भिंगारला स्वच्छता अभियान राबवून व वृक्षरोपणाने शिवजयंती साजरी

नगर – भिंगार शहरात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्वच्छता
अभियान राबवून व वृक्षरोपण करून छत्रपती शिवाजी महाराज यांची
साजरी करण्यात आली. भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये ग्रुपच्या
सदस्यांनी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी हातात झाडू घेऊन संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. तर छत्रपती
शिवाजी महाराजांना अभिवादन करुन वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सर्व नागरिकांना मिठाईचे वाटप
करण्यात आले.
प्रारंभी जॉगिंग पार्कच्या प्रवेशद्वारात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी शिवाजी महाराजांचा एकच जयघोष केला. याप्रसंगी
ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, रतन मेहत्रे, दिलीप
गुगळे, सुधीर कपाले, जहीर सय्यद, दीपक अमृत, अरविंद ब्राह्मणे,
दीपकराव धाडगे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, अभिजीत
सपकाळ, संजय भिंगारदिवे, विकास भिंगारदिवे, अशोक लोंढे, राजू
कांबळे, सरदारसिंग परदेशी, प्रकाश देवळालीकर, शिरीष पोटे, दीपक लिपाणे, कन्हैया परदेशी, अ‍ॅड.
सिध्देश कटारिया, दिपकराव घोडके, जालिंदर अळकुटे, मेजर नवनाथ वेताळ, चुनीलाल झंवर, संजय
ढोणे, नामदेवराव जावळे, अविनाश पोतदार, कुमार धतुरे, प्रवीण परदेशी, योगेश चौधरी, हरिष साळुंके,
अनिल हळगावकर, मंगेश मोकळ, बाळासाहेब झिंजे, दत्तात्रेय लाहुंडे, नवनाथ खराडे, किरण गायकवाड,
चेतन वझगडेकर, संदीप छजलानी, खान सर, कुंडलिकराव ढाकणे, देविदास गोंडाळ, शैलजा पोतदार,
सविता परदेशी, प्रांजली सपकाळ, विशाल भामरे, चंदाताई बेद्रे आदी उपस्थित होते.

आश्वासन मान्य नसताना, फौजदारी कारवाईच्या धमकीने उपोषणकर्त्यांना जिल्हा परिषदेतून हुसकावले

महिलेला मत्स्यमारीचा ठेका मिळण्यासाठी सुरु होते उपोषण; नियमांना डावलून व आर्थिक हितसंबंध साधून दुसर्‍या व्यक्तीला ठेका

नगर – जिल्हा परिषद समोर गोळेगाव
(ता. शेवगाव) येथील आदिवासी महिलेला
मत्स्यमारीचा ठेका देण्यापासून डावलण्यात
आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने उपोषण
करण्यात आले होते. सदर महिलेला नियम
ाप्रमाणे मत्स्यमारीचा ठेका मिळण्याबाबत व
संबंधित अधिकार्‍यांच्या चौकशीसाठी उपोषण
सुरु असताना शिवजयंतीच्या दिवशी बुधवारी
(दि.१९ फेब्रुवारी) लेखी पत्र मान्य नसताना
पोलीस प्रशासनाच्या कारवाईची धमकी देवून
उठवून देण्यात आले.
उपोषणाचा तिसरा दिवस असताना जिल्हा
परिषद लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण
अधिकारी यांनी सोमवारी (दि.२४ फेब्रुवारी) मुख्य
कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात सुनावणी ठेवण्यात
आली असल्याचे लेखी पत्र देऊन उपोषण मागे
घेण्याचे स्पष्ट केले आहे. उपोषणकर्त्यांनी डावलण्यात
आलेला मत्स्यमारीचा ठेका पुन्हा मिळण्याबाबत ठोस
आश्वासन दिले गेले नसल्याने उपोषण सुरु ठेवण्याचा
पवित्रा घेतला होता. मात्र लेखी पत्र घेऊन आलेल्या
संबंधित अधिकार्‍याने उपोषण सोडून या परिसरातून
उठा, अन्यथा पोलीस प्रशासनाच्या कारवाईला सामोरे
जाण्याची धमकी दिल्याने नाईलाजाने उपोणकर्त्यांना
उपोषण मागे घेऊन घरी परतावे लागले.
कुसुम पवार या गोळेगाव (ता. शेवगाव) येथील
रहिवासी असून, गोळेगाव ग्रामपंचायत पाझर तलावावर
२००५ पासून मत्स्यमारी व्यवसाय ठेका पद्धतीने
चालवत होत्या. शेवगाव तालुयातील एका व्यक्तीने
जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाच्या अधिकार्‍यांशी
आर्थिक हितसंबंध साधून मत्स्यमारीचा ठेका मिळवला
असल्याचा आरोप उपोषणकर्त्या महिलेने केला आहे.
या संदर्भात न्यायालयाच्या आदेशानुसार
दहा किलोमीटरच्या परिसरातील व्यक्तींना
मत्स्यमारी व्यवसायाचे ठेका देण्याचा अधिकार
असताना, सदर ठेका ३० किलोमीटर
अंतरावरच्या संस्थेला दिला गेला आहे, जो
संशयास्पद असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे
आहे. उपोषणात कुसुम पवार या आदिवासी
महिलेसह राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे
जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे, अंकुश
पवार, शरद पवार, वैजीनाथ बर्डे, दादासाहेब
बर्डे, गोकुळ पवार, प्रमिला पवार, कुसूम पवार,
कौसाबाई पवार, केशरबाई पवार आदी सहभागी
झाले होते. लोकशाही मार्गाने न्याय, हक्कासाठी
सर्वांना उपोषण आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र
जिल्हा परिषद प्रशासनाने लेखी पत्रात ठोस आश्वासन
न देता, सर्वसामान्यांना फौजदारी कारवाईची धमकी
देऊन त्यांचे उपोषण मागे घेण्यास भाग पाडले. शिवाजी
महाराजांच्या जयंतीदिनी प्रशासनाचा हा वाईट अनुभव
आला. अन्याय झालेल्यांना सोमवारी होणार्‍या सुनावणीत
न्याय न मिळाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी
सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब
ढवळे यांनी दिला आहे.

