आईने मुलांना समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी प्रेरणा द्यावी

0
29

छायाताई फिरोदिया यांचे प्रतिपादन; कै. सौ. इचरजबाई हस्तीमलजी मुनोत उद्योजकता विकास पुरस्काराचे वितरण

नगर – आजचा कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम असून अशा कार्यक्रमातून महिलांच्या कार्यकर्तृत्वाची नक्कीच ओळख होते.
आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्याची त्यांना प्रेरणा द्या. समाजात बदल घडवून आणायचा असेल तर आपल्या घरापासून सुरुवात करा हे काम एक आईच करू शकते असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शैक्षणिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या श्रीमती छायाताई फिरोदिया यांनी व्यक्त केले. के.जी. कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने कै. सौ. इचरजबाई हस्तीमलजी मुनोत उद्योजकता विकास पुरस्कार ८ मार्च रोजी केशर गुलाब मंगल कार्यालय येथे प्रदान करण्यात आले. यंदाचा पुरस्कार शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या श्रीमती छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते प्रा.मेधाताई यशवंत काळे, डॉ. ज्योत्स्ना पांडुरंग डौले, सौ.सविता हेमंत काळे, सौ.आशा बाळासाहेब काठेड या चार कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या उद्योजकतेच्या  आणि सामाजिक योगदानाच्या सन्मानार्थ दिला गेला. पुरस्कार विजेत्या प्रा. मेधाताई काळे यांनी महिलांच्या आर्थिक
स्वावलंबनासाठी पहिल्या महिला सहकारी बँकेची स्थापना करताना कराव्या लागणार्‍या खडतर कार्याची माहिती देऊन स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असूनही तिच्यावरील अन्याय, अत्याचार वाढत असून महिलांनी मुलांवर चांगले संस्कार करणे  गरजेचे असून  संस्कारातूनच या पिढीला वाचवावे लागेल व चांगले नागरिक घडवावे लागतील असे आपले विचार व्यक्त केले. डॉ.ज्योत्स्ना डौले या स्त्री रोग तज्ञ असून त्यांनी सुरू केलेल्या पहिल्या खतऋ (टेस्ट ट्यूब बेबी सेंटर) विषयी माहिती देऊन समाजात ताण- तणावाचे वातावरण वाढत असून सर्वांनी किमान अर्धा तास योगा आणि मेडिटेशन करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
सविता काळे या मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असून त्यांना खडू बनवणे, मेणबत्ती तयार करणे आणि फाईल बनवण्याचे प्रशिक्षण देतात. दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करणे, त्यांच्या क्षमतांचा विकास करणे, त्यांना आत्मनिर्भर करणे हाच ध्यास घेऊन त्यांनी आत्तापर्यंत ३००० दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भर केले आहे अशी त्यांच्या कार्याची
माहिती दिली. सौ.आशा काठेड या उत्कृष्ट स्वयंपाक कौशल्य असलेल्या गृहिणी  असून त्यांनी छोट्या स्तरावर खाद्यपदार्थ तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशरचंद गुलाबचंद मुनोत सार्वजनिक ट्रस्टचे सचिव लालचंद मुनोत हे होते. केशरचंद गुलाबचंद मुनोत
ट्रस्टचे विश्वस्त संचालक किशोर मुनोत यांनी आपल्या आईच्या कै. सौ.इचरजबाई हस्तीमलजी मुनोत यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी माहिती सांगून पुरस्कार विजेत्या महिलांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक करून पुढेही या पुरस्काराचे सातत्य ठेवले जाईल अशी माहिती दिली. तर के.जी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.डॉ.स्वाती
मुनोत यांनी आपल्या प्रास्ताविकेत पुरस्कार विजेत्या महिलांनी केवळ स्वतःच्या यशासाठी नाही तर समाजाच्या प्रगतीसाठी स्वतः ला समर्पित केले आहे त्यांच्या अथक प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी त्यांच्या यशाचा हा उत्सव आम्ही साजरा करत आहोत यातून नवीन पिढीला मार्गदर्शन मिळेल अधिकाधिक महिलांना पुढे येण्याची प्रेरणा मिळेल. महिला दिन हा केवळ दिनदर्शिकेवरील तारीख नसून तो लिंग समानता व महिलांच्या सशक्तिकरणाचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे असे
प्रतिपादन केले.  सूत्रसंचालन प्रा. डॉ. वर्षा कीर्तने यांनी तर आभार प्रा. आरती खेडकर यांनी मानले.
याप्रसंगी सौ.सुजाता मुनोत, प्राचार्य खासेराव शितोळे, कार्यालयीन अधीक्षक संतोष  मुनोत, प्रा. डॉ.प्रशांत खोपटीकर, प्रा. स्नेहल बोरावके, प्रा. सविता चव्हाण, प्रा. डॉ. राहुल थोरात, सौ. अमृता मुळे, सौ.हर्षाली रासकर व विद्यार्थी उपस्थित होते.