शासकीय जागेवरील अतिक्रमणांवर हातोडा, पक्की घरे केली जमीनदोस्त

वडगाव गुप्ता शिवारात मोठ्या पोलिस बंदोबस्तात महसूल विभागाची कारवाई

नगर – नगर तालुयातील वडगाव गुप्ता परिसरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे महसूल
प्रशासनाने विरोध झुगारून काढली. पत्र्याचे शेड असलेली सुमारे ३० ते ३५ घरे जेसीबीच्या साहाय्याने
जमीनदोस्त करण्यात आली. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात
आली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वडगाव गुप्ता परिसरात डॉ. विखे
पाटील फाउंडेशनच्या मागील बाजूस शासकीय जमिनीवर ही बांधकामे होती. शुक्रवारी
(दि.२१ फेब्रुवारी) सकाळीच प्रशासनाने कारवाई सुरू केली. यावेळी पोलिस उपअधीक्षक संपतराव
भोसले, एमआयडीसी पोलिस व अतिरिक्त पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
रहिवाशांचा विरोध झुगारून जेसीबीच्या साहाय्याने पत्र्याचे शेड असलेली घरे जमीनदोस्त करण्यात
आली. दरम्यान, या रहिवाशांनी तहसील कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या
होत्या. त्याला उत्तर देताना सदर ३०० एकर जागा ही बँकवर्ड लास सोसायटीला शासनाने
१९६४ च्या सुमारास दिलेली असल्याचा दावा रहिवाशांनी केला. तसेच, अनेक वर्षांपासून आम्ही
येथे वास्तव्य करत आहोत. या जागेबाबत महसूल विभागाच्या सचिवांकडे सुनावणी सुरू आहे, असेही
त्यांनी म्हटले होते. सदर गटातील जागा सुमारे ९०० एकर आहे. त्यातील ३०० एकर बॅकवर्ड
लास सोसायटीला देण्यात आली होती. इतर ६०० एकर जागेतील काही जागा वन विभागाची आहे. काही जागा विखे पाटील फाऊंडेशनला देण्यात आलेली आहे. ज्या जागेवर कारवाई झाली आहे, ती बँकवर्ड लास सोसायटीला दिलेली
जागा नसल्याचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांची होणारी लूट थांबवावी

