केडगाव बायपास रोडवर स्क्रॅप गोडावूनला भीषण आग, मोठ्या प्रमाणात नुकसान महापालिका व एमआयडीसी अग्निशामक दलाने २ तासानंतर आग आणली नियंत्रणात

0
75

नगर – केडगाव बायपास रोडवर स्क्रॅप गोडावूनला १२ मार्च ला रात्री ११.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोडावून मधील सर्व साहित्य जळून खाक झाले. महापालिका अग्निशामक दलाचे २ बंब आणि एमआयडीसी अग्निशामक दलाचा १ बंब यांनी २ तास अथक प्रयत्न करून सदर आग आटोक्यात आणली. परंतु तो पर्यंत आगीत मोठे नुकसान झाले होते.

केडगाव बायपास रोडवर नेप्ती कांदा मार्केटजवळ फिरोज खान यांचे प्लास्टिक स्क्रॅप गोडावून आहे. या गोडावूनला रात्री ११.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ, चालक ज्ञानेश्वर चाकणे, फायरमन संजय शेलार, भरत पडघे, पांडुरंग झिने, बाबा कदम, मच्छिंद्र धोत्रे हे घटनास्थळी दाखल झाले. आगीचे रौद्र रूप पाहून सावेडी विभागाची गाडीही बोलावण्यात आली. त्यानंतर एमआयडीसी अग्निशामक दलालाही बोलावण्यात आले. एमआयडीसीचे अग्निशमन अधिकारी जगतसिंग जाट, प्रमुख फायरमन नितीन जाधव, राकेश चौधरी, गणेश कदम, बालाजी ओव्हाळ, कैलास नांगरे, राहुल भालगावकर, निलेश भालेराव, चालक प्रकाश शिंगाडे यांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. या ३ बंबांनी आगीवर पाण्याचा मारा करत सुमारे २ तास अथक परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळविले.

गोडावून मध्ये प्लास्टिकचे स्क्रॅप असल्याने आगीने काही काळातच रौद्र रूप घेतले होते. त्यामुळे आग नियंत्रणात येईपर्यंत गोडावून मधील सर्व स्क्रॅप जळून खाक झाले होते. या आगीच्या ज्वाला लांबूनही दिसत होत्या. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी तसेच बायपास ने जाणाऱ्या वाहनचालकांनी गर्दी केली होती. आगीत किती नुकसान झाले याची निश्चित माहिती मिळू शकली नाही.