अहिल्यानगरमधील व्यावसायिक दिपक परदेशी १५ दिवसांपासून बेपत्ता

पोलिसांच्या विविध पथकांकडून शोध सुरु, माहिती देण्याचे आवाहन

नगर – नगर शहरातील चितळे रोड वरील दीपक ऑईल डेपो चे मालक दीपक लालसिंग परदेशी (वय ६८, रा. बोल्हेगाव गावठाण, मराठी शाळेजवळ) हे २४ फेब्रुवारी पासून बेपत्ता झालेले आहेत. पोलिसांची विविध पथके त्यांचा कसून शोध घेत आहेत. परंतु अद्यापपर्यंत त्यांचा काहीही तपास लागलेला नसल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. दिपक परदेशी हे बोल्हेगांव गावठाण, मराठी शाळा परिसरातून २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता ते घरातून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा पुढील कोणताही तपास लागलेला नाही. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दिपक लालसिंग परदेशी हे हरवले असल्याची तक्रार दिली आहे. त्यानंतर तोफखाना पोलिसांचे गुन्हे शोध पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांचा शोध घेत आहेत. तरी दिपक लालसिंग परदेशी यांच्या बाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तोफखाना पोलीस स्टेशन अथवा परदेशी यांच्या कुटुंबियांकडे संपर्क साधावा असे आव्हान नगर शहराचे आमदार संग्राम जगताप व परदेशी कुटुंबीयांनी
केलेले आहे. संपर्क साधण्यासाठी तोफखाना पोलीस स्टेशन (०२४१) २४१६११८ तसेच मोबाईल क्र. ८३२९३३७००६, ९२२५४४४४४, ८९९९४४६९४२ पत्ता – दिपक ऑईल डेपो, छाया टॉकिज जवळ, चितळे रोड, अहिल्यानगर येथे संपर्क साधावा असे आवाहन परदेशी कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.

ऊस तोड कामगाराची मुलगी ठरली खासदार मॅरेथॉन स्पधेची विजेता

शेतकरी हितासाठी, समर्थनासाठी आणि न्याय हक्कासाठी ‘रन फॉर फार्मर’ चे शहरात आयोजन; खा. निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा

नगर – शेतकरी हितासाठी, समर्थनासाठी आणि न्याय हक्कासाठी रन फॉर फार्मर या टॅगलाईनने बायपास कल्याण रोड येथे खासदार मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे दोन हजार धावपटूंनी सहभाग घेतला होता, शेतकर्‍यांच्या सन्मानासाठी आणि आरोग्याच्या अधिकारासाठी १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि २.५ किलोमीटर स्पर्धेमध्ये ज्येष्ठ नागरिक, पुरुष, महिला, युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लवकरच मुंबई येथे राज्यस्तरीय महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे, खासदार मॅरेथॉन स्पर्धेतून एकतेचा संदेश देण्याचे काम झाले असल्याचे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले. निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण रोड बायपास येथे
खासदार मॅरेथॉन स्पर्धा झाली. यावेळी खा. निलेश लंके, माजी महापौर अभिषेक कळमकर, जि.प.चे माजी सभापती बाळासाहेब हराळ, माजी नगरसेवक योगीराज गाडे, बबलू रोहोकले, केशव बेरड, रेवजी नांगरे, बाळासाहेब खिलारी आदी उपस्थित होते. खासदार मॅरेथॉन स्पर्धेमध्ये महिला खुले गटातून सुरेखा मातने या विद्यार्थिनी प्रथम क्रमांक मिळविला असून ती ऊस तोड कामगाराची मुलगी असून तिची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून तिच्या पुढील शिक्षणाला आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन खासदार निलेश लंके यांनी दिले.
पुरुष खुला गटातून प्रथम क्रमांक चांगदेव लाटे, द्वितीय क्रमांक प्रेम काळे, वरिष्ठ पुरुष गटातून प्रथम क्रमांक सूर्यकांत  पारधे, द्वितीय  क्रमांक बाजीराव मोठे, तृतीय क्रमांक राजाराम लगड, महिला खुल्या गटातून प्रथम क्रमांक सुरेखा माने, द्वितीय क्रमांक सई चेमटे, तृतीय क्रमांक केतकी सांगळे, वरिष्ठ महिला गटातून प्रथम क्रमांक कविता
खंडेलवाल, द्वितीय क्रमांक स्वप्नाली पारधे, तृतीय क्रमांक रूपाली खंडेलवाल यांनी मिळविला असून खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले असल्याची माहिती योगीराज गाडे यांनी दिली.