रुग्णालयांवर तात्काळ कारवाईची मागणी

नगर – जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची मोठी आर्थिक
लूट होत आहे. तर आर्थिक लूट करणार्‍या धर्मदाय रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी
धर्मदाय उपायुक्त कार्यालयातील अधीक्षक शेकडे यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा सल्लागार जे.डी. शिरसाठ, शहराध्यक्ष हनीफ शेख, शहर उपाध्यक्ष
प्रवीण ओरे, भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे, पी.के. गवारे, संजय शिंदे, पिनू भोसले, एकनाथ गायकवाड, प्रकाश साळवे, देविदास भालेराव, प्रतीक जाधव आदीसह उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर
जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयामध्ये उच्च न्यायालयाने आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन होत आहे. या
रुग्णालयांमध्ये आर्थिक उत्पन्न कमी असलेले व दारिद्र रेषाखालील कुटुंबांना मोफत
उपचार पद्धती मिळावे, यासाठी शासनाने धर्मदाय रुग्णालय यांना कर सवलत देऊन
लोकसेवा करण्यासाठी गरीब, वंचित नागरिकांना उपचार मोफत व कमी दरामध्ये
मिळावा यासाठी प्रयत्न करत असते. परंतु धर्मदाय कार्यालयात नोंदणीकृत धनदांडगे
रुग्णालय हे रुग्णांकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून रुग्णाच्या परिस्थितीचा फायदा
घेत अवाजावी रक्कमसह अनामत रक्कम घेताना अनेकदा आढळून आलेले आहे. त्यांची
कुठलीही अधिकृत नोंद रुग्णालयाच्या दप्तरीमध्ये नसून, त्याचे धर्मदाय रुग्ण म्हणून
नोंद केलेली असते. अशी माहिती रुग्णास किंवा त्यांच्या नातेवाईकांना नसते. उच्च
न्यायालय व त्यांच्या निर्देशाचे उल्लंघन आणि राज्य
शासनाचे महसूल बुडवण्याचा प्रकार सर्रासपणे होत
असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील वर्षी २०२४ मध्ये शहरातील
नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये दुर्गम भागातील एका
कुटुंबातील कर्ता व्यक्तीस किडनी स्टोन ऑपरेशन
करिता दाखल केले असताना त्यांच्याकडून अनामत
रक्कमेसह विविध टेस्ट करण्यासाठी आणि औषध
घेण्यासाठी दमदाटी करीत अरेरावेची भाषा वापरत
पैसे उकळण्यात आले. या प्रकरणात धर्मदाय
रुग्णालय निरीक्षक आणि धर्मादाय उपायुक्त यांनी
पत्राद्वारे सूचित करून देखील तेथील प्रशासकीय
अधिकारी यांनी लेखी आदेशाचे पालन न करता
अधिकार्‍याच्या आदेशाला केराची टोपली दाखवली.
शहरातील त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना व
त्यांच्या नातेवाईकांना अत्यंत हिन प्रकारची वागणूक देऊन पैसा उकळण्याचा धंदा
केला जातो. याचे सर्व पुरावे संघटनेकडे असल्याचे म्हंटले आहे.
जिल्ह्यातील सर्व धर्मदाय रुग्णालयांमध्ये निर्देशांचे पालन होत नाही, रुग्णांना
व नातेवाईकांना राहण्याची सोय उपलब्ध नसते, त्यांना जेणेकरून रुग्णालयातच
उघड्यावर झोपावे लागते. त्यामुळे त्यांचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. तसेच रुग्णाची
आर्थिक नुकसान देखील होते. धर्मदाय रुग्णालयांना रुग्णाचे नातेवाईकांसाठी राहण्याची
व कमी दारात चांगल्या दर्जाच्या जेवणाची सोय उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावे,
धर्मदाय कार्यालयाकडून नेमलेले रुग्णालयामधील प्रशासकीय अधिकारी यांची चौकशी
करण्यात यावी व त्यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

वाढती अतिक्रमण व अवैध धंद्यांमुळे माळीवाडा वेशीचा श्वास गुदमरला

दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना होतोय त्रास; महापालिका आयुक्तांचे निवेदनाद्वारे नागरिकाने वेधले लक्ष, कारवाईची मागणी

नगर – अहिल्यानगर शहरात मध्यवर्ती असलेल्या माळीवाडा चौक आणि वेशीच्या परिसराला अतिक्रमण
आणि अवैध धंदेवाल्यांनी पूर्णपणे विळखा घातला असून हा परिसर पुर्णपणे काबीज केलेला दिसत आहे. माळीवाडा
वेस येथे महात्मा फुले यांचे स्मारक असून त्या पासून जवळच शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर आहे. या
ठिकाणी दररोज अनेक भाविक दर्शनाला येतात. मात्र त्यांना या अतिक्रमणांमुळे
वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील अतिक्रमण
व अवैध धंदे कधी बंद होणार? माळीवाडा वेस कधी मोकळा श्वास घेणार असा सवाल
या परिसरातील नागरिक विरभाऊ पाचपुते यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना
केला आहे.  याबाबत दिलेल्या निवेदनात पाचपुते यांनी म्हटले आहे की, माळीवाडा वेशीला
तर चारीही बाजूने अतिक्रमणांनी वेढा घातला आहे. तेथे तर लागणार्‍या अनधिकृत हातगाड्या, टपर्‍या यांनी वेशीच्या नावावर
अनधिकृत नळ जोडणी केली व वेशीच्या वरील वीजेच्या लाईनवर केबल टाकून स्वतःच्या अतिक्रमणातील गाड्यांना वीज
जोड घेतले आहेत. महत्वाचे म्हणजे वेशीच्या शेजारी, बाजूस चहा, वडेवाल्यांनी गाळे भाडे
तत्वावर घेऊन त्या पुढे रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेले
गाळे हे त्यांना रोजगारासाठी दिले होते परंतु त्यांनी त्याच्यावर अनाधिकृत बांधकाम
करुन त्या गाळ्यात अवैध व्यवसाय चालू केला. या विरोधात अनेक वेळा
तेथील स्थानिक नागरिकांनी निवेदन दिले परंतू ठोस अशी कार्यवाही करण्यात येत नाही. महापालिकेच्या
अतिक्रमण विभागाचे पथक आले की हे लोक गाड्या काढतात आणि नंतर परत लावतात. त्यामुळे खुप मोठ्या प्रमणात
वाहतूक कोंडी होते. चतुर्थी असल्यास या अतिक्रमणामुळे हा रस्ता बंद ठेवावा लागतो.
त्यामुळे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच पोलिस प्रशासनास आवाहन आहे की, या माळीवाडा चौकाला मोकळा श्वास घेऊ द्या, तेथील अवैध धंदे बंद करा तसेच अवैध नळ जोडणी करणार्‍या, विज चोरी करणार्‍यांविरुध्द गुन्हे नोंदवून ते अतिक्रमण तात्काळ कायमस्वरुपी काढून टाकावे, अशी मागणी पाचपुते यांनी निवेदनात केली आहे.