 

साहित्य ही महाराष्ट्राची संस्कृती : उदय सामंत

साहित्ययात्री संमेलनाची इंग्लडच्या ग्लोबल बुक ऑफ एसलन्स मध्ये नोंद

पुणे – बाराशे साहित्यिक व साहित्यप्रेमी एकत्र येऊन
संमेलनानिमित्त प्रवास करणे हा जागतिक विक्रम आहे.
चार साहित्यिक एकत्र आल्यावर चांगले विचार ऐकायला
मिळतात. साहित्य आणि साहित्यिक म्हणजे महाराष्ट्राची
संस्कृती आहे. या संस्कृतीची जपणूक या संमेलनानिमित्ताने
होत आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत
यांनी केले.
सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य
महामंडळातर्फे दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्त
मराठी साहित्ययात्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान हे प्रवासी साहित्य संमेलन होत
आहे. या संमेलनाचे उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी मंत्री उदय
सामंत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील
अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, साहित्य
अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिका डॉ. संगीता बर्वे,
ग्लोबल बुक ऑफ एसलन्स, इंग्लडचे उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके
उपस्थित होते.
यावेळी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
करण्यात आले. राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणाने रेल्वे
स्टेशन परिसर दुमदुमून गेला होता. पंढरपूर येथून आलेल्या ग्रंथ दिंडीचे
या वेळी स्वागत करण्यात आले. ही दिंडी रेल्वेद्वारे दिल्लीला जाणार
आहे. या मराठी साहित्ययात्री संमेलनादरम्यान उदय सामंत यांनी
रेल्वेतून प्रवास करत साहित्यिक, साहित्यप्रेमी आणि पत्रकारांशी संवाद
साधला. मराठी साहित्ययात्री संमेलनाचे अध्यक्ष शरद तांदळे, कार्यकारी
अध्यक्ष वैभव वाघ, कार्याध्यक्ष शरद गोरे, कार्यवाह सचिन जामगे,
मुख्य समन्वयक अ‍ॅड. अनिश पाडेकर, सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे,
निमंत्रक अक्षय बिक्कड उपस्थित होते.
यावेळी उदय सामंत यांनी सांगितले की, या विशेष रेल्वेला महान
सेनानी महादजी शिंदे यांचे नाव दिले हे अभिमानास्पद आहे.
महाराष्ट्रातील नागरिक छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती
संभाजी महाराज यांच्या विचारांचा आदर करणारे आहेत.
या संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषेला सातासमुद्रापलिकडे
नेण्याचे मोठे कार्य घडत आहे.
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, मराठी भाषा साहित्य संमेलन
हे साहित्य आणि संस्कृतीची गौरवशाली परंपरा आहे.
या संमेलनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांनी
महाराष्ट्राला दिलेली शौर्याची शिकवण पुढे नेणार्‍या पराक्रमी
सेनानी महादजी शिंदे यांना वंदन केले जात आहे.
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कवी केदारनाथ सिंह
यांच्या ‘केदारनाथ सिंह की पचास कविताएं’ या कविता
संग्रहाचा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिका डॉ.
संगीता बर्वे यांनी मराठीत केलेल्या ‘सर्जनात्मक हस्तक्षेप’
या अनुवादीत पुस्तकाचे मंत्री उदय सामंत आणि डॉ. पी. डी.
पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेत होणार्‍या मराठी साहित्ययात्री
संमेलनाची ग्लोबल बुक ऑफ द एसलन्स, इंग्लड मध्ये नोंद करण्यात
आली असून ग्लोबल बुक ऑफ एसलन्स, इंग्लडचे उपाध्यक्ष डॉ.
दीपक हरके यांनी आज रेल्वे स्थानकावर झालेल्या उद्घाटन समारंभात
राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत व संयोजकांना याविषयीचे
प्रमाणपत्र प्रदान केले.

