नगर जिल्ह्यात १०९ केंद्रांवर बारावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात

सर्व केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ मॉनिटरिंग हाय अलर्ट मोडवर चालू, पहिला पेपर मास्टर प्लॅन नुसार सुरळीत नगर – नगर जिल्ह्यात १०९ केंद्रांवर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या लेखी परीक्षेला ११ फेब्रुवारी पासून सुरूवात झाली. परीक्षेसाठी जिल्ह्यात  ६३ हजार ६५८ विद्यार्थी आहेत. परीक्षा केंद्रावरील सरसकट शिक्षक, शिक्षकेतर आणि परिचर यांच्या आदला-बदल करण्यास शिक्षक संघटनांनी विरोध केल्यानंतर आता गेल्या पाच वर्षात परीक्षेत गैरप्रकार झालेल्या केंद्रांवरील पर्यवेक्षण यंत्रणेत बदल करण्यात आला आहे. तसेच सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही ची नजर असून गैरप्रकार रोखण्यासाठी प्रथमच सर्व केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ करण्यात येत आहे. परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त व्हाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दक्षता समितीची बैठक घेवून महत्वपूर्ण कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर सीसीटिव्ही कॅमेर्‍याची नजर असणार आहे. शिवाय केंद्राबाहेर गोंधळ घालणार्‍यांवर ड्रोन कॅमेर्‍यांचा वॉच आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष  येरेकर हे वेब कास्टिंग द्वारे परीक्षेचे अपडेट घेत असून महत्त्वपूर्ण सूचना प्रसारित करीत आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील संवेदनशील व महत्त्वाच्या परीक्षा केंद्रांचे वेब कास्टिंग होत असून जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे. ड्रोन कॅमेरा ,सीसीटीव्ही तसेच परीक्षा केंद्रातील वेब कास्टिंग आदी व्हिडिओ फुटेच्या माध्यमातून दक्षता समिती सदस्य वेब कास्टिंगची मॉनिटरिंग हाय अलर्ट मोडवर करत आहेत. काही मिनिटांच्या ठराविक कालांतराने वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी वार रूमला भेट देऊन महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. जिल्हास्तरीय दक्षता समिती सदस्यांचे ‘लक्ष’ ज्या शाळेत कॉपीचा प्रकार निदर्शनास येईल, त्या शाळेची परीक्षा केंद्रासह मान्यताही रद्द करण्यात येईल, असा सज्जड इशाराही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिला आहे. १० वी व १२ वीची बोर्ड परीक्षेसंदर्भात जिल्हास्तरीय दक्षता समिती सदस्यांनी परीक्षा सुरू होताच विविध पातळ्यांवर काम करायला सुरुवात केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, बाळासाहेब बुगे (शिक्षणाधिकारी – योजना), पोलिस निरीक्षक खेडकर, आकाश दरेकर, सुरेश ढवळे, श्रीराम थोरात आदी समिती सदस्य जिल्ह्यातील विविध केंद्रांवर नकारात्मक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. गैरमार्गाची प्रकरणे निरंक करण्यासाठी अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती केंद्रावर समाविष्ट असणार्‍या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचार्‍यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचार्‍यांमधून करण्यात येणार आहे, परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहणार आहे. तर परीक्षा केंद्र व शाळेची मान्यता होणार रद्द कॉपीमुक्त परीक्षेसाठी संवेदनशील केंद्रावर ड्रोन कॅमेरे, गैरप्रकारात सहभागी परीक्षा केंद्राची मान्यता रद्द, गैरप्रकारात सहभागी शाळेची मान्यता रद्द, परीक्षा केंद्रांचे पथकामार्फत वेबकास्टींग मॉनिटरींग, परीक्षा केंद्रावरील बैठे पथकांचे दोन स्तर, मोबाईल अँपच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर वॉच, सर्व परीक्षा केंद्रांवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असणार, जिल्हा आणि तालुकास्तरावरुन विशेष भरारी पथक, संवेदनशिल केंद्रावर जास्त बंदोबस्त, राज्य परीक्षा मंडळाकडून भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून जिल्हाभरात ही पथके कार्यरत झाली आहेत.

वंजारी समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या विठ्ठल सातपुते यांच्यावर कारवाई करावी

नगर – केडगाव येथील विठ्ठल सातपुते यांनी वंजारी समाजाबद्दल अपशब्द वापरून समाजाच्या भावना दुखावल्या आहे. व्यक्तिगत वादामध्ये समाजाला ओढण्याचे काम केले जाते, वंजारी महिलेला देखील लज्जास्पद बोलून महिलेच्या विशिष्ट भागाला सिगरेटचे चटके देऊन मारहाण करण्याची भाषा वापरली जाते. ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे, विठ्ठल सातपुते हा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती असून तो मोबाईलवर बोलताना म्हणतो की मी आबा सातपुते रांगोळी हॉटेल दिलीप सातपुतेचा भाऊ सगळ्यांचा बाप अशी अरेरावीची भाषा वापरून दमदाटी करून कायद्याचा कुठलाही धाक नसल्याचे दाखवत आहे, समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम या व्यक्तीकडून होत आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीला जातीय सलोखा बिघडला असून अशा व्यक्तींपासून आपल्या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो तरी पोलीस प्रशासनाने आबा सातपुते या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी वंजारी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदनाद्वारे केले आहे. यावेळी भीमराज आव्हाड, वैभव ढाकणे, कैलास गर्जे, संतोष ढाकणे, राहुल सांगळे, ओंकार आव्हाड, सतीश ढाकणे, रामदास सांगळे, भाऊसाहेब वनवे, संदीप ढाकणे, आकाश जावळे, अजय गीते, विक्रांत पालवे, ओंकार घुले, शुभम आघाव, संकेत दहिफळे, युवराज आव्हाड, अक्षय आघाव, कौस्तुभ गायकवाड, विकास राठोड, योगेश आव्हाड, मल्हारी आव्हाड, तुलसीदास बोडके, संदीप ढाकणे आदी उपस्थित होते. आबा सातपुते यांनी बोलताना भान बाळगले पाहिजे, व्यक्तिगत भांडणांमध्ये समाजाला ओढून जातीवाचक शिवीगाळ करणे योग्य नाही जर त्यांच्यामध्ये गुर्मी असेल तर आम्ही त्यांना धडा शिकवू, यांच्यावर पोलीस प्रशासनाने जर कारवाई केली नाही तर आम्ही समाजाच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा भीमराज आव्हाड यांनी दिला. दारूच्या नशेमध्ये टेबलावर बसून वंजारी समाजाबद्दल अपशब्द वापरून समाजाच्या भावना दुखावल्या आहे. आज पोलीस प्रमुख यांची भेट घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. चितावणीखोर वक्तव्य करून दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचे काम आबा सातपुते यांनी केले आहे त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले जाईल असा इशारा वैभव ढाकणे यांनी दिला.

