एमआयडीसी परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करा

0
55

उद्योजकांची जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

नगर : नागापूर एम.आय.डी.सी मध्ये राजरोजपणे अवैद्य धंदे सुरू असून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व अल्पवयीन मुले वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करून खंडणी, चोरी, मारहाण करत दहशत निर्माण करतात. त्यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, हे असेच चालू राहिले तर उद्योग धंदे बंद पडण्याचा धोका वाढला असल्याने याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आ.संग्राम जगताप यांच्या समवेत उद्योजकांनी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या कडे केली आहे.

यावेळी आ. संग्राम जगताप, उद्योजकांच्या आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, उपाध्यक्ष महेश इंदानी, राजेंद्र कटारिया, सचिव सागर निंबाळकर, चिन्मय सुखटणकर, सुमित लोढा, पुरुषोत्तम बुरा, दौलत शिंदे, दिलीप अकोलकर, गोकुळ हांडे, रोहन गांधी, सचिन पाठक, दीपक नागरगोजे आदीसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, एमआयडीसी परिसरात चौका चौकात अवैद्य धंदे वाढलेत गांजा, मटका, गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात चालत आहे यामुळे उद्योजक व महिला कामगारांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी यावर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळाव्यात, तसेच सन फार्मा व सह्याद्री चौकात कायम वाहतूक कोंडी होत असल्यामुळे तिथे ट्राफिक पोलिसाची नेमणूक करावी, तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी याचबरोबर एल ब्लॉक मध्ये पोलीस चौकी उभी करण्याची मागणी उद्योजकांनी जिल्हा पोलीस अधिक्षक राकेक्ष ओला यांच्याकडे केली आहे.

अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली

एम.आय.डी.सी परिसरामध्ये अवैद्य धंद्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे गुन्हेगारी देखील वाढली आहे. कामगारांमध्ये भांडणे होत असून थेट उद्योजकांनाच मारहाण, दमबाजी केली जाते. पगाराच्या दिवशी पाळत ठेवून चोऱ्या केल्या जातात यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी एमआयडीसीतील उद्योजकांनी केली.

पोलिसांनी कडक कारवाईची मोहीम सुरु करावी

क्लासिक हॉटेल ते गांधीनगर पर्यंतच्या रस्त्यावर राजरोजपणे अवैद्य धंदे सुरू असून अल्पवयीन मुले व्यसन करून त्यांच्याकडून गुन्हे घडत आहेत. उद्योजक हा आपल्या देशाचा आर्थिक कणा असून त्यांना व्यवसायासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे ही आपली जबाबदारी आहे पोलीस प्रशासनाने कडक कारवाईची मोहीम हाती घेऊन गुन्हेगारांवर वचक निर्माण करावी अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.