आईने मुलांना समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी प्रेरणा द्यावी

छायाताई फिरोदिया यांचे प्रतिपादन; कै. सौ. इचरजबाई हस्तीमलजी मुनोत उद्योजकता विकास पुरस्काराचे वितरण

नगर – आजचा कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम असून अशा कार्यक्रमातून महिलांच्या कार्यकर्तृत्वाची नक्कीच ओळख होते.
आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्याची त्यांना प्रेरणा द्या. समाजात बदल घडवून आणायचा असेल तर आपल्या घरापासून सुरुवात करा हे काम एक आईच करू शकते असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शैक्षणिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या श्रीमती छायाताई फिरोदिया यांनी व्यक्त केले. के.जी. कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने कै. सौ. इचरजबाई हस्तीमलजी मुनोत उद्योजकता विकास पुरस्कार ८ मार्च रोजी केशर गुलाब मंगल कार्यालय येथे प्रदान करण्यात आले. यंदाचा पुरस्कार शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या श्रीमती छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते प्रा.मेधाताई यशवंत काळे, डॉ. ज्योत्स्ना पांडुरंग डौले, सौ.सविता हेमंत काळे, सौ.आशा बाळासाहेब काठेड या चार कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या उद्योजकतेच्या  आणि सामाजिक योगदानाच्या सन्मानार्थ दिला गेला. पुरस्कार विजेत्या प्रा. मेधाताई काळे यांनी महिलांच्या आर्थिक
स्वावलंबनासाठी पहिल्या महिला सहकारी बँकेची स्थापना करताना कराव्या लागणार्‍या खडतर कार्याची माहिती देऊन स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असूनही तिच्यावरील अन्याय, अत्याचार वाढत असून महिलांनी मुलांवर चांगले संस्कार करणे  गरजेचे असून  संस्कारातूनच या पिढीला वाचवावे लागेल व चांगले नागरिक घडवावे लागतील असे आपले विचार व्यक्त केले. डॉ.ज्योत्स्ना डौले या स्त्री रोग तज्ञ असून त्यांनी सुरू केलेल्या पहिल्या खतऋ (टेस्ट ट्यूब बेबी सेंटर) विषयी माहिती देऊन समाजात ताण- तणावाचे वातावरण वाढत असून सर्वांनी किमान अर्धा तास योगा आणि मेडिटेशन करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
सविता काळे या मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असून त्यांना खडू बनवणे, मेणबत्ती तयार करणे आणि फाईल बनवण्याचे प्रशिक्षण देतात. दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करणे, त्यांच्या क्षमतांचा विकास करणे, त्यांना आत्मनिर्भर करणे हाच ध्यास घेऊन त्यांनी आत्तापर्यंत ३००० दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भर केले आहे अशी त्यांच्या कार्याची
माहिती दिली. सौ.आशा काठेड या उत्कृष्ट स्वयंपाक कौशल्य असलेल्या गृहिणी  असून त्यांनी छोट्या स्तरावर खाद्यपदार्थ तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशरचंद गुलाबचंद मुनोत सार्वजनिक ट्रस्टचे सचिव लालचंद मुनोत हे होते. केशरचंद गुलाबचंद मुनोत
ट्रस्टचे विश्वस्त संचालक किशोर मुनोत यांनी आपल्या आईच्या कै. सौ.इचरजबाई हस्तीमलजी मुनोत यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी माहिती सांगून पुरस्कार विजेत्या महिलांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक करून पुढेही या पुरस्काराचे सातत्य ठेवले जाईल अशी माहिती दिली. तर के.जी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.डॉ.स्वाती
मुनोत यांनी आपल्या प्रास्ताविकेत पुरस्कार विजेत्या महिलांनी केवळ स्वतःच्या यशासाठी नाही तर समाजाच्या प्रगतीसाठी स्वतः ला समर्पित केले आहे त्यांच्या अथक प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी त्यांच्या यशाचा हा उत्सव आम्ही साजरा करत आहोत यातून नवीन पिढीला मार्गदर्शन मिळेल अधिकाधिक महिलांना पुढे येण्याची प्रेरणा मिळेल. महिला दिन हा केवळ दिनदर्शिकेवरील तारीख नसून तो लिंग समानता व महिलांच्या सशक्तिकरणाचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे असे
प्रतिपादन केले.  सूत्रसंचालन प्रा. डॉ. वर्षा कीर्तने यांनी तर आभार प्रा. आरती खेडकर यांनी मानले.
याप्रसंगी सौ.सुजाता मुनोत, प्राचार्य खासेराव शितोळे, कार्यालयीन अधीक्षक संतोष  मुनोत, प्रा. डॉ.प्रशांत खोपटीकर, प्रा. स्नेहल बोरावके, प्रा. सविता चव्हाण, प्रा. डॉ. राहुल थोरात, सौ. अमृता मुळे, सौ.हर्षाली रासकर व विद्यार्थी उपस्थित होते.