समाजातील संवेदना जागृक करण्यासाठी, निस्वार्थ सामाजिक कार्य पुढे आणण्याची गरज

सिद्धराम सालीमठ यांचे प्रतिपादन; ऋणानुबंध संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान नगर – समाजात संवेदना बोथट होत चालल्या असून, निस्वार्थपणे समाजासाठी कार्य करत असलेल्यांचे कार्य पुढे आणण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे समाजाला एक प्रेरणा, दिशा व ऊर्जा मिळणार असल्याचे स्पष्ट करून, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी समाजातील संवेदनांची गऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा २०२३-२४ यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शहरातील माऊली सभागृहात पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. याप्रसंगी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, ऋणानुबंध संस्थेचे अध्यक्ष अजित रोकडे, उपाध्यक्ष सारिका रघुवंशी, सचिव प्रशांत बंडगर, सुफी गायक पवन नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सामाजिक कार्य करणाऱ्यांचा आदर्श समोर ठेवून, समाजातील संवेदना जागृक करण्याचे काम केले गेले पाहिजे. विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्यांची एक पुस्तिका तयार करून ती सर्वांपर्यंत पोहोचल्यास या कामाची व्याप्ती वाढणार आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते कुवत नसताना देखील संघर्षातून सामाजिक कार्य करत आहे, त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात अजित रोकडे यांनी विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळे काम करणाऱ्या व्यक्तींचे काम लोकांसमोर आणून त्यांचा सन्मान करणे व नागरिकांपर्यंत त्यांचे कार्य पोहोचविणे, हा या पुरस्कार सोहळ्यामागील उद्देश्य असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदी-मराठी गीतांची मैफल रंगली होती. यामध्ये शिर्डीवाले साईबाबा, बेखुदी ने सनम, देखा एक ख्वाब, तुमसे मिलकर ऐसा लगा आणि अन्य हिंदी-मराठी गीतांचे सादरीकरण करण्यात आले. रसिक श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थितांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल पुणे येथील उद्योजक विजय मोरे, तृतीयपंथीय डॉ. आम्रपाली उर्फ अमित मोहिते, नाशिकचे महंत डॉ. रत्नाकर पवार, संदीप सोनवणे, लातूरचे कृषी क्षेत्रातील कार्य करणारे बाळासाहेब दाताळ, आरोग्य क्षेत्रातील डॉ. दीप्ती साळी, शिक्षण क्षेत्रासाठी शिशु संगोपन संस्थेचे दशरथ खोसे, इतिहास संशोधन आणि संवर्धन कार्यासाठी पत्रकार भूषण देशमुख व मराठी भाषा संवर्धनासाठी तुकाराम जगताप यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, कृषी व ग्रामीण पत्रकारितेसाठी कै. अशोक तुपे यांना मरणोपरांत पुरस्काराने गौरविण्यात आले. याचबरोबर सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षापासून योगदान देत असलेले हेल्पिंग हॅन्ड्स फॉर हंगर्स ग्रुप, बालघर प्रकल्पाचे युवराज गुंड, सावली संस्थेचे नितेश बनसोडे आणि श्रीगोंदा येथी पारधी आदिवासी मुलांसाठी संस्था चालवणाऱ्या शुभांगी झेंडे यांना विशेष सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यानंतर सभागृहात सोडत पद्धतीने भाग्यवान विजेत्यांना पैठणी साडीचे बक्षीस देण्यात आले. सूत्रसंचालन चारुता शिवकुमार यांनी केले. आभार सारिका रघुवंशी यांनी मानले.

बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर टाकला; खाजगी रुग्णालयाला ५ हजारांचा दंड

  नगर – रुग्णालयात रोज निर्माण होणाऱ्या बायोमेडिकल वेस्टची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मात्र, या नियमालाच शहरातील काही रुग्णालये केराची टोपली दाखवत असून उघड्यावर सर्रास जैविक कचरा फेकला जात आह. परिणामी संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. शहरातील रुग्णालयातून बायोमेडिकल वेस्ट चा कचरा दररोज मोठ्या प्रमाणात निघत असून घातक असा हा कचरा काही रुग्णालयाकडून उघड्यावर टाकला जात आहे. वास्तविक महापालिकेने बायोमेडिकल वेस्टसाठी खासगी मक्तेदाराला ठेका दिला आहे असे असतानाही येथील एका रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. सदर बाब येथील महावीर पोखरणा यांनी महापालिकेचे सावेडीचे स्वच्छता निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी श्रीराम चौकातील सदर रुग्णालयास ५००० रु.ची दंडात्मक कारवाई केली.

मंगलगेट येथील सेतू कार्यालय व मोबाईल शॉपी फोडणारे चौघे जेरबंद

आरोपींमध्ये २ अल्पवयीन मुलांचा समावेश, चोरीचे दोन गुन्हे आले उघडकीस नगर – शहरातील मंगलगेट परिसरातील सेतू कार्यालय व मोबाईल शॉपी फोडणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. कोठला परिसरातील हॉटेल कुरेशी जवळ १० फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. अकबर लुकमान खान (वय २२) दस्तगीर हमीद शेख (वय ३५, दोघे रा. दौलावडगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांच्यासह २ अल्पवयीन मुलांचा यामध्ये समावेश आहे. या बाबतची माहिती अशी की, इरफान वाहिद शेख (रा. दर्गादायरा, मुकुंदनगर) यांच्या मालकीचे हॉटेल राजेंद्र शेजारी, मंगलगेट याठिकाणी असलेले सेतु केंद्र व मोबाईल शॉपी हे दुकान १५ जानेवारीला रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या वरच्या बाजुचे पत्रे उचकाटून मोबाईल शॉपीत प्रवेश करून रोख रक्कम व मोबाईल सेसरीज चोरून नेल्या होत्या. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना या गुन्हयाचा समांतर तपास करून, गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून तपास सुरु केला. पथकाने गुन्हयाचे घटनास्थळी भेट देऊन, आसपासचे सी.सी.टी.व्ही. फूटेज व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे हा गुन्हा अकबर खान (रा. दौलावडगाव, ता. आष्टी, जि. बीड) याने त्याचे साथीदारासह केल्याचे तपासात निष्पन्न केले. पथकास १० फेब्रुवारी रोजी अकबर खान हा हॉटेल कुरेशी समोर, कोठला याठिकाणी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने मिळालेल्या माहितीवरुन कोठला येथून आरोपी अकबर खान दस्तगीर शेख व २ अल्पवयीन मुलांना पकडले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर अकबर खान याने विधीसंघर्षित बालकासोबत एक ते दीड महिन्यापुर्वी मंगलगेट परिसरामध्ये एका सिगारेट व गोळ्या बिस्कीटचे दुकानामध्ये प्रवेश करून रोख रक्कम चोरल्याची माहिती सांगीतली. तसेच २० ते २५ दिवसापुर्वी कोंड्यामामा चौक परिसरातून सेतु केंद्रामधुन रोख रक्कम व दुकानातील स्पीकर, ब्लुटुथ चोरून नेल्याची माहिती सांगीतली. चोरीच्या गुन्ह्यातील रक्कम ते आपसात वाटुन घेत असल्याची माहिती सांगीतली. आरोपीने दिलेल्या माहितीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेले २ चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ताब्यात घेतलेले आरोपी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हयाचे तपासकामी हजर करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उप अधिक्षक अमोल भारती यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, शिवाजी ढाकणे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे यांनी केली आहे.