विचार भारती व रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीच्या कार्यशाळेत सर्वपक्षिय पदाधिकार्‍यांचा सहभाग

अहिल्यानगरच्या विचार भारतीच्यावतीने भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीमध्ये होणार्‍या राजकीय प्रशिक्षण कार्यशाळेस नोदणी केलेल्या पदाधिकार्‍यांची नुकतीच बैठक झाली

नगर – राजकारणद्वारे जनसेवा करण्याची इच्छा
असलेल्यांसाठी तसेच भविष्यातील राजकीय नेता,
लोकप्रतिनिधी व कार्यकर्ता होण्याची इच्छा असलेल्यांसाठी अहिल्यानगरच्या विचार
भारतीच्यावतीने भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीमध्ये दोन दिवसीय राजकीय
प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेच्या नोंदणीस सर्व प्रमुख
पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत नोंदणी केली आहे. २४ व २५
फेब्रुवारी रोजी भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीमध्ये ही होणार कार्यशाळा
होणार आहे, अशी माहिती विचार भारतीचे गिरीश अग्रवाल यांनी दिली.
कार्यशाळेसाठी नोंदणी केलेल्यांची नुकतीच बैठक झाली. यामध्ये सहभागी
झालेल्यांना कार्यशाळेबद्दल सविस्तर माहिती व सूचना देण्यात आल्या. रवींद्र मुळे यांनी
मार्गदर्शन करताना राजकीय भिंती असाव्यात पण त्याची उंची इतकीही नसावी की
ज्याच्यामुळे नगरचा विकास थांबेल. सर्व पक्षांनी एकत्र येत नगरच्या विकासाचा विचार
करावा या उद्देशानेच विचार भारतीने या कार्यशाळेचे
आयोजन केले आहे. भविष्यातील सुसंस्कृत व अभ्यासू
लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेतृत्व घडवण्यासाठी ही कार्यशाळा फलदायी ठरेल,
असे सांगितले.
प्रास्ताविकात विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे यांनी उपक्रमांची माहिती
दिली. गौतम मुनोत यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष अनिल मोहिते यांनी रामभाऊ
म्हाळगी प्रबोधानीची महिती दिली. अशोक गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर रवींद्र
बारस्कर यांनी आभार मानले.
यावेळी अभय आगरकर यांच्यासह कार्यशाळेत सहभागी झालेले शिवसेनेचे संभाजी
कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक निखील वारे
व पुष्पा बोरुडे यांनी मनोगत व्यक्त करत शहरातील नागरिकांसाठी प्रथमच अशा
कार्यशाळेचे आयोजन विचार भारतीने केल्याबद्दल आभार मानले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने व संस्काराने मुले घडली पाहिजे

