली. तर शिबिरात सहभागी गरजूंची ३ हजार रुपयात अँजिओग्राफी करण्यात आली.
गरजेनुसार रुग्णांची बायपास सर्जरी, हृदयातील झडप बदलणे, हृदयातील छिद्र बुजविणे, लहान मुलांच्या हृदय
शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी अल्पदरात केल्या जाणार आहेत. तर महात्मा ज्योतीबा फुले जन
आरोग्य योजनेअंतर्गत या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. पाहुण्यांचे स्वागत डॉ. आशिष भंडारी यांनी केले.
अनिल मेहेर यांनी आभार मानले.

‘उर्दू स्कूल’च्या परवीन खान यांचा कर्तृत्ववान महिला पुरस्काराने गौरव

नगर – शहरातील नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू प्राथमिक स्कूलच्या शिक्षिका परवीन
फैसल खान यांना ठाणे येथील मातृसेवा फाउंडेशन आणि शिक्षक ध्येय यांच्यावतीने राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार
प्रदान करण्यात आला. खान यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
परवीन खान यांना नुकताच सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्यावतीने सचिव रेहान काझी व खजिनदार वाजिद खान यांनी त्यांचा सत्कार केला. विविध क्षेत्रातील महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मातृसेवा फाउंडेशन व शिक्षक
ध्येय यांच्यावतीने महिला दिनानिमित्त राज्यातील ३४ महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
परवीन खान या अहमदनगर उर्दू प्राथमिक स्कूलमध्ये शिक्षिका असून, अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करत
आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगतीसाठी त्या विविध शैक्षणिक उपक्रम राबवित असतात. पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना व्यवहारिक, व्यावसायिक ज्ञान मिळण्यासाठी व त्यांच्या शिक्षणाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने त्या योगदान देत आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्यातील रिक्त मंत्रीपदी आ.संग्राम जगताप यांना संधी द्या

नगर – उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यात रिक्त अलेल्या मंत्रीपदी आमदार
संग्राम जगताप यांना संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर
यांनी केली आहे. मंत्री धनंजय मुंढे यांच्या राजीनाम्या नंतर राज्यात राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक
मंत्रिपद सध्या रिक्त आहे. या रिक्त मंत्रीपदी आ.संग्राम जगताप यांची वर्णी लावण्याची मागणी आशा निंबाळकर
यांनी केली आहे. आ.संग्राम जगताप यांना जर मंत्रीपद दिले तर ते पूर्ण राज्यात आदर्शवत काम करून पक्षाचाही
नावलौकिक वाढवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या मागणीस उपस्थित महिला पदाधिकार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत प्रतिसाद दिला.
जिल्हा महिला आघाडीची नूतन कार्यकारिणी जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत जाहीर केली. यावेळी आ.जगताप यांच्या हस्ते सर्व नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्रे देण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना निंबाळकर यांनी ही मागणी केली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, जिल्हा कार्यालयीन सचिव साईनाथ भगत, माजी उपमहापौर दीपक सूळ, अरुणा गोयल आदींसह पदाधिकारी उपस्थित होत्या.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर, जिल्हा उपाध्यक्षा सुजाता कदम, स्मिता वाल्हेकर व संगीता ससे, नगर तालुका उपाध्यक्षा स्नेहल दरंदले, सरचिटणीस वनिता ठोंबे, जिल्हा सरचिटणीस कल्याणी गाडळकर, सरचिटणीस रोहिणी दळवी, कोषाध्यक्षा आश्विनी दळवी, सरचिटणीस स्वाती पवार, सरचिटणीस रुपाली तांबोळी, सचिव
अश्विनी झरेकर, उपतालुका प्रमुख टिना लालबेग, जिल्हा चिटणीस अंबिका भिसे, सहसचिव दिपाली आढाव,
सहसचिव भारती दिवटे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

जयंतीनिमित्त शिवसेना ठाकरे पक्षातर्फे छत्रपती शिवराय निबंध स्पर्धेचे आयोजन

नगर – शिवजयंतीचे औचित्य साधून अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवराय निबंध स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. पाच हजारहून अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे विचार उद्याचं राष्ट्राच भवितव्य घडविणार्‍या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. छत्रपती शिवरायांच्या दैदीप्यमान कर्तुत्वाचा जाज्वल्य इतिहास घराघरात पोहोचावा ही या मागची आमची भूमिका आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये भाग घ्यावा, असे आवाहन शहरप्रमुख किरण काळे यांनी केले आहे.