महापालिकेच्या ओंकारनगर शाळेतील विद्यार्थी संख्या १४ वर्षात २० पटीने वाढली

अपुऱ्या वर्ग खोल्यांचा प्रश्न आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या पुढाकारातून मार्गी; दोन नवीन वर्ग खोल्यांसाठी निधी मंजूर; महिनाभरात प्रत्यक्ष काम सुरू होणार नगर – महानगरपालिकेच्या केडगाव येथील आयएसओ मानांकन प्राप्त ओंकारनगर प्राथमिक शाळेला १४ वर्षे पूर्ण होत आहेत. विविध पुरस्कार प्राप्त करणाऱ्या या शाळेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतात. शिक्षणाचा दर्जा कायम राखणाऱ्या शाळेची पट संख्या स्थापनेपासून तब्बल २० पटींनी वाढली आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन या शाळेसाठी आणखी दोन वर्ग खोळ्यांना अनुदान मंजूर करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. एकीकडे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत असताना महानगरपालिकेच्या शाळेत पट संख्या वाढत असल्याने या शाळेसाठी व तेथील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी नुकतीच या शाळेला भेट देऊन आढावा घेतला. ओंकारनगर प्राथमिक शाळेची स्थापना जून २०११ मध्ये करण्यात आली. त्यावेळी शाळेची पटसंख्या अवधी ४ होती. आमितीला ८१ विद्यार्थी याशाळेत शिक्षण घेत आहेत. शाळेत दोन वर्गखोल्या असून इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग सुरू आहेत. जून २०११ ते जुलै २०१४ दरम्यान शशिकांत वाघुलकर हे एकच शिक्षक शाळेत होते. १५ जुलै २०१४ ला भाऊसाहेब कबाडी यांची नियुक्ती करण्यात आली. सप्टेंबर २०१५ पर्यंत शाळा एकशिक्षकी होती. सप्टेंबर २०१५ मध्ये शिवराज वाघमारे यांची शाळेत नियुक्ती करण्यात आली. शाळा द्विशिक्षकी झाली. सन २०१७-१८ मध्ये शाळेची पटसंख्या ६४ झाल्यावर वषाली गावडे यांची शाळेत नियुक्ती करण्यात आली. १५ जुलै २०१४ पासून भाऊसाहेब कबाडी हे मुख्याध्यापक म्हणून शाळेचे कामकाज पाहतात. दोनच वर्गखोल्या असल्यामुळे सन २०१९-२० पासून दरवर्षी जूनमध्येच शाळेचे प्रवेश बंद करावे लागतात. विविध उपक्रम व चांगल्या सुविधा असल्याने शाळेला १८ सप्टेंबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी व प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र मिळाले. आयएसओ मानांकन मिळणारी ओंकारनगर ही अहिल्यानगर महानगरपालिकेची पहिलीच शाळा आहे. जुने रेकॉर्ड मांडणी, व्हीझिटर नोंदवही, विद्यार्थी फाईल, नाविन्यपूर्ण उपक्रम, वृक्षारोपण, लोकसहभाग, कंपोस्ट खत, चप्पल स्टॅन्ड, समित्या फलक, घोषवाक्य, संदेशसुविचार, खिडक्यांना पडदे, स्वच्छता व टापटीपपणा, शिक्षक व विद्यार्थी ओळखपत्र, दिशादर्शक फलक, बोलका व्हरांडा, शालेय क्रीडांगण, क्रीडा साहित्य मांडणी, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, कोपरे, पार्किंग व्यवस्था, वीज बचत, पाणी बचत संदेश, स्वच्छता संदेश, स्वच्छ सुंदर शालेय बहिरंग व अंतरंग, प्रथमोपचार पेटी, ई लर्निंग सुविधा, परसबाग, शौचालय सुविधा, अग्निशमन यंत्र, वाचनालय, संरक्षक भिंत, सूचना व कौतुक पेटी, विद्यार्थी गणवेश, विद्यार्थी गुणवत्ता या निकषांच्या आधारे शाळेला आयएसओ मानांकन मिळाले. सन २०१६ मध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेचा स्वच्छ, सुंदर शाळा पुरस्कार, अहिल्यानगर जिल्हास्तरीय उपक्रमशील शाळा पुरस्कार, हायजिन लंच बॉक्स स्पर्धेत अशोकभाऊ फिरोदिया शाळेसमोर अहिल्यानगर शहरातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, २०२१ मध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार, केंद्र शासनाच्या पोर्टलवर शाळेच्या यशोगाथेचा समावेश, केंद्र शासनाच्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेत शाळेला फाइव्ह स्टार मानांकन, राज्यस्तरीय प्रेरणादायी शाळा पुरस्कार, अहिल्यानगर जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट पर्यावरणपूरक शाळा स्पर्धेत ओंकारनगर शाळेला द्वितीय क्रमांक, परसबाग निर्मिती स्पर्धेत अहिल्यानगर शहरातून प्रथम क्रमांक असे नऊ पुरस्कार व पारितोषिके या शाळेला मिळाले आहेत. शाळेला आतापर्यंत विविध दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांकडून ८ लाख ५० हजार रुपये लोकसह‌भाग मिळाला आहे. यातून शाळेत विविध अद्ययावत भौतिक सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. शाळेत टॉयबैंक उपक्रम, शालेय परसबाग, कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प, विद्यार्थी बचत बँक, शैक्षणिक सहल व क्षेत्रभेट, बाल आनंद मेळावा, वार्षिक स्नेहसंमेलन, दिनांक तो पाढा, मुक्त बाल वाचनालय, दर शनिवारी दप्तर मुक्त शाळा, १०० टक्के उपस्थितीसाठी दरमहा बक्षीस, वाढदिवसाला रोपटे भेट, ज्ञानरचनावादी अध्यापन आदी उपक्रम शाळेत राबवले जातात. शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांना विविध सामाजिक संस्थांकडून राष्ट्रीय व राज्यस्तरीय २० पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुरस्कारामध्ये मिळालेली रक्कम त्यांनी शाळेच्या विकासासाठी वापरली आहे. तसेच शाळेतील सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे यांनाही विविध सामाजिक संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांनाही विविध स्पर्धामध्ये पारितोषिक प्राप्त झालेले आहेत. या शाळेचा आलेख चढता असल्याने विद्यार्थी संख्या वाढत आहे. याचाच विचार करून शाळेला आणखी दोन वर्गखोल्या बांधण्यासाठी निधी मंजूर करून दिला आहे. येत्या महिनाभरात वर्ग खोल्यांच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

नगरमध्ये पोलिस असल्याची बतावणी करून लुटणारी टोळी सक्रीय

  आनंदधाम पाठोपाठ पाईपलाईन रोडवरही वृद्धाची सोन्याची चेन व अंगठी पळविली  नगर – पोलिस असल्याची बतावणी करून लुटणारी टोळी नगर शहर आणि उपनगरी भागात सक्रीय झाली आहे. २ दिवसांपूर्वी आनंदधाम रस्त्यावर उद्योजकाला लुटल्याची तसेच नवीन टिळक रोडवर मोपेडवर चाललेल्या महिलेचे गंठण हिसका मारून तोडून नेल्याच्या घटना ताज्या असताना, ९ फेब्रुवारीला सायंकाळी ५.४० च्या सुमारास पाईपलाईन रोडवरही रस्त्याने वॉकिंग करत असलेल्या वृद्धाला अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन व हाताच्या बोटातील अंगठी बळजबरीने काढून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत दिपक त्र्यंबक आंबेकर (वय ६७, रा. श्रीकृष्ण नगर, हॉटेल सागर समोर, पाईपलाईन रोड, अ.नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आंबेकर हे ९ फेब्रुवारीला सायंकाळी नेहमीप्रमाणे वॉकिंग करता गेले होते. पाईपलाईन रोडवर असलेल्या सुर्यकांत फर्निचर दुकाना जवळ त्यांना दोन अनोळखी इसम मोटारसायकलवर रस्त्याच्या कडेला उभे असलेले दिसले. ते तसेच पुढे गेले असता थोड्याच अंतरावर आणखीन एका मोटार सायकलवर दोन अनोळखी रस्त्याच्या कडेला बसलेले दिसले. त्यातील एकाने आंबेकर यांना थांबून एक कार्ड दाखवून मी पोलीस आहे. तुमच्या गळ्यातील चेन व अंगठी काढून द्या असे म्हटले. त्यावर आंबेकर यांनी तुम्ही पोलीस आहात तर माझ्या गळ्यातील सोने का मागता असे म्हटले असता त्यातील एकाने त्यांच्या पाठीमागून हाताने धक्का दिला. त्यामुळे गोंधळून आंबेकर यांनी त्यांच्या गळ्यातील ३ तोळे वजनाची सोन्याची चेन व हाताच्या बोटातील ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा ऐवज काढून दिला. त्यानंतर लगेचच ते चारही अनोळखी इसम त्यांच्याकडील दोन मोटार सायकल वरून श्रीराम चौकाच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेले. काही वेळातच आपण लुटलो गेलो असल्याचे आंबेकर यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र नागरिक जमा होईपर्यंत ते चौघेही पसार झाले होते. त्यानंतर दिपक आंबेकर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी चार अनोळखी इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २०४, ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत करीत आहे. शहर परिसरात ४ दिवसांत घडल्या लुटीच्या ३ घटना शहरातील नवीन टिळक रोडवर ६ फेब्रुवारीला सायंकाळी ७.३० च्या सुमारास मोपेड वरून घरी चाललेल्या सौ.मिनाबाई बाळासाहेब शिरसाठ (वय- ४०, रा. इधाते शाळेजवळ, भगवानबाबा नगर, सारसनगर) यांना धक्का देवून त्यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाचे १ लाख २९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण मोटारसायकल वर आलेल्या दोघांनी बळजबरीने हिसकावून नेले होते. त्या पाठोपाठ एमआयडीसी मधील उद्योजक राजाराम राय (वय ६२) यांना ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आनंदधाम रस्त्यावर मोटारसायकल वर आलेल्या दोघांनी अडवून पोलिस असल्याची बतावणी करून तुम्ही हेल्मेट का नाही घातले? तुमचा वाहन चालविण्याचा परवाना दाखवा असे दटावले. त्यानंतर तुम्हाला कळत नाही का, या भागात किती चेन स्नॅचिंग च्या घटना घडत आहेत. तरीही तुम्ही गळ्यात सोन्याची चेन, हातात अंगठ्या घालून फिरता. कालच या परिसरात चेन स्नॅचिंग झाली आहे. त्यामुळे तुम्ही गळ्यातील चेन आणि अंगठ्या काढून ठेवा असे म्हणत त्यांना त्या काढायला लावल्या आणि त्यांची नजर चुकवून ते दागिने लंपास करण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा पाईपलाईन रोडवर ९ फेब्रुवारीला अशीच घटना घडली आहे. चोरट्यांनी पोलिसांनाच दिले आव्हान पोलिस असल्याची बतावणी करत लुटमार करणाऱ्या या टोळीने ४ दिवसांत ३ ठिकाणी आणि ते ही अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर लुटमार करत शहर पोलिसांनाच आव्हान दिले आहे. पोलिस दलाने शहरासह उपनगरात मुख्य चौक तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. या शिवाय नागरिक, व्यापारी यांचेही खाजगी सीसीटीव्ही कॅमेरे ठिकठिकाणी आहेत. असे असतानाही गेल्या ४ -५ दिवसांत पोलिसांना या टोळीचा काहीही तपास लागलेला नाही. त्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे शोभेच्या वस्तू ठरताहेत काय? किंवा पोलिसांनी या घटना गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. अशी शंका उपस्थित होत आहे. दिवसा ढवळ्या, मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी जर अशा लुटमारीच्या घटना वारंवार होत असतील तर पोलिसांचा गुन्हेगारांवर काही वचकच राहिलेला नाही असे दिसत आहे. त्यामुळे आता जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनीच याचा जाब शहरातील पोलिस यंत्रणेला विचारण्याची गरज आहे.