अभिषेक कळमकर यांचे प्रतिपादन, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात अवतरली शिवशाही

नगर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने व संस्काराने
मुले घडली पाहिजे. महाराजांनी सर्व जाती-धर्माच्या मावळ्यांना
एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले. शिवरायांचा पराक्रम,
संघर्ष, शौर्याचा इतिहास विद्यार्थ्यांना माहिती व्हावा,
या उद्देशाने हे सांस्कृतिक कार्यक्रम दिशादर्शक आहे.
शिवरायांचे गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करुन जीवनाची
यशस्वी वाटचाल करण्याचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल
बॉडी सदस्य अभिषेक कळमकर यांनी आवाहन केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी
महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे
बहारदार सादरीकरण करुन उपस्थितांच्या डोळ्यांचे
पारणे फेडले. तसेच साकारण्यात आलेल्या छत्रपती
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला
उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. जय भवानी… जय शिवाजी च्या जय
घोषात संपूर्ण सभागृह दणाणला. विद्यार्थ्यांनी सादर केलेले पोवाडे, बाळ शिवाजीची रणनिती
व मावळे, माँ साहेब जिजाऊंचे संस्कार, स्वराज्य स्थापनेची घेतलेली शपथ तसेच अनेक
गड व किल्ले जिंकत शत्रूंना यमसदनी धाडणारे शिवरायांचा पराक्रम विद्यार्थ्यांनी रंगमंचावर
जिवंत केला. अश्वावर स्वार होऊन सभागृहात दाखल झालेले शिवाजी महाराजांच्या प्रवेशाने
महाराजांचा एकच जयघोष करण्यात आला.
लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव
व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करुन दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी अभिषेक कळमकर, ज्ञानदेव पांडुळे, अंबादास गारुडकर, शिक्षण उपसंचालक
रमाकांत काठमोरे, सुरेश थोरात, काकासाहेब वाळुंजकर, निलेश मालपाणी, प्राथमिकचे
मुख्याध्यापक शिवाजी लंके, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, कैलास गुंजाळ
आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी गुणवत्तेसाठी शाळा आघाडीवर असून,
अनेक स्पर्धा परीक्षेत शालेय विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत तर मोठ्या संख्येने
जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले आहे. याशिवाय कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही
विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी
विविध गीतांमधून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन
घडविले. प्रारंभी महाराष्ट्र शासनाच्या बालनाट्य स्पर्धेत
सहभागी झालेल्या न्याय देता का न्याय! या नाटकाचे
देखील सादरीकरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राची
संस्कृती जिवंत करुन येथील सण-उत्सव, रुढीय्परंपरा, धार्मिक वातावरण, ऐतिहासिक ठेव्याचे दर्शन
घडविण्यात आले.
शिवाजी महाराजांचा जन्म, मावळ्यांसह स्वराज्य
स्थापनेची घेतलेली शपथ, विविध गड, किल्ले युक्ती
आणि शक्तीने मिळवतानाचे दृश्य रंगमंचावर सादर
करण्यात आले. अफजल खानाचा वधाचा प्रसंग
यावेळी विद्यार्थ्यांनी जिवंत केला. उपस्थित पालकांनी
टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद
दिली. स्वराज स्थापन करुन झालेल्या राज्याभिषेकाच्या दिमाखदार सोहळ्याने उपस्थितांच्या
अंगावर शहारे आणले.
सूत्रसंचालन प्रदीप पालवे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता
दोमल व शिल्पा कानडे यांनी केले. आभार ज्ञानदेव पांडुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी उर्मिला साळुंके, मिनाक्षी खोडदे, रुपाली वाबळे, अमित धामणे, मंगेश कारखिळे,
जयश्री खांदोडे, शितल रोहोकले, भाग्यश्री लोंढे, भारती राऊत, इंदूमती दरेकर, पुनम घाडगे
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

मंदिर व धार्मिक कार्यासाठी कोणतीही कमतरता पडू देणार नाही

उद्योजक सचिन कोतकर यांचे आश्वासन; केडगावला अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याला प्रारंभ, श्री विश्वेश्वर प्रतिष्ठानतर्फे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक सोहळा

