नगर – नगर शहरातील बाजारपेठ परिसरातील अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने १८ फेब्रुवारीला मोठ्या पोलिस बंदोबस्तात हटविली आहेत. त्यामुळे बाजार पेठेतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. या मोहिमेत महापालिकेने सातत्य ठेवण्याची मागणी बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने केली आहे.
शहरातील भिंगारवाला चौक, कापड बाजार रोड ते तेली खुंट चौक ते घासगल्ली, कापड बाजार रोड लगत असणारे अतिक्रमणे टपऱ्या, लोखंडी जाळ्या, हातगाड्या हटविण्यात आल्या. घास गल्ली ते नवी पेठ कॉर्नर ते परत घास गल्ली ते मोची गल्ली लाईटच्या खांबावरील जाहिरातीचे व दुकानदारांचे फ्लेक्स बोर्ड हटविण्यात आले. मोची गल्ली, महावीर कॉर्नर, गंज बाजार रोड, भाजी मार्केट, सराफ बाजार रस्ता, दुर्गा सिंग लस्सी रोड लगत असणारे पूजा साहित्य विक्रेत्यांचे लोखंडी टेबल, भिंती लगत असणारे फायबर टेबल खुर्च्या हटविण्यात आल्या.
अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ, उपअभियंता सुरेश इथापे, मुख्यालय क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख व नितीन इंगळे यांच्या सह पथकातील कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली. यावेळी कोतवाली पोलीस स्टेशनकडून पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला होता.