शाळकरी मुले व नागरिकांवर हल्ले करणारे माकड अखेर जेरबंद

वनविभागाच्या टीमने  राबविले रेस्क्यू ऑपरेशन, माकडाला सुरक्षित अधिवासात सोडले नगर – गेल्या काही दिवसांपासून नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा गावात नागरिक तसेच शाळकरी मुलांवर हल्ला करणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाच्या पथकाला यश आले. या माकडाला सुरक्षित अधिवासात सोडल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सोमवारी १० फेब्रुवारीला सकाळी हे रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. पिंपळगाव वाघा गावात गेल्या काही दिवसांपासून एक माकड धुमाकूळ घालत होते. सदर माकड जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातच वावरत होते. त्यामुळे अनेक शाळकरी मुलांवर तसेच परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांवर त्याने हल्ले केले होते. माकडाच्या या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढत चालल्याने त्याला जेरबंद करण्याची आग्रही मागणी नागरिकांनी केली होती. गावच्या सरपंचांनी देखील २ दिवसांपूर्वी वन विभागाला पत्र देवून या हल्ले खोर माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यामुळे १० फेब्रुवारीला सकाळीच वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अशोक गाडेकर, चालक संदीप ठोंबरे, वन कर्मचारी सखाराम येणारे, तेजस झिने, सुभाष हंडोरे, वन्यजीव अभ्यासक हर्षद कटारिया, सचिन क्षीरसागर यांच्या पथकाने गावात दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले. बराच वेळ त्या माकडाला पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर अखेर त्याला भूलीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात रेस्क्यू टिमला यश आले. या पथकाने माकडाला पिंजऱ्यात बंदिस्त करून सुरक्षित अधिवासात सोडल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

चौका चौकात गुन्हेगारांच्या टोळ्या, हप्ते वसुली, महिला मुलींची छेडखानी, बिंगो, मटक्याचे अड्डे, वेश्याव्यवसाय सुरू आहे, पोलीस करताय तरी काय?

वाढलेल्या गुन्हेगारीमुळे शहरासह उपनगर परिसराचा बिहार झाला; गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तडीपार करा रात्रीची गस्त वाढवा; टोळ्यांचा बंदोबस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन नगर शहरातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा बोल्हेगाव-नागापूर परिसरातील वाढलेल्या गुन्हेगारीमुळे या परिसराचा बिहार झाला असून या भागातील गुन्हेगारी पोलिसांनी तातडीने मोडून काढावी अन्यथा रस्त्यावर उतरून नागरिकांसह तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. पत्रकार परिषदेमध्ये पुढे म्हटले आहे की, बोल्हेगाव-नागापूर भागातील वाढलेल्या गुन्हेगारीबाबत संताप व्यक्त करत पोलिसांच्या अर्थपूर्ण निष्क्रिय भूमिकेवर जोरदार टीकास्त्र केले. बोल्हेगावनागापूर एमआयडीसी भागात सध्या चौका-चौकात गुन्हेगारांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्या हप्ते वसुली, महिला मुलींची छेडखानी, बिंगो मटक्याचे अड्डे चालवित असून या भागातील महिला, तरुणी, सर्वसामान्य नागरिक, दुकानदार, व्यापारी कुणीही सुरक्षित राहिला नाही. सर्वसामान्य माणसांना दादागिरी केली असून जीवघेणे हल्ले करून खुनाचे प्रयत्न होत आहे तर गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे पाप एमआयडीसी व तोफखाना पोलीस करत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या भागातील ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशांना तातडीने तडीपार करावे व एमआयडीसी खंडणीमुक्त व हप्तेवसुलीमुक्त करावी. बोल्हेगाव-नागापूर परिसरात रात्रीची गस्त वाढून चौकाचौकात बसणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा या भागातील रहिवासी भागात सुरू असलेला वेश्याव्यवसाय बंद करण्यात यावा, अशी मागणी दत्ता पाटील सप्रे यांनी केली आहे. या भागात रात्री-अपरात्री मोटरसायकलवर टोळके फिरते. चौकामध्ये टवाळक्या करत असून महिला, मुलींची छेडखानी होते यासाठी पोलिसांनी विशेष गस्त सुरू करून या टोळक्यांना आवर घालण्याची गरज आहे. एमआयडीसी परिसरातील नागापूर, बोल्हेगाव फाटा, बोल्हेगाव पुल, लोकवस्तीतील अंतर्गत चौक अशा परिसरातील चौकांमध्ये रात्री ११ नंतर तरुणांची टोळकी बसून राहतात व हे रस्त्यावर का थांबतात अशी विचारणा करण्यासाठी पोलीस पथक या भागात येत नाही त्यातूनच गुन्हेगारी वाढली आहे. या टोळक्यांना काहींचा राजकीय वरदहस्त असल्याने त्यांची मुजोरीही वाढली आहे. गेल्या काही वर्षापासून नगर शहराचा विस्तार होत आहे. बोल्हेगाव, एमआयडीसी, नागापूर, तपोवन रोड आदी महापालिका हद्दीतील उपनगरांमध्ये दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे परंतु या लोकवस्तीला आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून धोका निर्माण झाला आहे. या भागातील गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ झाली आहे. सद्यस्थितीत नगर शहरात कार्यरत असलेल्या कोतवाली व तोफखाना या दोन पोलीस ठाण्यांच्या अंतर्गतच हा सर्व भाग येतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने व वाढती गुन्हेगारी लोकसंख्या रहदारी आदी बाबी लक्षात घेता बोल्हेगाव, सावेडी भागासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे देण्यात यावे. तोफखाना, सावेडी व एमआयडीसी पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी द्यावे अशी मागणी दत्ता पाटील सप्रे यांनी केली असून, या भागातील गुन्हेगारांकडून चोरी, घरफोडी यांच्यासह घातक शस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, कामगारांकडून हप्ते वसुली करणे, अवैध सावकारकी व वेश्याव्यवसाय असे गंभीर गुन्हे केले जात आहेत. सर्वसामान्य लोकांवर दहशत निर्माण करून सार्वजनिक व्यवस्था धोक्यात आणली आहे त्यामुळे या गुन्हेगारी विरोधात कोणीही पोलीस ठाण्यापर्यंत जाण्याची हिंमत करत नाही. मागील काही दिवसांतील घटना पाहता चाकूहल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न, एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करणे, अवैध सावकारी किंवा त्या अंतर्गत कामगारांना वेठीस धरणे आदी प्रकार उघडकीस आले आहे. या सर्व गुन्हेगारी कृत्याकडे एक जबाबदार लोकप्रतिनिधी व नागरिक म्हणून शांतपणे पाहणे शक्य नाही. आम्ही लोकप्रतिनिधी असल्याने या भागातील नागरिकांच्या सुरक्षेची आम्हाला काळजी आहे. चौकाचौकात बिंगोचे व मटक्याचे अड्डे सुरू असून, त्यांना कोणत्या पोलिसांचा आशीर्वाद आहे? असा सवालही दत्ता पाटील सप्रे यांनी केला. तेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बोल्हेगाव, नागापूर, एमआयडीसी भागातील गुन्हेगारी सक्तीने मोडून काढावी व या भागाचा विहार होण्यापासून वाचवावे अन्यथा आम्हाला नागरिकांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही दत्ता पाटील सप्रे यांनी घेतलेला पत्रकार परिषदेमध्ये सांगितले