नगर – प्रत्येक वर्षी ३० ते ३२ सप्ताह केडगावमध्ये होतात. हिंदुत्व व समाजासाठी संस्काराची चळवळ या
उपनगरात चालवली जात आहे. यासाठी कोतकर परिवाराचा नेहमीच पुढाकार व सहकार्य राहिले आहे. मंदिरासाठी व
धार्मिक कार्यासाठी कोतकर परिवार व मित्र मंडळ सातत्याने धावून जातात. धार्मिक
कार्यासाठी कोणतीही कमतरता  पडू देत नसल्याचे उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांनी
सांगितले. तर परमार्थासाठी स्वतःच्या हिशोबाने व्यवसाय करण्याचे त्यांनी युवकांना आवाहन केले.
केडगाव मधील उदयनराजेनगर येथे श्री विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अखंड
हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी शिवलिलामृत पारायण आणि तपपुर्ती सोहळ्याचे प्रारंभ झाले. २० ते
२७ फेब्रुवारी पर्यंत चालणार्‍या या धार्मिक सोहळ्याचे हे तेरावे वर्ष आहे. या सप्ताहाचे उद्घाटन उद्योजक सचिन
(आबा) कोतकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी माजी नगरसेवक गणेश कवडे, इंजि. प्रसाद
आंधळे, सचिन सातपुते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते, भूषण गुंड, सागर सातपुते, अशोक कराळे,
महेश घोडके, महेश महाराज मडके, हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज जाधव, उद्योजक महेश वाळके, मुकुंद
दळवी, सुनील उमाप, पोपट कराळे, भीमा सातपुते, ह.भ.प. बाळासाहेब मुंडे, ह.भ.प. मोकाटे, बाबुराव
खोसे, गणेश भागवत, विठ्ठल साबळे, खेडकर मेजर, संजय खामकर, विशाल सकट, मच्छिंद्र भांबरे, स्वप्नील
पवार, गोरक्षनाथ कोकाटे, योगेश डोंगरे, राजेंद्र कोल्हे, रोहित धांडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते कलश पूजन, प्रतिमापूजन व तुलसी पूजन पार पडले.
प्रास्ताविकात गणेश सातपुते म्हणाले की, समाजात व भावी पिढीत
संस्कार रुजवण्यासाठी आणि आपल्या धर्माचे ज्ञान देण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन दरवर्षी
केले जाते. धर्म व परमार्थातून यशस्वी जीवनाची वाटचाल करता येणार आहे. यासाठी
सर्वांना या धार्मिक सोहळ्यातून जोडले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गणेश कवडे यांनी शहर, उपनगरात खर्‍या अर्थाने सप्ताहाची गरज आहे.
संस्कारापासून लांब चाललेली पिढी या सप्ताहातून धर्माला जोडली जाणार असल्याची
भावना त्यांनी व्यक्त केली. गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या प्रेरणेने व हरिभक्त परायण महेश महाराज मडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पार
पडत आहे. सात दिवस या सप्ताहात महाराष्ट्रातील
कीर्तनकार यांचे कीर्तन सेवा होणार असून, काकडा,
भजन, ज्ञानेश्वरी आणि शिवलीलामृत पारायण, हरिपाठ,
महाआरती आणि हरिकीर्तनयांसह विविध धार्मिक
कार्यक्रम होणार आहे.
या धार्मिक सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांना
उपस्थित राहण्याचे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने
करण्यात आले आहे.