जन्म व मृत्यूच्या नोंदीचे स्कॅनिंग करून डिजिटलायझेशन करा; रेकॉर्ड विभागाची पाहणी करून मनपा आयुतांनी दिले आदेश

जुने रेकॉर्ड शोधण्यासाठी होणारा त्रास थांबून दाखले वेळेत मिळणार : यशवंत डांगे

नगर – महानगरपालिकेच्या जन्म व
मृत्यू विभागाकडील जुन्या नोंदी अनेकवेळा
सापडत नाहीत. जुने रेकॉर्ड शोधण्यासाठीही
अडचणी येतात. परिणामी, नागरिकांना वेळेत
दाखले देण्यात अडचणी येतात. नागरिकांना
वारंवार हेलपाटे मारावे लागतात. हा त्रास
थांबण्यासाठी जुन्या नोंदीचे डिजिटलायझेशन
करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक
यशवंत डांगे यांनी दिले आहेत. तसेच, रेकॉर्ड
विभागातील जन्म व मृत्यू नोंदीसह इतर
रेकॉर्डही स्कॅन करून घ्यावेत, अशा सूचनाही
त्यांनी दिल्या आहेत.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी
जुन्या महानगरपालिकेतील रेकॉर्ड विभागाची पाहणी
केली. तेथील रेकॉर्ड अत्यंत जुने असून काही
कागदपत्रे काळानुरूप जीर्ण होत आहेत. या रेकॉर्डचे
तसेच, जन्म व मृत्यूच्या नोंदी असलेल्या रेकॉर्डचे
स्कॅनिंग करणे गरजेचे आहे. जन्म व मृत्यूच्या जुन्या
नोंदी वेळेत न सापडल्यास नागरिकांना वेळेत दाखले देता येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा
लागतो. अनेक कायदेशीर प्रकरणांमध्येही जुने
रेकॉर्ड शोधावे लागते. त्यामुळे या रेकॉर्डचे जतन
करणे आवश्यक आहे. त्याची प्रक्रिया तत्काळ
सुरू करावी, असे निर्देश आयुक्त यशवंत डांगे यांनी
दिले. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.
सतीश राजूरकर, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर
उपस्थित होते.
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, जन्म
व मृत्यूच्या दाखल्यांचे वितरण सुरळीत व्हावे,
यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्न करत
आहे. सर्व प्रभाग कार्यालयात त्या त्या हद्दीतील
दाखले मिळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या
आहेत. नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी सर्व
उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जुन्या नोंदी
शोधण्यात अडचणी येत असल्याने या नोंदीच्या
रेकॉर्डचे स्कॅनिंग करण्यात येऊन डिजिटलायझेशन
करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातून
नागरिकांना होणारा त्रास वाचून, दाखले वेळेत
मिळतील, असा विश्वासही आयुक्त तथा प्रशासक
यशवंत डांगे यांनी व्यक्त केला आहे.