न्यायालयाच्या निकालानंतरही देयके मिळत नसल्याने कामगारांमध्ये संतप्त भावना, सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा, थकीत देयकांसाठी कंपनीसमोर केले ठिय्या

नगर – बुऱ्हाणनगर (ता. नगर) येथील व्हिडिओकॉन (सध्याची फोर्स अप्लायन्स) कंपनीतील कामगारांनी मार्च २०१८ पासूनची थकीत पगाराची देयके मिळावी म्हणून नगर जिल्हा मजदूर सेनेच्या वतीने कंपनी समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. न्यायालयाचा निकाल लागूनही पगार न मिळाल्याने कामगारांमध्ये संतप्त भावना आहेत. जोपर्यंत थकीत देयके मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, देयके न मिळाल्यास सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. नगर जिल्हा मजदूर सेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात विद्या पवार, आप्पासाहेब पाटील, मीना रोकडे, बिजली लांडे, सुनिता क्षीरसागर, रवींद्र कुदळे, पाराजी पानसंबळ, अनिल गादिया, लक्ष्मण लोखंडे, नितीन गांधी यांच्यासह अनेक कामगार सहभागी झाले आहेत. रविवारी (दि.९ फेब्रुवारी) या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. व्हिडिओकॉन कंपनीतील १५० ते २०० कामगारांना मार्च २०१८ पासून पगार मिळालेले नाहीत. कंपनी कडून कामगारांना ३.५ कोटी रुपयांची देयके देणे बाकी आहे. यामधील ३० कामगारांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने २०२३ मध्ये निकाल देऊन, कंपनीला सर्व कामगारांची थकीत देयके देण्याचे आदेश दिले होते. तथापि, आजतागायत कामगारांना त्यांचे देयके मिळालेली नाहीत. कंपनीच्या जागेवर एका बँकेने ताबा घेतला असून, ती मालमत्ता विक्री केली आहे. परंतु, विक्रीनंतर देखील कामगारांचे देयके अद्याप दिलेले नाहीत, यामुळे कामगारांत मोठा रोष पसरला आहे. बाबुशेठ टायरवाले यांनी सांगितले की, बँकेला न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांची थकलेली देयके मालमत्ता विक्री पश्चात देणे बंधनकारक आहे. परंतु, बँकेने परस्पर जागा विकून कामगारांवर अन्याय केला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी हा लढा तीव्र केला जाईल, असे त्यांनी ठामपणे भूमिका स्पष्ट केली. कंपनीतील महिला कामगार मीना रोकडे यांनी सांगितले की, मार्च २०१८ पासून वेतन दिलेले नाही, त्यामुळे सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील देयके मिळत नसल्यास, हे कामगारांसाठी एक मोठी शोकांतिका आहे. कामगारांचा जीवन जगणे-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे स्पष्ट केले. न्याय, हक्कासाठी संघर्षमय लढाई अजूनही चालू आहे, आणि यासाठी आक्रमक भूमिकेच्या तयारीत असल्याची भावना कामागरांनी व्यक्त केली

शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ

  पक्षाचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सदस्य नोंदणीचे नियोजन करा : आ.संग्राम जगताप नगर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात फॉर्म ठेवून करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असून सर्वांनी पक्ष संघटना वाढीसाठी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करावी, पक्षाचे विचार शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी विभागानुसार सदस्य नोंदणीचे नियोजन करावे आपण महायुती सरकारमध्ये काम करत आहे. काश्मीर भूमीतील पीओके शब्द पुसला पाहिजे आणि अखंड भारत निर्माण होण्यासाठी हिंदुत्वाची खरी गरज आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कुठलेही शुभ कार्य करायचे असेल धार्मिकतेपासून करावे लागते, शहराचे श्रद्धास्थान श्री विशाल गणपती मंदिरात सदस्य नोंदणीचा शुभारंभ केला असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ श्री विशाल गणपती मंदिरात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, गणेश भोसले, अविनाश घुले, प्रा. माणिकराव विधाते, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, संभाजी पवार, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, कार्याध्यक्ष प्रा. अरविंद शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, युवक अध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, दीपक खेडकर, शिवाजी साळवे, डॉ. रणजीत सत्रे, मळु गाडळकर, सतीश ढवण, भरत गारुडकर, विनीत गाडे, गणेश बोरुडे, आकाश दंडवते, रेणुका पुंड, मयुरी गोरे, संगीता अकोलकर, सुनंदा शिरवाळे, सुरेखा फुलपगारे, राणी भाकरे, अपर्णा पालवे, शालिनी राठोड, आरती उफाडे, सुनंदा कांबळे, मंजुषा शिरसाठ आदी उपस्थित होते शहरामध्ये आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण पक्षाचे काम करत आहोत, आता महापालिकेत निवडणूक येणार असून या ठिकाणी महायुतीची सत्ता आणायची आहे, तरी कार्यकर्त्यांनी आपापल्या भागामध्ये सदस्य नोंदणी करावी, निवडणुकीमध्ये सदस्य नोंदणीचा विचार केला जाणार आहे. नगर शहराची राज्यामध्ये सर्वात जास्त सदस्य नोंदणी करणार असून एक लाखाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, अशी माहिती संपत बारस्कर यांनी दिली

परसबाग निर्मिती स्पर्धेत मनपा ओंकारनगर शाळा अहिल्यानगरमधून प्रथम

  नगर – प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत शालेय परसबाग निर्मिती स्पर्धेत महापालिका प्राथमिक शाळा ओंकारनगर केडगाव अहिल्यानगर शाळेला अहिल्यानगर शहरातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. शहरातील १३५ शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. शाळेला प्रथम क्रमांकाचे ७५०० रुपये पारितोषिक प्राप्त झाले आहे. मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे व शाळेतील विद्यार्थी यांच्या मदतीने गेल्या १० वर्षांपासून शाळेत परसबाग फुलवली आहे. यासाठी सहज फाउंडेशन अहिल्यानगर, रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर मिडटाऊन, लायन्स क्लब ऑफ अहिल्यानगर मिलेनियम यांचेही सहकार्य मिळाले आहे. शाळेत शेवगा, कढीपत्ता, लिंबू, वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, कोथिंबीर, भोपळा, विविध फळझाडे, विविध औषधी वनस्पती, विविध फुलझाडे यांची लागवड विद्यार्थ्यांच्या मदतीने करण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध रोपांची व झाडांची माहिती प्रत्यक्षपणे मिळाली आहे. तसेच जल व्यवस्थापन, कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प, इको क्लब उपक्रम, पर्यावरणविषयक जागृती इत्यादी उपक्रम शाळेत राबविण्यात येतात. तसेच परसबागेतून मिळणाऱ्या भाज्या शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जातात. तसेच विद्यार्थी शाळेतील विविध फळांचा आस्वाद घेतात. ओंकारनगर शाळेला अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण, शालेय पोषण आहार समन्वयक ज्ञानेश्वर कुटे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रियंका लोळगे, उपाध्यक्षा दिपाली साळवे, सदस्य कवित वाघमारे, गणेश पाडळे, पल्लवी भुजबळ, दुर्गा घेवारे, पुनम बडे, भावना पवार, शिलाबाई देसाई, हेमंत झरेकर यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. ओंकारनगर शाळेत मागील दहा वर्षांपासून शालेय परसबाग निर्माण करण्यात आलेली आहे. या परसबागेतील भाजीपाला शालेय पोषण आहारासाठी वापरला जातो. तसेच शाळेतील सिताफळ, पेरु, आंबा, रामफळ ही फळे विद्यार्थ्यांना देण्यात येतात. शाळेतील भाजीपाला विद्यार्थी बाल आनंद मेळाव्यात विक्री करतात व खरेदी- विक्रीचा अनुभव घेतात. भाऊसाहेब कबाडी – मुख्याध्यापक. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील ओंकारनगर प्राथमिक शाळेत सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले जातात. तसेच शाळा विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होते. शालेय परसबाग निर्मिती स्पर्धेत ओंकारनगर शाळेने मिळवलेल्या यशाबद्दल शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. जुबेर पठाण प्रशासनाधिकारी मनपा शिक्षण विभाग अहिल्यानगर

