नगर – केडगाव येथील राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे राजर्षी शाहू बालक मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली होती. दिंडीत बाल वारकरी उत्साहात सहभागी झाले होते. संस्थेचे सचिव बबनराव कोतकर व खजिनदार प्रल्हाद साठे यांच्या हस्ते आरती करून दिंडीला प्रारंभ करण्यात आला. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंगचा निनाद, जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत बाल वारकर्यांनी शाळे पासून ते शाहूनगर बस स्टॉप पर्यंत दिंडी काढली. विठ्ठल, रुमिणी व संतांच्या वेशभूषेत घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. बाल वारकर्यांनी केलेल्या ज्ञानोबा… तुकाराम…च्या गजराने केडगाव परिसर दणाणला. पांढरी टोपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी या पोशाखातील लहान मुले, तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन मुलीं दिंडीत सहभागी झाल्या होत्या. हातात टाळ घेऊन विद्यार्थ्यांनी जय हरी विठ्ठलाचा घोष केला. तर मुलींनी फुगड्यांचा फेर धरला होता. ठिकठिकाणी नागरिकांनी दिंडीचे स्वागत करुन कौतुक केले. शाळेच्या प्रांगणात अभंग, गवळण, कीर्तन, भारुड, भक्ती गीतांसह विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. बालदिंडीसाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आर. व्ही. म्हस्के याचे मार्गदर्शन लाभले. यावेळी एम.एस. जगदाळे, के.के. भोर, एस.एन. काकडे, वाय.बी. काळे, एस.के. करांडे, ए.एस. सोनवणे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.