 

शहरातील बाजार पेठेतील अतिक्रमणे मनपाने पोलिस बंदोबस्तात हटविली

नगर – नगर शहरातील बाजारपेठ परिसरातील अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने १८ फेब्रुवारीला मोठ्या पोलिस बंदोबस्तात हटविली आहेत. त्यामुळे बाजार पेठेतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. या मोहिमेत महापालिकेने सातत्य ठेवण्याची मागणी बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने केली आहे.

शहरातील भिंगारवाला चौक, कापड बाजार रोड ते तेली खुंट चौक ते घासगल्ली, कापड बाजार रोड लगत असणारे अतिक्रमणे टपऱ्या, लोखंडी जाळ्या, हातगाड्या हटविण्यात आल्या. घास गल्ली ते नवी पेठ कॉर्नर ते परत घास गल्ली ते मोची गल्ली लाईटच्या खांबावरील जाहिरातीचे व दुकानदारांचे फ्लेक्स बोर्ड हटविण्यात आले. मोची गल्ली, महावीर कॉर्नर, गंज बाजार रोड, भाजी मार्केट, सराफ बाजार रस्ता, दुर्गा सिंग लस्सी रोड लगत असणारे पूजा साहित्य विक्रेत्यांचे लोखंडी टेबल, भिंती लगत असणारे फायबर टेबल खुर्च्या हटविण्यात आल्या.

अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ, उपअभियंता सुरेश इथापे, मुख्यालय क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख व नितीन इंगळे यांच्या सह पथकातील कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली. यावेळी कोतवाली पोलीस स्टेशनकडून पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला होता.

एमआयडीसी परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करा

उद्योजकांची जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

नगर : नागापूर एम.आय.डी.सी मध्ये राजरोजपणे अवैद्य धंदे सुरू असून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व अल्पवयीन मुले वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करून खंडणी, चोरी, मारहाण करत दहशत निर्माण करतात. त्यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, हे असेच चालू राहिले तर उद्योग धंदे बंद पडण्याचा धोका वाढला असल्याने याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आ.संग्राम जगताप यांच्या समवेत उद्योजकांनी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या कडे केली आहे.

यावेळी आ. संग्राम जगताप, उद्योजकांच्या आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, उपाध्यक्ष महेश इंदानी, राजेंद्र कटारिया, सचिव सागर निंबाळकर, चिन्मय सुखटणकर, सुमित लोढा, पुरुषोत्तम बुरा, दौलत शिंदे, दिलीप अकोलकर, गोकुळ हांडे, रोहन गांधी, सचिन पाठक, दीपक नागरगोजे आदीसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, एमआयडीसी परिसरात चौका चौकात अवैद्य धंदे वाढलेत गांजा, मटका, गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात चालत आहे यामुळे उद्योजक व महिला कामगारांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी यावर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळाव्यात, तसेच सन फार्मा व सह्याद्री चौकात कायम वाहतूक कोंडी होत असल्यामुळे तिथे ट्राफिक पोलिसाची नेमणूक करावी, तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी याचबरोबर एल ब्लॉक मध्ये पोलीस चौकी उभी करण्याची मागणी उद्योजकांनी जिल्हा पोलीस अधिक्षक राकेक्ष ओला यांच्याकडे केली आहे.

अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली

एम.आय.डी.सी परिसरामध्ये अवैद्य धंद्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे गुन्हेगारी देखील वाढली आहे. कामगारांमध्ये भांडणे होत असून थेट उद्योजकांनाच मारहाण, दमबाजी केली जाते. पगाराच्या दिवशी पाळत ठेवून चोऱ्या केल्या जातात यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी एमआयडीसीतील उद्योजकांनी केली.

पोलिसांनी कडक कारवाईची मोहीम सुरु करावी

क्लासिक हॉटेल ते गांधीनगर पर्यंतच्या रस्त्यावर राजरोजपणे अवैद्य धंदे सुरू असून अल्पवयीन मुले व्यसन करून त्यांच्याकडून गुन्हे घडत आहेत. उद्योजक हा आपल्या देशाचा आर्थिक कणा असून त्यांना व्यवसायासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे ही आपली जबाबदारी आहे पोलीस प्रशासनाने कडक कारवाईची मोहीम हाती घेऊन गुन्हेगारांवर वचक निर्माण करावी अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.