आनंदऋषीजी हॉस्पिटलची आरोग्यसेवा रुग्णांसाठी संजीवनी

भगवानदास गुगळे यांचे प्रतिपादन; मोफत नेत्र रोग तपासणी शिबिराला ज्येष्ठांचा प्रतिसाद, ७५० रुग्णांची तपासणी

नगर – व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांना आनंदऋषीजी हॉस्पिटल नवजीवन देण्याचे काम करीत आहे. हॉस्पिटलची आरोग्यसेवा रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. सर्वसामान्य घटकांना याचा लाभ मिळत असून, सेवाभाववृत्तीने
कार्य सुरु आहे. आरोग्य शिबिर घेऊन सर्वसामान्यांना आधार व निरोगी समाजासाठी हे हॉस्पिटल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या मानवसेवेच्या कार्यात गुगळे परिवाराच्या वतीने सातत्याने योगदान राहणार असल्याची भावना
भगवानदास गुगळे यांनी केले. राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या नेत्रालय विभागात मोफत नेत्र रोग तपासणी शिबिर पार
पडले. या शिबिराचे उद्घाटन भगवानदास गुगळे व मंगलाताई गुगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. पंकज गुगळे, महेश गुगळे, नेत्र तपासणी चळवळीतील समाजसेवक अशोक शिंगवी, स्मिता गुगळे, सोनल गुगळे, सार्थक गुगळे, समीक्षा गुगळे, रिया गुगळे, सिध्दार्थ गुगळे, संतोष बोथरा, आनंद छाजेड,
माणकचंद कटारिया, अनिल मेहेर, डॉ. अशोक म्हाडिक, डॉ. संदीप राणे, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. प्रतिक कटारिया, डॉ. विशाल तांबे, डॉ. किरण शिंदे आदी उपस्थित होते. अशोक शिंगवी म्हणाले की, जामखेडला आनंदऋषीजी
नेत्रालयाचे व्हिजन सेंटर सुरू आहे. तेथून आलेल्या दृष्टीहीन रुग्ण या आरोग्य मंदिरातून दृष्टी घेऊन जातात. ४० वर्षा पासून जामखेड मध्ये अविरत नेत्र शिबिर घेत असून, शिबिरातील रुग्णांना उपचारासाठी या नेत्रालयात दाखल करुन त्यांना दृष्टी दिली जात आहे. तर एका महिलेला सर्व हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेनंतर देखील दृष्टी येणार नसल्याचे सांगण्यात आले होते,
मात्र आनंदऋषीजी नेत्रालयात त्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन तिला नवदृष्टी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
सार्थक गुगळे यांनी मानव जात ही एक समान असून, या मानवतेच्या भावनेने आनंदऋषीजी हॉस्पिटल कार्य करत असल्याचे
स्पष्ट केले. रिया गुगळे हिने आरोग्य शिबिरातून सर्व सामान्यांना आधार मिळत आहे. शेवटच्या घटकापर्यंत
आरोग्यसेवेचा लाभ पोहचवून माणुसकीच्या भावनेने उभे राहिलेले हे मानवतेचे कार्य असल्याचे
सांगितले. एका रुग्णाच्या नातेवाईकाने देखील हॉस्पिटल हे मानवतेचे मंदिर झाले असून, येथे सेवाभाव जपला जात असल्याची भावना व्यक्त केली. या शिबिरात ७५० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
यामधील गरजू रुग्णांवर अल्पदरात मोतीबिंदू, काचबिंदू आदी नेत्र दोषाच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद छाजेड यांनी केले. आभार अनिल मेहेर यांनी मानले.