आंतरशालेय इंग्रजी स्पेलिंग कॉम्पिटिशनला प्रतिसाद

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रीतीज पाठशाळेचा उपक्रम; विद्यार्थ्यांनी दाखवली बुध्दीमत्तेची चुणूक

नगर – विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना देण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी प्रीतीज पाठशाळेच्या वतीने शहरात
स्पेल इट वेल या आंतरशालेय इंग्रजी स्पेलिंग कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा
प्रतिसाद लाभला. इंग्रजी भाषेतील विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह व त्याचे योग्य स्पेलिंग अवगत करण्याच्या
उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. वाडियापार्क
येथील श्री विद्या निकेतनमध्ये झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धे चे परीक्षक चंचल खितानी, अनिता गंभीर, भावना शिंगी,
तन्वी शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रीतीज पाठशाळेच्या संस्थापिका प्रीती मुथियान, पाठशाळेच्या
सोनिया घंगाळे, शीतल मुनोत, रिना मुनोत, खुशी डागा, चारुशीला शिंदे, प्रगती व्यवहारे, रुशिता गुजराती
आदींसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रीती मुथियान यांनी लहान वयातच विद्यार्थ्यांना
विविध स्पर्धांना सामोरे जाण्याची सवय होण्यासाठी व इंग्रजीतील स्पेलिंगची योग्य माहिती होण्याच्या उद्देशाने
या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. सह संस्थापक चेतन मुथियान यांनी उपस्थित पाहुणे व
पालकांचे स्वागत केले. या स्पर्धेदरम्यान पालकांसाठी मुलांच्या स्पेलिंग सुधारण्यासाठी मार्गदर्शन करण्यात
आले. एल.के.जी ते इयत्ता ५ वी पर्यंतच्या गटामध्ये चुरशीच्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत शहर व उपनगरातील
इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमधील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. तोंडी
व लेखी पध्दतीने पार पडलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या बुध्दीमत्तेची चुणूक दाखवली.
एल.के.जी. गटात प्रथम- यशवर्धन सुद्रिक, द्वितीय- तन्वी गट, तृतीय- युगंधरा सुद्रिक, उत्तेजनार्थ-
रिधन अडसुरे, श्रेयांश कटारिया, रुद्रांश शमा. यु.के. जी. गटात प्रथम- अंश तलरेजा,
द्वितीय- दिव्यन नवलानी, तृतीय- लब्धी डागा. उत्तेजनार्थ- आराध्या झलते, कबीर शाह, परनीत कौर,
हीना तलरेजा. इयत्ता १ ली च्या गटात प्रथम- प्रारब्धी मंत्री, द्वितीय- सान्वी अग्रवाल, तृतीय-
इहान बच्छावत. इयत्ता २ री च्या गटात प्रथम- रियांश धानोरकर, द्वितीय- भाव्या संचेती. इयत्ता ३ री
च्या गटात प्रथम- कियान खत्ती, द्वितीय- वरद सुपेकर. इयत्ता ४ थी च्या गटात प्रथम- अर्णवी चव्हाण,
द्वितीय- समृद्धी झीने. इयत्ता ५ वी च्या गटात प्रथम- तनिष्क रापरिया, द्वितीय- अनय कर्णावट
यांनी बक्षिसे पटकावली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे
देण्यात आली. तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मेडल आणि
फन की लॅण्डचे ५० टक्के सवलतीचे कूपन देण्यात आले.
स्पर्धेदरम्यान पालकांसाठी विशेष अर्हम पुरुषाकार ध्यान
सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या ध्यानसाधनेचा
उद्देश पालकांचे आरोग्य सुधारणे, एकाग्रता वाढवणे
आणि मानसिक शांतता प्रदान करणे हा होता. ध्यानाच्या
माध्यमातून उत्तम विचारसरणी, तणावमुक्त जीवन
आणि सकारात्मक उर्जेचा संचार कसा होतो? याबद्दल
पालकांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले

नगर अर्बन बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी कडक पावलं उचलली पाहिजेत