मग याआधी हिंदू धर्म नव्हे तर कोणत्या विचारांची सत्ता अहिल्यानगर मनपावर होती? लोकप्रतिनिधीला सवाल

नगर – आजमीतिला अहिल्यानगर
महापालिकेला सुमारे ४९६ कोटी रुपयांची देणी
आहेत. सद्यस्थितीत तातडीने २०४ कोटी थकीत
असल्याने मनपा आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत आहे. अनेक देणे
देण्याबरोबरच विविध शासकीय योजनेचा स्वहिस्सा भरण्यासाठी सुद्धा
महापालिकेमध्ये छदाम नाही. या मुद्द्यांवरून लक्ष भरकटविण्यासाठी
शहराचे लोकप्रतिनिधी हे वेगवेगळी विधानं करीत आहेत. आम्ही हिंदू
आहोत. यापूर्वी मनपावर शिवसेनेसारख्या खर्‍या हिंदुत्ववादी पक्षाची सत्ता
होती. लोकप्रतिनिधी स्वतः दोन वेळा महापौर होते. मग त्यावेळी हिंदू
धर्म विचारांची सत्ता नव्हती तर अन्य कोणत्या विचारांची होती का, असा
सवाल किरण काळे यांनी केला आहे.
केंद्र व राज्यामध्ये हिंदू धर्माचे संरक्षण करणारी सत्ता आहे. आता
पुढील काळात होणार्‍या निवडणुकीत अहिल्यानगर मनपावर देखील हिंदू
धर्म विचाराची सत्ता बसवणार असल्याचे शहर लोकप्रतिनिधी म्हणाले
होते. काळे म्हणाले की, शहरामध्ये हिंदूंना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत
आहे. हिंदू व्यापारी, हिंदू उद्योजक, हिंदू फेरीवाले, हिंदू युवक, हिंदू व्यावसायिक,
हिंदू महिला, समस्त हिंदूंना मनपाच्या गलथान कारभारामुळे अनेक गोष्टींचा त्रास होत
आहे.
मनपा साधे वीज बिल भरू शकत नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्याचा
इशारा मनपाला दिला गेला आहे. तब्बल अकरा कोटी न भरल्यास पाटबंधारे विभागाने
शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. जर पाणी बंद झाले तर आमच्या
लाडया हिंदू बहिणींनी हांडे घेऊन पाण्याला कुठ जायचं? शहरात ठिकठिकाणी
खांदून ठेवलं आहे. नियोजनशून्य कारभार सुरू आहे. त्या रस्त्यांच्या कामासाठी
लागणारी स्वहिश्याची रक्कम भरण्यासाठीची दमडी सुद्धा मनपाकडे नाही. भ्रष्टाचाराने
बरबटलेल्या मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे मनपाचे प्रस्तावित रुग्णालय
रखडले आहे. नाट्यगृहाचा सांगाडा तसाच पडला आहे. फोटोसेशन करून कामाला
सुरुवात करू असं आश्वासन देऊन तुम्ही नगरकरांची बोळवण करत आहात.
काळे पुढे म्हणाले की, अमृत गटार योजना,
अमृत पाणी योजना, फेज टू पाणी योजना,
सौर ऊर्जा प्रकल्प, शहरातील सुमारे २४ प्रमुख
रस्ते, नगरोत्थान जिल्हा योजनेतील तीन रस्ते या सगळ्या कामासाठी
लागणारी स्वहिश्याची रक्कम देण्याची मनपाची स्थिती नाही. राज्यात,
देशात आणि शहरात सर्व सत्तेची सूत्र, रिमोट कंट्रोल हा तुमच्याच हातात
असून देखील तुम्ही रोज बोंबा मारता. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही
बिनकामाचे झाले आहात. तुमचा अकार्यक्षमपणा झाकण्यासाठी तुम्ही
त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करता हे नगरकरांना चांगलं ठाऊक
आहे असे काळे म्हणाले.
अन्यथा जागा दाखवून देऊ शहरातील हिंदूंना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सत्तेच्या माध्यमातून प्रश्नांची सोडवणूक करण्याची तुमची जबाबदारी आहे.
बाजारपेठेमध्ये व्यापार्‍यांना अनंत अडचणी आहेत. त्याबाबत त्यांनी मनपाकडे मागण्या
केल्या आहेत. हिंदूंच्या नावाने दिशाभूल करणारी भाषणबाजी करून मूळ प्रश्नांना बगल
दिली जात असल्यामुळे हिंदूंवर अन्याय होत आहे. हिंदूंवर होणारा हा अन्याय आम्ही
खपवून घेणार नाही. हिंदूंना होणारा त्रास थांबला नाही तर दिशाभूल करणार्‍यांना त्यांची
जागा दाखवून देऊ, असा इशारा किरण काळे यांनी दिला आहे.
भ्रष्ट अधिकार्‍यांची पाठराखण तर प्रामाणिक लोकांना त्रास
मनपात आरोग्य विभागात झालेली आर्थिक अनियमितता आणि त्यातून झालेला
भ्रष्टाचार उघड झाला आहे. मनपात भ्रष्टाचार करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांची
पाठराखण सत्ताधारी करतात. तर प्रामाणिकपणे काम करणार्‍या अधिकारी,
कर्मचार्‍यांना मात्र त्रास दिला जातो. त्यांच्या विरोधात खोटी नाटी आंदोलन केली
जातात. त्यांच्यावर नको ते आरोप करून त्यांच्यावर बदली करून घेण्यासाठी दबाव
आणला जातो. इथून पुढच्या काळामध्ये आम्ही भ्रष्टाचार्‍यांच्या मानगुटीवर बसू आणि
प्रामाणिकपणे काम करणार्‍यांच्या पाठीशी उभे राहू असे किरण काळे म्हणाले.