अहिल्यानगर शहर शिवसेना व शिक्षक सेनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन किरण काळे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले  असल्याची माहिती शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख तथा स्पर्धा समन्वयक अंबादास शिंदे यांनी दिली आहे. इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या वयोगटासाठी स्पर्धा असणार आहे. निबंधासाठी पाचशे शब्दांची मर्यादा आहे. प्रवेश सर्वांसाठी खुला व विनामूल्य असून २८ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत आहे.
स्पर्धकांनी आपला निबंध स्कॅन करून पीडीएफ फॉरमॅटमध्ये ९३२५१८२५९५, ९९२२९१४२६४ या व्हाट्सअप क्रमांकांवर पाठवायचा आहे. तसेच shivsenaubtahilyanagargmail.com या ईमेल आयडीवर देखील निबंध पाठविता
येतील. निबंध पाठविताना वरील बाजूस स्पर्धकाचे संपूर्ण नाव, इयत्ता, तुकडी, शाळेचे नाव, पालकांचे नाव व मोबाईल क्रमांक, संपूर्ण पत्ता नमूद करण्याचे आवाहन केले आहे.

स्पर्धेसाठी निबंधाचे पुढील दहा विषय देण्यात आले आहेत : १. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण, २. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन, ३. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, ४. छत्रपती शिवाजी महाराजां कडून मराठा साम्राज्याची
स्थापना, ५. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श, ६. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य, ७. छत्रपती शिवराय एक आदर्श राजा, ८. मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय, ९. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर, १०. छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र.

प्रत्येक इयत्तेसाठी प्रथम पाच व पाच उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. याप्रमाणे प्रत्येक इयत्तेसाठी दहा अशी एकूण पन्नास बक्षीसे दिली जाणार आहेत. शालेय साहित्य, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरूप
आहे. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभागा बद्दलचे प्रमाणपत्र देखील दिले जाणार असल्याचे म्हटले आहे.
उर्दू भाषेतून लिहिता येणार निबंध स्पर्धकांना चार विविध भाषांमधून निबंध लिहिता येणार आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजीसह उर्दू भाषेतून देखील स्पर्धक निबंध लिहू शकतील. शिवसेना ठाकरे पक्षाच्या पुढाकारामुळे अहिल्यानगर शहरात
पहिल्यांदाच या निमित्ताने छत्रपती शिवरायांवर उर्दू भाषेतून निबंध लेखन स्पर्धा पार पडत आहे. गँगस्टर्सचे उदात्तीकरण किळसवाणे १८६९ मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजयंती उत्सव सुरू केला.
जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं, शिवाजी महाराजांच
स्मरण व्हाव, असा हेतू यामागे होता. पण मागील शिवजयंती मिरवणुकीमध्ये जगभर
कुविख्यात असणार्‍या लॉरेन्स बिश्नोई सारख्या गँगस्टरचे पोस्टर अहिल्यानगर शहरात
झळकले. त्यामुळे शहराची भारतभर बदनामी झाली. गुन्हेगारीच उदात्तीकरण झालं.
तरुण पिढीसमोर चुकीचे आदर्श ठेवले जात आहेत. हे समाजासाठी घातक आहे. स्व.
अनिल राठोड हयात असताना तसं घडत नव्हतं. मिरवणुकांमध्ये कुणी दारू पिऊन
आलं, चुकीचं कृत्य केलं तर ते अशा व्यक्तीला लगेच बाजूला करायचे. पण त्यांच्या
पश्चात आता तसं राहिल नाही. म्हणूनच शहर शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचे
विचार भावी पिढीच्या मनात रुजले जावेत यासाठी निबंध स्पर्धेच्या माध्यमातून
त्यांना जाज्वल्य इतिहासाचा अभ्यास करण्या करिता प्रवृत्त करत व्यक्त होण्या करिता
व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे किरण काळे
यांनी म्हटले आहे.