नगर – नगर अर्बन बँकेतील कोट्यवधींच्या
घोटाळ्याप्रकरणी तब्बल १०५ आरोपी निष्पन्न झाले
आहेत. यात आतापर्यंत सुमारे १५ ते २० आरोपींना
अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपी आजही उजळ माथ्याने फिरत
आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच अर्बन
बँकेच्या पिडित ठेवीदारांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या
प्रकरणाच्या सखोल कारवाईबाबत आदेश दिले. तरीही आरोपी मोकाट आहेत.
संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात अतिशय कणखर भूमिका घेत कारवाई
सुरू केली. दुर्दैवाने नगरमधील या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तितके गांभीर्य फडणवीस
यांच्या गृहखात्याकडुन दिसत नाही, अशी खंत बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी
व्यक्त केली आहे.
राजेंद्र चोपडा यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नगर अर्बन बँकेत तब्बल
२९१ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या फॉरेन्सिक
ऑडिट रिपोर्टमध्येच सदर बाब निष्पन्न होऊ सुमारे १०५ आरोपींची नावे निश्चित
करण्यात आली आहेत. परंतु या प्रकरणात कारवाई कासव गतीने चालू आहे. फक्त
१५ ते २० आरोपींना अद्याप अटक झाली आहे. उर्वरित आरोपी मोकाट फिरत आहेत.
आरोपींची अटक, त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई अद्याप सुरू झालेली नाही. बँकेची
कर्ज थकबाकी वसुली सुद्धा ठप्प आहे. परिणामी हजारो ठेवीदार त्यांच्या हक्काच्या
पैशापासून वंचित आहेत. त्यांच्यासमोर जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन अतिशय धिम्या गतीने कारवाई करत असल्याने
या प्रकरणी आरोपींवर कायदेशीर कारवाई कधी होणार
आणि सर्वसामान्य ठेवीदारांना न्याय कधी मिळणार हा
प्रश्न उपस्थित होत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांनी संवेदनशीलपणे ठेवीदार, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन,
बँकेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन आदेश पारित केले. त्यानुसार आता
पर्यंत काय कारवाई झाली याची कोणतीही माहिती ठेवीदार तसंच बँक बचाव
कृती समितीला दिली जात नाही. दुसरीकडे आरोपी बिनधास्त फिरत आहेत.
पोलिसांनी ठरवले तर सगळेच आरोपी चोवीस तासात अटक होऊ शकतात.
फरार आरोपी त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात नक्कीच असतील. यासाठी
पोलिसांनी त्यांचे मोबाईल सीडीआर तपासणी केली पाहिजे. आताच्या आधुनिक
तंत्रज्ञानाच्या काळात हे सहज शय आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
हे सुद्धा पोलिस तपासात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आग्रही असतात. तरी
सुद्धा नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेला तसेच तपासी यंत्रणेला या मोठ्या आर्थिक
घोटाळ्यातील आरोपींचा शोध लागेत नसेल तर हे खूप मोठं दुर्दैव आहे.
या कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपींची मालमत्ता जप्तीची प्रक्रियाही
जलदगतीने होणे आवश्यक आहे. आमच्यासारखे बँकेचे हितचिंतक यासाठी सातत्याने
पाठपुरावा करत आहेत. बँकेच्या अवसायकांनीही कठोर भूमिका घेतली पाहिजे.
कारण नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यामुळे सर्वसामान्यांचा सहकारी बँकिंग, सहकारी
पतसंस्थांवरील विश्वास डळमळीत होऊ लागला आहे. भविष्यात अशा आर्थिक
घोटाळ्यामुळे इतरही सहकारी बँका अडचणीत आल्यसा सर्वसामान्य ठेवीदारांचे मोठे
आर्थिक नुकसान होऊ शकते, असे राजेंद्र चोपडा यांनी म्हटले आहे

शिवजयंतीनिमित्त नगरमध्ये ‘शिवजन्मोत्सवा’चा देखावा

छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समिती आणि स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी
विद्यार्थी संघटनेच्या वतीने शिवजयंतीच्या पारंपरिक मिरवणूकीत शिवजन्मोत्सवाचा देखावा साकारला
होता. यात पाळण्यात बाळ शिवबा आणि जिजाऊ आणि सहकार्‍यांच्या वेशभूषेत मुली होत्या. सोबतच
स्मारक समितीचे सचिव रिनुल नागवडे, जिजाबाई महिला बहुद्देशीय संस्थेच्या प्रा.नंदा पांडूळे, बांधकाम
व्यावसायिक धिरज कुमटकर, मयुर ढगे, कल्याणी कुमटकर, शिवतेज इलेट्रिकलच्या संचालिका
ऋतुजा जानवळे आणि स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल आदींनी या मिरवणुकीसाठी
परिश्रम घेतले होते. या शिवजन्मोत्सव देखावा मिरवणुकीत मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात होती, हे या
देखाव्याचे वैशिष्ट्य होते. शहरभर याचे कौतुक केले गेल