शिवजयंती मिरवणुकीवर पोलिस ‘ड्रोन कॅमेर्‍या’द्वारे ठेवणार नजर

नगर – शिवजयंतीनिमित्त काढण्यात
येणार्‍या मिरवणुकीमध्ये डीजेच्या आवाजावर
मर्यादा ठेवावी. मिरवणुकीत लेझर शोचा
वापर करू नये. कुठलीही विटंबना होईल,
अशी कृती करू नये. आक्षेपार्ह घोषणांचे
पोस्टर्स, बॅनर्स लावू नयेत. अन्यथा संबंधित
संघटना, मंडळांवर कठोर कारवाई केली
जाईल, असा इशारा पोलिस उपअधीक्षक
अमोल भारती यांनी शिवजयंती उत्सवात
सहभागी होणार्‍या संघटना व मंडळांना दिला
आहे. मिरवणुकीवर पोलिस ड्रोन कॅमेर्‍याद्वारे
नजर ठेवणार आहेत.
१९ फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त
शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उपअधीक्षक अमोल भारती यांनी १७
फेब्रुवारीला सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात शिवजयंती उत्सवात सहभागी
होणार्‍या संघटना व मंडळांची बैठक घेतली. यावेळी उत्सव शांततेत व उत्साहात पार
पाडण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
मिरवणूक काळात डीजेच्या आवाजाची मर्यादा पाळावी. ध्वनी प्रदूषण केल्यास
संबंधितांवर कारवाई केली जाईल. तसेच
मिरवणुकीवेळी लेझर शोचा वापर करू नये.
कोणत्याही धार्मिक स्थळांची विटंबना होईल,
अशी कृती करू नये. आक्षेपार्ह गाणी वाजवू
नयेत. भावना दुखावणार्‍या आक्षेपार्ह घोषणांचे
पोस्टर्स, बॅनर्स लावू नयेत. अन्यथा संबंधित
संघटना अथवा मंडळाच्या प्रतिनिधींवर
कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा
उपअधीक्षक भारती यांनी यावेळी दिला.
यावेळी कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक
प्रताप दराडे, तोफखाना पोलिस ठाण्याचे
निरीक्षक आनंद कोकरे आदी उपस्थित
होते.
२५० पोलिस बंदोबस्तासाठी तैनात
शहरातून शिवजयंती मिरवणूक काढण्यासाठी ५ मंडळांनी पोलिसांकडे परवानगी
मागितलेली असून या मिरवणुकीसाठी २ पोलिस उपअधीक्षक, ६ पोलिस निरीक्षक,
२२ पोलिस उपनिरीक्षक यांच्या सह २५० पोलिस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात
करण्यात येणार आहे.

श्रुती संगीत निकेतनच्या दशकपूर्ती वर्षाची बहारदार सांगता

नगर – श्रुती संगीत निकेतन या संस्थेला १०
वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित दोन दिवसीय शास्त्रीय
संगीताच्या महोत्सवात बहारदार गायन आणि वादन
सादर झाले आणि दशकपूर्ती वर्षाची दिमाखदार
सांगता झाली. पहिल्या दिवशी अहिल्यानगर येथील
विख्यात तबला वादक शेखर दरवडे यांनी स्वतंत्र
तबला वादन सादर केले. त्यांनी सादर केलेल्या
तिनतालात पेशकार, घराणेदार कायदे, रेले, तुकडे,
स्तुती परण प्रभावीपणे सादर केले. त्यांना उचित
अशी लेहरा साथ किरण जोशी यांनी केली. पहिल्या
दिवशी उत्तरार्धात नगर येथीलच विख्यात संतूर वादक ज्ञानेश्वर दुधाडे यांनी आपली
कला सादर केली. पटदीप रागात आलाप जोड झाला आणि गत अशा पारंपरिक पद्धतीने
त्यांनी केलेले वादन रसिकांची विशेष दाद घेऊन गेले. नंतर त्यांनी पहाडी रागातील
लोकधून सादर केली. त्यांना तबल्यावर शेखर दरवडे यांनी समर्पक साथसंगत केली.
द्वितीय दिवसाची सुरूवात प्रा.निलेश खळीकर यांनी राग पुरिया गाऊन केली.
नंतर त्यांनी राग कलावती सादर केला. त्यांनी गायलेली सरगम आणि ताना रसिकांची
विशेष दाद घेऊन गेली.
महोत्सवाची सांगता डॉ.रुचिरा केदार यांच्या
गायनाने झाली. त्यांनी बसंती केदार या अनवट
रागाने सुरुवात केली. पारंपारिक अतर सुगंध हा
ख्याल त्यांनी अतिशय रंगतदारपणे सादर केला.
पिया कर धर देखो ही बंदिशीची ठुमरी आणि या
जादू डाला हा दादरा गीतप्रकार खास बनारस ढंगाने
त्यांनी पेश केला. त्यांना तबल्यावर शेखर दरवडे
आणि हार्मोनियम वर मकरंद खरवंडीकर यांनी समर्थ
आणि समर्पक साथसंगत केली. स्नेहल उपाध्ये यांनी
समायोचित निवेदन केले. याप्रसंगी विविध संगीत
परीक्षांमध्ये प्रथम आल्याबद्दल अन्वय परदेशी, शार्दुल खोल्लम, शौनक कुलकर्णी, गौरी
बिडकर, डॉ. हृषिकेश कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.धनश्री खरवंडीकर, महेश खोपटीकर, वेदांत
कुलकर्णी, भार्गव देशपांडे, गंधार कुलकर्णी, सुपर्ण प्रताप, शौनक कुलकर्णी यांनी
परिश्रम घेतले. या महोत्सवाला डॉ. हेमंत नाईक, अविनाश कुलकर्णी, कुमुदिनी
बोपर्डीकर, अशोक गांधी, भूषण भणगे, लक्ष्मणराव डहाळे, रवींद्र मुळे,मनीषा मुळे,
श्रीराम तांबोळी, दीपक शर्मा आदी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारने आरक्षणाची वर्गवारी करावी

सुनिल शिंदे यांचे प्रतिपादन, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन, राज्यव्यापी अधिवेशनाच्या पोस्टरचे अनावरण

नगर – क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त लहुजी शक्ती सेनेच्या वतीने सिद्धार्थनगर येथील
त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर लहुजी शक्ती सेनेच्या
वतीने पुणे येथील दशभूजा मैदानावर १ मार्च रोजी होणार्‍या लहूजी शक्तीच्या राज्यव्यापी
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोस्टरचे अनावरण करुन सर्व मातंग समाज बांधवांना सहभागी
होण्याचे आवाहन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे,
कार्याध्यक्ष राजाराम काळे, पाथर्डी तालुका अध्यक्ष सिताराम शिरसाठ, जयवंत गायकवाड,
सुनील सकट, किरण कनगरे आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले की, ४० वर्षांनंतर
मातंग समाजाचे अधिवेशन पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन १ मार्च रोजी संघटनेचे संस्थापक
अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार
आरक्षणाची अ, ब, क, ड प्रमाणे वर्गवारीची अंमलबजावणी करण्याची मागणी केली जाणार
आहे. वर्गवारी आरक्षणासाठी  संघटनेने सातत्याने आंदोलन, उपोषण व न्यायालयीन मार्गाने
लढा यशस्वी केला आहे. त्याला अंतिम यश येण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याची माहिती त्यांनी
दिली.