प्रत्येक आईने मुलीला माहेरसारखेच सासरी रहाण्याचे ज्ञान द्याव

श्री राधाकृष्णजी महाराज यांचे प्रतिपादन नगर – अलिकडच्या काळात सर्व सुख मिळवण्याचा कल वाढत चालला असताना घरा-घरातील सहनशक्तीच संपू लागली आहे. कुटुंब व्यवस्था अबाधित रहाण्यासाठी सासरी जाणाऱ्या मुलीला आईने सहन करण्याचे शिक्षण देणे अत्यंत गरजेचे झाले आहे, असे प्रतिपादन श्री राधाकृष्णजी महाराज यांनी केले. येथील श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट व्दारा अहिल्यानगरमध्ये प्रथमच आयोजित केलेल्या संत मीराबाई चरित्र कथा सोहळ्याचे पहिले पुष्प गुंफताना नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉनमध्ये ते बोलत होते. सनई चौघड्याच्या निनादात महाराजांचे कथास्थळी आगमन होत असताना सोबत कलश घेतलेल्या सुवासिनी होत्या. पुष्पवृष्टी करण्यात येत होती. ट्रस्टचे अध्यक्ष नंदलाल मणियार, उपाध्यक्ष मोहनलाल मानधना, सचिव सुरेश चांडक, खजिनदार मगनलाल पटेल, कथा सोहळ्याचे मुख्य यजमान रामनिवास इंदाणी, सतीशचंद्र इंदाणी, दैनिक यजमान श्रीगोपाल मणियार, पुरुषोत्तम पटेल, विजय झंवर, मधुसूदन सारडा तसेच हिरालाल पटेल, बजरंग दरक, डॉ. विजय भंडारी, लक्ष्मीनारायण जाजू, रामेश्वर बिहाणी, शरद झवर, सोमनाथ नजन, पुरुषोत्तम नावंदर, मुकुंद जाजू आदीच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून महाराजांना सन्मानित करण्यात आले. पं. विजय मिश्रा यांनी पौरोहित्य केले. सूत्रसंचालन हर्षा गुजराथी यांनी केले. स्वागतपर मनोगत व्यक्त करताना नंदलाल मणियार यांनी १९८३ सालापासून रामकृष्ण परिवार धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. युवा आणि महिलांना सोबत घेऊन ट्रस्टचे कार्य शिस्तबध्दरितीने अखंडपणे सुरू आहे. राधाकृष्ण महाराजांच्या श्रीमुखातून संत मिराबाई चरित्र सलग तीन दिवस श्रवण करण्याचे भाग्य आपणा सर्वांना लाभले आहे. या कथा सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्वांचे मी स्वागत करून अभिनंदन करतो, असे सांगितले. राधाकृष्ण महाराज पुढे म्हणाले, सासरी मुलींनी अत्याचार, अनाचार सहन करू नये पण घरातील सर्वांना समजून घेऊन त्यांचे स्वभाव ध्यानी घेऊन कुटुंब जपण्याचा, सासरची मान उंचावण्याचा कसोशीने प्रयत्न करावा. प्रत्येक आईने आपल्या मुलीला सहन करण्याचे ज्ञान द्यावे. सासुरवाडीला जावयाला जसा मान मिळतो तसा सुनबाईला सासरी मान मिळाल्यास कुटुंब खऱ्या अर्थाने सुखी होतील. सुनबाईस सासरी जाताना आपल्या माहेरी चालल्यासारखा आनंद वाटला पाहिजे. मुलींनी गर्भ संस्काराचे महत्व अत्यंत सावधानतेने समजून घेतले पाहिजे. घरातील आजी-आजोबा संस्काराची खाण असतात. ज्या मुलांना आजी-आजोबा मिळतात ती मुले भाग्यशालीच असतात. आज २०-२२ वर्षाचे युवक-युवती मनोरंजनास आनंद समजतात. खाणे-पिणे-मजा करणे, नवनवीन कपडे खरेदी करणे, दूरवर फिरायला जाणे, नाचणे हे त्यांना जीवन वाटते. जीवनाची अर्धी यात्रा पार करताना आपल्यास भगवंताने जीवन कशासाठी दिले? याचे भानही त्यांना नसते, ही वस्तुस्थिती आहे. मिराबाईला बालपणीच भगवान श्रीकृष्णाला भेटण्याची आस लागली होती. ती बाल्यावस्थेत कथा कीर्तन श्रवण करायची म्हणून तिला भगवान श्रीकृष्णाच्या हृदयस्थानी स्थान मिळाले. आद्य शंकराचार्यांनी वयाच्या ३२ वर्षात धर्म रक्षण्यासाठी चार पीठ आणि विपुल ग्रंथ संपदा निर्माण केली. फार कमी लोकांना आपल्या जीवनाचे लक्ष्य समजते. संतांचे प्रेम सान्निध्य सौभाग्यानेच प्राप्त होते. हनुमंताने आपल्या हृदयात प्रभू श्रीराम आहेत हे छाती फाडून दाखवून दिले तसे संत सावता माळी यांनी हृदयातील विठ्ठलाचे दर्शन घडवले, अशी भगवंताची भक्ती आपल्याला करता आली तर जीवनातील परमानंद मिळेल. जीवन सार्थकी होईल, असे राधाकृष्णजी महाराजांनी विविध दाखले देत सांगितले. जब संत मिलन हो जाए। तेरी वाणी हरी गुण गाए ।। तब इतना समझ लेना। अब हरी से मिलन होगा ।। तसेच दूर नगरी बडी दूर नगरी। कैसे आऊ रे सावरीया तेरी गोकुलनगरी ।। या गीतासह मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई हासत नाचत या भावमधूर गीतांवर स्त्री-पुरुष भाविकांनी चांगलाच ठेका धरला. कथा सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी स्त्री-पुरूषांची अलोट गर्दी झाल्याने श्री राधाकृष्ण सेवा ट्रस्टमधील सर्वांचा उत्साह द्विगुणीत झाल्याचे दिसून आले

नगरमध्ये बांगलादेशी घुसखोरांना कागदोपत्री आश्रय देणाऱ्या सेतू चालकांवर कारवाई करावी

नगर – नगर शहरात अनेक सेतू केंद्रे हे जिहादी वृत्तीच्या सेतू चालकांकडे आहेत जे नगर शहरासह आजू बाजूच्या परिसरात बांगलादेशी रोहिंग्यांना कागदोपत्री आश्रय देत आहेत. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात आ. जगताप यांनी म्हंटले आहे की, हे सेतू चालक या बांगलादेशी रोहिंग्यांना आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्राइव्हिंग लायसेन्ससह रेशन कार्ड देखील काढून देत आहेत. ज्यात तहसील कार्यालयातील कर्मचारी वर्ग चिरीमिरीसाठी या सर्व कागदपत्रांना मंजुरी देत आहेत. हा सर्व प्रकार गंभीर असून आपण स्वतः यात जातीने लक्ष घालून बांगलादेशी रोहिंग्यांना कागदोपत्री आश्रय देणारे जे कोणी जिहादी वृतीचे सेतू चालक असतील अश्या सर्वांची कारवाई करून सेतू केंद्रे रद्द करावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्या देशात बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढली असून महाराष्ट्र व त्यातल्या त्यात आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात घुसखोर अधिक वाढल्याचे दिसून आहेत. नुकतेच पुण्यात स्वारगेट परिसरात एका बांगलादेशी घुसखोराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड सह मतदान कार्ड व ड्रायव्हिंग लायसेन्स देखील सापडले आहे. मालेगाव मधे एका घुसखोरास नकली जन्म दाखला दिल्याप्रकरणी तहसीलदारावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे, तसेच आपल्या अहिल्यानगर शहरात गेल्या काही महिन्यांपुर्वी जिहादी वृत्तीच्या सेतु चालकांमार्फत नकली शिक्के व बोगस आधारकार्ड बनवुन देण्याचा धक्का दायक प्रकार समोर आला होता. ज्याचा गुन्हा तोफखाना पोलिस स्टेशन येथे दाखल आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशी घुसखोरी करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना नगर शहरात सेतू चालकांकडून असे गंभीर प्रकार घडत आहेत, ते थांबवा असे आ. जगताप यांनी म्हंटले आहे. यावेळी त्यांच्या समवेत सुरेश बनसोडे, सिद्धार्थ आढाव, सृजन भिंगारदिवे, ओंकार घोलप, गणेश कांबळे आदी उपस्थित होते.