नगरला मेहेरबाबांच्या जन्मोत्सवास २५ फेब्रुवारीपासून प्रारंभ, दरवर्षीप्रमाणे विविध संगीत कार्यक्रमांचे आयोजन

नगर – नगरमधील सरोष पेट्रोलपंपा शेजारील
केंद्रामध्ये अवतार मेहेरबाबांचा १३१ वा जन्मोत्सव
कार्यक्रम २५ फेबुवारीपासून सुरु होत असून १ मार्चपर्यंत
चालणार आहे, अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष मेहेरनाथ
कलचुरी यांनी दिली.
२५ फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वा. अवतार मेहेरबाबांचा
जन्मोत्सव सोहळा होणार आहे. याप्रसंगी विविध कार्यक्रम
होणार आहे. नगरसह देश विदेशातील भाविक यावेळी गीते
सादर करतील. तर बाबा कार्याविषयी प्रवचनही होणार
आहे. इर्विन लक, मर्टल बीच, अमेरिका यांचे बाबांवरील भाषण
होईल. नंतर सकाळी ९ वाजता श्रीमती रमा कलचुरी यांचे हस्ते
मेहेरबाबाच्या सप्तरंगी ध्वजाचे अनावरण होणार आहे. ध्वजारोहण
हे मेहर नजर ट्रस्ट कंपाऊंडमध्ये होईल. यावेळी ध्वजगीत, भजन,
आरती होईल. सुनील मांढरे हे यावेळी माहिती देतील नंतर प्रार्थाना
व प्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
२६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ ते ८ यावेळेत श्रीराम
तबला अकादमीचा ‘ताल स्तुती’ हा कार्यक्रम शेखर दरवाडे आणि
विद्यार्थी सादर करतील. त्यांना साथसोबत मकरंद खरवंडीकर हार्मो
नियमने करतील. नंतर संतूरसह ध्यान संगीत ज्ञानेश्वर दुधाडे हे
सादर करतील.
२७ फेब्रुवारीला रात्री ७ ते ९ यावेळेत अनिरुद्ध
पंडित, तबला कलाकार, पुणे (मुकुंद पंडित यांचे पुत्र,
तबला वादक) अभेद अभिषेकी, शास्त्रीय गायक, पुणे
(पद्मश्री पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे नातू) हे कार्यक्रम
सादर करतील.
२८ फेब्रुवारी संध्या. ७ वा. साहित्य संगीत कला
मंच, संभाजीनगर यांचा गीत गझल हा कार्यक्रम वर्षा
जोशी आणि वैभव पांडे सादर करतील. यामध्ये शांतीभूषण
देशपांडे, हार्मोनियम, गजानन धुमाळ, तबला, प्रबोध जोशी,
व्हायोलिन तर श्रीकांत उमरीकर हे सूत्रसंचालन करतील.
१ मार्चला संध्या ५ वाजता नगर सेंटरचे सदस्य सांस्कृतिक
कार्यक्रम सादर करतील. यामध्ये भजन, गाणी, गझल, नृत्य, तसेच
पाश्चिमात्य बाबाप्रेमींचे गायन, वादन यांचे सादरीकरण व नंतर ह्यू
मॅकडोनाल्ड यांचे मॅजिक शो, श्रीमती रमा कलचुरी यांचे कोडे, मजा
आणि बक्षिसे देण्यात येतील.
सर्व नगरकरांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन
नगर सेंटरचे उपाध्यक्ष वैभव जोशी व पदाधिकारी व सदस्यांनी केले
आहे