भाग्योदय विद्यालयाने सफाई सेविकांचा केलेला सत्कार स्तुत्य उपक्रम

उपायुक्त प्रियंका शिंदे यांचे प्रतिपादन; भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महिला दिन साजरा

नगर – नगर -महिला दिनानिमित्ताने भाग्योदय विद्यालयाने केडगाव सफाई सेविकांचा केलेला सत्कार कार्यक्रम खूप सुत्य उपक्रम राबविला. शाळेतील मुलींचा सत्कार शाळेतील मुलांनी करायचा आणि मुलींनी जिद्दीने उभे राहायचे. महिलांचा सन्मान  फक्त आजच्या दिवशी करायचा नाही तर वर्षभर आपली आई, बहिण, मैत्रीण यांचा सन्मान करायचा प्रत्येक काम लहान किंवा मोठे नसते. सफाई कामगारांचा सन्मान केला, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मुलींनी शिक्षण घेऊन माझ्यासारखे
अधिकारी होण्याची इच्छा बाळगावी. क्रीडा क्षेत्र सामाजिक क्षेत्र उद्योग क्षेत्र इतर क्षेत्रात आपला ठसा उमठावा. यासाठी मुलींनी संयमाने राहावे व फेसबुक, इंस्टाग्राम यांचे वापर कमी करावा, असे प्रतिपादन अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रियंका शिंदे यांनी केले.
भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महिला दिनाचे औचित्याने केडगांव येथील सफाई महिला
सेवकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रियंका शिंदे, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, मुख्याध्यापक
बन्सी नरवडे, कोतकर बाबासाहेब, गोविंद कदम आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात श्रीमती केरुळकर यांनी सावित्रीबाई
फुले, झाशीची राणी, जिजामाता, मदर टेरेसा, इंदिरा गांधी या व्यक्तिमत्त्वांचा आदर्श मांडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानदेव बेरड यांनी आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. विद्येसाठी आपण सरस्वतीची पूजा करतो. धनप्राप्तीसाठी आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो. अशी आपली भारतीय संस्कृती आहे कुठल्याही आर्थिक परिस्थिती
चांगली नसताना केवळ जिद्दीच्या बळावर अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपायुक्त पदावर काम करणार्‍या
प्रियंकाताई शिंदे यांचा मुलींनी आदर्श घ्यावा. प्राचीन काळी चूल आणि मूल या पलीकडे महिलांचे जीवन नव्हते.
सतीची चाल, बाल विवाह आशा रुढीपरंपरा होत्या. परंतु महात्मा फुले, महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणाच्या उद्धाराचे
काम केले. महिलांना समाजात मानाचे स्थान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय पांडुळे यांनी केले.
गोविंद कदम यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोपान तोडमल, साहेबराव कार्ले, धनंजय
बारगळ, संतोष काकडे, रुपाली शिंदे, रेणुका गुंड,  कांडेकर गोरक्ष, एकनाथ होले तसेच गणेश गायकवाड,
सुधाकर गायकवाड, बाळू कावरे यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी विद्यालयातील महिला शिक्षकांचा पाहुण्यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला.

‘नारी सन्मान पुरस्कारा’ने सरोज आल्हाट यांचा गौरव

नगर – येथील कवयित्री, मुक्त पत्रकार सरोज आल्हाट यांचा महिलादिनी राज्यस्तरीय नारी सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. गेल्या अठरा वर्षांपासून सामाजिक तथा साहित्यिक उपक्रम राबविणार्‍या उपदेशक आयोजित राज्यस्तरीय महिला मेळाव्यात आल्हाट यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉन बॉस्को येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपदेशकचे संस्थापक विक्रम गायकवाड यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आल्हाट यांना प्रदान करण्यात आला. या वर्षाची जागतिक महिला दिनाची थीम असलेली एसलरेट शन अर्थात फक्त चर्चा न होता वेगाने कृती करा! या विषयावर सरोज आल्हाट यांनी मार्गदर्शन केले. महिलांवर होणार्‍या अत्याचारावर आल्हाट यांनी स्वरचित मदर इंडिया ही कविता सादर केली. या कवितेला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक संतप्त

तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला इशारा

नगर – शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील संपूर्ण आगरकर मळा, रेल्वेस्टेशन परिसर काटवण खंडोबा, कायनेटिक चौक, गायके मळा, पंचशील वाडी, इंगळे वस्ती हे परिसर व सर्व टाकी वरील मेन लाईन वरील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. आम्ही वारंवार प्रशासनाला कळवून सुद्धा काही सुधारणा झाली नाही. पाण्याची टाकी वेळेवर भरत नाही.
त्यामुळे नागरिकास पाणी मिळत नाही गेल्या १ ते २ महिन्यापासून सांगून देखील काही सुविधा होत
नाही तरी याची दखल घेऊन पाण्याच्या आवक मध्ये वाढ करण्यात यावी अन्यथा महानगरपालिकेत
उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. प्रभाग क्र.१५ मधील आगरकर मळा
भागातील नागरीकांच्या वतीने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, यासाठी मनपा आयुक्त यशवंत डांगे
यांना निवदेन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक अनिल शिंदे, दत्ता
जाधव, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे यांच्यासह परिसरातील नागरीक उपस्थित होते.
मनपा एकीकडे पाणीपट्टीची भरमसाठ वाढ करते, तर दुसरीकडे नागरीकांना पाण्यावाचून
वंचित ठेवते. नागरीकांना आधीच दिवसाआड पाणी आणि त्यातही कमी दाबाने पुरवठा होतो. त्यामुळे
नागरीकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते. तरी यामध्ये सुधारणा होणे गरजचे आहे .
अन्यथा नागरीकांसह मनपामध्ये तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे दत्ता जाधव
यांनी सांगितले. यावेळी बोलताना नगरसेवक अनिल शिंदे म्हणाले की, सर्वत्र उन्हामुळे पाण्याची कमतरता
वाढू लागली. नागरीकांना पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे. या अगोदर सुध्दा मनपाच्या
पाणी पुरवठा विभागास आम्ही सांगितले होते की, या भागातील नागरीकांना पाणी पुरवठा हा कमी
प्रमाणात व अपुर्‍या दाबाने तर काही भागांमध्ये पाणी पुरवठा होतच नाही. त्यामुळे नागरीकांच्या रोषाला
सामोरे जावून आम्हा नगरसेवकांना उत्तरे द्यावी लागतात आणि प्रशासनाचे कोणीही या भागाकडे
लक्ष देत नाही. नागरीकांचा जर उद्रेक झाला तर त्याची सर्व जबाबदारी मनपा प्रशासनावर राहिल,
असा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

अहमदनगर सीए शाखेच्या अध्यक्षपदी प्रसाद पुराणिक, उपाध्यक्षपदी अभयकुमार कटारिया यांची एकमताने निवड

सचिवपदी सीए महेश तिवारी तर खजिनदारपदी सीए महेश भळगट; अहमदनगर सीए शाखेच्या नविन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ

नगर – अहमदनगर सीए शाखेच्या २०२५-२९ सालाकरिता व्यवस्थापकीय समितीच्या सभासदांसाठी निवडणूक नुकतीच झाली. यात नवनिर्वाचित सभासदांमधून सन २०२५-२६ या वर्षासाठी पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.

शाखेचे मावळते अध्यक्ष सीए सनित मुथा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खालीलप्रमाणे पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष – सीए प्रसाद पुराणिक, उपाध्यक्ष व विकासा अध्यक्ष – सीए अभयकुमार कटारिया, सचिव – सीए महेश  तिवारी, खजिनदार – सीए महेश भळगट, सभासद – सीए सुनंदा रच्चा, सीए चांसी आगरवाल.

सीए प्रसाद पुराणिक हे मावळते उपाध्यक्ष असून, एकमताने त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सीए अभयकुमार कटारिया यांची उपाध्यक्ष पदाबरोबरच सीए विद्यार्थी शाखेच्या (थखउअडअ) अध्यक्षपदीही निवड करण्यात आली. सर्व नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रण समारंभ ७ मार्च रोजी सीए भवन येथे पार पडला. या कार्यक्रमाला आयसीएआयचे सेंट्रल कौन्सिल मेंबर सीए मंगेश किनरे उपस्थित होते.
प्रथम मावळते अध्यक्ष सीए सनित मुथा यांनी स्वागत करून नूतन पदाधिकार्‍यांची घोषणा केली. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नगर सीए शाखेच्या आपल्या प्रवासात सहभागी सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
नूतन अध्यक्ष सीए प्रसाद पुराणिक यांनी निवडीबद्दल आभार मानून ध्येय, धोरण व येत्या वर्षातील उपक्रमाविषयी माहिती दिली.
नूतन उपाध्यक्ष सीए अभयकुमार कटारिया यांनी विद्यार्थी शाखेचे नूतन अध्यक्ष म्हणून उपक्रमाविषयी माहिती दिली.
तसेच सचिव सीए महेश तिवारी व खजिनदार सीए महेश भळगट, सभासद सीए सुनंदा रच्चा व चांसी आगरवाल यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सीए मंगेश किनरे यांनी बोलताना प्रथम सर्व नूतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले. तसेच नगर सीए शाखेला व विद्यार्थी शाखेला सन २०२४-२५ साठी उत्कृष्ठ शाखेचा प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल नगर शाखेचेही अभिनंदन केले. नूतन पदाधिकार्‍यांना अधिक कार्यक्षमतेने व प्रभावी काम करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी नगर शाखेचे माजी अध्यक्ष सीए मोहन बरमेचा, सीए आयपी अजय मुथा  व सीए ज्ञानेश कुलकर्णी यांची भाषण झाले. कार्यक्रमाला माजी अध्यक्ष सीए संजय देशमुख, सीए मिलिंद जांगडा, सीए सुशील जैन, सीए प्रसाद भंडारी, सीए (डॉ.) परेश बोरा, सीए संदीप देसरडा, सीए पवनकुमार दरक, सीए ज्ञानेश्वर काळे तसेच इतर सीए सभासद आदी उपस्थित होते.
उपाध्यक्ष सीए अभयकुमार कटारिया यांनी आभार मानले तर सीए शतानंद कळेढोणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केल

तलवार घेऊन फिरणार्‍यास भुईकोट किल्ल्याजवळ पकडले

नगर – धारदार तलवार घेऊन फिरणार्‍या एकास भिंगार कॅम्प पोलीसांनी शिताफीने पकडून त्याच्याकडील धारदार तलवार  जप्त करुन त्यास ताब्यात घेतले. ही कारवाई ८ मार्च रोजी भुईकोट किल्ल्याजवळ नगर लबकडे जाणारे रोडवर केली.
फूरकान अन्वर कुरेशी (वय २५ रा नागरदेवळे फाटा, ता. नगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार दिपक शिंदे यांना मिळालेल्या माहितीवरुन स.पो.नि. जगदीश मुलगीर यांनी पोलीस पथकास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकातील अंमलदार यांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन सापळा लावला असता काही वेळात माहिती प्रमाणे एकजण नगर लबकडे पायी येताना दिसला. त्यास पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याचे तयारीत असताना त्यास जागीच पकडून त्याची झडती घेतली असता त्याचे कंबरेला लावलेली धारदार तलवार मिळून आल्याने त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने फूरकान अन्वर कुरेशी असे सांगितले. पोलिसांनी त्यास तलवारीसह ताब्यात घेतले.
या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फूरकान कुरेशी याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे दाखल करण्यात आला. ही कारवाई भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर
यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार कैलास सोनार, दिपक शिंदे, विलास गारुडकर, रवी टकले, पांडुरंग बारगजे, अंकुश कासार, कैलास शिरसाठ, समीर शेख यांनी केली

योग्य संस्कार व संस्कृतीचा अवलंब करणार्‍या महिला उच्च पदावरती काम करत आहेत

रामेश्वर ढाकणे यांचे प्रतिपादन; मुख्य डाकघर मध्ये महिला दिनानिमित्त होम मिनिस्टरचा रंगला कार्यक्रम; पोस्टल महिला कर्मचार्‍यांनी लुटला आनंद

नगर – योग्य संस्कार व संस्कृतीचा अवलंब करून आज समाजात वावरणार्‍या महिला आज उच्च पदावरती काम करत आहेत, जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा देश सेवा करणार्‍या सर्व महिला कर्मचार्‍यांच्या योग्य तो सन्मान करणे हे आपले
कर्तव्य आहे असे प्रतिपादन अहिल्यानगर पोस्टल सोसायटीचे चेअरमन रामेश्वर
ढाकणे यांनी व्यक्त केले.
अहिल्यानगर मुख्य डाकघर येथे महिला दिनानिमित्त होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगला होता. विविध स्पर्धेने होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात महिला कर्मचार्‍यांमध्ये उत्साह संचारला होता. सर्व महिलांनी या कार्यक्रमात एकत्र येऊन स्त्री
शक्तीचा जागर केला. अहिल्यानगर वरिष्ठ डाक अधीक्षक हेमंत खडकीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
तसेच युनियनचे सेक्रेटरी प्रमोद कदम व सलीम शेख यांनी सर्व महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. खासदार निलेश लंके यांनी फोनवरून महिला दिनाच्या शुभेच्छा देत, महिला कर्मचार्‍यांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतल्याबद्दल कौतुक केले. वेगवेगळ्या उखाण्यांसहित महिलांच्या वारीने या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. यामध्ये रिंग
फेकणे, फुगे उडवणे आणि नाव घेणे यांसारखे खेळ खेळले गेले. राजेंद्र टाक यांनी विविध स्पर्धा घेतल्या. रंगलेला
हा खेळ पैठणीच्या कार्यक्रमात विविध स्पर्धेचा सामना करीत महिलांनी मनोरंजनात्मक खेळाचा आनंद लुटला.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांकाची पैठणी
साडीचे बक्षीस श्रीमती ऋतुजा कराळे यांनी पटकाविले. तसेच द्वितीय क्रमांकाचे बक्षीस नीलिमा शुक्रे व प्रश्नमंजुषा
या स्पर्धेमध्ये विविध महिलांना आकर्षक बक्षीसे देण्यात आली. या कार्यक्रमासाठी सर्व पोस्टल महिलां
कर्मचार्‍यांचा प्रतिसाद लाभला. आगळावेगळा कार्यक्रम पोस्टल विभागामध्ये आयोजित निवृत्त महिलांसाठी हा
एक मनोरंजनात्मक कार्यक्रम ठरला. हेमंत खडकीकर म्हणाले की, प्रत्येक महिलेमध्ये विविध सुप्त कलागुण असतात. पण संसाराच्या जबाबदार्‍या पेलविताना तिच्यामध्ये असलेले कलागुण कोमजतात. या कार्यक्रमातून तिच्या कलागुण वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंब, नोकरी आणि विविध क्षेत्रात गुंतलेल्या महिलांना थोडा वेळ स्वतःसाठी मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाची रुपरेषा आखण्यात आल्याचे प्रमोद कदम यांनी स्पष्ट केले.
तसेच या कार्यक्रमांमध्ये स्त्री शक्तीचा संदेश देण्यासाठी नृत्य सादर करण्यात आले. प्रास्तविक प्रफुल्ल कुमार काळे यांनी केले. आभार गणेश केसकर यांनी मानले. यासाठी पोस्टल कर्मचारी शुभांगी मांडगे, सपना चिलवर, रूपाली निसाळ, अश्विनी फुलकर, मोनाली हिंगे, अर्चना लांडे, सीमा कचरे, नीलिमा शेकटकर, ज्योती कांबळे, संयुक्ता पोळ, नमिता देशपांडे, स्मिता साखरे, शुभांगी सस्कर, स्मिता कुलांगे, शरद नऊसुपे, अजय आगळे, दत्तात्रय जासुद, रामराव धस,
अजय खेडकर, सुखदेव पालवे, सागर कळगुंडे, संदीप मिसाळ, राजेंद्र गवते, संजय परभने, सुनील कुलकर्णी,
शिवाजी कांबळे, विजय चाबुकस्वार, नितीन खेडकर, महेश टकले उपस्थित होते