निंबळक जवळील रेल्वेचा जुना पत्री पुलाच्या जागी नवीन पुल उभारण्याचे काम अखेर पूर्ण

नगर – एप्रिल २०२४ पासून दौंड-मनमाड हा रेल्वे मार्ग सोलापूर विभागातून पुणे विभागात वर्ग केल्यापासून या मार्गावर अनेक चांगले बदल करण्यात येत असल्याचे दिसून येत आहेत. हा मार्ग संपूर्ण विद्युत करण्यात आलेला असून दुहेरीकरणाचे काम सुद्धा पूर्ण होण्याच्या मार्गावर असून या मार्गावरील रेल्वे आता पहिल्यापेक्षा जलद गतीने धावताना दिसून येत आहेत. याचाच एक भाग म्हणून निंबळक रेल्वेगेट क्रमांक ३० व निंबळक रेल्वे स्टेशन दरम्यान असलेला ब्रिटिश काळात उभारण्यात आलेला खूप जूना व ऐतिहासिक असलेला खारा नाल्यावरील संपूर्ण लोखंडी पूल अर्थात पत्री पूल म्हणून प्रसिद्ध असलेला पूल खूप जुनाट व धोकादायक झाल्यामुळे तो हटवून त्या ठिकाणी आधुनिक बनावटीचा सिंमेट काँक्रीटीचा मजबूत असा पूल उभारण्यात आला. येथील काम करण्यासाठी ४ दिवस अगोदरच तयारी करून त्या ठिकाणी अत्याधुनिक ३ मोठे क्रेन, ३ जेसीबी, २ पोकलेन, २ डंपर, खडी, स्लीपर व रेल्वे रुळ, पाण्याचा एक ट्रॅक्टर, गॅस कटर, वेल्डिंग, २ कंटेनर, १ टेम्पो, जवळपास शंभर पेक्षा जास्त रेल्वेतील व ठेकेदाराकडिल कर्मचारी, रेल्वेतील अभियंते, विद्युत विभागातील कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, या ठिकाणी उपस्थित होते. या कामासाठी मध्य रेल्वेकडून रविवार असल्यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी ३ पर्यंत मेगा ब्लॉक घेतला असल्याचे दिसून आले. काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील सर्व गाड्यांचे येणे-जाणे सुरळीत सुरु झाले. निंबळक बायपास ने जाणाऱ्या येणाऱ्या अनेक लोकांनी आपली वाहने थांबवून मोठ-मोठ्या क्रेन च्या सहाय्याने सुरु असलेल्या पूल उभारणी कामाची कुतूहलाने पहाणी केली.

कॉटेज कॉर्नर येथे हिंदू महिलांना मारहाण करणाऱ्या जिहादी लोकांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा

] आ. संग्राम जगताप यांची मागणी नगर – सिद्धार्थ नगर मधील हिंदू महिलांवर नागापूर कॉटेज कॉर्नर परिसरामध्ये जिहादी लोकांनी अमानुषपणे मारहाण केली. या घटनेतील इतर आरोपींना अटक करून सर्व आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी तोफखान्याच्या पोलिस निरीक्षकांकडे केली आहे. सिद्धार्थ नगर मधील हिंदू महिलांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर आ. संग्राम जगताप यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन उपचार घेत असलेल्या महिलांची भेट घेत विचारपूस केली. मारहाण झालेल्या या महिला दिवसभर कष्ट करून उदरनिर्वाह करत असतात. काम केले तरच संध्याकाळची चूल पेटत असते, अशा हिंदू महिलांना त्यांची जात पाहून जिहादी लोकांकडून अमानुषपणे मारहाण करण्याचे काम केले आहे. हिंदू महिलांवर हात उचलणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आ. जगताप यांनी दिला. ‘सिव्हील’ मध्ये रुग्णांना चांगली आरोग्य सेवा द्या सिव्हील हॉस्पिटलच्या अनागोंदी कारभारामुळे लाल टाकी येथील ४० वर्षीय सनी बोरुडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला वेळेवर उपचार मिळाले नाही. आदल्या दिवशी घशाच्या त्रासाने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारे उपचार करण्यात आले नाही, त्याच्या नातेवाईकांशी कोणत्याही डॉक्टरांनी साधी चर्चाही देखील केली नाही. ही बाब तेथे उपस्थित काहींनी आ. जगताप यांच्या निदर्शनास आणून दिली. रुग्णांवर उपचारादरम्यान दिरंगाई होते या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचे मशिनरी असून देखील रुग्णांना त्याचा उपयोग होताना दिसत नाही. डॉक्टर अधिकारी कर्मचारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांचा मृत्यू होतो, त्याचबरोबर युवकांना देखील आपला जीव गमावा लागतो, ही बाब चांगली नाही सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा मिळणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी आ. जगताप यांनी दिल्या.

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका झेंडीगेट परिसरात पोलिसांची कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल

  नगर – कत्तल करण्याचे उद्देशाने पत्र्याचे शेडमध्ये दोरीने बांधुन ठेवलेल्या २ गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांच्या पथकाने सुटका केली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील झेंडीगेट परिसरात आर. आर.बेकरी जवळ ८ फेब्रुवारीला पहाटे १ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या बाबतची माहिती अशी की झेंडीगेट येथील बेकरी जवळ राजु कुरेशी यांचे बंद पत्र्याचे शेडमध्ये काही गोवंश जनावरे डांबून ठेवलेली आहेत व त्यांची कत्तल केली जाणार आहे, अशी माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. या माहिती वरून पोलिसांनी तेथे पहाटेच्या सुमारास छापा टाकला असता तेथे पोलिसांना काही गोवंश जनावरे दोरीने बांधुन ठेवलेले, तसेच त्यांच्या चारापाण्याची सोय सुविधा नसल्याचे दिसुन आले.पोलिसांनी तेथून २ जर्शी गायींची सुटका केली. या कारवाईत राजु कदीर कुरेशी, आणि गुड्डु कदीर कुरेशी यांना ताब्यात घेतले.त्यांच्या विरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात भा. न्या. सं. २०२३ चे कलम २७१ सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन १९७६ चे कलम ५ (क) ९ (अ) तसेच प्राण्याना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणेबाबत अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अंमलदार संदीप पितळे, सुरज कदम, दिपक रोहकले, तानाजी पवार, संकेत धीवर, राहूल शिंदे यांनी केली.

