नगर – श्रुती संगीत निकेतन या संस्थेला १०
वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित दोन दिवसीय शास्त्रीय
संगीताच्या महोत्सवात बहारदार गायन आणि वादन
सादर झाले आणि दशकपूर्ती वर्षाची दिमाखदार
सांगता झाली. पहिल्या दिवशी अहिल्यानगर येथील
विख्यात तबला वादक शेखर दरवडे यांनी स्वतंत्र
तबला वादन सादर केले. त्यांनी सादर केलेल्या
तिनतालात पेशकार, घराणेदार कायदे, रेले, तुकडे,
स्तुती परण प्रभावीपणे सादर केले. त्यांना उचित
अशी लेहरा साथ किरण जोशी यांनी केली. पहिल्या
दिवशी उत्तरार्धात नगर येथीलच विख्यात संतूर वादक ज्ञानेश्वर दुधाडे यांनी आपली
कला सादर केली. पटदीप रागात आलाप जोड झाला आणि गत अशा पारंपरिक पद्धतीने
त्यांनी केलेले वादन रसिकांची विशेष दाद घेऊन गेले. नंतर त्यांनी पहाडी रागातील
लोकधून सादर केली. त्यांना तबल्यावर शेखर दरवडे यांनी समर्पक साथसंगत केली.
द्वितीय दिवसाची सुरूवात प्रा.निलेश खळीकर यांनी राग पुरिया गाऊन केली.
नंतर त्यांनी राग कलावती सादर केला. त्यांनी गायलेली सरगम आणि ताना रसिकांची
विशेष दाद घेऊन गेली.
महोत्सवाची सांगता डॉ.रुचिरा केदार यांच्या
गायनाने झाली. त्यांनी बसंती केदार या अनवट
रागाने सुरुवात केली. पारंपारिक अतर सुगंध हा
ख्याल त्यांनी अतिशय रंगतदारपणे सादर केला.
पिया कर धर देखो ही बंदिशीची ठुमरी आणि या
जादू डाला हा दादरा गीतप्रकार खास बनारस ढंगाने
त्यांनी पेश केला. त्यांना तबल्यावर शेखर दरवडे
आणि हार्मोनियम वर मकरंद खरवंडीकर यांनी समर्थ
आणि समर्पक साथसंगत केली. स्नेहल उपाध्ये यांनी
समायोचित निवेदन केले. याप्रसंगी विविध संगीत
परीक्षांमध्ये प्रथम आल्याबद्दल अन्वय परदेशी, शार्दुल खोल्लम, शौनक कुलकर्णी, गौरी
बिडकर, डॉ. हृषिकेश कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.धनश्री खरवंडीकर, महेश खोपटीकर, वेदांत
कुलकर्णी, भार्गव देशपांडे, गंधार कुलकर्णी, सुपर्ण प्रताप, शौनक कुलकर्णी यांनी
परिश्रम घेतले. या महोत्सवाला डॉ. हेमंत नाईक, अविनाश कुलकर्णी, कुमुदिनी
बोपर्डीकर, अशोक गांधी, भूषण भणगे, लक्ष्मणराव डहाळे, रवींद्र मुळे,मनीषा मुळे,
श्रीराम तांबोळी, दीपक शर्मा आदी उपस्थित होते.