जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांची होणारी लूट थांबवावी

0
57

रुग्णालयांवर तात्काळ कारवाईची मागणी

नगर – जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची मोठी आर्थिक
लूट होत आहे. तर आर्थिक लूट करणार्‍या धर्मदाय रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी
धर्मदाय उपायुक्त कार्यालयातील अधीक्षक शेकडे यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा सल्लागार जे.डी. शिरसाठ, शहराध्यक्ष हनीफ शेख, शहर उपाध्यक्ष
प्रवीण ओरे, भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे, पी.के. गवारे, संजय शिंदे, पिनू भोसले, एकनाथ गायकवाड, प्रकाश साळवे, देविदास भालेराव, प्रतीक जाधव आदीसह उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर
जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयामध्ये उच्च न्यायालयाने आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन होत आहे. या
रुग्णालयांमध्ये आर्थिक उत्पन्न कमी असलेले व दारिद्र रेषाखालील कुटुंबांना मोफत
उपचार पद्धती मिळावे, यासाठी शासनाने धर्मदाय रुग्णालय यांना कर सवलत देऊन
लोकसेवा करण्यासाठी गरीब, वंचित नागरिकांना उपचार मोफत व कमी दरामध्ये
मिळावा यासाठी प्रयत्न करत असते. परंतु धर्मदाय कार्यालयात नोंदणीकृत धनदांडगे
रुग्णालय हे रुग्णांकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून रुग्णाच्या परिस्थितीचा फायदा
घेत अवाजावी रक्कमसह अनामत रक्कम घेताना अनेकदा आढळून आलेले आहे. त्यांची
कुठलीही अधिकृत नोंद रुग्णालयाच्या दप्तरीमध्ये नसून, त्याचे धर्मदाय रुग्ण म्हणून
नोंद केलेली असते. अशी माहिती रुग्णास किंवा त्यांच्या नातेवाईकांना नसते. उच्च
न्यायालय व त्यांच्या निर्देशाचे उल्लंघन आणि राज्य
शासनाचे महसूल बुडवण्याचा प्रकार सर्रासपणे होत
असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील वर्षी २०२४ मध्ये शहरातील
नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये दुर्गम भागातील एका
कुटुंबातील कर्ता व्यक्तीस किडनी स्टोन ऑपरेशन
करिता दाखल केले असताना त्यांच्याकडून अनामत
रक्कमेसह विविध टेस्ट करण्यासाठी आणि औषध
घेण्यासाठी दमदाटी करीत अरेरावेची भाषा वापरत
पैसे उकळण्यात आले. या प्रकरणात धर्मदाय
रुग्णालय निरीक्षक आणि धर्मादाय उपायुक्त यांनी
पत्राद्वारे सूचित करून देखील तेथील प्रशासकीय
अधिकारी यांनी लेखी आदेशाचे पालन न करता
अधिकार्‍याच्या आदेशाला केराची टोपली दाखवली.
शहरातील त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना व
त्यांच्या नातेवाईकांना अत्यंत हिन प्रकारची वागणूक देऊन पैसा उकळण्याचा धंदा
केला जातो. याचे सर्व पुरावे संघटनेकडे असल्याचे म्हंटले आहे.
जिल्ह्यातील सर्व धर्मदाय रुग्णालयांमध्ये निर्देशांचे पालन होत नाही, रुग्णांना
व नातेवाईकांना राहण्याची सोय उपलब्ध नसते, त्यांना जेणेकरून रुग्णालयातच
उघड्यावर झोपावे लागते. त्यामुळे त्यांचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. तसेच रुग्णाची
आर्थिक नुकसान देखील होते. धर्मदाय रुग्णालयांना रुग्णाचे नातेवाईकांसाठी राहण्याची
व कमी दारात चांगल्या दर्जाच्या जेवणाची सोय उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावे,
धर्मदाय कार्यालयाकडून नेमलेले रुग्णालयामधील प्रशासकीय अधिकारी यांची चौकशी
करण्यात यावी व त्यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.