नगर तालुक्यात बिबट्याच्या भीतीने शेतीची कामे खोळंबली, पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिके करपण्याची शक्यता

नगर – नगर तालुक्यात अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला असल्याने त्याच्या भीतीने शेतकरी, शेतमजूर रात्रीच नव्हे तर दिवसाही शेतात जायला घाबरू लागले आहेत, त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाल्याचे चित्र गावागावात दिसत आहे. परिणामी पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली गहू, हरबरा, ज्वारीची पिके करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे शेतात जावे तर बिबट्याची भीती आणि नाही जावे तर पिकांचे नुकसान या दुहेरी संकटात शेतकरी वर्ग सापडला आहे. नगर तालुक्यातील कामरगाव परिसरात काळ्याचा डोंगर, विठ्ठलवाडी, शहा डोंगर, कामरगाव व पिंपळगाव कौडा गावच्या शिवेचा परिसर या भागात दररोज कुठेना कुठे बिबट्या दिसत आहे. ७ फेब्रुवारीला रात्रीही एका शेतकऱ्याला शेतात बिबट्या दिसला. त्याने त्याचा व्हिडीओ ही मोबाईल मध्ये काढून वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाठविला आहे. सारोळा कासार च्या बारेमळा परिसरातही गेल्या ३-४ दिवसांपासून एक मादी बिबट्या आणि त्याचे २ बछडे शेतकऱ्यांच्या नजरेस पडत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. मळ्यात राहणारे शेतकरी व त्यांचे कुटुंबीय सायंकाळ नंतर घराबाहेर पडायला घाबरत आहेत. अनेक जण रात्रीच नव्हे तर दिवसही शेतात जायला धजावत नाहीत. त्यामुळे या परिसरातही शेतीची कामे ठप्प आहेत. अशीच परिस्थिती भोरवाडी गावच्या परिसरात भोरवाडी ते चास रस्त्यावरील डोंगर भागात आहे. याशिवाय मेहेकरी, बारदरी व चांदबीबी महालालगत असलेली गावे, जेऊर, ससेवाडी, चापेवाडी, मांजरसुंबा, विळद या परिसरातही बिबट्यांचा वावर असल्याने याचा परिणाम आता शेती व्यवसायावर झाला आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतमजूर कामावर यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. बिबट्यामुळे एकीकडे नागरिक घाबरले असताना विभागाकडून कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केली जात नाही. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे उपलब्ध केले जातात पण त्यात ठेवलेल्या भक्षाची सर्व व्यवस्था परिसरातील शेतकऱ्यांनाच करावी लागत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.

आई-वडीलांची सेवा केल्यावर देव भेटणारच… ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांचे प्रतिपादन; श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व पर्जन्येश्वर महादेव मंदिर यांच्या वतीने किर्तन सोहळा

  नगर – जन्म, मृत्य, निसर्ग हे देवाच्या हातात आहे. पण जन्म आणि मृत्य यांच्या मधला जो काळ आहे. तो मानवाच्या हातात आहे. त्याला तीन टप्पे आहेत, पहिला बालपण, दुसरा तरुणपण व तिसरा म्हतारपण. बालपण हे आई-वडीलांनी दिलेल्या संस्कारावर अवलंबून आहे. तरुणपण हे तुमच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे. आणि म्हतारपण हे केलेल्या पुण्याईवर अवलंबून आहे. देवाची पुजा केल्यावर देव मिळेलच अस नाही, पण आई-वडीलांची सेवा केल्यावर देव भेटणारच यात मात्र शंका नाही. संपत्ती मिळाल्यावर सुख मिळेल, पण समाधान मिळेलच अस नाही, पण समाधान मिळाल्यावर देव मिळेलच यात शंका नाही, असे आपल्या किर्तनातून ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांनी सांगितले. दातरंगे मळा येथील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व पर्जन्येश्वर महादेव मंदिर आयोजित किर्तन सोहळ्यात ह.प.भ इंदोरीकर महाराज बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अर्जुन दातरंगे, भिमराज दातरंगे, अनिल दातरंगे, ठकाराम दातरंगे, गुलाब दातरंगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप दातरंगे, अशोक दातरंगे, सुरेश दातरंगे, दत्ता दातरंगे, गणेश दातरंगे, अशोक आगरकर, रमेश आगरकर, स्वप्निल दातरंगे, बाबा दातरंगे, चंद्रकांत दातरंगे, बंडू दातरंगे, बाळासाहेब दातरंगे, भरत आगरकर, रोहिदास दातरंगे, दिलीप दातरंगे, सोनू दातरंगे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी आमदार संग्राम जगताप, माजी महापौर रोहिणीताई शेंडगे, संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, जिल्हापमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सभापती गणेश कवडे, गटनेते संजय शेंडगे, सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, शाम नळकांडे, सचिन शिंदे, संतोष ग्यानप्पा, परेश लोखंडे, अजय चितळे, अनिल बोरुडे, संजय चोपडा, सुरेश तिवारी, महेश लोंढे, अरविंद शिंदे, दत्ता कावरे, विष्णु फुलसौंदर, सूरज जाधव, सुनिल त्रिपाठी, संजय शेळके, विठ्ठल जाधव, संजय सांयगावकर, रमेश खेड़कर, अरुण झेंडे, अशोक दहीफळे, शंकर ठाणगे , राजमल मुनोत, बबन खरमाळे, देवराम मेहेत्रे आदी उपस्थित होते. यावेळी संदिप दातरंगे म्हणाले की, आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असतो. त्यामध्ये धार्मिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, क्रिडा विषयक, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, नागरीकांना मदतीचा हात आदींच्या माध्यमातून जनसेवा करत आहोत. सुखी जीवन जगण्यासाठी संतांचे विचार आपल्या सोबत असायला हवे. तसेच नागरीकांना संतांचे विचार समजावे, त्यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षापासून या किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वार्षिक सभेत सेवानिवृत्तांच्या प्रश्नांवर चर्चा

नगर राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अहिल्यानगर विभागाची वार्षिक सभेत सेवानिवृत्तांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. टिळक रोड येथील श्रमिक कार्यालयाच्या सभागृहात विभागीय सचिव गोरख बेळगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुनिलराव कोल्हे, माजी बँक संचालक डी.जी. अकोलकर, माजी वाहतूक निरीक्षक राजेंद्र माने, नवनिर्वाचित राज्य केंद्रीय सदस्य बलभीम कुबडे आदींसह सभासद उपस्थित होते. संघटनेचे मयत झालेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहून बैठकीला प्रारंभ करण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे याची राज्य केंद्रीय सदस्यपदी निवड झाल्यामुळे रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्ष पदावर तारकपूर आगाराचे माजी वाहक गंगाधर कोतकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वार्षिक हिशोब, सेवानिवृत पास पेन्शनबदल संघटनेचे सुरु असलेल्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. बलभीम कुबडे म्हणाले की, शंभर सभासदांची नोंदणी झाल्यामुळे राज्यात नगर विभागाचा तिसरा क्रमांक आल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. पुढील काळात सेवानिवृत्ती पास एक वर्षाचा व सर्व बसेसमध्ये त्याचा लाभ मिळण्यासाठी केंद्रीय सदस्यांच्या बैठकीत विषय मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सर्वांच्या सहकार्यामुळे केंद्रीय सदस्यपदी काम करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी संघटनेच्या माध्यमातून सेवानिवृत्तांच्या प्रश्नावर सुरु असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केला. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष गंगाधर कोतकर यांनी पुढील काळात सर्व पदाधिकारी यांना बरोबर घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अण्णासाहेब आंधळे यांनी प्रलंबीत प्रश्न सुटण्यासाठी व संघटना वाढीसाठी भावनिक आवाहन केले. शेवगांव आगाराचे के. के. जाधव यांनी स्वतः कोणत्या पदाची अपेक्षा न ठेवता एसटीच्या सेवानिवृत्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. गोरख बेळगे म्हणाले की, अत्यंत कमी असणाऱ्या पेन्शनमध्ये एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा औषधांचा देखील खर्च भागत नाही. त्यांना सन्मानाने जगण्यासाठी महागाईचा विचार करता योग्य पेन्शन मिळण्याची गरज आहे. यासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सेवानिवृत्त कामगारांच्या प्रश्नावर २०१६ ते २०२४ मधील कामगार करारातील फरकाच्या रक्कमा लवकर मिळणे बाबत मुठाळ यांनी आपली मागणी मांडली. माजी वाहक एकनाथ औटी यांनी कर्तव्य कवितेतून सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब चव्हाण यांनी संघटनेचे पदाधिकारी सभासदाच्या पाठपुराव्याने अनेक प्रश्न मार्गी लागल्याचे विशद केले. सूत्रसंचालन अर्जुन बकरे यांनी केले. यावेळी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. संघटनेसाठी नेहमीच सहकार्य करणारे कॉ. आनंदराव वायकर यांचे आभार मानण्यात आले. सदर बैठक यशस्वी होण्यासाठी विठ्ठल देवकर, खजिनदार श्रीदेवीदास डहाळे, ताकपेरे आदी सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले